गरज... सामूहिक प्रयत्नांची

विवेक मराठी    13-Aug-2016
Total Views |

प्रदूषण ही आजच्या घडीला आपल्या देशालाच नव्हे, तर जगातल्या बहुतेक देशांना भेडसावणारी गंभीर समस्या आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने त्यावर उत्तर शोधायच्या प्रयत्नात आहे. प्रदूषण होण्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपण सर्वच कारणीभूत असतो, जबाबदार असतो; तर त्याच्या विरोधातली लढाई ही सगळयांनी मिळूनच लढायला हवी हा विचार केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुणे महानगरात 'सामाजिक रक्षाबंधन' हे अभियान योजलं आहे. 'ई-कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर' हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून या सामाजिक अभियानाची आखणी करण्यात आली आहे. प्रबोधन, 


संकलन आणि निर्मूलन या त्रिसूत्रीवर हे अभियान आधारित आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून हाती घेण्यात आलेलं हे समाजोपयोगी अभियान निश्चितच स्तुत्य आहे. अनुकरणीय आहे. घरोघरी जमा होणारं प्लॅस्टिक आणि ई-कचरा हे पर्यावरणाला सर्वाधिक हानी पोहोचवणारे आजच्या काळातले दोन मुख्य घटक आहेत. या अभियानात अंदाजे दहा हजार कार्यकर्ते आणि एक लाख विद्यार्थी सहभागी होतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. त्यामुळे हे अभियान म्हणजे प्रदूषणमुक्तीसाठी छेडण्यात आलेलं जनआंदोलन आहे असं म्हणता येईल.

कोणतीही सामाजिक समस्या कितीही उग्र रूप धारण करो, तिच्या निर्मूलनासाठी सामूहिकरित्या, नियोजनबध्द लोकशक्ती संघटित झाली, तर प्रभावी उत्तर सापडू शकतं याचं उदाहरण म्हणून या अभियानाकडे बघता येईल. समस्येचं उत्तरदायित्व कोणाच्या तरी माथी मारून समस्या सुटत नाहीत, तर तिच्या निराकरणासाठी लोकांनी एकत्र येऊन एका दिशेने विचार करावा लागतो. त्यानुसार कृती करावी लागते.

सा. विवेकच्या यंदाच्या स्वातंत्र्यदिन विशेषांकाला या अभियानाची पार्श्वभूमी असल्याने, अंकाची मध्यवर्ती कल्पना 'उद्याचा भारत - प्रदूषणमुक्त भारत' अशी आहे. प्रदूषणमुक्त भारत हे उद्याचं स्वप्न आहे. त्याची आजची सुरुवात आमचं घर, आमची वस्ती, आमचा गाव स्वच्छ-प्रदूषणमुक्त ठेवण्यापासून होते. 

कुटुंब हा समाजाचा पायाभूत घटक असं आपण म्हणतो. तेव्हा सुधारणांचा श्रीगणेशा एकेका घरापासून करावा लागेल. पंतप्रधानांनी आपल्यासमोर ठेवलेलं 'स्वच्छ भारता'चं स्वप्न अतिशय रम्य आहे. मात्र ते प्रत्यक्षात अवतरण्यासाठी केवळ प्रेरक भाषणं वा आकर्षक जाहिराती पुरेशा नाहीत, तर त्यासाठी आपण प्रत्येकाने कृतिशील होण्याची गरज आहे. घराची स्वच्छता करतानाच आपल्या परिसराची कचराकुंडी न बनवता, परिसरही स्वच्छ ठेवण्यासाठीही प्रयत्नशील राहायला हवं.

