सरस्वतीचा वसा

विवेक मराठी    13-Aug-2016
Total Views |

मदतीचे असे अनेक हात एकत्र आले, तर सिग्नल शाळेसारखा कौतुकास्पद प्रकल्प उभा राहतो. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या इराद्याने सुरू झालेल्या सिग्नल शाळेचं समाजातील प्रत्येक स्तरात कौतुक होतंय. सिग्नलवरच्या मुलांना त्यांचा शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचं काम ही संस्था करते आहे. पण असे प्रकल्प केवळ कौतुकास्पदच नाहीत, तर ते अनुकरणीय आहेत. सर्वसामान्य मुलांप्रमाणे ही मुलंदेखील देशाचा भविष्यकाळ आहेत. देशाच्या भविष्यासाठी हा सरस्वतीचा वसा आपणही हाती घ्यायला हवा.


स्ते, सिग्ल्स, ट्रॅफिक, प्रवास हे शब्द सर्वसामान्य शहरवासीयांना नवीन नाहीत. ते आपल्या दिनचर्येचाच एक भाग झालेत. प्रवासादरम्यान अनेक लहान लहान मुलं आपल्याला सिग्नलवर दिसतात. कोणी गजरे विकत असतो, तर कोणी लिंबू-मिरची, कोणी गाडीची काच पुसून आपल्याकडून पैसे घेत असतो, तर कोणी भीक मागत असतो. कधी मदत म्हणून, कधी करुणा म्हणून तर कधी अक्षरशः चरफडत आपण दोन-पाच रुपये त्यांच्या हातावर टेकवतो आणि गाडी आपल्या मार्गाने पुढच्या प्रवासाला निघते.

समाजात जे दुर्लक्षित घटक आहेत, त्यांपैकीच एक म्हणजे ट्रॅफिक सिग्नलवर काम करून, भीक मागून आला दिवस पुढे ढकलणारी ही मुलं, ज्यांच्या अन्न-वस्त्र-निवारा-आरोग्य आणि शिक्षण या प्राथमिक गरजाही पूर्ण होताना दिसत नाहीत. शिक्षण हा या देशातील प्रत्येकाचा अधिकार आहे. जसा हा अधिकार तुम्हाला-आम्हाला मिळतो, तसाच तो सिग्नलवरच्या या मुलांनाही मिळायला हवा, असं ठाण्यातील 'समर्थ भारत व्यासपीठ' या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना वाटलं आणि त्यातून उभी राहिली अभिनव स्वरूपाची सिग्नल शाळा.

सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की गणवेशात वावरणारी मुलं, त्यांची रंगीबेरंगी दप्तरं, खेळाचं साहित्य, पुस्तकांची कपाटं, मुलांच्या अंगीच्या कलागुणांना वाव देणारं साहित्य, मोठ्ठे फळे, वेगवेगळया इयत्तांसाठी मोठ्ठाले वेगवेगळे वर्ग हेच चित्र आपल्या डोळयासमोर उभं राहतं. पण ठाण्यातली ही सिग्नल शाळा नेहमीच्या शाळांपेक्षा जरा वेगळी आहे. ठाण्यातील तीन हात नाक्यावरच्या पुलाखाली, मुंबईकडे तोंड करून उभं राहिलं की डाव्या हाताला पत्र्याचा एक मोठा कंटेनर दिसतो. या कंटेनरमध्येच रोज सिग्नल शाळा भरते. कंटेनरचा दरवाजा उघडून आत गेलं की वेगवेगळया वयोगटाची मुलं एकत्र अभ्यास करताना दिसतात.

