टाईप टू मधुमेह

विवेक मराठी    16-Aug-2016
Total Views |

टाईप वन मधुमेह म्हणजे इन्श्युलीनचा अभाव हे आपण पाहिलं. टाईप टू मधुमेहात अशी इन्श्युलीनची पूर्ण कमतरता असतेच असं नाही. कधीकधी तर सामान्य माणसांपेक्षा जास्त इन्श्युलीन शरीरात असूनही टाईप टू मधुमेह होतो, हेसुध्दा आपण लक्षात घेतलं. त्याचबरोबर या प्रकारच्या मधुमेहात केवळ रक्तातलं ग्लुकोज वाढत नाही, तर कोलेस्टेरॉल, रक्तदाब अशा अनेक समस्या सोबत घेऊन तो येतो, मेटाबोलिक सिंड्रोमचा एक भाग असतो, याबद्दल आपण माहिती घेतली. मग आता टाईप टू मधुमेहासंदर्भात आणखी सांगायचं काय राहिलं? असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे.


साधारण पंचाण्णव ते सत्त्याण्णव टक्के लोकांमध्ये जो मधुमेह दिसतो, तो या प्रकारात मोडतो. त्यामुळे या प्रकारच्या मधुमेहाची थोडी सखोल चर्चा करणं आवश्यक आहे. साधारणत: काय होतं... तुम्ही डॉक्टरांना भेटता, त्यांच्याशी जुजबी बातचीत करता. कारण ना त्यांच्याकडे पुरेसा वेळ असतो, ना तुम्हाला उसंत असते. तुमच्या मनातले बरेचसे प्रश्न अनुत्तरित राहतात. बहुधा त्यांच्या दवाखान्यातून तुम्ही बाहेर पडता ते सूचना किंवा उपदेश घेऊन. त्याऐवजी जर तुम्ही या प्रश्नाचं ज्ञान मिळवलं, तर तुम्ही स्वत:देखील मधुमेहाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊ शकता. म्हणूनच थोडं विस्तृत विवेचन करणं आवश्यक वाटतं.

टाईप वन मधुमेह म्हणजे इन्श्युलीनचा अभाव हे आपण पाहिलं. टाईप टू मधुमेहात अशी इन्श्युलीनची पूर्ण कमतरता असतेच असं नाही. कधीकधी तर सामान्य माणसांपेक्षा जास्त इन्श्युलीन शरीरात असूनही टाईप टू मधुमेह होतो, हेसुध्दा आपण लक्षात घेतलं. त्याचबरोबर या प्रकारच्या मधुमेहात केवळ रक्तातलं ग्लुकोज वाढत नाही, तर कोलेस्टेरॉल, रक्तदाब अशा अनेक समस्या सोबत घेऊन तो येतो, मेटाबोलिक सिंड्रोमचा एक भाग असतो, याबद्दल आपण माहिती घेतली. मग आता टाईप टू मधुमेहासंदर्भात आणखी सांगायचं काय राहिलं? असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे.

परंतु आणखी बरंच समजून घ्यायचं बाकी राहिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हा मधुमेह का होतो? आताच घरटी एक तरी माणसामध्ये हा अनाहूत पाहुणा का अवतरू लागलाय? का आपला देश त्याची जागतिक राजधानी होऊ लागलाय? अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं मिळाली, तरच मधुमेहाचा हा प्रकार आपण नीट समजून घेऊ शकू.

टाईप वन आणि टाईप टू मधुमेह यांच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे दोन्हीमध्ये जीन्सना वातावरणाची जोड मिळाली की मधुमेह होतो. पण यात जीन्सही टाईप वन मधुमेहापेक्षा निराळे आहेत आणि त्यांचं प्रत्यक्ष मधुमेहात रूपांतर व्हायला लागणारं वातावरणसुध्दा वेगळं आहे. इथे जीन्सच्या दोषामुळे बीटा पेशी नष्ट करणाऱ्या ऍंटीबॉडीज बनत नाहीत. त्यामुळे बीटा पेशी निदान मधुमेह होईपर्यंत तरी शिल्लक असतात. टाईप वन मधुमेहात इन्श्युलीनची मागणी इतरांसारखीच असते. फक्त ही इन्श्युलीनची सामान्य मागणी पुरी करायलादेखील बीटा पेशी बाकी नसतात. टाईप टू मधुमेहात मागणीच इतकी वाढलेली असते की असलेल्या बीटा पेशी ती मागणी पुरी करू शकत नाहीत व मधुमेह होतो.