प्रदूषणाच्या समस्येचा नीटपणे विचार केला तर असं लक्षात येईल की गेल्या काही वर्षांतली वाढत चाललेली भोगवादी वृत्ती याच्या तळाशी आहे. 'आणखी हवं, रोज काहीतरी नवीन हवं' हा हव्यास अनेक समस्या निर्माण करतोय. 'वापरा आणि फेकून द्या' हे आजच्या जगण्याचं सूत्र बनलं आहे. त्यातून निर्माण होणारा अगणित कचरा विल्हेवाटीशिवाय पडून राहतोय. गावोगावीच्या कचरा कुंडया, कचरा डेपो भरभरून वाहताहेत. कचरा पचवायची क्षेपणभूमीची क्षमता कमी झाल्याने सडणाऱ्या कचऱ्यातून रोगराईला आमंत्रण मिळतं आहे. 

प्रदूषणाची समस्या ही गुंतागुतीची साखळी आहे. अतिरेकी चंगळवाद ही या साखळीतली एक महत्त्वाची कडी असेल, तर थोडं थांबून आपण विचार करायला हवा. आपल्या बदललेल्या जीवनशैलीची चिकित्सा करायला हवी. 'भौतिक सुखाच्या' सध्याच्या संकल्पनांचा त्याग करून नवीन अंगीकारण्याची गरज असेल तर त्यासाठीही तयार असायला हवं.

कोणताही नवा सामाजिक बदल ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते. ती होण्यासाठी आणि झालेला बदल दीर्घकाळ टिकण्यासाठी शास्त्रशुध्द विचार, नियोजनबध्द कृती आणि संयम यांची गरज असते. एका रात्रीत हे घडणार नाही आणि आपण सहभागी झाल्याशिवायही घडणार नाही, हे स्वत:च्या मनाला बजावत या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवं.

प्रदूषणाच्या अनेक समस्यांनी आपण आज ग्रस्त आहोत.  त्यासाठी व्यक्तिगत पातळीवर आपण काय करू शकतो याचं दिशादर्शन करण्याचा प्रयत्न या अंकातील लेखांमधून केला आहे. यात सुचवलेले उपाय वाचकांनी करून पाहावेत, त्यात नवी भर घालावी, इतरांना सुचवावी... यातून एक चळवळ उभी राहिली, तर या अंकाचं ते लक्षणीय यश समजावं लागेल.

आपल्या स्वयंपाकघरात जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी बाहेरच्या कचरा कुंडीपर्यंत कमीत कमी कचरा जाण्यासाठी काय काय करता येईल याबाबत मार्गदर्शन करणारा सरस्वती कुवळेकर यांचा लेख आहे. तसंच आपली कॉलनी कचरामुक्त करण्यासाठी सुभाष राणे यांनी मुंबईतील मालाड परिसरात जी पावलं उचलली आहेत, त्याविषयीचा अंजना देवस्थळी यांचा लेख वाचकांना नवी दृष्टी देणारा आहे. त्याबरोबर ई-कचरा, घरगुती स्तरावर बायोगॅसचा वापर अशा विषयांवरील लेखांचाही अंतर्भाव आहे.

आपल्याला ठाऊक असलेल्या या प्रदूषणांव्यतिरिक्त आणखी काही प्रदूषणांनी आजचं समाजस्वास्थ्य हरपलं आहे. भौतिक सुखासाठी आधुनिक विज्ञानाची कास धरणारा बहुतांश समाज आजही अनेक त्याज्य परंपरांना, बुरसटलेल्या विचारसरणीला चिकटून आहे. त्यामुळेच या 'विज्ञानयुगात' पराकोटीला पोहोचलेली जातिभेदाधारित आणि लिंगभेदाधारित विषमता आढळते. सुशिक्षिततेचं वाढलेलं प्रमाणही या भेदांना थोपवू शकलेलं नाही, ही चिंतनीय बाब आहे. या प्रश्नांचा वेध घेणाऱ्या दोन लेखांचा अंतर्भाव अंकात केला आहे.

उद्याच्या प्रदूषणमुक्त भारतासाठी आपणां सर्वांनाच कृतिशील होण्याची प्रेरणा मिळो, ही स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा!