ही तर आत्मवंचना

विवेक मराठी    30-Jul-2016
Total Views |

'युतीत शिवसेनेची 25 वर्षे सडली' असं मत शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या मुखपत्रात प्रकाशित झालेल्या मॅरेथॉन मुलाखतीत व्यक्त केलं. महाराष्ट्र ढवळून काढणारी मुलाखत अशी त्याची पूर्वप्रसिध्दी मुखपत्राच्या संपादक महाशयांनी केली, ते त्यांच्या स्वभावाला धरूनच होतं. मात्र वरील उद्गार वगळता त्या मुलाखतीत कुजबुजण्याजोगंही काही नाही.


उध्दव ठाकरे गंभीर प्रकृतीचे, संयत भाषेत बोलणारे राजकीय नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. मित्रपक्षावरची नाराजीही संयमित शब्दांत व्यक्त करणारे. त्यांच्या चुलतभावासारखे वा दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांसारखे वाचाळपणासाठी ते प्रसिध्द नाहीत. मात्र नुकतंच त्यांनी केलेलं विधान त्यांच्याविषयीची ही प्रतिमा तपासून बघायला भाग पाडत आहे.

हिंदुत्वाच्या मुद्दयावर विचारपूर्वक एकत्र आलेल्या आणि त्या निर्णयाची 25 वर्षांत अनेक चांगली फळं मिळालेल्या शिवसेनेच्या आजच्या पक्षप्रमुखाला, युतीत पक्ष सडत असल्याचा साक्षात्कार झाला. ही काही स्वत:च्या पक्षाची केलेली परखड चिकित्सा नव्हे, तर उद्वेगाने परिपूर्ण असं हे विधान आहे. असलीच तर आत्मवंचना आहे. अशा प्रकारच्या उद्गारांनी निष्ठावंत सैनिकाचं मनोधैर्य खच्ची करत आहोत याचं भान विद्यमान प्रमुखांना राहिलेलं नाही, असं दिसतं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे प्रमोद महाजन हे या युतीचे शिल्पकार. युतीबाबत दोन्ही पक्षांतले अनेक दिग्गज साशंक असताना, विरोधात असतानाही या दोघांनी ठाम राहत हा धाडसी निर्णय घेतला. तो प्रत्यक्ष कृतीत आणला. ही युती म्हणजे हिंदुत्ववादी राजकारणाच्या दिशेने टाकलेले एक आश्वासक पाऊल होतं. तो काही या राजकीय नेत्यांच्या हट्टाग्रहाचा परिणाम नव्हता तर राजकीय अपरिहार्यता होती, व्यापक समाजहितासाठी होती. या युतीसाठी दोन्ही पक्षांना तडजोडी कराव्या लागल्या. भिन्न प्रकृतीधर्माच्या दोन माणसांना एकत्र काम करण्यासाठी जेवढया तडजोडी कराव्या लागतील, त्याहूनही अधिक तडजोडी दोन्ही पक्षांना कराव्या लागल्या. या सर्व वाटचलीत शिवसेनेला मोठया भावाचं स्थान देत भाजपाने आपल्याकडे धाकटेपण घेतलं. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास त्याला साक्षी आहे.

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या ताठ कण्याच्या नेत्याने जेव्हा महाराष्ट्रातील राजकारणाला नवं वळण देणारा इतका मोठा निर्णय घेतला, तेव्हा नक्कीच विचारपूर्वक घेतला होता. पक्षाचं हित डोळयासमोर ठेवूनच घेतला होता. त्याहीपेक्षा अधिक व्यापक असं हिंदुत्वाचं हित त्यांच्या डोळयासमोर होतं. म्हणूनच उध्दव ठाकरे यांचं विधान बाळासाहेबांच्या राजकीय समजशक्तीचा अवमान करणारं आहे. हा सगळा प्रवास जवळून बघितलेल्या उध्दव यांनी ते करावं हे खेदजनक आहे.

