कोंडी फुटते आहे!

विवेक मराठी    26-Jul-2016   
Total Views |

आजचा कालखंड नव्याने मांडणी करण्याचा, नवसमाज निर्माण करण्याचा आहे, त्याचा तात्त्वि पाया आपले सर्वसमावेशक आणि मानवतावादी तत्त्वज्ञान आहे. भाजपाचे शासन केंद्रात आणि राज्यात आल्यापासून हे तत्त्वज्ञान राजकीय व्यवहारात आपल्याला कसे जगता येईल हा विषय मुख्य झालेला आहे. यामुळे मंत्रीमंडळाचा विस्तार करताना सर्वसमावेशकता, हिंदू समाजातील जास्तीत जास्त जातिवर्गाचे प्रतिनिधित्व असा विचार होणे अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. महाराष्ट्रातील एका विद्वान प्राध्यापकाने या प्रक्रियेचे आकलन करून घेतले आणि ते आपल्या लेखातून मांडले, हेदेखील फारच महत्त्वाचे आहे. झापडबंद विचारवंताची कोंडी फोडून विद्वतेच्या नवीन किरणाचे प्रकटीकरण होत आहे.


लोकसत्ताच्या 13 जुलैच्या अंकात प्रा. प्रकाश पवार यांचा 'हिंदूकरण' या शीर्षकाचा लेख प्रकाशित झाला आहे. दर शुक्रवारी त्यांचा एक लेख प्रकाशित होत असतो. त्यांचा 'लोककारण' हा स्तंभ मी आवर्जून वाचत असतो. प्रा. प्रकाश पवार यांनी आतापर्यंत जे लेख लिहिले, त्यातून एक तटस्थ विश्लेषक अशी त्यांची प्रतिमा माझ्या मनात तयार झाली आहे. सामान्यतः संघ, भाजपा, हिंदुत्व यावर लिहिणारे लेखक पारंपरिक पाटया टाकण्याचे काम करतात, त्यात नवीन काही नसते आणि जुन्यात काहीही अर्थ नसतो. संघाविषयी लिहिताना ते अभ्यासकाची भूमिका घेतात, पण लेख वाचायला लागल्यानंतर त्यांच्यातील अज्ञानी अभ्यासक प्रकट व्हायला लागतो. प्रत्येकाचे चश्मे ठरलेले असतात आणि चश्म्याचे रंगही ठरलेले असतात. कोणी निळया रंगातून संघाकडे बघतो, कुणी लाल रंगातून पाहतो, तर कुणी पांढऱ्या रंगातून पाहतो. म्हणून रंगाचा बेरंग करणारे लेखन आणि निष्कर्ष असतात. ज्ञानात भर शून्य आणि माहितीत उणे शून्य, एवढी अशा लेखांची पात्रता असते. मात्र प्रा. प्रकाश पवार या प्रकारात बसत नाहीत.

हिंदूकरण हा मुद्दा कळीचा

प्रा. प्रकाश पवार तटस्थपणे विश्लेषण करतात आणि त्यासाठी तर्क देतात. डोळयावर कोणताही चश्मा चढवत नाहीत आणि स्वत:ची कोणतीही विचारसरणी मांडत नाहीत. हे फार अवघड काम आहे, म्हणून सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन. 'हिंदूकरण' या लेखात केंद्रात आणि महाराष्ट्रात नुकताच जो मंत्रीमंडळ विस्तार झाला, त्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांचा निष्कर्ष त्यांच्याच शब्दात असा - 'सरतेशेवटी मंत्रीमंडळाच्या फेरबदलातील तपशिलाच्या आधारे असा निष्कर्ष काढता येतो की, सामाजिक संघर्षभूमी असलेले नेतृत्व भाजपाच्या हिंदूकरणाचे प्रारूप स्वीकारत आहे. गटबाजी आणि जातीय समीकरण यामध्ये हिंदूकरण हा मुद्दा कळीचा आहे. हिंदुत्व आणि जात यांचे संबंध नाजूक आहेत. मात्र हिंदूकरण हा घटक जातवादाचे रूपांतर हिंदुत्वात घडवून आणत आहे. त्यामुळे एकूण जातवादी राजकारणाच्या प्रारूपास हिंदुत्व राजकारणाचे प्रारूप चीतपट करत आहे, असे चित्र या मंत्रीमंडळ विस्तारामधून पुढे येते.'

