घरातल्या कचऱ्यापासून सोने!

विवेक मराठी    13-Aug-2016
Total Views |

झाडांसाठी उत्तम पोषणमूल्य असलेले सोन्यासारखे खत - ज्याला 'ब्लॅक गोल्ड' म्हणता येईल, असे खत ओल्या कचऱ्यापासून आपण अगदी सहज करू शकतो. तसेच सुका कचरा पुनर्वापरासाठी देऊ शकतो. स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्यापासून घरातच मातीच्या किंवा प्लॅस्टिकच्या भांडयात केलेल्या खताला अगदी मृद्गंधासारखा सुगंध येतो. हे खत वापरून बाल्कनीत, खिडकीत तासभर ऊन येत असेल, तर त्यात सुंदर पालेभाज्या कुंडीतच घेता येतात.


आज सन 2016. विकासाच्या रेटयामुळे शहरांची संख्या विस्तारली. ग्रामीण जीवनाचे परिवर्तन झाले आणि शहरीकरणाची आवर्तने चक्रवाढ गतीने वाढली. शहरीकरणाने अनेक समस्यांना जन्म दिला. यातूनच निर्माण झाली डंपिंग ग्राउंड्स अर्थात कचरा क्षेपणभूमी.

पुण्याजवळचं फुरसुंगी असो नाहीतर मुंबईचे देवनार. हा नरकलोक आता शहरी लोकांना नकोसा वाटायला लागला आहे. आज केवळ नकोशी वाटणारी ही कचराभूमी पुढच्या 25 वर्षानंतर - किंबहुना त्या आधीही यातनादायी ठरू शकते, याकडे किती जणांचे लक्ष जात आहे? याला जबाबदार कोण?

कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही नियमानुसार महापालिकेची जबाबदारी असे म्हणत पालिकेच्या नावाने बोटे मोडण्याएवढीच का आपली जबाबदारी? अहो, पालिकेलाही कसा झेपणार हा गावगाडाभर कचरा? एकटया मुंबईत दररोज निर्माण होतो टनावारी कचरा. भारतात निर्माण होणाऱ्या एकूण कचऱ्याच्या 6.11% कचरा एकटया मुंबईत दररोज निर्माण होतो. म्हणजे हा एवढा कचरा आपण निर्माण करायचा आणि तो जिरवण्याची नैतिक जबाबदारी मात्र महापालिकेची, हे कसे? ओला-सुका कचरा साधा वेगवेगळा ठेवण्याची जबाबदारीही आपल्याला पार पाडायची नसते. त्यामुळे सुक्याबरोबर ओले जळते तसे या कचऱ्याचे होऊन जाते. प्लॅस्टिक, कागद आदी सुक्या कचऱ्यामध्ये एकत्र झालेला स्वयंपाकघरातील ओला कचरा जेव्हा आपल्या घरापासून डंपिंग ग्राउंडपर्यंत पोहोचतो, तेव्हा तो सडण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामध्ये घातक विषाणूंची जोमाने वाढ होते. डंपिंग ग्राउंडवर थरावर थर चढल्यामुळे या कचऱ्यात ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे सडण्याची प्रक्रिया वाढून त्यातून मिथेनसारखे अनेक घातक वायू बाहेर पडत राहतात. याने दुर्गंधी तर येतेच, त्याचबरोबर जीवनासाठी आवश्यक असलेले वातावरणातले अनेक घटक आणखी दूषित होऊन जातात.

आपल्या पूर्वीच्या पिढीच्या कचऱ्याचा त्रास आज आपल्याला जाणवू लागला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तर ही समस्या अधिक उग्र होत आहे. मग आपण आपल्या भावी पिढीला काय देणार? उत्तम शिक्षण, उत्तम नोकरी-धंदा, बक्कळ पैसा, इमले, गाडया आणि महत्त्वाचे म्हणजे या कशाचाही त्यांना उपभोग घेता येणार नाही असे अनारोग्य, प्रदूषित हवा, दूषित पाणी आणि बिघडलेले पर्यावरण. त्यांच्या या 'विकासाला' आपण त्यांचे मायबापच जबाबदार असू. असू दे बापडे! विकासाची उंच शिखरे पाहताना खाली वाकून मातीकडे-जमिनीकडे पाहायला आपल्याला कुठे फुरसत? पण मग ती जमीनच खचली, तर? कारण आपणच त्या जमिनीवर कचऱ्याचा खच ठेवला आहे.

खरे तर आपण या कचऱ्याचे सोने नक्कीच करू शकतो. झाडांसाठी उत्तम पोषणमूल्य असलेले सोन्यासारखे खत - ज्याला 'ब्लॅक गोल्ड' म्हणता येईल, असे खत ओल्या कचऱ्यापासून आपण अगदी सहज तयार करू शकतो. तसेच सुका कचरा पुनर्वापरासाठी देऊ शकतो.

स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्यापासून घरातच मातीच्या किंवा प्लॅस्टिकच्या भांडयात केलेल्या खताला अगदी मृद्गंधासारखा सुगंध येतो. हे खत वापरून बाल्कनीत, खिडकीत तासभर ऊन येत असेल, तर त्यात सुंदर पालेभाज्या कुंडीतच घेता येतात.

