मुलं बिघडायला लागली म्हणजे काय ?

विवेक मराठी    01-Aug-2016
Total Views |

काहीही कारण नसताना आज माणूस ज्याला आपण शिव्या म्हणतो त्यांनीच बोलायला सुरुवात करतो. कानावर पडलेले शब्द बोलण्यात येतात. एका सिनेमात मुलं शिव्या देतात म्हणून शिक्षिका तक्रार करतात. वडिलांना वाईट वाटतं. वडील हातात काठी घेतात. ''कुठे शिकलात लेकांनो?'' असं विचारतात. तेव्हा मुलं निरागसपणे म्हणतात, ''तुम्हीपण देता तेव्हा ऐकलं...'' शिवाय मुलं घरातलंच नाही, घराबाहेरचंही ऐकतात. त्यामुळे जबाबदारीच्या कक्षा रुंदावतायत. शेवटी हे लक्षात ठेवू या की मुलं निवडतात आपल्या प्रत्येक गोष्टी!


''काय म्हणतोस? कसा आहेस? आज बऱ्याच दिवसांनी भेटतोय...''

''बऱ्याच महिन्यांनी म्हण...''

''हो ना. मी मस्त आहे. मजेत आहे. खरंच आता रिलॅक्स आहे...''

''का रे? काही...''

''तसं काही नाही...''

''मुलं कशी आहेत?''

''दंगा चाललाय. हट्ट चाललाय. पसारा करतात...''

''वा! म्हणजे मुलं असण्याची सगळी छान लक्षणं आहेत...'' कितवीत आहेत, कुठल्या शाळेत जातात हा प्रश्न मुद्दामच मी कुठल्याच पालकांना विचारत नाही. मुलांना तर नाहीच नाही. उलट काय आवडतं तुला, काय आवडत नाही, कुठलं कार्टून आवडतं असेच प्रश्न विचारते. मूल सांगेल त्याच्यापेक्षा वेगळं नाव मी सांगते. तेव्हा कुठे दोस्ती होते. नाहीतर बऱ्याच वेळा कुणाकडेही गेल्यावर, ''या ना, शाळेत टीचर आहेत. नुसत्या टीचर नाहीत, तर प्रिन्सिपॉल आहेत बरं का?'' अशी माझी ओळख करून दिल्यावर मुलांचा दृष्टीकोनच बदलतो. 'अरे बापरे! म्हणजे आता अभ्यासातलं विचारणार' असे भाव असतात. एवढयावर थांबत नाही. ''तुमच्याकडे हॉस्टेल आहे ना? आता जर दंगा केलात ना, तर हॉस्टेलला टाकणार. मग आई नाही नि बाबा नाहीत'' असंही सांगतात. मग काय, पराकोटीची नाराजी दिसते मुलांच्या चेहऱ्यावर. मुलांना अशी भीती घातली की मुलं लांबच जातात. मुलं मागे पडण्याला मनातली भीती खूप कारणीभूत असते. बऱ्याच वेळा आई-वडील, शिक्षक आणि इतर यांच्याकडून ही भीती निर्माण केली जाते. मग तो एखादा विषय असो, एखादं ठिकाण असो, एखादी व्यक्ती असो.

''मुलांना शेवटी मराठी माध्यमातून काढलं आणि इंग्लिश मीडियमला टाकलं. आठ दिवसात मुलं एबीसीडी लिहायला लागलीत. एक-दोन वाक्य तरी चांगलं बोलतात...'' मी ऐकून घेत होते.

''अहो, भीती वाटायला लागली मुलांच्या भविष्याची! सगळं बिघडायला लागलं हो! बोलणं अशुध्द, शिव्या देऊ लागली. साधी मुळाक्षरं लिहिता येत नव्हती. ही शाळा चांगली आहे. स्मार्ट दिसतात मुलं...''

