स्वच्छ, प्रदूषणमुक्त भारतासाठी मूल्यशिक्षण आवश्यक

विवेक मराठी    13-Aug-2016
Total Views |

  आपल्या भारत देशातील जनतेचे जगण्यासंबंधीचे वास्तव बदलणे आपल्या प्रत्येकाच्या हातात असून आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बदलत्या काळात विकासाच्या नावाखाली अनेक मूल्यांचा आपण ऱ्हास करत आहोत. जर आपले घर, आपले राज्य आणि आपला देश स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवायचा असेल, तर प्रत्येक भारतीय कुटुंबाला मूल्यशिक्षण द्यायलाच हवे.


र दिवशी प्राणवायूचे तीन सिलेंडर्स संपविणाऱ्या मानवाला पुढील काळात प्राणवायूचे सिलेंडर्स सोबत वागवावे लागले तर वावगे वाटू नये. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृध्द असलेल्या भारत देशात प्रदूषणाची पातळी उंचावत असताना आम्ही सर्व जण नुसते बघत आहोत - नव्हे, तर त्यात भरही घालत आहोत. समृध्दीच्या नावाखाली घराघरात होणाऱ्या प्रदूषणाची तिळमात्र कल्पना मानवाला आलेली नाही, हे मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल. घरात होणारे प्रदूषण किती भयानक आहे, याचे उदाहरण म्हणजे बालमृत्यूचे प्रमाण. सत्तर लाख मृत्यू जन्मापूर्वीच होत असल्याचे दिसून आलेले आहे. घराघरांत औषध ही आजची आमची 'जीवनशैली' झाली आहे. समृध्दी असूनही आनंद, उत्साह, उत्तम आरोग्य आम्ही अनुभवू शकत नाही, हे वास्तव आहे. आपल्या भारत देशातील जनतेचे हे वास्तव बदलणे आपल्या प्रत्येकाच्या हातात असून आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बदलत्या काळात विकासाच्या नावाखाली अनेक मूल्यांचा आपण ऱ्हास करत आहोत. जर आपले घर, आपले राज्य आणि आपला देश स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवायचा असेल, तर प्रत्येक भारतीय कुटुंबाला मूल्यशिक्षण द्यायलाच हवे.

आजमितीला मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या प्रमुख शहरांत प्रदूषणाची पातळी (AQI - Air Quality Index) उच्चतमतेपर्यंत पोहोचलेली आहे, याचा अनुभव शहरवासीयांना येतच आहे; पण त्याचबरोबर आपण ज्या घरात राहतो, त्या घरातही प्रदूषण होतच आहे आणि आपण त्यात राहत आहोत याची कल्पना माणसाला खरोखर येतच नाही. सकाळपासून विचार करता आपण चूल, स्टोव्ह, गॅस इ.चा वापर करतो. इंधन जळताना कार्बन डायऑक्साईड हा घातक वायू बाहेर पडतो. आपण कोणते इंधन वापरतो आहोत त्यावर त्याचे प्रमाण अवलंबून आहे. आजही ग्रामीण भागात 60% गृहिणी इंधन म्हणून लाकूड, शेण्या, कोळसा इ.चा वापर करतात. लाकूड जळताना प्रचंड धूर होतो. एका वेळी 200 सिगारेट्सचा जेवढा धूर असेल, तेवढा हा धूर असतो. या धुरामुळे वरवर पाहता डोळयांना त्रास होतो हे समजते; परंतु नाकातोंडावाटे गेलेला हा धूर फुप्फुसाला किती घातक ठरतो हे दिसतच नाही. गरोदर गृहिणींना याचा परिणाम त्रासदायक ठरू शकतो. शहरातही स्वयंपाकघरात अन्न शिजविताना वेगवेगळया प्रकारे अन्न चविष्ट करण्याच्या व्यापात भरपूर वाफा बाहेर पडतात. पुरेशी खेळती हवा नसल्याने किंवा खिडक्या नसल्याने हे सर्व घरातच राहते आणि घरातील हवामान दमट बनते, घुसमटायला होते. यामुळे या वातावरणात वाढणारे सूक्ष्मजीव घरात वावरायला सुरुवात होते आणि जैविक प्रदूषण सुरू होते. झुरळे, उंदीर, पाली, बारीक चिलटे, मच्छर यांचे साम्राज्य म्हणजे घरात आजारपणाला नक्कीच आमंत्रण. हे घालविण्यासाठी आम्ही रासायनिक औषधांचा वापर करतो - म्हणजे पुन्हा प्रदूषण करतो. वेगवेगळया फवारण्या, पंप, कॉइल याचा वापर आज सर्वत्र बघायला मिळतो. पण असे प्रदूषण होऊच नये याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला, तर या प्रदूषणातून मुक्तता मिळू शकते. खेळती हवा दमटपणा कमी करायला मदत करते. किमान स्वयंपाकघरात खिडकी असणे अत्यंत गरजेचे आहे आणि छोटया जागेतही हे करता येणे शक्य आहे.

