अनपेक्षित पाहुणा

विवेक मराठी    01-Aug-2016
Total Views |

'मधुमेहासोबतही सुखानं जगण्या'मागे नेमकं कोणतं इंगित आहे, त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, हे कळणं खूपच महत्त्वाचं असतं. तुमचे पैसेही वाचू शकतात आणि त्रासही कमी होतो. सा. विवेक समाजाशी आपलं घट्ट नातं टिकवून आहे. त्यामुळे या अंकापासून मधुमेहाचा सर्वांगीण विचार करणारी लेखमाला सुरू करतो आहोत. मधुमेहतज्ज्ञ डॉ. सतीश नाईक यांचं 'साखरेचे खाणार त्याला...' हे सदर आठवडयाला आपल्या भेटीला येणार आहेत. 


धुमेह म्हणजे आताचा कळीचा विषय. घरटी एक तरी माणूस मधुमेही असावा इतकं त्याचं प्रमाण वाढतं आहे. शिवाय आपल्या देशात तो कमी वयात होतो आहे. त्यामुळे अनेक गुंतागुंतीच्या कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अशा गोष्टींमध्ये विवाद आणि प्रवादांची भर पडली की एकदम स्फोटक परिस्थिती निर्माण होते. तसंच काहीसं आताशा होतंय.

महत्त्वाची बाब म्हणजे मधुमेह पावलं न वाजवता येतो. त्यात निदान सुरुवातीला तरी फारशी लक्षणं नसतात. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याचा आपला कल असतो. मग पाय कापण्याची वेळ आली, मूत्रपिंड निकामी व्हायला लागलं, हृदयरोगाने घर केलं अथवा डोळयांवर परिणाम झाला की आपण जागे होतो. तोपर्यंत अर्थातच खूप उशीर झालेला असतो. परतीचे दोर कापले गेलेले असतात. याचं दुसरं टोक म्हणजे नीट काळजी घेतली तर माणसं कित्येक वर्षं मस्त जगू शकतात. मधुमेह झाल्यावरदेखील पन्नास-पन्नास, साठ-साठ वर्ष निकोप राहिलेली माणसं आपल्याला दिसतात.

ज्या ज्या वेळी मधुमेहाचा विषय निघतो, त्यावर चर्चा घडते तेव्हा एक प्रश्न हमखास विचारला जातो, ''मधुमेह म्हणजे काय?'' प्रश्न साधा असतो. आलेलं उत्तरदेखील सहज आणि खरं असतं. 'मधुमेह म्हणजे रक्तातली साखर वाढणं' ही गोष्ट जवळजवळ सगळयांना माहीत असते. मग हा एवढा गहजब कशासाठी? वाढली तर वाढू दे साखर. काय होणार आहे त्याने? मला तर कुठलाच त्रास होत नाही, कुठेही दुखत खुपत नाही. तरी मी डॉक्टरांकडे का जायचं? कशाला करायचे उपचार?

मधुमेह म्हणजे रक्तातली साखर वाढणं असं म्हणणं जरी खरं असलं, तरी ते पूर्ण उत्तर नाही. इतर आजारात जसं एका वाक्यात त्या आजाराचं वर्णन करता येतं, तसं मधुमेहात करता येत नाही. एखाद्याला न्यूमोनिया झाला तर त्याला सांगता येतं की तुमच्या फुप्फुसात जंतुसंसर्ग झालाय. उपायसुध्दा ठरावीक असतात. रोगजंतूंना ठार मारणारी प्रतिजैविकं दिली की रोगी बरा होतो. त्याचा प्रश्न सुटतो.

मधुमेहाबद्दल असं आणि इतकं सोप्पं विधान करताना जीभ कचरते.

याला कारण आहे. रक्तातली साखर वाढणं ही परिणती आहे, तो परिणाम आहे. मूळ आजार नव्हे. रक्तातली साखर अनेक कारणांनी वाढू शकते. यातली बरीच कारणं एकमेकांशी फारसा संबंध नसलेली आहेत. साहजिकच त्यांच्या उपचारांमध्ये एकवाक्यता असणं कठीण आहे. म्हणूनच मधुमेह समजून घेण्यासाठी थोडं खोलात शिरून शरीर आपली साखर नियंत्रणात कशी राखतं ते पाहावं लागेल. तरच पुढच्या सगळया गोष्टी आपल्या नीटपणे लक्षात येतील.

