जाणिवेचा स्पर्श

विवेक मराठी    18-Jul-2016   
Total Views |

शिक्षण क्षेत्र हे खरं तर शाळा, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अतूट विश्वासावर आधारलेलं असतं. हा एक अनेक माणसांच्यातला विश्वासाचा बंध होता, आहे आणि असला पाहिजे. पण परिस्थिती बदलते आहे का? विश्वास डळमळतो आहे का? मुलांभोवतीचं पालकांचं सुरक्षा कवच जरा अधिकच काळजीवाहू नाही ना? शिक्षक आणि मुलं यांच्यात असलेलं नातं निखळ आहे ना? ते असावं यासाठी घरातून आणि शाळेतून योग्य ते वातावरण तयार केलं जातं आहे का? प्रश्नच प्रश्न आणि अर्थातच याची उत्तरं प्रत्येक ठिकाणी मिळणार वेगवेगळी....


रपूर पाऊस पडून गेला होता. रस्ते, घरं, बागा, माणसं, दुकानं - सगळं कसं तरतरीत झालं होतं. लहान मुलांचे चेहरे नाही का आंघोळ केल्यावर कसे फ्रेश दिसतात! अगदी तशीच प्रसन्नता वातावरणात भरून राहिली होती. संध्याकाळची 5-5.30ची शाळा सुटण्याची वेळ होती. आनंदनिकेतन शाळा सुटली आणि मुलं हातातली दप्तरं, डबे, छत्र्या, रेनकोट सावरत 'हुई' करून वर्गातून बाहेर पडली. राणीला आज काही फारशी घाई नव्हती, कारण आई थोडी उशिराच तिला न्यायला येणार होती. रमत-गमत राणी शाळेच्या ग्राउंडमध्ये आली. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हवेत छानसा गारवा होता. ग्राउंडमध्ये ठिकठिकाणी असलेल्या खळग्यात पाणी साचलं होतं. मग काय, दप्तर व्हरांडयात टाकून राणीजी निघाल्या पाण्यात खेळायला! पाणी साचलेल्या एका डबक्यात मनसोक्त उडया मारून झाल्या की दुसऱ्या डबक्याकडे जाऊन परत तेच - तिच्या खेळात ती पार रंगून गेली होती.

इतक्यात समोरून मृदुलाताई आल्या. मृदुलाताई म्हणजे तिच्या वर्गशिक्षिका. पांढरी शुभ्र साडी नेसलेल्या मृदुलाताईंनी राणीला विचारलं, ''काय गं राणी, अजून आई आली नाही का?'' ''अंहं, येईल आत्ता - आज उशिराच येणार आहे ती.'' राणी म्हणाली आणि त्याच वेळी राणीच्या डोक्यात ती कल्पना चमकली. मागचा पुढचा विचार न करता ती खेळत असलेल्या खळग्यात तिने जोरदार उडी मारली - डुबुक - आणि काय, मृदुलाताईंची पांढरी शुभ्र, सुंदर साडी चिखलाच्या पाण्याने चिंब भिजली. त्या मात्र तिच्याकडे पाहून छानसं हसत होत्या.

मध्ये दोन दिवस गेले असतील. पंधरा ऑॅगस्टचा दिवस. त्या दिवशीची मुलांची खास कवायत जेमतेम झाली आणि जोरदार पावसाची सर कोसळून गेली. ग्राउंडमध्ये जागोजाग डबकी साचली होती. राणीने त्या दिवशी शाळेत छानसं स्फूर्तिगीत म्हटलं होतं, नवे कपडे घातले होते, त्यामुळे तिची अगदी ऐट होती. वर्गशिक्षिका मृदुलाताईंना तर तिचं गाणं खूप आवडलं होतं. दोघी जणी ग्राउंडमधून बोलत बोलत चालल्या होत्या आणि अचानक गंमतच झाली. पावसाच्या -चिखलाच्या पाण्याने पूर्ण भरलेल्या एका खळग्यात चक्क मृदुलाताईंनी अनपेक्षितपणे उडी मारली - डुबुक - त्या तर भिजल्याच, पण राणी - आज ती पूर्ण गाफील होती. नवे कपडे होते. कालच घेतलेला तिचा नवा फ्रॉक चिंब भिजला. चिखलाने बरबटला. आजही मृदुलाताई छान हसत होत्या. मनातला राग गिळून, रडू आवरून राणीला हसावंच लागलं. दोन दिवसांपूर्वीचा प्रसंग तिला आठवत होता ना! तेवढयात आई आली. दुरून तिने ही गंमत पाहिली होती आणि ताईंना भिजवल्याची गोष्ट राणीने तिला अगदी तिखटमीठ लावून सांगितली होती. त्यामुळे आई जवळ आली ती हसत हसतच. आता तर राणीला हसावं म्हणजे हसावंच लागलं!

