दोन जगांमधला फरक कळायला हवा

विवेक मराठी    30-Jul-2016
Total Views |

कोणताही गेम खेळणे ही विकृती नाही. मात्र सोशल मीडिया, सर्फिंग, चॅटिंग, साईट व्हिजिट अशा ज्या इंटरनेट ऍक्टिव्हिटी आहेत, त्यात किशोरवयीन मुले अडकली असल्याचे लक्षात येते. त्याचप्रमाणे साधारणपणे 35 ते 55 या वयोगटातील व्यक्तीही या महाजालात गुरफटल्या आहेत. याला कारण मानसिक अस्वस्थता, उदासीनता यामुळे ते स्वतःला या महाजालात गुंतवतात आणि त्यातून एक प्रकारच्या परावलंबित्वाचे ते शिकार होतात. आभासी जगाचे आकर्षण निर्माण होते. इंटरनेट महाजालापासून दूर झाल्यास अस्वस्थ वाटणे, चिडचिड वाटणे, संवाद न करणे अशा प्रकारची लक्षणे दिसू लागतात. या पार्श्वभूमीवर आपण 'पॉकेमॉन गो'चा विचार करत आहोत.


पोकेमॉन हे पात्र आजचे नाही. गेली पंधरा वर्षे दूरचित्रवाहिन्यांवरून तो घराघरात पोहोचला आहे. पोकेमॉन आणि त्याचे मित्र अनेकांना भुरळ घालत होते. आता हाच पोकेमॉन नव्या तांत्रिक साह्याने विकसित होऊन आला आहे. पोकेमॉनला नव्या स्वरूपात  बाजारात आणला आहे. या तंत्रज्ञानाच्या झेपेवर अवंलबून राहून काही जण आभासी जगात रममाण होत आहेत. हा धोक्याचा विषय आहे, कारण प्रत्यक्ष जगणे आणि आभासी दुनिया यांच्यातील भेदरेषा संपवण्याची ताकद या गेममध्ये आहे. यातून समाजिक पातळीवर धोका निर्माण होऊ शकतो. कोणतेही तंत्रज्ञान वाईट नसते. ते आपण कशा प्रकारे वापरतो, यावर सर्व काही अलंबून असते. अणुशक्ती आपण विध्वंसक शस्त्र म्हणूनही वापरू शकतो आणि अणुशक्तीपासून विद्युत्निर्मितीही करू शकतो. आपण तंत्रज्ञानाचा फक्त बाजारू उपयोग केला, तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

आपण एखादा गेम खेळतो, तेव्हा शरीराबरोबरच आपला मेंदूही तो गेम खेळत असतो. मेंदूला गुंतवून ठेवू शकेल अशा प्रकारची त्या गेमची रचना असते. त्या गेममध्ये तुमचे मन एकाग्र होते, तुम्हाला दिसते, ऐकू येते, हालचाली पाहता येतात, यामुळे आपला मेंदू अधिक उत्तेजित होत असतो. गेम खेळण्यासाठी ज्या भागाचा अधिक वापर होतो, तेथे अधिक उत्तेजना दिसून येते. मेंदूचा अधिकाधिक भाग अशा गेममध्ये गुंतू लागला की परावलंबित्व वाढते. वास्तव आणि आभासी जगात एकाच वेळी आपण जगत असतो. एकाच वेळी दोन पातळयांवर मेंदू काम करत असतो. आपल्या मेंदूवर या गोष्टीचा नक्कीच परिणाम होत असतो. अशा दोन पातळयांवरच्या जगण्यातून ही शक्यता अधिक वाढत असते. अशा प्रकारे मेंदूला अधिक उत्तेजित करणारे गेम जर खेळायला मिळाले नाहीत, तर उदास वाटू लागते, चिडचिड होते, राग येतो. अशा प्रकारची लक्षणे लक्षात येतात.

अशा प्रकारचे गेम खूप खर्चीक असतात. पोकेमॉनचा विचार केला, तर यासाठी 4-जी इंटरनेट सेवा, बॅटरी चार्जिंग, डेटा पॅक यासाठी खूप मोठा खर्च अपेक्षित असतो. हा खर्च किशोरवयीन मुले कुठून उभा करणार? अप्रत्यक्षपणे हा खर्च पालकांनाच करावा लागतो. आभासी जगात घेऊन जाणारी अनेक माध्यमे आज उपलब्ध आहेत. अकरावीमध्ये शिकणाऱ्या मुलांशी मी संवाद साधला. माझ्या असे लक्षात आले की तास, अर्धा तास गेम खेळतो असे म्हणणारी मुले रात्रभर गेम खेळत असतात. कारण त्यांना गुंतवून ठेवणारी मेंदूची उत्तेजकता या गेममध्ये जास्त आहे.

अशा गेमवर बंदी घालण्याची मागणी काही जण करत आहेत. ती बाष्कळपणाची आहे असे मला वाटते. या गेमला आज जो प्रतिसाद मिळतो आहे, तो पाहता हे तंत्रज्ञान जसेजसे अधिक विकसित होत जाईल, तसतसे त्यांच्याकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. विकसित तंत्रज्ञानातून अधिक मोठया प्रमाणात हा गेम प्रसारित केला जाणार आणि त्याला खूप मोठया प्रमाणात समर्थनही मिळणार. त्यामुळे अशा गेमवर बंदी घालणे अशक्य आहे. हे आपल्या समाजासमोर उभे ठाकलेले आव्हान आहे. त्याच्याशी आपल्याला सामना करायचा आहे. त्यासाठी पाल्य आणि पालक या दोघांशीही संवाद साधावा लागेल आणि या संवादातूनच मार्ग शोधावा लागेल. आभासी जगाची शिकार न होता वास्तवाचे भान ठेवून आपल्या शक्तीचा, बुध्दीचा वापर कसा करायचा हे ठरवावे लागेल आणि आपल्या पाल्यांना आभासी जग आणि वास्तव जग यांच्यातील फरक समजून सांगितला, तर या बाबतीत आपण समाधानकारक मार्ग काढू शकतो.