त्यापूर्वी एक स्पष्टीकरण करायला हवं. आपण साखर हा शब्द सहजपणे वापरतो. तो चुकीचा आहे. साखर म्हणजे शर्करा, अनेक प्रकारच्या असतात. उदाहरणार्थ दुधातली लॅक्टोज, फळांमधली फ्रुक्टोज, अशा वेगवेगळया शर्करांशी आपला संबंध येत असतो. या वेगवेगळया शर्करा हाताळण्याची, त्यापासून ऊर्जा बनवण्याची शरीराची क्षमता निरनिराळी असते. फ्रुक्टोज ही ग्लुकोजपेक्षा फारच मंद वेगाने वापरली जाते. मधुमेहातली वैद्यकाला अपेक्षित शर्करा म्हणजे ग्लुकोज. त्यामुळे यापुढे आपण 'साखर'ऐवजी 'ग्लुकोज' हा शब्द वापरत जाऊ. ते अधिक शास्त्रीय होईल. इथे आणखी एक प्रश्न निकालात काढू. ग्लुकोजलाच इतकं महत्त्व का? निसर्गात मोठया प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून. त्यामुळे ती कुठल्याही व्यक्तीच्या खाण्यात सहजपणे येते. निसर्ग त्या त्या प्राण्याला ज्या गोष्टी सहज उपलब्ध असतील त्या गोष्टींच्या माध्यमातून त्या त्या प्राण्याची गुजराण होईल अशी व्यवस्था करतो. उत्क्रांतीदरम्यान तसे बदल त्या प्राण्यात घडवतो. आपल्याही बाबतीत तेच घडलंय. आपला मेंदू त्याच्या ऊर्जेच्या गरजेसाठी फक्त आणि फक्त ग्लुकोज वापरू शकतो. म्हणून तिला इतकं डोक्यावर घेतलं जातंय.

आता मूळ प्रश्नाकडे वळू. शरीर रक्तातली ग्लुकोज नियंत्रणात कशी राखतं? ती एका विशिष्ट पातळीत राखण्याची गरज का भासते?

आपण याआधीच पाहिलं आहे की मेंदूला जगण्यासाठी, आपलं काम चोखपणे बजावण्यासाठी जी ऊर्जा लागते, ती फक्त ग्लुकोजमधून मिळते. शरीराचे इतर अवयव आपापल्या ऊर्जेच्या गरजा इतर इंधनातून भागवू शकतात. परंतु मेंदू मात्र केवळ ग्लुकोज आणि ग्लुकोजवरच अवलंबून असतो. त्याला ग्लुकोजचा सतत आणि पुरेसा पुरवठा होत राहणं आवश्यक असतं. आपला मेंदू चोवीस तास काम करतो. आपण गाढ झोपेत असतानादेखील त्याचं काम चालू असतं. साहजिकच त्याची ग्लुकोजची लाईफ लाईन कधीच बंद होणार नाही अशी सोय करणं निसर्गाला भाग असतं.

ही जबाबदारी त्याने उत्तमरित्या बजावलेली आहे. आपली रक्तातली ग्लुकोज 70च्या वर राहावी अशी व्यवस्था त्याने केलेली आहे. कारण ग्लुकोज 60च्या खाली गेलं की मेंदू अस्वस्थ व्हायला लागतो. प्रश्न असा आहे की चोवीस तास हे ग्लुकोज येतं कुठून? आपण काही चोवीस तास खात नाही. जेमतेम तीन ते चार वेळेला जेवतो. कधीकधी उपास करतो. अन्न उपलब्ध नसेल तेव्हा फाकेही पडतात. पण मेंदूला ही गोष्ट समजत नाही. त्याची ग्लुकोजची मागणी चोवीस तास चालूच असते. निसर्गाने त्यावर तोडगा काढलाय. खाण्याच्या माध्यमातून जेव्हा ग्लुकोज उपलब्ध नसेल, तेव्हा शरीरात साठवलेली ग्लुकोज वापरता येईल अशी यंत्रणा त्याने निर्माण केलेली आहे. त्यासाठी ग्लुकॅगॉन नावाचं एक महत्त्वाचं संप्रेरक (हॉर्मोन) त्याने जन्माला घातलंय. आपण खात नाही, तेव्हा रक्तात पुरेशी ग्लुकोज येईल अशी सोय हे हॉर्मोन करत असतं.