खरं तर ही गोष्ट 'जशास तसे' किंवा 'अरेला का रे' अशी नाही. हा शिक्षकाने मुलाएवढं छोटं होऊन त्याला दिलेला एक धडा आहे. तू मला भिजवलंस ना, मग मीसुध्दा तुला भिजवणार अशी भावना या प्रसंगातून व्यक्त होत नाही, तर दुसऱ्याला त्रास देण्याआधी त्याच्या जागी आपण स्वत:ला ठेवून पाहावं, हेच मृदुलाताईंनी राणीला शिकवलं.

पण बहुतेक वेळा असं होतच असं नाही. मुलांनी केलेला खटयाळपणा शिक्षकांना, पालकांना अपमानास्पद वाटतो आणि अशा मुलांच्यात आणि शिक्षकांच्यात छोटया-छोटया गोष्टीत सतत संघर्ष होत राहतो. शाळेत शिक्षकांचं वर्चस्व असतं. ते अशा मुलांना ''तो कसला! - तो दंगा करतो, खोडया करतो. त्याला नका गाण्यात घेऊ! खेळात भाग घ्यायला त्याला बंदी!'' असली बंधनं घालून चांगलं काही करण्यापासून दूर ढकलत राहतात. मग 'ठीक आहे! मग बघतोच. करणारच मी खोडया!' अशी मुलांचीसुध्दा भावना होत जाते. मृदुलाताईंनी मात्र वेगळाच पवित्रा घेतला. त्यांनी एका छोटया प्रसंगातून तिला सहज लक्षात राहील असं काहीतरी समजावून सांगितलं.

आजकाल मुलांनी केलेला खटयाळपणा, शिक्षकांची झालेली फजिती याबद्दल कित्येक पालकांना मुलांचं अति कौतुक वाटतं. ते बोलूनही दाखवलं जातं. मुलं लहानच असतात, त्यांना खटयाळपणा आणि वागण्यातली चूक यातली सीमारेषा ओळखता येत नाही, आणि मग ही मुलं अशा गोष्टींचा फायदा घेऊ लागतात. कारण आजकाल म्हणे शिक्षकांनी मुलांना चुकून बोट जरी लावलं तरी शिक्षकांवर बाका प्रसंग ओढवतो. म्हणूनच मला या ठिकाणी पालक म्हणून राणीची आई ही फारच महत्त्वाची वाटली. राणीची आई एक सुज्ञ पालक होती असंच म्हणावं लागेल.

आता राणी मोठी झालीये. आणि शहाणीसुध्दा! मृदुलाताईंनी तिला अनेक प्रसंगी मदत केली, घडवलं असं तिला वाटतं. ती मला जेव्हा भेटते तेव्हा मला सांगते, ''वर्षामावशी, मी अनेक शिक्षकांकडे शिकले. पण मृदुलाताईंसारखं कुणी नाही. अशी 'ग्रेट' शिक्षिका एखादीच!''

शिक्षण क्षेत्र हे खरं तर शाळा, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अतूट विश्वासावर आधारलेलं असतं. हा एक अनेक माणसांच्यातला विश्वासाचा बंध होता, आहे आणि असला पाहिजे. पण परिस्थिती बदलते आहे का? विश्वास डळमळतो आहे का? मुलांभोवतीचं पालकांचं सुरक्षा कवच जरा अधिकच काळजीवाहू नाही ना? शिक्षक आणि मुलं यांच्यात असलेलं नातं निखळ आहे ना? ते असावं यासाठी घरातून आणि शाळेतून योग्य ते वातावरण तयार केलं जातं आहे का? प्रश्नच प्रश्न आणि अर्थातच याची उत्तरं प्रत्येक ठिकाणी मिळणार वेगवेगळी....

9594962586