आता प्रश्न उद्भवतो की ही मागणी अशी अचानक का वाढते? खरं सांगायचं तर मागणी तितकीशी वाढतही नाही. परंतु जे काही इन्श्युलीन बनत असतं, ते आपलं काम व्यवस्थित करायला समर्थ नसतं. शरीराच्या पेशींवर इन्श्युलीन ज्या प्रमाणात प्रभाव टाकायला पाहिजे, त्या प्रमाणात ते टाकू शकत नाही. मग शरीराचं काम भागवायला शरीर अधिक अधिक इन्श्युलीन बनवू लागतं. आपण घर बांधायला घेतलं आणि त्यासाठी मागवलेले मजूर कामचोर निघाले, म्हणून जास्त मजूर लावून घर पुरं करून घेतलं.. यासारखा हा प्रकार आहे. म्हणजे या मधुमेहात उलट नेहमीपेक्षा अधिक इन्श्युलीन रक्तात असतं - 'हायपर इन्श्युलिनेमिया' असतो. शरीराच्या पेशी त्या इन्श्युलीनला दाद देत नाहीत. इन्श्युलीनचा निरोप मिळूनही पेशी कामात चालढकल करतात. यालाच वैद्यकीय भाषेत 'इन्श्युलीन रेझिस्टन्स' म्हणतात.

तुमच्या मनातला पुढचा प्रश्न - पेशी अशा का वागतात? या प्रश्नाचं उत्तर सरळसोट नाही. याला अनेक पैलू आहेत. एखादी गोष्ट फार घाईत बनवायला जावी आणि तिचा दर्जा घसरावा असं व्हायला लागतं. बीटा पेशींच्या जीन्स इन्श्युलीन बनवायला घेतात, तेव्हा ते फिनिश्ड प्रॉडक्ट नसतं. इन्शुलीन हे प्रोटीन आहे. प्रोटीन विशिष्ट आकार धारण केल्याशिवाय काम करू शकत नाही. ओबडधोबड इन्श्युलीनला 'प्रीप्रोइन्श्युलीन' आणि 'प्रोइन्श्युलीन' म्हणतात. पेशींच्या अंतरंगात त्यावर प्रक्रिया व्हावी लागते. तेव्हा कुठे नीट काम करणारं इन्श्युलीन बनतं. टाईप टू मधुमेहात घाईत इन्श्युलीनसोबत प्रोइन्श्युलीनदेखील रक्तात येतं. ते अर्थातच कुचकामी असतं. म्हणजे काही बाबतीत पेशींचं चुकत नाही. त्यांना त्यांचं काम करायला मिळणारा आदेश चुकीचा असतो. प्रोइन्श्युलीन त्यांना नीट आदेशच देऊ शकत नाही.

हे झालं बीटा पेशींतून निघणाऱ्या इन्श्युलीनबद्दल. त्यानंतरदेखील काही कमी समस्या नसतात. 'इन्श्युलीन म्हणजे चावी' अशी आपण कल्पना केली की बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. कुलपाला चावी लागल्यावर कुलपाच्या आतल्या लिव्हर्स फिरतात. थोडासा खुट्ट आवाज होतो आणि कुलूप उघडतं. इन्श्युलीन पेशींच्या आवरणात दडलेल्या रिसेप्टरला घट्ट बसलं की काहीसं असंच होतं. तिथेही कुलपाच्या लिव्हर्ससारख्या काही प्रोटीन्सची मांदियाळी असते. एकाला एक साखळीच्या कडयांप्रमाणे प्रोटीन्सची चेन रिएॅक्शन सुरू होते. यात कुठलंही एखादं प्रोटीन चुकलं, तर पुढचा सगळा कारभार बिघडतो. जे जीन्स या प्रोटीन्सचा संदेश आपल्या पोटात दडवून असतात, त्या जीन्समध्ये दोष असल्यास प्रोटीन्सदेखील सदोष बनतात आणि इन्श्युलीनचं काम बिघडतं.

जीन्सशी संबंधित आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या विचाराकडे तुमचं लक्ष वेधलं पाहिजे. कदाचित हे वाचल्यावर तुमचं बरंच समाधान होईल. या प्रकाराला वैद्यकीय भाषेत 'थ्रिफ्टी जीन्स हायपोथिसिस' म्हणतात. यामागची बैठक अगदी साधी आहे. तुमच्या जीन्समध्ये खूप महत्त्वाचे बदल घडून यायला कित्येक हजार वर्षांचा कालावधी जावा लागतो. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिध्दान्ताने हे आपल्याला कळलं आहे. आपल्या जीन्सच्या मूलभूत ढाच्यामध्ये किमान गेली वीस हजार वर्षं बदल घडलेला नाही. पण आपल्या जीवनशैलीत मात्र आमूलाग्र फरक झालेला आहे. आपण पूर्वी इतर प्राण्यांसोबत जंगलात राहत होतो. तिथे जगण्याची अतोनात स्पर्धा होती. आपलं खाणं मिळवायला आणि नुसतं इतर जीवघेण्या धोक्यांपासून आपला बचाव करायला खूप कष्ट पडत. प्रचंड भटकंती करावी लागे. खाणं वेळेवर मिळेलच याची शाश्वती नसे. तिथे निसर्ग दादा होता. निसर्गात अन्नचक्र असतं. वर्षाचे बाराही महिने सारखंच अन्न उपलब्ध नसतं. कधी ते मुबलक मिळतं, तर कधी फाके पडतात. जेव्हा भरपूर खायला मिळेल तेव्हा खायचं आणि त्याची चरबी करून शरीरात साठवून ठेवायची. जेव्हा उपासमार होईल, तेव्हा या साठवलेल्या चरबीचा उपयोग करून दुर्भिक्ष निभावून न्यायचं, हा निसर्गाचा रिवाज.