समर्थ भारत व्यासपीठचे पदाधिकारी भटू सावंत, ऍड. पल्लवी जाधव आणि आरती नेमाणे यांनी या आगळयावेगळया शाळेविषयी अधिक माहिती दिली. भटू सावंत म्हणाले, ''सिग्नलवर फिरणारी ही मुलं आम्हाला नेहमी दिसत होती. त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटत होतं. आम्हाला समजलं की ठाणे महानगरपालिकेकडे सिग्नल शाळेसाठी राखीव निधी आहे. आम्ही महानगरपालिकेकडे या सिग्नल शाळेसाठी प्रस्ताव ठेवला आणि तो मंजूरही झाला. पण केवळ प्रस्ताव ठेवून हा विषय मार्गी लागणार नव्हता. त्या मुलांना शाळेपर्यंत कसं आणायचं? हा खरा प्रश्न होता.''

महानगरपालिकेच्या मान्यतेनंतर समर्थ भारत व्यासपीठचे कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले. सुरुवातीच्या टप्प्यात या सिग्नलवरच्या रहिवाशांचं सर्वेक्षण करण्यात आलं. सिग्नलवर एकूण किती माणसं राहतात, त्यांच्यापैकी शाळेत जाणाऱ्या वयाची मुलं किती, ते मूळचे कुठले आहेत, त्यांच्यापैकी किती जण शाळेत जातात अशा बऱ्याच अंगांनी हे सर्वेक्षण करण्यात आलं. पण याहून मोठी कामगिरी होती ती मुलांना शाळेत पाठवायला पालकांना राजी करण्याची. कारण सिग्नलवर राहणाऱ्यांसाठी त्यांची मुलं हा पैसे कमवण्याचा एक मार्ग असतो, मग ते भीक मागून असो वा काही वस्तू विकून. अशा वेळी या गोष्टीला फाटा देऊन त्यांना पालकांनी शाळेत पाठवणं निव्वळ अशक्य.

भटू सावंत पुढे सांगत होते, ''आम्ही जवळपास दीड महिना या लोकांशी बोलत होतो. त्यांना राजी करायला खूप वेळ गेला. हे लोक मूळचे पारधी समाजाचे. कळव्यात पारसिक बोगद्याजवळ डोंगरावर यांच्या वस्त्या आहेत. शहराच्या इतक्या जवळ असणाऱ्या या परिसरात अद्याप वीजही पोहोचलेली नाही आणि पाणीही नाही. केवळ चार पत्रे जोडून यांनी आपली खोपटी तयार केली आहेत. डोंगरावर राहून रोज कामधंद्यासाठी ठाण्यात येणं शक्य नाही, म्हणून ही माणसं सिग्नलजवळ वस्ती करून राहतात. अनेक मुलांचा जन्मही इथेच या सिग्नलजवळ झाला आहे.''

सिग्नल वस्तीवरच्यांशी अनेकदा संवाद साधल्यानंतर संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या असं लक्षात आलं की ते जिथे राहतात, तिथे जवळपासच शाळा असणं ही त्यांची गरज होती. कारण सिग्नलवरच्या असुरक्षित वातावरणात मुलं पालकांच्या आसपास असणं आवश्यक होतं आणि दुसरं म्हणजे त्यांचं कमाईचं ठिकाणही तेच होतं. या मुलांपैकी अनेक जण सिग्नलवर विक्री व्यवसाय करणारे आहेत. त्यावर शाळेमुळे परिणाम होऊ नये, यासाठी शाळा तीन हात नाक्याच्या सिग्नलजवळ पुलाखाली भरवायचं ठरलं. संध्याकाळी ट्रॅफिक असतो, त्यामुळे मुलांच्या फायद्याचा विचार करून शाळेची वेळही सकाळी 11 ते 2 अशी ठरवण्यात आली. आज या शाळेत एकूण 17 मुलं शिकतात.

जून महिन्यात ही मुलं पहिल्यांदा शाळेत आली, त्या वेळी त्यांना दात घासणं, आंघोळ करणं, स्वच्छ धुतलेले कपडे वापरणं अशा कोणत्याही सवयी नव्हत्या. शाळेत आल्यानंतर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पहिल्याच दिवशी एका सलूनवाल्याला बोलवून सगळया मुलांचे केस कापून घेतले. अनेकांच्या केसात उवा होत्या, त्यांना औषध लावलं. त्यांना केसाला लावण्यासाठी तेलाच्या बाटल्या दिल्या. तेल लावून केस कसे विंचरायचे ते शिकवलं. त्यांना ब्रश-पेस्ट देऊन दात कसे घासायचे, स्वच्छ आंघोळ कशी करायची ते शिकवलं.