स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात मोठे प्रदूषण आम्ही करतो ते म्हणजे जेवणासाठी कागदी प्लेट, थर्माकोल प्लेट, प्लॅस्टिक प्लेट यांचे. ही संस्कृती भारतीयांची नव्हे. जेवायला ताटच हवे. भांडी धुवायला वेळ नाही, माणसे मिळत नाहीत या नावाखाली आपण किती कचरा निर्माण करतो, याचा अंदाज आपल्याला येत नाही. चहा, कॉफी, पाणी पितानाही आम्ही हेच करतो. आपण खाता-पिता जर प्रदूषण करणार असू, तर साहजिकच घरात तसे संस्कार होतात.

हात पुसायला टिश्यू पेपर, वहीतील कागदावर एक शब्द चुकला तर दुसरा कागद, शैक्षणिक वर्ष... नव्हे - नुसते एक सत्र संपले की नवीन वही. पहिल्या वहीची अर्धी पाने कोरीच असली तरीही. पूर्वी सर्वच गोष्टींचा तुटवडा, त्यामुळे आम्ही मागील वर्षी राहिलेली कोरी पाने एकत्रित काढून वही तयार करत असू. किंबहुना सर्व बहीण-भावंडांकडची वह्यांची सर्व कोरी पाने एक वर्षभर पुरायची. आज शाळांमधून मूल्यशिक्षण दिले जाते, पण विद्यार्थ्यांना/शाळांनाही मूल्यशिक्षण अंमलात आणायला कोणती अडचण निर्माण होते हे कळत नाही. गेल्या वर्षीची कोरी पाने वापरली न जाता टाकून दिली जातात. प्रत्येक सत्राला वेगळी वही दिली जाते. वास्तविक अनुभवी शिक्षक आपल्या विषयाला किती पानांची वही पुरेशी आहे, हे सांगू शकतात. काही जण सांगतातही, तरीही वह्या कोऱ्या राहतात आणि अर्धवट  वापरलेल्या वह्या तशाच रद्दीत जातात, हे मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल. आज 1 टन कागदनिर्मितीसाठी दहा वर्षे वाढलेली 17 मोठी झाडे, 380 गॅलन ऑइल, 7000 गॅलन पाणी, 4000 कि.वॉ./तास वीज आणि 300 क्यूबिक यार्ड जमीन वापरली जाते. याशिवाय 1 कि.ग्रॅ. उत्तम प्रतीचा कागद तयार करताना 100 लिटर शुध्द पाणी वापरले जाते. जर निसर्गाने या सर्व वस्तूंची किंमत मानवाकडे मागितली, तर आज तीन रुपयांना मिळणारा कागद 8-9 रुपये किंमतीला मिळेल, याची जाणीव सर्वांनाच व्हायला हवी. यात सूर्य झाडांना देत असलेल्या प्रकाशाची किंमत धरलेली नाही. शिवाय वेगवेगळया इंधनांच्या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड यांसारखे वायू बाहेर पडून प्रदूषणात किती भर पडते, याचा अनुभव श्वसनाचे विकार निर्माण झाले की मग येतो. प्रदूषणाची पातळी कमी करण्याकरिता प्रत्येक कुटुंबाने कागदाचा वापर कमी कसा करता येईल याचा विचार करायलाच हवा. भावी पिढीची तरतूद पैशात करणारा समाज जर त्यांच्यासाठी विषारी वायूंची निर्मिती करून ठेवणार असेल तर भावी पिढीचे आरोग्य किती धोक्यात येणार आहे, हे दिसून येत आहे. कागदाचा पुनर्वापर करणे म्हणजे 55% पाण्याची बचत, तसेच 35% पाण्याचे प्रदूषण कमी, 74% वायू आणि विषारी प्रदूषण कमी करता येते. कागद कमीत कमी वापरण्याचे पहिले पाऊल निवडणूक आयोगाने उचलले आणि हजारो टन कागदाचा वापर होणाऱ्या मतपत्रिका बंद केल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदान सुरू केले. आज अशाच प्रकारे अनेक कार्यालयांमध्ये कागदोपत्री चालणारा व्यवहार ई-मेलद्वारे, व्हॉट्स ऍपद्वारे करून कागदाची बचत केली जात आहे.

असे असले, तरी प्रत्येक विद्यार्थ्याने दर दिवशी एक कागद वाचवला, तर दर वर्षी भारतातील 40,000 झाडे वाचू शकतील असा विश्वास वाटतो. कागदाबरोबरच प्लॅस्टिक वापरही लक्षात घ्यायला हवा. घरात येणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक बाटल्या, प्लॅस्टिक डबे मोठया प्रमाणावर वापरले जात असून जास्त प्लॅस्टिक वापरणाऱ्या वीस देशांपैकी भारताचा बारावा क्रमांक आहे. 192 देशात मिळून सुमारे 300 दशलक्ष मे. टन प्लॅॅस्टिकचा वापर दर वर्षी होत आहे. प्लॅॅस्टिकचा पुनर्वापरकेला गेल्यास प्रदूषणाला आळा बसू शकेल. शाळाशाळांमधून, घराघरांमधून संस्कारक्षम विद्यार्थ्यांना प्रदूषणाची योग्य जाणीव करून दिल्यास या संपत्तीचा योग्य वापर, पुनर्वापर अंमलात येऊ शकेल. नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला भारत देश प्रदूषणमुक्त करण्यासाठी या मूल्यशिक्षणांची रुजवात व्हायलाच हवी.

9869065547