समतोल हिंदूकरणाचा

तसेच लेखाच्या सुरुवातीला प्रा. प्रकाश पवार म्हणतात, 'केंद्र व राज्य दोन्ही मंत्रीमंडळांचे विस्तार करताना प्रदेश, धर्म, जात, गट, निष्ठावंत अशा नानाविध गोष्टींचा एकत्र विचार झाला. परंतु जात व गटबाजी यांचा समतोल हिंदूकरण मुद्दयाच्या आधारे सोडविला गेला, तसेच हिंदूकरण प्रक्रियेतून जातवादी व बहुजनवादी चौकटीला अंतर्गतपणे खिंडार पाडण्यात आले. डावे, जातवादी आणि बहुजन चळवळीतील वारसदार नेते सत्तेत भागीदार केले गेले.... या बदलात हिंदूकरण हा मध्यवर्ती आशय दिसतो. बहुजन व गटबाजी यांच्यावर हिंदूकरणाच्या रसायनाचा वापर केला गेला.' मंत्रीमंडळातील एक एक मंत्र्याची नावे, त्यांचा पक्ष, त्याची जात याची माहिती लेखात विस्ताराने दिली आहे.

मंत्रीमंडळांचा विस्तार करीत असताना आपल्याला हिंदूकरणाची प्रक्रिया पुढे न्यायची आहे, असा विचार केंद्रात झाला असेल किंवा महाराष्ट्रात झाला असेल असे वाटत नाही. सत्ता राबविताना आपल्याबरोबर असलेल्या मित्रपक्षाला सत्तेत सहभागी करून घ्यावे लागते, ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. सत्तेत सहभागी करून घेताना ज्याला बरोबर घेत आहोत, तो आपल्याबरोबर चालण्यास समर्थ आहे का? त्याची राजकीय शक्ती किती आहे? मते आणण्याची त्याची शक्ती किती आहे? वैचारिकदृष्टया तो अडचणी निर्माण करणार नाही ना? याचा मुख्यत्वाने विचार केला जातो. त्याचप्रमाणे तात्कालिक परिस्थितीच्या संदर्भात कुणाला मंत्रीमंडळात घेतले असता निवडणुकीच्या राजकारणात फायदा होणार आहे याचीही गणिते मांडली जातात. राजकारण म्हणजे शक्यतेत आणण्याची कला आहे. उलटा विचार होत नाही - म्हणजे हिंदूकरण करायचे आहे आणि त्यासाठी कुणाकुणाला घेतले पाहिजे, अशी प्रक्रिया नसते. हिंदूकरण हा नंतरचा विषय आहे. विश्लेषकांचा हा अर्थ आहे. प्रस्तुत लेखात हा अर्थ पटणारा आहे. परंतु असे घडणे ही एक अत्यंत स्वाभाविक प्रक्रिया आहे. ती स्वाभाविक का आहे? हे समजून घेणे आवश्यक आहे.

जे स्वत:ला पुरोगामी, प्रागतिक, डावे, सेक्युलर, उदारमतवादी म्हणवतात, त्यांनी हिंदुत्वासंबंधी पूर्वग्रहदूषित लेखन आणि साहित्य निर्माण केलेले आहे. वरील विचारधारेच्या लोकांचे आपापसात फारसे पटत नाही, ते संघटित होऊ शकत नाहीत, वेगवेगळया जातीच्या संघटना तयार करून या संघटनेत ते गटांगळया खात राहतात. परंतु या सर्वांचे एका बाबतीत एकमत आहे, ते म्हणजे हिंदुत्व प्रतिगामी आहे, विषमतावादी आहे, स्त्रीविरोधी आहे, उदारमतवादविरोधी आहे, सेक्युलरविरोधी आहे. नरेंद्र मोदी यांच्या शासनाला दोन वर्षे झाल्यानंतर अनेक लेख प्रकाशित झाले. यातील सुहास पळशीकर, मणीशंकर अय्यर, आशुतोष (जे आप पार्टीत होते) यांचे लेख मी वाचले. लेख वाचल्यानंतर असे वाटले की, हे तिन्ही लेखक एकत्र आले असावेत आणि मोदी सरकारविरुध्द काय लिहायचे हे त्यांनी ठरविले असावे, इतकी मुद्दयांची समानता आहे. पण ते एकत्र येण्याची शक्यता अजिबात नाही, विचारांची मात्र समानता आहे.