अर्थात ग्लुकोज शरीरात साठवून साठवून साठणार तरी किती! कधीतरी तो साठा संपणारच ना! तरीही खायला मिळालं नाही तर! उपवास लांबला तर! म्हणून निसर्गाने त्याचीही व्यवस्था करून ठेवली. त्याने इतरही काही हॉर्मोन बनवले. उपासाची वेळ जसजशी लांबत जाईल, तसतसे एकेक हॉर्मोन्स आपलं काम सुरू करतात. शरीरात साठवलेल्या चरबीपासून, प्रोटीन्सपासून ग्लुकोजची निर्मिती करायला सुरुवात करतात. थोडक्यात आपल्या रक्तातलं ग्लुकोज कधीच विशिष्ट पातळीपेक्षा कमी होणार नाही, याची पूर्ण व्यवस्था निसर्गाने केलेली आहे. त्यासाठी अनेक हॉर्मोन्सची फौज त्याने उभी केलेली आहे.

आता तुम्ही म्हणाल, ही काय भानगड आहे? शरीर रक्तातली ग्लुकोज वाढवायचा एवढा प्रयत्न करतंय, त्यासाठी त्याने हॉर्मोन्सची फौज निर्माण करून ठेवलीय, तर आपण हा मधुमेहाचा बाऊ का करतोय? वाढलं ग्लुकोज तर वाढू दे की? मेंदूला ददात पडणार नाही ग्लुकोजची. ती विशिष्ट मर्यादेत राहावी हा आपला अट्टाहास का म्हणून? वर ती विशिष्ट पातळीत ठेवायला इन्श्युलीनसारख्या ताकदवान हॉर्मोनची रचना निसर्गाने का केली? हा प्रश्नदेखील शिल्लक आहेच ना!

नाही, निसर्ग कुठल्याच गोष्टीचा अतिरेक होऊ देत नाही. जसं आपल्या शरीराचं तापमान विशिष्ट मर्यादेत असतं, त्याची पातळी खाली गेली तर आपण थंड पडू आणि वाढली तर ताप येईल हे जितकं खरं, तितकंच ग्लुकोजची पातळी सांभाळणंदेखील महत्त्वाचं. ग्लुकोजची पातळी वाढली की काय होईल, याचं विस्तृत विवेचन आपण पुढे करणार आहोतच. त्यामुळे त्याची अधिक लांबण लावणं तूर्तास टाळलेलं बरं. एकच सांगितलं तर पुरे की रक्तात ग्लुकोज वाढली तर एक प्रकारे रक्तातून गुलाबजामचा पाक वाहिल्यासारखं होईल. मान्य आहे, हा थोडा अतिरेक झाला.. पण नीट समजायला जरा अतिरेकी शब्द वापरला तर बिघडत नाही. आता रक्त संपूर्ण शरीरभर फिरत असल्याने शरीराच्या प्रत्येक भागात मधुमेहाचे दुष्परिणाम होणार, हे वेगळं सांगायला नकोच. म्हणूनच निसर्गाला इन्श्युलीन बनवायला लागलं आणि रक्तातलं ग्लुकोजचं प्रमाण फार वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी लागली.

तर आपण मधुमेह म्हणजे काय ते पाहत होतो. आता सहज समजायला हरकत नाही की ग्लुकोज कमी करणाऱ्या व वाढवणाऱ्या यंत्रणा एकमेकांशी सुसंवाद साधत असतील, गुण्यागोविंदाने नांदत असतील तर आपलं ग्लुकोज अगदी नॉर्मल राहील. त्यात कुठलाही प्रश्न येणार नाही. पण त्यांचं काहीतरी बिनसलं, ग्लुकॅगॉन व त्याचे साथीदार जरा जास्त उतावळे झाले, रक्तात जास्तच ग्लुकोज ओतायला लागले किंवा इन्श्युलीन कमजोर झालं, त्याच्याकडून ग्लुकोज कमी करण्यात कामचुकारपणा झाला, तर मात्र सगळं समीकरण बिघडेल आणि आपल्याला मधुमेह होईल.

मधुमेह म्हणजे ग्लुकोज वाढणं. ती वाढू न देणं हे मुख्यत्वे इन्श्युलीनचं काम. म्हणून त्याच्याकडे जास्त दोष जातो. पण ग्लुकॅगॉन नि त्याचे साथीदार हॉर्मोन निर्दोष सुटत नाहीत. फारतर इन्श्युलीनकडे तीन बोटं आणि बाकीच्यांकडे एखादं बोट असा फरक करता येईल.

आता तीन बोटं रोखलेल्या इन्श्युलीनचा समाचार घेऊ या. तो आपलं काम कसं करतो हे पाहू या.