स्वच्छतेच्या अभावामुळे जवळपास प्रत्येकाला खरूज, नायटा, पावसामुळे होणाऱ्या चिखल्या असा काही ना काही प्रकारचा त्वचाविकार होताच. कोणाला ताप, तर कोणाला सर्दी-खोकला होता. बालरोगतज्ज्ञांना बोलवून मुलांची पूर्ण तपासणी करून घेण्यात आली व औषधंही देण्यात आली. या मुलांना औषधं कशी किती प्रमाणात घ्यायची हे सांगून कळणार नव्हतं. त्यामुळे कार्यकर्तेशाळेतच त्यांना औषधं देण्याचं आणि मलम लावण्याचं काम करतात. अपुऱ्या आहारामुळे बऱ्याच मुलांच्या शरीरात जीवनसत्त्वाची आणि खनिजांची कमतरता होती. त्यांना रोज टॉनिकही देण्याला सुरुवात करण्यात आली. आज या मुलांच्या प्रकृतीत फरक दिसून येत असल्याचं संस्थेचे कार्यकर्ते सांगतात.

''सहसा घरातल्या मुलांना खेळाच्या, खाण्याच्या निमित्ताने किंवा आईवडलांच्या सांगण्यावरून एका जागी बसण्याची सवय असते. पण या मुलांना एका जागी बसण्याची सवय अजिबातच नव्हती. त्यामुळे मुलं शाळेत आल्यानंतरचं आमच्यापुढचं आव्हान होतं त्यांना एका जागी बसवून ठेवण्याचं. अशा वेळी त्यांना शिकवायला सुरुवात केली असती, तर ती मुलं कंटाळून शाळेत यायची बंद झाली असती. म्हणून सुरुवातीच्या काळात स्क्रीन लावून कार्टून फिल्म्स, वेगवेगळे मनोरंजनपर कार्यक्रम लावून आम्ही त्यांना एका जागी बसण्याची सवय केली. त्यानंतर पंधरा दिवसांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली.'' ऍड. पल्लवी जाधव सांगत होत्या.

विद्यार्थी म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या एका शाळेच्या पटावर या मुलांची नोंद आहे. त्यांची वयोगटानुसार इयत्तावार विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांचा अभ्यास आणि परीक्षा घेतल्या जातील. सिग्नल शाळेत मुलांना शिकवण्याची पध्दत मात्र वेगळी आहे. त्याविषयी भटू सावंत यांनी सांगितलं, ''ही मुलं पालिकेच्या शाळेच्या पटावर असली, तरी त्यांना त्यांना थेट क्रमिक पुस्तकी शिक्षण देणं शक्य नव्हतं. कारण यांच्यापैकी अनेकांना साधी अक्षरओळखही नव्हती. मोहन या एका मुलाचं सहावीपर्यंत शिक्षण झालं होतं, पण त्याची शाळा सुटून आज चार वर्षं झाली आहेत. त्यामुळे पुन्हा पाटी कोरी झाली आहे. या सगळया मुलांना आम्ही मराठी माध्यमातून अगदी अ आ इ ई पासून शिकवतो आहोत.''