समतावादी, सेक्युलरवादी विचारधारा

हिंदू विचारधारेत समतेला काही स्थान नाही आणि समाजातील मागास व दलित जातींना हिंदू विचारधारा स्वाभिमान आणि आत्मशक्ती देऊ शकत नाही, हा एक आवडता सिध्दान्त आहे. त्यासाठी महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातील अवतरणेच्या अवतरणे सांगितली जातात. मागास आणि दलित जातींवर हिंदू धर्माने आणि हिंदू तत्त्वज्ञानाने कसा घोर अन्याय केलाआहे, याची मांडणी करणारे लेखनही फार विपुल आहे. त्याला पर्याय म्हणून राजकारणातून हिंदुत्ववादी विचारधारा हद्दपार केली पाहिजे आणि समतावादी, सेक्युलरवादी विचारधारा बलवान केली पाहिजे, अशा प्रकारची प्रवचने सातत्याने होत असतात. प्रवचनकर्त्यांचा एक आवडता शब्दप्रयोग आहे - 'हिंदू समाजातून पूर्णपणे जातिनिर्मूलन झाले पाहिजे, जातिअंत झाला पाहिजे, आम्हाला डी-कास्ट झाले पाहिजे.' यातला विरोधाभास असा की, एका जातीचे लोक एकत्र करून त्यांच्यापुढे असे विचार मांडला जातो. डी-कास्ट होण्याचे दोन कार्यक्रम असतात. पहिला कार्यक्रम म्हणजे संघाला शिव्या घालत राहणे आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे ब्राह्मणांना शिव्या घालत राहणे. माणसे बुध्दिमान असल्यामुळे दुसऱ्यांना शिव्या घालून आपण सशक्त कसे होणार? असा प्रश्न त्यांनाही पडत नाही आणि आपणही विचारायचा नसतो.

विसर राष्ट्रधर्माचा

हिंदुत्वात किंवा हिंदू धर्मात सर्व जातीपातींना एकत्र करण्याचे आणि त्यांना सशक्त करण्याचे अद्भुत सामर्थ्य आहे, याची पहिली अनुभूती संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांनी घेतली. डॉ. हेडगेवार हे संघबीज आहे. या बीजाचा विचार स्थूलमानाने करता येत नाही, त्याला सूक्ष्मात जावे लागते. संघ सुरू करत असताना जो हिंदू समाज डॉक्टरांनी पाहिला, तो जातीपातीत विखुरलेला, उच्च-नीच भावनेने पोखरलेला, अस्पृश्यतेच्या रूढींनी नासलेला, पंथोपपंथांच्या भेदामुळे पोखरलेला, अत्यंत स्वार्थी माणसांनी भरलेला, ज्याला देश, समाज, धर्म याची काही चिंता नाही. मी, माझे घर, माझे कुटुंब, माझी जात याच्याच विचार करणारा माणसांचा समूह म्हणजे हिंदू समाज होता. धर्माच्या नावाने काहीही आचरट गोष्टी करणारा, परंतु समाज आणि राष्ट्रधर्म विसरलेला असा हा समाज होता.

