अनिलराव गाडगीळ - लोकसंग्रहाचा दीपस्तंभ

विवेक मराठी    25-Jul-2016   
Total Views |

दि. 14 जुलै 2016 रोजी सायंकाळी अनिलराव गाडगीळ यांचे निधन झाले. रविवार दि. 10 जुलैला अनिलरावांना पक्षाघाताचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. एक तातडीची शस्त्रक्रियासुध्दा झाली. तरीही ते वाचू शकले नाही. त्यांच्या निधनाची बातमी समजताच धक्काच बसला. आज गाडगीळ सर गेले! पण जाताना एक आदर्श शारीरिक शिक्षण प्रमुख, निधी संकलक, समाजसुधारक आणि लोकसंग्रहक असा त्यांच्यातला निष्ठावान स्वयंसेवक सर्वांच्याच स्मरणात राहील!


 दि. 14 जुलै 2016 रोजी सायंकाळी अनिलराव गाडगीळ गेल्याची अपेक्षित बातमी आली आणि मन एका उदासीने भरून गेले. धक्का बसला नाही, कारण दोन दिवसांपूर्वीच 'ब्रेन डेथ'चे निदान झाले होते आणि फक्त हृदय चालू ठेवणारे औषधोपचार बंद करण्याची औपचारिकता उरली होती. अनिलरावांचे चिरंजीव वैभव परदेशातून भारतात आले आणि तो कटू निर्णय घेण्याची वेळ आलीच. एक वादळ कायमचे शांत झाले!

रविवार, दि. 10 जुलै 2016 रोजी स्नान करीत असताना अनिलरावांना पक्षाघाताचा तीव्र झटका आला. रुग्णालयात दाखल केले. एक तातडीची शस्त्रक्रियासुध्दा झाली, पण त्यातून वाचण्याची शक्यता नव्हतीच. मात्र अनेकांना अनिलराव 4-5 दिवस रुग्णालयात आहेत ही बातमी न कळल्यामुळे धक्काच बसला.

अनिलराव गाडगीळांचा जन्म 18 एप्रिल 1948चा पुण्यातला. त्यांचे कागदोपत्री नाव चंद्रशेखर होते, हे अनेकांना अनेक वर्षे माहीत नसेल. पण घरात, संघात सर्व जण अनिल नावानेच ओळखत. पुढे त्यांनी चंद्रशेखर हे नाव बदलून अनिल हेच नाव लावून घेतले. पुणे विद्यार्थी गृह आणि नूतन मराठी विद्यालय येथून शालेय शिक्षण घेतल्यावर स.प. महाविद्यालयातून त्यांनी रसायनशास्त्र विषयात पदवी घेतली. बी.एड. केले आणि पुढे तीन वर्षे सांगली जिल्ह्यात संघप्रचारक म्हणून कार्य केले.

प्रचारकी जीवनातून त्यांनी निवृत्ती घेतली, त्याच वेळी अणिबाणी आली. भूमिगत राहून त्यांनी संघर्ष केला. त्याच सुमारास विमलाबाई गरवारे शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस प्रारंभ केला. दरम्यान एम.एड. पूर्ण केले. विवाह झाला. नीता आणि वैभव यांचा जन्म झाला.

अणिबाणीनंतरच्या काळात अनिलराव पुणे जिल्ह्याचे शारीरिक शिक्षण प्रमुख म्हणून संघकाम करीत होते. पण माझ्यासह हजारो जणांना अनिलराव लक्षात आहेत ते संघशिक्षा वर्गातील एक कडक शिक्षक म्हणूनच! पहाटे साडेचार वाजता करडया आवाजात अनिलरावांची डरकाळी वर्गात घुमायची! ''उठले का रे सगळे? कोण आहे रे तो कोपऱ्यात झोपलेला?'' असे म्हणत अनिलराव सगळया वर्गातून फिरायचे. गाढ झोपलेल्यांना थेट उभे करून सोडायचे. त्या वेळी राग यायचा, पण ते स्वत: पहाटे चार वाजता उठून, स्नान करून इतरांना उठवायला यायचे.

अत्यंत कडक शिस्तीच्या अनिलरावांना गणसमता घेताना पाहणे ही एक पर्वणीच असायची. स्वत: चौकोनाच्या एका कोपऱ्यात निश्चल उभे राहून सलग 40 मिनिटे गणसमता घेण्याची त्यांची हातोटी अनेकांच्या लक्षात आहे. त्यांची एकही आज्ञा कधीही चुकली नाही. गणातले 22 जण श्रमाने थकून जायचे, पण या कडकपणामुळेच त्यांनी शिकवलेले शारीरिकमधले अनेक प्रयोग अजूनही चुकू शकत नाहीत.

पुढे त्यांच्याकडे पुणे महानगराचे शा.शि.प्र. म्हणून जबाबदारी आली, पण त्यांच्यातला खरा लोकसंग्रहक जागा झाला, तो ज्या वेळी त्यांना वनवासी कल्याण आश्रमाची जबाबदारी मिळाली त्या वेळी! आश्रमासाठी निधी संकलनाची जुनी पध्दत त्यांनी बदलूनच टाकली. शेकडो शाळांतील शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना ते भेटले. विद्यार्थ्यांशी बोलले आणि त्यातून उभे राहिले निधी संकलनाचे एक मजबूत जाळे! रविवारी, दिवाळी सुट्टीत, उन्हाळी सुट्टीत शेकडो शिक्षक आणि हजारो विद्यार्थी पुण्यातील घरोघरी फिरले आणि निधीच्या आकडयाने कोटीचा संकल्प केव्हाच पार केला. यासाठी ते महाराष्ट्रातील अनेक शाळांत फिरले. शाळा-शाळांत आणि विद्यार्थ्यांच्यात एक प्रकारची स्पर्धाच लागली होती. विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रके मिळाली. देणगीदारांचे मेळावे घेतले. वनवासी कल्याण आश्रमाची वसतिगृहे दाखवण्यासाठी सहली आयोजित केल्या. चैत्रात रामनवमी ते हनुमान जयंती या सप्ताहात निधी संकलन मोहीम दर वर्षी सुरू झाली. एखाद्या विषयात अनिलराव घुसले की त्यात चैतन्य भरले जायचे ते असे.