हे खत करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये मुख्य दोन प्रकार. एक म्हणजे प्राणवायूचा वापर करून केलेले खत आणि दुसरा म्हणजे प्राणवायूचा वापर न करता केलेले खत. खत निर्माण होताना मुख्य प्रक्रिया होते कुजण्याची. कुजणे आणि सडणे या दोन भिन्न क्रिया आहेत. ओला कचरा डंपिंग ग्राउंडवर सडतो, म्हणून दुर्गंधी येते आणि हाच कचरा 'कंपोस्ट बिन'मध्ये कुजतो, म्हणून मृद्गंध येतो.

ओल्या कचऱ्यापासून खत करत असताना दोन गोष्टींचे भान विशेषत्वाने बाळगावे लागते. त्यातील ओलाव्याचे प्रमाण आणि प्राणवायूचा पुरवठा या दोन गोष्टी योग्य प्रमाणात त्या कचऱ्यात भिनल्या, तर उरलेले काम सूक्ष्म जीव करतात. त्यासाठी आपण त्यांना फक्त हवा आणि योग्य पाणी पुरवायचे. पाणी म्हणजे ओलावा. हा कमी झाला, तर हे सूक्ष्म जीव सुकून मरतात आणि ओल जास्त झाली, तर ते गुदमरून मरतात. यासाठी सोप्पा उपाय म्हणजे कचरा रोज व्यवस्थित खाली-वर करणे. स्वयंपाकघरातील भाज्यांचे देठ, फळांच्या साली अशा तऱ्हेचा सगळा ओला कचरा जमल्यास किमान 1 सें.मी. इतक्या लांबीचा कापून आपल्या कंपोस्ट बिनमध्ये टाकावा. शक्य असल्यास रोज मूठभर सुकी पाने त्यात मिसळावी आणि हे मिश्रण रोज तरी ढवळावे. काही दिवसांनी काळेभोर मृद्गंधाचे खत तयार होऊ लागते. सुकी पाने नसतील तर खूप खूप मोठाली छिद्रे असलेल्या बास्केट्स या खतनिर्मितीसाठी उपयुक्त ठरतात.

हे कंपोस्ट बिन सावलीत असावे. त्यावर जाळीदार झाकण असावे. मिरची, लसूण, कांदा तसेच लिंबूवर्गीय फळांच्या साली यात शक्यतो मिसळू नये. शिजवलेले अन्न, तसेच मांसाहारी घटक यात मिसळू नये. त्यासाठी वेगळया प्रकारे खतनिर्मिती केली जाते.

मी किमान एवढे करायला लागल्यापासून माझ्या एकटया घरातून दर महिन्याला 18 किलो ओला कचरा माझ्या कंपोस्ट बिनमध्ये फस्त होतो आणि सुका कचरा कारखान्यात जातो. असे जर प्रत्येकाने केले, तर मग आपल्याला हवेच कशाला डंपिंग ग्राउंड!

 

 शोधयात्रेची आनंददायी अनुभूती

लहान मुलांना होणारे कर्करोगासारखे आजार अनुभवले. बाजारात मिळणारी रसायनयुक्त भाजी, गटारांच्या पाण्यावर वाढवलेल्या मुंबई स्पेशल पालेभाज्या, हे सारे आपल्या कुटुंबासाठी टाळता येईल का? निदान काही प्रमाणात तरी टाळता येईल का? याचा ध्यास मनाने घेतला. हातांनी काम हाती घेतले. शहरातल्या टिचभर जागेत आपल्याला कुंडीत काय काय पिकवता येईल, याची माझी शोधयात्रा सुरू झाली. या यात्रेत जाणवले की, सेंद्रिय कर्बादी घटक, बुरशी, लिग्नन, फायबर आदी जैविक घटकांनी प्रथम माती समृध्द असली पाहिजे. ही मातीची समृध्दी केवळ लाखो सूक्ष्म जीवाणूच टिकवून वाढवू शकतात. अशी जिवंत माती मग सुदृढ झाडे निर्माण करेल आणि सशक्त झाडे निर्माण करतील सुदृढ माणूस. या सशक्त शोधयात्रेचा एक कंगोरा सापडला - कंपोस्ट खतनिर्मिती. शहरे स्वच्छ करणारी, पर्यावरण सांभाळणारी आणि सर्जनशक्ती जागवणारी. हे कंपोस्ट खत मातीत मिसळून माती जिवंत ठेवायची. या मातीत आपण भाजी पिकवू शकतो. शहरातल्या खिडक्यांमधून, गॅलरी-गच्चीवर भाज्या काही प्रमाणात तरी पिकवणे शक्य असते. अशी ही रसायनमुक्त घरची भाजी आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. घरच्या भाजीपासून चविष्ट सूप बनवू शकतो. रसरशीत पानांची खमंग भजी, अळूवडी, विविध पानांच्या चटण्या, पराठे हेदेखील घरच्या कंपोस्टमुळे मिळू शकते. हे प्रत्यक्ष अनुभवल्याने माझी ही शोधयात्रा आनंददायी झाली आहे. शिवाय काही सोसायटयांतून आणि कार्यालयांतून याबाबत कार्यशाळा घेण्याचा माझा उपक्रमही आता सुरू झाला आहे. इतर काही जण कंपोस्टनिर्मितीच्या या कार्यात सहप्रवासी झाले, त्याचा आनंद ही या माझ्या शोधयात्रेची आनंददायी अनुभूती.

9869315116

ssarasgarden1@gmail.com