हिंदू धर्म मानवी समतेचे तत्त्वज्ञान सांगतो. सर्व ब्रह्ममय आहे, मी ब्रह्म आहे, तूही ब्रह्म आहेस, हे हिंदू धर्माचे पायाभूत सिध्दान्त आहेत. ते सांगतात की, एकाच ब्रह्माची सर्व व्युत्पत्ती असल्यामुळे येथे कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, कुणी स्पृश्य नाही, कुणी अस्पृश्य नाही, सर्व एका समान भूमिकेवर आहेत. समतेच्या तत्त्वज्ञानाला यापेक्षा मोठा तात्त्वि आधार जगाच्या कोणत्याही तत्त्वज्ञानात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीदेखील हेच सांगितले आहे. ते म्हणतात, ''ठीक आहे, ब्रह्म जाणता येत नसेल, परंतु या सिध्दान्ताचे महत्त्वाचे सामाजिक परिणाम आहेत. लोकशाहीचा पाया म्हणून या सिध्दान्ताला अपरिमित महत्त्व आहे. ब्रह्माचे भाग असल्यामुळे सर्वच सारखे आहेत. सर्वांनी समान स्वातंत्र्य उपभोगले पाहिजे, यालाच लोकशाही म्हणतात, ब्रह्म न दिसेना का, पण लोकशाहीचा पाया म्हणून त्याच्यापेक्षा अधिक बळकट सिध्दान्त अन्य कोणताच नाही.'' (डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण - एक अभ्यास - शेषराव मोरे, मूळ इंग्रजी अवतरणाचे तात्पर्य - हिंदू धर्माची कोंडी या बाबासाहेब लिखित ग्रंथातील हे अवतरण आहे.)

विश्लेषण हिंदुत्वाचे 

डॉ. हेडगेवारांचा, म्हणजे संघाचा पूर्ण भर तत्त्वज्ञानाच्या आचरणावर आहे. जी उदात्त तत्त्वे आहेत, त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. ''ज्या तत्त्वांचे आचरण करता येत नाही, ती वांझ समजली पाहिजेत'' असे डॉक्टर म्हणत. थोडक्यात, संघाच्या जन्मापासून संघाने मांडलेल्या हिंदुत्वात विषमता बसत नाही, सर्वांशी बंधुवत व्यवहार हा संघाच्या हिंदुत्वाचा गाभा आहे. त्यामुळे संघाच्या आचरणात आणि व्यवहारात कधीही कुणाची जात काढली जात नाही, जातिनिर्मूलनाची प्रवचने दिली जात नाहीत; आम्ही सर्व एक आहोत, एकात्म आहोत, एका राष्ट्राचे अंग आहोत, एवढेच फक्त संघात शिकविले जाते.

ही शिकवण घेऊन राजकारणात जे काम करतात, त्यांच्याकडून अपेक्षा एवढीच असते की आपण जे शिकलो, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. सर्व समाज आपला आहे, समाजात जाती आहेत, त्याही आपल्याच आहेत. या सर्वांना बरोबर घेऊन देशकार्य करायचे आहे. एका देशाचे आपण अंग असल्यामुळे कुठलेही अंग दुर्बल आणि कमकुवत राहता कामा नये. एका शरीराचा ते भाग असल्यामुळे त्याचे परिणाम सर्व शरीरावर होतात, म्हणून संघाची प्रथमपासूनची भूमिका सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आहे. सगळेच हिंदू आहेत, त्यामुळे कोणाच्या हिंदूकरणाचा प्रश्न निर्माण होत नाही. हे असे म्हणण्यासारखे झाले की 'तू हिंदू आहेस, मी तुला हिंदू करतो.' राजकीय विश्लेषण करताना वापरण्यात येणारी भाषा ठीक आहे, कारण जे आज मंत्रीमंडळात सहभागी झाले आहेत, ते काही काळापूर्वी भाजपाचा विरोध करीत होते. या राजकीय विरोधाला हिंदूविरोध म्हणता येत नाही. हा दोन हिंदूंतील राजकीय आकांक्षाचा संघर्ष असतो. या आकांक्षा जेव्हा मिळत्या-जुळत्या होतात, तेव्हा संघर्षाचे कारण राहत नाही. राजकीय विश्लेषण करताना हिंदूकरण झाले असे म्हणता येईल, परंतु सामाजिक विश्लेषण करताना असे म्हणता येत नाही.