1980नंतर देशभरात हिंदुत्ववादी विचारसरणीला जे पोषक वातावरण तयार झालं, त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे महाराष्ट्रात झालेली सेना-भाजपा युती. बाळासाहेबांच्या जहाल व्यक्तिमत्त्वाची मध्यमवर्गीय आणि निम्नमध्यमवर्गीय तरुणांवर छाप पडली. बाळासाहेबांचे हे चाहते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते झाले. अशा कार्यकर्त्यांच्या फौजेमुळे कोणत्याही प्रश्नावर रस्त्यात उतरण्याचं बळ शिवसेनेला प्राप्त झालं होतं. साहेबांच्या हाकेला'ओ' देत क्षणार्धात रस्त्यावर येणारे शिवसैनिक हे सेनेचं अतुल्य बळ होतं.

तर भाजपाची मुख्य ताकद ही मध्यमवर्गीय, शिक्षितांमध्ये एकवटली होती. अशा पक्षांनी केलेल्या युतीमुळे विभिन्न आर्थिक स्तरातल्या मतदारांची एकत्र मोट बांधली गेली. त्यातूनच काँग्रेसला समर्थपणे टक्कर देणारा पर्याय महाराष्ट्रात निर्माण झाला.

स्वसामर्थ्याची जाणीव असतानाही आणि देशपातळीवर व्यापक समर्थन लाभत असतानाही दीर्घकालीन राजकीय हित डोळयासमोर ठेवत भाजपाने कायमच आताआतापर्यंत धाकटेपण स्वीकारलं. 25 वर्षांच्या प्रवासात सेनेपेक्षाही जास्त तडजोडी केल्या. पक्षाचं बळ वाढलेलं असतानाही अनेक अवमानकारक प्रसंगात, मूग गिळून गप्प राहण्याचा पण युती न तोडण्याचा संयम दाखवला. आणि आजचे सेनाप्रमुख या इतिहासाकडे सोयीस्कर कानाडोळा करून त्यांचा पक्ष सडल्याची भाषा करताहेत.

या युतीमुळेच सेनेच्या अनेक नेत्यांना मोठमोठया सत्तापदांचा लाभ झाला. लोकसभेचं अध्यक्षपद, राज्याचं मुख्यमंत्रिपद आणि लाभाची अन्य अनेक पदं मिळाली. आजही त्यांचे मंत्री केंद्रात आणि राज्यातही आहेत.

सत्तेची ऊब घेण्यासाठी बरोबर तर राहायचं, पण सतत काही ना काही वाद उकरून काढत सहकाऱ्याला स्वस्थता लाभू द्यायची नाही, सतत युती तोडण्याच्या धमक्या द्यायच्या हा सध्या शिवसेनेचा एककलमी कार्यक्रम झाला आहे. 'युतीत नाही जमलं तर वेगळे होऊ पण आमचा मुख्यमंत्री आणू' अशी स्वप्नं ते आपल्या अनुयायांना दाखवीत आहेत. वास्तविक मुख्यमंत्री तर लांबच, पण मुंबईचा महापौर तरी सेनेचा स्वबळावर येऊ शकेल का, अशी आत्ता स्थिती आहे. आणि त्याला कारणीभूत त्यांचा महापालिकेतील विद्यमान कारभारच आहे.

भारताची आर्थिक राजधानी समजली जाणारी मुंबई. अनेक राज्यांहून जिचा अर्थसंकल्प मोठा आहे अशी महापालिका. या महापालिकेच्या चाव्या मतदारांनी शिवसेनेकडे विश्वासाने सोपवल्या होत्या. मात्र त्या अपेक्षा काही या पक्षाला पूर्ण करता आल्या नाहीत. तेव्हा निराशाजनक बोलून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची उरलीसुरली उमेद घालवण्यापेक्षा राज्यकारभार कसा करावा याचे धडे द्यावेत. सांप्रत त्याची गरज आहे, ही वेळ आत्मवंचनेची नाही.