या शाळेत मुलांना समजायला अधिक सोपं जाईल अशा पध्दतीने मराठी, गणित, विज्ञान यासह सर्व विषय शिकवले जातात. मुलांकडे वैयक्तिक स्वरूपात लक्ष देऊन त्यांचा अभ्यास घेतला जातो. शिक्षकांप्रमाणे ठाणे परिसरातील सामाजिक कामाची आवड असणाऱ्या व्यक्तीही मुलांना शिकवायला येतात. ठाण्यातील प्रसिध्द बासरीवादक आठवडयातून दोन तास मुलांना शिकवायला येतात. चित्रकला, हस्तकला, शारीरिक शिक्षण असे विषयही या मुलांना शिकवले जातात. सिग्नल शाळेत ज्ञानसाधना कॉलेजमधील एन.एस.एस.चे विद्यार्थी शाळेत येऊन मुलांना अभ्यासात मदत तर करतातच, त्यासह त्यांना योगाचंही प्रशिक्षण देतात.


सिग्नलवर उघडयावर राहणाऱ्या मुलांना आपल्याप्रमाणे संपूर्ण आहार मिळणं हे केवळ अशक्य. मिळेल ते आणि मिळेल तेवढं खायचं. सिग्नल शाळा मात्र मुलांचं वैचारिक पोषण करताना त्यांचं शारीरिक पोषणही करत आहे. सिग्नल शाळेतील मुलांना सकाळी भरपेट नाश्ता, दूध, दुपारी पोळी-भाजी-वरण-भात असा चौरस आहार मिळतो. ठाण्यातील एका बचत गटाला याचं कंत्राट देण्यात आलं आहे. या बचत गटातर्फे रोज ठरलेल्या वेळी निवडक स्वरूपाचा आहार शाळेत पोहोचवला जातो. इथे मिळणारा आहार हेही मुलं नियमितपणे शाळेत येण्याचं एक कारण असल्याचं संस्थेच्या लोकांनी सांगितलं. संपूर्ण आहारामुळे मुलांच्या प्रकृतीमध्ये बराच फरक पडला आहे. इथे यायला लागल्यापासून मुलांमध्ये घडलेला सगळयात मोठा सकारात्मक बदल म्हणजे सिग्नल शाळेच्या परिसरातील एकही मूल आज भीक मागत नाही. अगदी संस्थेत जेवायला बसल्यावरही हात पुढे करायचा नाही, हा संस्थेने घालून दिलेला नियम हे सगळे जण आनंदाने पाळतात.

''सुरुवातीच्या काळात मळलेल्या अवस्थेत येणारी, शिव्या देणारी, शिक्षणाबाबत फारशी उत्सुक नसलेली मुलं आज मनापासून छान आवरून शाळेत येतात. घरी केलेला अभ्यास कौतुकाने दाखवतात. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला उत्सुक असतात. हे पाहून फार आनंद होतो. आज दीड-दोन महिन्यांनतर घडलेला सगळयात मोठा बदल म्हणजे या शाळेकडे बघण्याचा त्यांच्या पालकांचा दृष्टीकोन संपूर्णपणे बदलला आहे. दर दिवशी मुलांमध्ये होणारा बदल तेही अनुभवतायत. शेवटी प्रत्येक आईबापाला आपलं मूल आनंदात आहे, शिकत आहे, त्याला चांगल्या सवयी आहेत, हे चित्र सुखावणारं असतं. आज हे सगळं सिग्नल शाळेमुळे घडतंय या भावनेने मला फार बरं वाटतं.'' भटू सावंत सांगत होते.

मदतीचे असे अनेक हात एकत्र आले, तर सिग्नल शाळेसारखा कौतुकास्पद प्रकल्प उभा राहतो. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या इराद्याने सुरू झालेल्या सिग्नल शाळेचं समाजातील प्रत्येक स्तरात कौतुक होतंय. सिग्नलवरच्या मुलांना त्यांचा शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचं काम ही संस्था करते आहे. पण असे प्रकल्प केवळ कौतुकास्पदच नाहीत, तर ते अनुकरणीय आहेत. सर्वसामान्य मुलांप्रमाणे ही मुलंदेखील देशाचा भविष्यकाळ आहेत. देशाच्या भविष्यासाठी हा सरस्वतीचा वसा आपणही हाती घ्यायला हवा.

9920450065

 mrudula.rajwade@gmail.com