महाराष्ट्रात सामाजिक समरसता मंचाचे काम सुरू झाल्यानंतर वेगवेगळया सामाजिक विषयासंबंधीच्या भूमिका जाहीर रितीने मांडणे सुरू झाले. त्यात नवीन काही नव्हते, फक्त जाहीरपणे भूमिका मांडणे एवढे नावीन्य होते. तेव्हा एक भूमिका सर्वांपुढे सातत्याने मांडली गेली व जी आजही मांडली जाते, ती भूमिका म्हणजे सार्वजनिक काम करीत असताना आपल्या कामात सर्व जातींचा सहभाग हवा. आपला चेहरा एकजातीय असू नये. सहभागाशिवाय आपलेपणा निर्माण होत नाही आणि सहभागाशिवाय कोणतेही कार्य माझे कार्य आहे असे वाटत नाही. हाच हिंदुत्वाचा सामाजिक आशय आहे. विषमता कशी निर्माण झाली, मनुस्मृती काय म्हणते आणि कोणत्या धर्मग्रंथात कोणती विषमतावादी वचने आहेत या चर्चा करीत राहणे याला काही अर्थ नाही. आज अर्थपूर्ण विषय फार वेगळे आहेत आणि ते सर्व व्यवहाराचे आहेत.

व्यवहाराचे विषय राजकीय क्षेत्रातून लोकांच्या नजरेत पटकन येतात. राजकीय क्षेत्र सर्व समाज व्यापून टाकणारे असते. तेथे सत्ता असते आणि सत्तेतून येणारी शक्ती असते. सत्तेचे लाभ अनेकांपर्यंत पोहोचविण्यात ही शक्ती उपयोगी ठरते. सत्तेच्या क्षेत्रात हिंदुत्वाच्या भूमिकेतून सर्व जातींचा सहभाग, सर्वांचा सन्मान आणि सर्वांना समतेची वागणूक हे होत जाणार. कारण असे होणे जसे स्वाभाविक आहे, तसे अपरिहार्य आहे. सामाजिक भेदांमुळे, अस्पृश्यतेमुळे व त्यातून निर्माण झालेल्या विषमतेमुळे आपल्या देशाचे भयंकर नुकसान झालेले आहे, ही गोष्ट आता विचारी माणसास पटवून द्यावी लागत नाही. त्यामुळे या गोष्टी आता नकोत, त्याचे समर्थनही नको आणि जुन्या गोष्टी, जुना भूतकाळ उगाळत बसणेही नको. आजचा कालखंड नव्याने मांडणी करण्याचा, नवसमाज निर्माण करण्याचा आहे, त्याचा तात्त्वि पाया आपले सर्वसमावेशक आणि मानवतावादी तत्त्वज्ञान आहे. भाजपाचे शासन केंद्रात आणि राज्यात आल्यापासून हे तत्त्वज्ञान राजकीय व्यवहारात आपल्याला कसे जगता येईल हा विषय मुख्य झालेला आहे. यामुळे मंत्रीमंडळाचा विस्तार करताना सर्वसमावेशकता, हिंदू समाजातील जास्तीत जास्त जातिवर्गाचे प्रतिनिधित्व असा विचार होणे अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे.

महाराष्ट्रातील एका विद्वान प्राध्यापकाने या प्रक्रियेचे आकलन करून घेतले आणि ते आपल्या लेखातून मांडले, हेदेखील फारच महत्त्वाचे आहे. झापडबंद विचारवंताची कोंडी फोडून विद्वतेच्या नवीन किरणाचे प्रकटीकरण होत आहे, त्यात आणखी भर पडत जावी आणि यथार्थ, वस्तुनिष्ठ आणि तटस्थ विश्लेषक महाराष्ट्रात उभे राहावेत. कारण असे होणे हेदेखील हिंदुत्वशक्तीचे एक वेगळे प्रकटीकरणच आहे.

vivekedit@gmail.com

 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.