आपण जेवतो, ते अन्न पचतं, त्यात असलेलं ग्लुकोज रक्तात यायला सुरुवात होते, तसं इन्श्युलीनचं काम सुरू होतं. रक्तात ग्लुकोज आल्यावर ते इन्श्युलीन बनवणाऱ्या स्वादुपिंडातल्या बीटा पेशींमध्ये जातं. तिथल्या यंत्रणेला सिग्नल मिळतो. आता तयार व्हा. इन्श्युलीन बनवा. बाहेरून अन्नातून ग्लुकोज येतं आहे. अर्थात या बीटा पेशींमध्ये सतत थोडं थोडं इन्श्युलीन बनत असतंच. या अत्यंत अल्प प्रमाणात बनणाऱ्या इन्श्युलीनचं काम असतं रक्तात ग्लुकोज वाढवणाऱ्या ग्लुकॅगॉनवर थोडासा ताबा ठेवण्याचं. ग्लुकॅगॉन नेहेमीच इन्श्युलीनला वचकून असतं. थोडंसं इन्श्युलीन रक्तात असेल तर ते रक्तातलं ग्लुकोजदेखील मर्यादेत वाढवतं. मधुमेहात हे अल्प प्रमाणात बनणारं इन्श्युलीन कमी होतं. वैद्यकीय भाषेत याला 'लॉस ऑॅफ फर्स्ट फेज ऑॅफ इन्श्युलीन' असं म्हणतात. इन्श्युलीनचा धाक कमी झाल्यावर ग्लुकॅगॉनची दादागिरी वाढते. असं झालं की साहजिकच रित्या पोटीचं ग्लुकोज वाढतं.

अन्नाद्वारे ग्लुकोजची आवक सुरूच राहिली म्हणजे बीटा पेशी 'सेकंड फेज ऑॅफ इन्श्युलीन' बनवायला लागतात. जेवढं ग्लुकोज नेमकं, तितकंच इन्श्युलीन बीट पेशी बनवतात. या नेमकेपणामुळे तुमचं-आमचं ग्लुकोज नॉर्मलच्या खाली कधीच येत नाही.

इन्श्युलीन शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचलं की ते त्या पेशींवर असलेल्या रिसेप्टरला, टाळयाला चावी लागावी तसं अडकतं. चावी लागल्यावर घराचा दरवाजा उघडतो, तसाच ग्लुकोज आत घेणारा या पेशींचा दरवाजा उघडतो. ग्लुकोज पेशींमध्ये जातं. अर्थात रक्तात साचलेलं ग्लुकोज पेशींमध्ये शिरल्यामुळे रक्तातलं ग्लुकोज कमी होतं. इन्श्युलीनचं काम हे असं असतं.

दोन परिस्थितीत इन्श्युलीन नीट काम करू शकणार नाही. समजा, रक्तात ग्लुकोज आलं, तरी इन्श्युलीन बनलंच नाही तर! इन्श्युलीन बनवणाऱ्या बीटा पेशीच काही कारणाने नष्ट झाल्या, तर साहजिकच इन्श्युलीन बनणार नाही. हा 'टाईप वन मधुमेह'. त्यात बीटा पेशीच नाहीशा झालेल्या असतात. चावी नाही, तर पेशींच्या आत ग्लुकोज नेणारा दरवाजा उघडणार कसा? दरवाजा न उघडल्याने रक्तातलं ग्लुकोज आत जाणार नाही. ते रक्तातच साचून राहील. पेशंटला मधुमेह होईल.

आणखी एका प्रकारे पेशींचा दरवाजा उघडणार नाही. कधीकधी चावी कुलपात नीट बसली नाही किंवा कुलूपच गंजलेलं असलं की दरवाजा उघडत नाही, तसं या पेशींच्या बाबतीत होतं. इन्श्युलीनच्या चाव्या असूनदेखील त्या पेशींचा दरवाजा उघडण्यात अयशस्वी ठरतात. हा 'टाईप टू मधुमेह'. आपली देशात जवळजवळ 98 टक्के लोकांमध्ये हा प्रकार दिसतो. त्या मानाने जेमतेम एक टक्क्याहून कमी लोकांमध्ये टाईप वन मधुमेह असतो.


