रोमँटिक इतिहासाकडून विसाव्या शतकातील वास्तवाकडे

विवेक मराठी    25-Jul-2016   
Total Views |

 1971-72मध्ये महाविद्यालयात गेल्यानंतर तत्कालीन समाजातील परिवर्तनवादी चळवळींचे जे चित्र समोर आले, तेव्हा या युगात हिंदुत्वववादी चळवळीचा काही संदर्भ आहे की नाही असा जो प्रश्न पडला होता, त्याचे एक उत्तर अणिबाणीच्या विरोधातील संघर्षातून मिळाले. परंतु त्याचे वैचारिक उत्तर मिळायला ज.दं.ची ओळख होईपर्यंत थांबावे लागले. त्यांच्याच सहवासामुळे, त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून इतिहासात रमणारे रोमँटिक राष्ट्रवादाचे विचार विसाव्या शतकातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा व राष्ट्रवादाच्या संदर्भात चिकित्सक अभ्यास करू लागले. युरोपियन प्रबोधन पर्वाने धर्मकेंद्रित सत्तास्थानात जो बदल घडविला व त्याचे पडसाद भारतात उमटले, त्याचा वेध घेण्याची नवी दृष्टी मिळाली.


वास्तविक पाहता स्वकथनात्मक लेख लिहिणे हे माझ्या स्वभावाशी विसंगत आहे. परंतु ज.दं.चे आमच्यासारख्या काही जणांच्या मनातील स्थान नेमकेपणाने सांगायचे असेल, तर अशा तऱ्हेचा लेख लिहिल्याशिवाय ते सांगता येणार नाही. एखाद्या व्यक्तीच्या बौध्दिक विकासाचे अनेक टप्पे असतात. त्या टप्प्यावर त्याला अनेक प्रश्न पडत असतात. त्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याकरिता काही मोजक्याच व्यक्ती साहाय्यभूत होत असतात. ज.द. हे त्यापैकी एक. आमची पिढी ही अनेक टप्प्यातून बौध्दिक संक्रमणावस्थेतून गेली.

1970-71नंतरच्या काळात केवळ भारतच नव्हे, तर सर्व जगच क्रांतिपर्वातून जात होते. अमेरिकेत आफ्रिकन अमेरिकन चळवळ उग्रवादी होत होती. फ्रान्समध्येही प्रस्थापितांविरोधात तरुणांचा उठाव होत होता. भारतात व महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटत होते. त्याच सुमारास दलितांमधलीही नवी पिढी स्वत:ला प्रस्थापित करीत होती. त्यातूनच पुढे दलित पँथरचा जन्म झाला. नक्षलवादी चळवळीला जन्मून चार वर्षे झाली होती आणि विशेषत: बंगालमध्ये व इतरत्रही या चळवळीचा तरुण मनावरील प्रभाव वाढत होता. एका नव्या क्रांतिकारक, प्रस्थापितविरोधी ऊर्जेने वातावरण भारून टाकले होते. त्या वातावरणाचाच परिणाम म्हणून अमिताभ बच्चन यांचा जंजीर हा चित्रपट प्रकाशित झाला. या चित्रपटाने ऍंग्री यंग मॅन अशी त्यांची प्रतिमा उभी राहिली व तिने लोकभावनांचा ताबा घेतला. या सर्वाचे पडसाद प्रसारमाध्यमातून उमटत होते. याच काळात श्रीमती इंदिरा गांधींच्या आक्रमक नेतृत्वाने राजकारण प्रभावित केले होते. या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्रांतीचा नारा न देणारे, शाखा चालविण्यासारखी नीरस कार्यपध्दती असणारे व इतिहासाची पुनःस्थापना करू पाहणारे अशी सामाजिक प्रतिमा असणारे संघाचे काम हे कालविसंगत वाटावे हे अगदी स्वाभाविक वाटत होते. त्या काळच्या इतिहासात जे जगले आहेत त्यांच्या मनात त्या आठवणी अजूनही ताज्या असतील.