वनवासी कल्याण आश्रमासाठी निरंतर निधीची व्यवस्था लावून दिल्यावर ते वळले एकता मासिकाकडे. पण त्यांच्या लोकसंग्रहाच्या कर्तृत्वाला अधिक उंची मिळाली ती ढोलताशा पथकांच्या कामातून. शिस्तबध्द, निर्व्यसनी, चारित्र्यवान, देवभक्त आणि देशभक्त, समाजोपयोगी तरुणांचे ढोलताशा पथक गरवारे शाळेसाठी त्यांनी उभे केले. त्यासाठी त्याची मूळ प्रेरणा होती ज्ञान प्रबोधिनीच्या कै. अप्पा पेंडसे यांची. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन उभ्या राहिलेल्या अनेक ढोलताशा पथकांचे यशस्वी संघटन अनिलरावांनी बांधले. वादकांसाठी नियमांची पंचसूत्री तयार केली. स्वामी विवेकानंद सार्ध शतीमध्ये स.प. महाविद्यालयात 4200 ढोलताशा वादकांनी केलेला तालबध्द दणदणाट अजूनही पुणेकर विसरू शकत नाहीत. तरुण पिढी वाया गेलीय, त्यांचा काहीही उपयोग नाही अशी बोटे मोडणाऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले. सार्ध शतीत सूर्यनमस्कारांचे उद्दिष्ट 5 कोटींवरून 11 कोटी सूर्यनमस्कार असे वाढवले आणि प्रत्यक्षात 17 कोटी सूर्यनमस्कार घालायला लावून जागतिक विक्रम करण्याची उमेद आयोजकांना दिली.

पुण्याच्या अनेक शाळांतून त्यांनी घोषपथके उभी केली. त्यासाठी निधी मिळवला. वाद्ये खरेदी केली, वादक तयार केले, शाळा-शाळांच्या स्पर्धा घेतल्या. घोषपथकातून भूप, दुर्गा, केदार, शिवरंजनी यासारख्या भारतीय रागदारीवर आधारित रचना बसवून घेतल्या. मरगळलेल्या अनेक शाळांचे वातावरण चैतन्याने भारून टाकले.

शिक्षकांची पतपेढी चालवली. शालेय भांडार तोटयातून नफ्यात आणले. त्यातून राष्ट्रीय संकटांच्या वेळी आर्थिक मदत उभी केली. शिक्षकांवरचा अन्याय दूर करण्यासाठी वेळप्रसंगी व्यवस्थापनाशी भांडलेसुध्दा!

मध्यंतरी त्यांच्यावर एक मोठेच संकट येऊन गेले. पण त्याला डरतील ते अनिलराव कसले? त्या संकटाला त्यांनी अत्यंत धैर्याने तोंड दिले. मात्र त्यांच्यातला बिनधास्त आणि बेडर शिक्षक हळवासुध्दा झाला तो संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या आंतरजातीय विवाहाच्या वेळी! अशा विवाहांना त्यांनी ठामपणे प्रोत्साहन दिले. इतकेच नाही, तर वेळप्रसंगी स्वत:च्या पदराला खार लावून कन्यादानसुध्दा केले. दोन्ही बाजूंच्या घरात विषय पटवून दिला. एका सामाजिक विषयाच्या मागे बळ उभे केले.

या सगळया धावपळीत होते ते म्हणजे आपल्या प्रकृतीकडे झालेले दुर्लक्ष! पाठदुखीचा त्रास असतानासुध्दा त्यांचा प्रवास, भेटीगाठी चालू राहायच्या. मग महिना महिना ट्रॅक्शन घेणे आणि बेडरेस्ट! पण जरा बरे वाटले की प्रवास सुरू!

चिरंजीव वैभव 4 वर्षे प्रचारक म्हणून गेल्यावर त्यांच्यातला पिता मनोमन सुखावला! शारीरिकचे संघस्थान गाजवणारा हा सिंह आपल्या नातवंडांशी खेळताना बघितला की गंमत वाटायची. पण नियतीला हे सुख फार बघवले नाही.

गणेशोत्सव जवळ आलेला असताना सर्वत्र ढोलपथकांचा जोरदार सराव सुरू झाला असतानाच ती दुर्दैवी बातमी आली! शेकडो ढोलपथकांनी एक दिवस सराव बंद ठेवला आणि गाडगीळ सरांना श्रध्दांजली वाहिली.

गाडगीळ सर गेले! पण जाताना एक आदर्श शारीरिक शिक्षण प्रमुख, निधी संकलक, समाजसुधारक आणि लोकसंग्रहक असा त्यांच्यातला निष्ठावान स्वयंसेवक सर्वांच्याच स्मरणात राहील!

मात्र आजही माझ्यासारख्या अनेकांना अनिलरावांची ती आरोळी आठवते, ''उठले का रे सगळे? कोण आहे रे तो कोपऱ्यात झोपलेला?''

अनिल नीळकंठ गाडगीळ या एका वादळाच्या स्मृतीला शतश: प्रणाम!   

9423016776

khareharshavardhan@gmail.com