सगळं इतकं सरळसोट आहे, तर मग मधुमेह म्हणजे खूप गुंतागुंतीचा आजार असल्याचा दावा का केला जातो? इन्श्युलीन असूनही ते आपलं काम चोख करू शकत नसलं की त्या प्रकाराला डॉक्टर 'इन्श्युलीन रेझिस्टन्स' म्हणतात. असं झाल्यावर बीटा पेशींवर आणखी इन्श्युलीन बनवण्याचा दबाव वाढतो. त्यातून टाईप टू मधुमेहात पेशंटच्या रक्तात नॉर्मल माणसापेक्षा अधिक इन्श्युलीन तयार झालेलं दिसतं. जास्त इन्श्युलीन, तरीही पेशंट मधुमेही. झाली ना गडबड! ही गुंतागुंत इथेच थांबत नाही. दबावाखाली काम करणाऱ्या बीटा पेशी कालांतराने थकायला लागतात. इन्श्युलीन बनवायची त्यांची क्षमता खालावत जाते. आता हा प्रश्न सरळसोट उरत नाही. इन्श्युलीनची थोडीशी कमतरता आणि सोबतीला इन्श्युलीन रेझिस्टन्स असा गडबडगुंडा प्रकार सुरू होतो. कुठल्या पेशंटमध्ये इन्श्युलीनची कमतरता किती आणि इन्श्युलीन रेझिस्टन्स किती, हे कळणं खरंच अवघड असतं. डॉक्टरांचा कस तिथेच लागतो.

यात आणखी एका गुंत्याची भर पडते. टाईप टू मधुमेह हा केवळ रक्तातली ग्लुकोज वाढणं इतक्याचपुरता मर्यादित प्रश्न नसतो. कोलेस्टेरॉल, रक्तदाब, वाढलेलं वजन अशा अनेक रासायनिक समस्यांचं ओझं सोबत घेऊन तो येतो. यालाच 'मेटाबॉलिक सिंड्रोम' असं म्हणतात. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.

'मधुमेह म्हणजे काय' या साध्या प्रश्नाचं उत्तर मिळवता मिळवता मेंदूचा जो भुगा झाला, तो या घडीला तरी पुरेसा आहे. इतकं पाल्हाळ लावण्यामागे हेतू एवढाच होता की मधुमेह म्हणजे केवळ ग्लुकोजशी संबंधित आजार नाही. तो तुमच्या आरोग्याशी अनेक प्रकारे खेळतो. हा खेळ किती अंगांना स्पर्श करतो, ही गोष्ट जसजसं आपण पुढे जाऊ तसतशी स्पष्ट होत जाईल. या घडीला हा एक मुद्दा मनात घट्ट बसला तरी आपलं काम फत्ते झालं, असं म्हणायला हरकत नाही.

 

 थोडंसं गमतीदार...निसर्गाची इच्छा

आपल्याला मधुमेही बनवायची निसर्गाला इच्छा असावी. कारण त्याने ग्लुकोज वाढवाची भरपूर सोय करून ठेवली आहे. त्यासाठी ग्लुकॅगॉन, एपिनेफ्रिन, ऍड्रेनल आणि ग्रोथ हॉर्मोन यासारख्या हॉर्मोन्सची निर्मिती करून ठेवली. परंतु ग्लुकोज कमी करायला फक्त एकाच हॉर्मोन - इन्श्युलीन बनवलं. गंमत म्हणजे उत्क्रांतीदरम्यान ग्लुकॅगॉन जीन्स आधी बनले. इन्श्युलीनचे जीन्स मात्र बरेच नंतर उत्क्रांत झाले.

आता निसर्गाच्या या 'इच्छे'वर मात करायची आणि मधुमेह होण्यापासून स्वत:ला वाचवायचं, तर आपल्याला कठोर परिश्रम करावे लागणारच ना!

मधुमेह पावलं न वाजवता येतो. त्यात निदान सुरुवातीला तरी फारशी लक्षणं नसतात. म्हणून आपला त्याकडे दुर्लक्ष करण्याचा कल असतो. मग पाय कापण्याची वेळ आली, मूत्रपिंड निकामी व्हायला लागलं, हृदयरोगाने घर केलं अथवा डोळयांवर परिणाम झाला की आपण जागे होतो. तोपर्यंत अर्थातच खूप उशीर झालेला असतो. परतीचे दोर कापले गेलेले असतात. याचं दुसरं टोक म्हणजे नीट काळजी घेतली तर माणसं कित्येक वर्ष मस्त जगू शकतात. मधुमेह झाल्यावरदेखील पन्नास-पन्नास, साठ-साठ वर्ष निकोप राहिलेली माणसं आपल्याला दिसतात.

9892245272