पण अणिबाणीने हे चित्र बदलले. क्रांतीची भाषा करणारे कुठे गेले याचा पत्ताही कुणाला लागला नाही. परंतु क्रांतीची भाषा न बोलणारा व नीरस कार्यपध्दती वाटणारा संघच अणिबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभा राहिला. या काळात परिस्थितीच्या दडपणाने का होईना, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्याची भाषा बोलू लागला. संघटनेपेक्षा वेगळया असणाऱ्या चळवळीच्या कार्यपध्दतीशी त्याचा परिचय झाला. जनता पक्षाच्या प्रयोगात केंद्रवर्ती भूमिका निभावणे संघाला भाग पडले. या सर्वांचा परिणाम संघाच्या कार्यकर्त्यांच्या विचार करण्याच्या, ते व्यक्त करण्याच्या पध्दतीवरही झाला. इतिहासाच्या गौरवापेक्षा वर्तमानाच्या प्रश्नावर तो अधिक विचार करू लागला. परंतु आजवरचा भारताचा सांस्कृतिक विचार आणि विद्यमान व्यवस्थेतील प्रश्न यात पार न करता येणारी दरी आमच्या पिढीतल्या, विचार करणाऱ्या अनेक तरुणांना जाणवत होती. या दरीचे स्वरूप नेमके कसे आहे? भारताच्या संदर्भात आधुनिक व्यवस्था व पारंपरिक विचार यांची सांगड कशी घालायची? हे समजून घ्यायचे असेल तर मुळात आधुनिक विचार म्हणजे काय? युरोपमध्ये त्याचा विकास कसा झाला? याचे आकलन होणे महत्त्वाचे होते. भारतात साधारणपणे हे आकलन माक्र्सवादी विचारधारेतून केले जात असे व आजही केले जाते. परंतु राष्ट्रवादाच्या अंगाने हा आधुनिक विचारांचा विकास कसा झाला हे समजून घेण्याची गरज होती. विश्वास पाटील, ज.द. जोगळेकर आदींनी ती पुरविली. विश्वास पाटील हे सौम्य प्रकृतीचे, तर ज.द. हे फील्ड मार्शल.

युरोपमधला इहवाद किंवा सेक्युलॅरिझम म्हणजे समाजधारणेच्या सांप्रदायिक विचारांकडून असांप्रदायिक विचारांकडे झालेला प्रवास. हा प्रवास दोन तऱ्हांनी झाला. यातला पहिला मार्ग हा पाप-पुण्य या कल्पना किंवा धार्मिक ग्रंथातील शब्दप्रामाण्य, प्रेषिताची आज्ञा हाच अंतिम शब्द या संकल्पना नाकारणारा होता. आपल्या जीवनाचे पारमार्थिक व ऐहिक असे दोन भाग असतात. त्यातील पारमार्थिक मार्गाची निवड करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे; परंतु ऐहिक जीवनाच्या विचारांचा आधार हा व्यक्तीचे व समाजाचे ऐहिक सुख असाच असला पाहिजे, असे सांगणारा हा मार्ग आहे. परंपरेपेक्षा बुध्दिप्रामाण्याला यात अधिक महत्त्व आहे. इहवादी विचारांसोबतच राष्ट्र या संकल्पनेचाही विकास झाला. लोकांची एकत्र राहण्याची इच्छा हा राष्ट्रवादाचा पाया असतो, असे थोडक्यात म्हणता येईल. याकरिता समान श्रध्दाकेंद्रे आवश्यक असतात. भारतात इंग्रजांचे राज्य दृढमूल झाल्यावर युरोपियन आधुनिक विचारांचा प्रभाव भारतावर पडू लागला. लोकशाही राज्यव्यवस्था, न्यायालये, विद्यापीठे, उद्योगाच्या नव्या संकल्पना, नवे विज्ञान व तंत्रज्ञान येऊ लागले व भारतीय समाजजीवनाचा अविभाज्य भाग झाले. युरोपमध्ये हे संस्थाजीवन विकसित झाले, त्यामागे आधुनिक विचारांची परंपरा होती. ती भारताच्या संदर्भात लागू कशी करायची हा महत्त्वाचा प्रश्न होता. त्यात राष्ट्रवादी व पुरोगामी हे दोन गट पडले. राष्ट्रवादी विचारांमध्ये राष्ट्राची एकात्मता टिकवून त्यानंतरच सुधारणांचा विचार करायचा असा प्राधान्यक्रम होता, तर पुरोगाम्यांवर कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव असल्याने एक तर त्यांच्या लेखी राष्ट्रीय एकात्मतेला महत्त्वच नव्हते, असले तरी गौण महत्त्व होते. राष्ट्रवादामध्ये परंपरेला महत्त्व असल्याने राष्ट्रवादाचा विचार मांडत असताना स्वाभाविकपणे इतिहासाला अधिक महत्त्व दिले जायचे. त्यामुळे राष्ट्रवाद ही मध्ययुगीन संकल्पना आहे असा प्रचार करणे सोपे व सोईचे होते. त्याचा प्रभावही पडत असे.