''हो का? अरे वा...'' याव्यतिरिक्त मी काय बोलणार? पालकांच्या धारणा मुलांचा ट्रॅकच बदलतात. पहिलीतल्या मुलांच्या भविष्याची भीती वाटण्याइतकं काहीच घडलं नव्हतं. मुलं बिघडायला लागली म्हणजे काय, हेही नक्की ठरलं नव्हतं. अशुध्द भाषा म्हणजे काय? हाही प्रश्नच होता. इंग्लिश मीडियमला घातलं की मुलं स्मार्ट होतात हाही विचार समजत नव्हता. ज्या अर्थाने मुलं स्मार्ट वाटू लागली होती, त्या अर्थाने मराठी शाळेत स्मार्ट वाटायला लावणं हे त्या त्या शाळेतल्या शिक्षकांचं काम आहे असं वाटतं आणि घरी असलेल्या पालकांची भाषा अशुध्द नसते, भाषा बोलीच्या रूपात असते. या बोली पुष्कळ आहेत, ज्या परिसर, प्रदेश, घर, व्यक्तीनुसार बदलतात. त्यातही देखणेपण आहे हे लक्षात घेऊ. माध्यम बदलून दुसरं माध्यम घेणारी मुलं घरी आली की घरच्या भाषेतच बोलतात, हे लक्षात घेऊ या. प्रश्न राहिला शिव्यांचा. खरं तर हा अनुकरणाचा भाग आहे. सामान्यत: राग आल्यावर माणूस शिव्या देतो. शिव्या ही भांडणाची पहिली पायरी. मग हाताशी येतं भांडण.

काहीही कारण नसताना आज माणूस ज्याला आपण शिव्या म्हणतो त्यांनीच बोलायला सुरुवात करतो. (च्यामायला, साल्या, आयला इ...) कानावर पडलेले शब्द बोलण्यात येतात. एका सिनेमात मुलं शिव्या देतात म्हणून शिक्षिका तक्रार करतात. वडिलांना वाईट वाटतं. वडील हातात काठी घेतात. ''कुठे शिकलात लेकांनो?'' असं विचारतात. तेव्हा मुलं निरागसपणे म्हणतात, ''तुम्हीपण देता तेव्हा ऐकलं...'' शिवाय मुलं घरातलंच नाही, घराबाहेरचंही ऐकतात. त्यामुळे जबाबदारीच्या कक्षा रुंदावतायत. शेवटी हे लक्षात ठेवू या की मुलं निवडतात आपल्या प्रत्येक गोष्टी!

तेव्हा शाळा बदलणं कशासाठी? माध्यम कोणतं? कपडे-बूट-टाय-बस यावर मुलांच्या शाळेची निवड करायची का? शिक्षण हे क्षेत्र आता Marketingच्या बिझनेस तंत्राने विकसित होतंय. तेव्हा आपण प्रत्येकाने त्या त्या ठिकाणच्या गाभ्याचा विचार करू या आणि निर्णय घेऊ. शाळेकडे आकर्षित करून पालकांना पाल्याबद्दलचा (भाबडा) आशावाद निर्माण करून पालक जर वाटेल तितके पैसे मोजायला तयार आहेत, तर का नाही करायचा हा व्यवसाय? त्यासाठी माध्यम आलं, चकचकीतपणा आला, भडकपणा आला, जागतिक पातळीवरचे शब्द आले. पालक बिचारे भुलून जातात. विचार संपतो. विचारपूर्वकता घाबरट बनते आणि छोटया छोटया गोष्टी पालकांना आकर्षित करतील अशा वापरल्या जातात.

परवा एक शिक्षक म्हणाले, ''आपणही सेमी इंग्लिश सुरू करू. काळ बदललाय. मुलं यायला हवी असतील तर पर्याय नाही.''

दुसरे म्हणाले, ''अहो, त्या शाळेत अशी सिस्टिम आहे, प्रत्येक मुलाला वर्षातून एक तरी बक्षीस मिळतंच. पालकांची शेवटी हीच अपेक्षा असते ना! पालकांना बरं वाटतं हो...'' आपण मुलांमधली स्वाभाविकता, नैसर्गिकता कमी करत मुलांना यंत्राच्या अधीन करत नाही ना, याचा विचार करू. तिथून गुणवत्तेचा शोध सुरू होईल.

एक सॉफ्टवेअर पाहिलं. पुस्तकच त्यात उतरवून काढलं होतं. शिक्षक सांगत होते,''आमची डिजिटल क्लासरूम आहे. मुलं कॉम्प्युटरवर शिकतात.'' वेगळं काय करतात मुलं? अगदी दहावीतलं पहिलं महायुध्दही याच पध्दतीने मुलं अभ्यासत होती. फक्त पडद्यावर. उलटपक्षी पहिल्या-दुसऱ्या महायुध्दाची प्रत्यक्ष चित्ररूप माहिती इंटरनेटवर आहे. मग जी मुलं ते पाहतील, त्याची दाहकता समजून घेतील, तर महायुध्दाची संकल्पनाच समजेल. न समजता शिकण्याला सुरुवात होणं हे गुणवत्तेपासून लांब नेणारं नाही का?

9403693275

renudandekar@gmail.com