त्यानंतर आपण आपलं भटकं जंगली जीवन सोडून दिलं. थोडे स्थावर झालो. गावं बनवून शेती करायला लागलो. आता पूर्वीपेक्षा उपासमार कमी झाली. रोजच्या रोज शिकार करण्याची गरज उरली नाही. तृणधान्य, कडधान्य अशा गोष्टी आहारात यायला लागल्या. मांसाहार होता, पण तुलनेने कमी कमी होऊ लागला. अर्थात शेतीतही कष्ट होतेच. पण निदान वर्षाचा बराच काळ खाण्याची भ्रांत नसे. नाही म्हणायला कधीकधी पोटाला चिमटा काढावा लागे. कुटुंबातल्या लहान आणि वयस्कर सदस्यांसाठी राखून उरलेलं खाणं भाग पडे. तरीही पहिल्यापेक्षा परिस्थिती बरी होती.

गेल्या दोनेक शतकांत आपण प्रचंड प्रगती केली. आपल्या रोजच्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त अन्न आपल्याला उपलब्ध झालं. यांत्रिकतेमुळे शारीरिक कष्टात कमालीची घट झाली. अन्नाचा नाश खूपच कमी झाला. बाजार व्यवस्था आली. खाणं केव्हाही कितीही आणि कुठेही मिळू लागलं. पाककलेने मोठी झेप घेतली. अन्न पूर्वीपेक्षा अधिक चविष्ट, अधिक रुचकर बनलं. माणसं जगण्यासाठी खाण्याऐवजी खाण्यासाठी जगू लागली. खाण्याची चंगळ आणि व्यायामाच्या नावाने बोंबाबोंब, असं शरीर लठ्ठ करणारं समीकरण तयार झालं. गंमत म्हणजे हे सगळं फार जलद, जेमतेम शंभर वर्षांच्या कालावधीत घडलं. तितक्या वेळेत आपले जीन्स बदलणं शक्य नव्हतं. ते आपल्या जुन्या स्वभावाला चिकटून राहिले. थोडयाशा अन्नावर दिवस काढण्याची जीन्सची सवय. अचानक आलेल्या एवढया अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करून ते वापरून टाकायची सोय जीन्स करूच शकले नाहीत. त्यामुळं त्या अतिरिक्त अन्नाचं थेट चरबीत रूपांतर झालं. आपल्या पोटाचा घेर वाढला. अन्न साठवण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेलं इन्श्युलीन बनवून आपल्या बीटा पेशी थकून गेल्या. आपण मधुमेही झालो. हीच ती 'थ्रिफ्टी जीन्स थिअरी.'

यासोबत आणखी एक विचार मांडला गेला. 'थ्रिफ्टी फेनोटाइप' नावाचा. यातही जवळपास थ्रिफ्टी जीन्सचीच कल्पना वेगळया संदर्भात उदयाला आली. आईच्या उदरात असताना बाळाला पुरेसं पोषण मिळालं नाही, तर त्याच्या शरीरात कमी अन्नावर जगण्यासारखे बदल घडतात. एकदा बाळ या जगात आलं की त्याला खूप खायला मिळू लागतं आणि त्याची पंचाईत होऊ लागते. वाढीव पोषणाला हाताळण्याची क्षमता नसलेल्या बाळाच्या शरीरात प्रमाणाबाहेर चरबी वाढू लागते. ते कमी वयात आणि मोठया प्रमाणात मधुमेही बनू लागतं.

आपल्या देशाला दोन्ही थिअरीज लागू आहेत. आपल्या शेतीप्रधान देशाने कायमच बैलांवर अवलंबून शेती केली. उत्पन्न कमी आणि खाणारी तोंडं अधिक, अशी परिस्थिती गेल्या काही दशकांत बदलली. यांत्रिकी शेतीने उत्पन्न अचानक वाढलं. सुबत्ता पचवायला आपलं शरीर तयार नव्हतं. आपला देश मधुमेहाची राजधानी होण्यामागे जी काही कारणं सांगितली जातात, त्यात ही प्रमुख म्हणायला हरकत नाही.     &  9892245272