या पार्श्वभूमीवर ज.द. हे अशा मोजक्या विचारवंतांमधील होते की जे आधुनिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादाचा विचार मांडत होते. विसाव्या शतकात, कम्युनिस्ट प्रभावाच्या काळातही राष्ट्रवाद हे कालविसंगत झालेले मूल्य नाही याची वेगवेगळी उदाहरणे देऊन ते सिध्द करीत होते. सेक्युलॅरिझमचा आधार घेऊन, हिंदुत्वाची भाषा ही जातीय आहे असा आरोप करीत मुस्लीम जातीयतेला मात्र अल्पसंख्याकत्वाच्या नावाखाली संरक्षण देणारे हे किती फसवा प्रचार करीत आहेत, हे विविध देशांतील समकालीन उदाहरणे देऊन ते सिध्द करून दाखवत. ज.द. हे हिंदुत्ववादी असले, तरी आंधळे परंपरावादी नव्हते. परंपरेची चिकित्सा न करता केवळ त्याच्या गौरवात रमणारे नव्हते. युध्दशास्त्र हा त्यांच्या आवडीचा विषय होता. भारतीय आध्यात्मिक परंपरेत जेवढी चिकित्सा झाली, त्याच्या पासंगाला पुरेल एवढीही चिकित्सा ऐहिक जीवनात झाली नाही. त्याचा परिणाम युध्दशास्त्रावरही झाला. त्यामुळे अगदी पोरसच्या युध्दापासून पानिपतच्या तिसऱ्या युध्दापर्यंत भारतीय सेनाधिपती पुन:पुन्हा त्याच चुका कशा करत राहिले, याचे विवेचन करणारे पुस्तक त्यांनी लिहिले. या निमित्ताने परंपरेचा अभिमान बाळगत असतानाही तिची चिकित्सा कशी करावी याचा वस्तुपाठच त्यांनी हिंदुत्ववादी अभ्यासकांपुढे ठेवला आहे.

सांप्रदायिकता हे आधुनिक जगापुढचे फार मोठे संकट आहे. हिंदुत्वाचा विचार मांडत असताना परंपरेतील सांप्रदायिक भाग बाजूला ठेवून आधुनिक राष्ट्रवादाला पोषक एवढाच भाग कसा स्वीकारावा, याचा विवेचक दृष्टीकोन त्यांनी दिला. युरोपियन ख्रिश्चन धर्मात अशा चिकित्सक इहवादी विचारांची परंपरा निर्माण झाल्याने त्या देशांचे आधुनिकीकरण कसे झाले? तेथील समाजामध्ये राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया घडवून आणणारे राष्ट्रनेते कसे होते? त्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागले? त्यावर त्यांनी कशी मात केली? याचे विवेचन करणारे 'रिशेल्यू ते केमाल' हे पुस्तक म्हणजे आधुनिक राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत राजकीय नेत्यांनी कोणते भान ठेवले पाहिजे हे शिकविणारे पाठयपुस्तकच आहे. मुस्लीम समाजामध्ये अशा प्रकारच्या चिकित्सेचा अभाव असल्यामुळे या समाजाच्या मानसिकतेचाच आधुनिक समाजमूल्यांना धोका आहे, हे त्यांच्या अनेक लेखांमधून विद्यमान घडामोडींचे विश्लेषण करून स्पष्ट केले. त्याचीच प्रचिती आज येत आहे.

ज.दं.चे लिखाण हे तर्कनिष्ठ व विचारांना चालना देणारे असे. त्यात भावनोत्कटता नसे. परंतु त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचे, गप्पा मारण्याचे भाग्य ज्यांना लाभले असेल, त्यांना त्यांचे व्यक्तिमत्त्व विसरतो म्हटले तरी विसरता येणार नाही. त्यांचे बोलणे हा एकपात्री नाटयप्रयोग असे. पु.लं.च्या हरितात्यांप्रमाणे मग ते इतिहासात जात. दुसरे महायुध्द हा त्यांच्या अभ्यासाचा व आवडीचा विषय. त्यांच्याशी बोलत असताना मग तिथे चर्चिल अवतरे, स्टॅलिन, रुझवेल्ट आपली हजेरी लावून जात. मुस्लीम राष्ट्रांत निधार्मिकतेची संकल्पना रुजविणारा केमाल पाशा तर त्यांच्या आवडीचा नेता. त्याने पुन्हा खिलाफत स्थापन करून स्वत:ला खलिफा म्हणून घोषित करावे असे आवाहन करण्यासाठी भारतातून आगाखान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ गेले होते. केमालने त्या शिष्टमंडळाची कशी बोळवण केली, तो प्रसंग त्यांच्याकडूनच ऐकण्यासारखा होता. त्यांचे वाचन अफाट व स्मरणशक्ती अगदी अखेरपर्यंत तीव्र. त्यामुळे त्यांचे साधे बोलणे हेही इतिहासातल्या अनेक व्यक्तिमत्त्वांचा वेध घेत, त्या संबंधातील पुस्तकांचा संदर्भ देत चालत असे. त्यांच्या घरी जाऊन भेटणे ही किमान दीड-दोन तासांची बौध्दिक मेजवानी असे.

1971-72मध्ये महाविद्यालयात गेल्यानंतर तत्कालीन समाजातील परिवर्तनवादी चळवळींचे जे चित्र समोर आले, तेव्हा या युगात हिंदुत्ववादी चळवळीचा काही संदर्भ आहे की नाही असा जो प्रश्न पडला होता, त्याचे एक उत्तर अणिबाणीच्या विरोधातील संघर्षातून मिळाले. परंतु त्याचे वैचारिक उत्तर मिळायला ज.दं.ची ओळख होईपर्यंत थांबावे लागले. त्यांच्याच सहवासामुळे, त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून इतिहासात रमणारे रोमँटिक राष्ट्रवादाचे विचार विसाव्या शतकातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा व राष्ट्रवादाच्या संदर्भात चिकित्सक अभ्यास करू लागले. युरोपियन प्रबोधन पर्वाने धर्मकेंद्रित सत्तास्थानात जो बदल घडविला व त्याचे पडसाद भारतात उमटले, त्याचा वेध घेण्याची नवी दृष्टी मिळाली. ब्रेक्झिटचा निर्णय अनपेक्षित आहे म्हणून जे गळे काढीत आहेत, त्यांनी ज.द. थोडे वाचले असते, अभ्यासले असते तर त्यांची ही अवस्था झाली नसती. राष्ट्रवाद ही एकविसाव्या शतकातही प्रभावी असणारी सामूहिक ऊर्जा आहे व तिला दुर्लक्षून जागतिकीकरणाची प्रक्रिया घडू शकणार नाही, हे ब्रेक्झिटने सिध्द केले आहे.

मुस्लीम समस्या हा ज.दं.च्या अभ्यासाचा विषय होता. जगभरातील सर्व देशांतील मुस्लीम प्रश्नावर ते लक्ष ठेवून असत. रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले, तेव्हा त्यावर ज.दं.ची प्रतिक्रिया विचारली होती. ''धर्मांध अफगाणिस्तानपेक्षा कम्युनिस्ट अफगाणिस्तान बरा!'' असे त्यांचे उत्तर होते. आज अमेरिकेलाही ते पटले असेल. आपल्या देशात स्वा. सावरकरांना व डॉ.आंबेडकरांना हा प्रश्न समजला होता. पण सावरकरांची मांडणी हिंदू स्वभावाला मानवली नाही, तर आंबेडकरांपुढे दलित मुक्तीचा प्रश्न प्राधान्याने होता. म. गांधींनी हिंदू समाजाच्या मानसिकतेला पटेल अशी या प्रश्नाची मांडणी केली, पण ती वास्तवाला धरून नव्हती. त्यामुळे भारतात या विषयाची कोंडी झाली आहे. पण हा अपवाद नसून जगातील सर्वच देशांची ही अवस्था आहे. आज या प्रश्नाने जे उग्र व जागतिक स्वरूप धारण केले आहे, त्यामुळे हा प्रश्न प्राधान्याने सोडविणे ही जगाची गरज बनली आहे. आधुनिक राष्ट्रवाद व मुस्लीम मानस यातील अंत:संघर्ष समजून घ्यायचा असेल, तर तो ज.द. अभ्यासूनच समजून घ्यावा लागेल.

kdilip54@gmail.com

 

दिलीप करंबेळकर

दिलीप दामोदर करंबेळकर

मूळ गाव : पट्टणकुडी

शिक्षण    : बीएस्सी, एम.बी.ए.

 

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कोल्हापूर व गोव (1976-1980) कालावधीत होते.

मराठी साप्ताकिक विवेक, दैनिक मुंबई तरुण भारत,शिल्पकार चरित्रकोश प्रकल्प यांचे प्रबंध संपादक आहेत, तसेच त्रैमासिक ज्येष्ठपर्व, वैद्यराजचे ते सल्लागार आहेत.

विवेक व्यासपीठ व सेवाभावी आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे विश्वस्त.

सामाजिक अभ्यास आणि समाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण यासाठी कार्यरत असणाऱ्या स्पार्क या संस्थेचे संचालक

विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर या स्वयंसेवी संस्थेचे संचालक

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष.

श्रीरामजन्मभूमी  लढयाचा अन्वयार्थ विकृत मानसिकतेचा पंचनामा व भारत - पाकिस्तान: एक सांस्कृतिक युध्द ही पुस्तके प्रकाशित.