निर्माल्यातून खतनिर्मिती आणि  हरित कचऱ्यापासून इंधन!

विवेक मराठी    16-Aug-2016
Total Views |

सुरुवातीला फक्त उत्सवादरम्यान करण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची व्याप्ती हळूहळू वाढत गेली. आज शहरातील देवालयं, स्मशानघाट, आणि गृहसंकुलं यामधील निर्माल्य संकलित करून त्याचा खतनिर्मितीसाठी वापर केला जात आहे. याचे फायदे म्हणजे हे निर्माल्य प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून खाडीत किंवा तलावात टाकण्यात येत असे. प्लॅस्टिकच्या आणि निर्माल्याच्या प्रदूषणापासून काही प्रमाणात तरी खाडी व तलाव यांची मुक्तता झाली.


ठाण्यात एके दिवशी एक बातमी आली - 'ठाण्याच्या मासुंदा तलावात हजारो मासे मृतावस्थेत आढळले.' प्रदूषणामुळे हे मासे मेले. देवपूजेतलं तलावात विसर्जन केलेलं निर्माल्य आणि त्यामुळे पाण्याचं होत असलेलं प्रदूषण हे या घटनेमागचं कारण. त्यावर काहीतरी तोडगा काढायला हवा या विचाराने ठाण्यातील समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचे कार्यकर्ते सक्रिय झाले. मग सुरू झालं संस्थेच्या वतीने शोधचक्र! तलावात एका प्रमाणाबाहेर निर्माल्य जमलं की ते काढून क्षेपणभूमीवर, म्हणजे जिथे शहरातला अन्य कचरा जमा होतो त्या ठिकाणी पाठवून दिलं जात असे. भक्तिभावाने घरातल्या देवपूजेतली फुलं तलावात सोडणाऱ्या भाविकांना ते निर्माल्य अखेर क्षेपणभूमीवर जातं याची कल्पना नसते. निर्माल्याचा शेवट असा व्हावा हे निश्चितच धक्कादायक होतं. त्यामुळे संस्थेने संशोधनाधारित अभ्यासाअंती या निर्माल्याचा वापर खत बनवण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला. यातून जन्म झाला निर्माल्यापासून खत बनवणे या भव्य प्रकल्पाचा!

मासे मेल्याची ती एक छोटीशी घटना! म्हटलं तर दुसऱ्याच दिवशी बातमी विसरून जाण्यासारखी! पण माझ्या डोक्यात त्या बातमीने घर केलं आणि प्रदूषणाची समस्या आपल्या शहरातसुध्दा गंभीर आहे, याची जाणीव झाली. हे साल होतं 2007! ठाणे शहराचा नव्याने विकास होऊ लागला होता आणि परिणामी लोकसंख्या वाढू लागली होती. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होणार याची कल्पना आली. म्हणून मग त्यावर उपाय शोधायचं समर्थ भारत व्यासपीठने ठरवलं.

सुरुवातीला मंदिर, स्मशानभूमी आणि दोन-चार गृहसंकुलांमधून गोळा होणारं निर्माल्य आज तब्बल 150 गृहसंकुलांतून, 20 देवालयांतून आणि 17 स्मशानभूमींतून संकलित केलं जात आहे. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या 7 हजार चौरस फुटांवर उभारलेल्या निर्माल्य व्यवस्थापन केंद्रात त्यावर प्रक्रिया केली जाते.

या ठिकाणी आणल्यावर त्यातील अविघटनशील पदार्थ वेगळे केले जातात. त्यानंतर हे निर्माल्य मशीनमध्ये टाकून बारीक करण्यात येतं. तब्बल 40 दिवसांनंतर यातून खतनिर्मिती होते. यानंतर हे खत महापालिकेच्या अनेक बगिच्यांसाठी देण्यात येतं. या उपक्रमामुळे अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. हे खत बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या या महिलांना विकण्यासाठी दिलं जातं. त्यामुळे या महिलांना रोजगार मिळतो. शिवाय, देवाला वाहिलेल्या फुलांपासून शास्त्रशुध्द पध्दतीने तयार झालेलं हे खत अनेक जण प्रसाद म्हणूनसुध्दा घरी नेतात.

शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिवर्तनासाठी प्रयत्नशील असलेल्या या संस्थेला मानाचे पुरस्कार अनेक मिळाले आहेत. निर्माल्य प्रकल्पासाठी त्यांना राष्ट्रीय पातळीवरील 'स्कॉच गुड गव्हर्नन्स' हा पुरस्कार मिळाला आहे. नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक डॉ. जॉर्न बर्न यांनीसुध्दा संस्थेच्या या प्रकल्पाला भेट देऊन त्यांचं कौतुक केलं होतं. तर मॅगसेसे पुरस्कार सन्मानित डॉ. राजेंद्र सिंग, नीलिमा मिश्रा, डॉ. विकास आमटे, डॉ. रवी कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे, विलास चाफेकर आदी सामाजिक क्षेत्रातील नामवंतांनी या संस्थेला भेट देऊन मार्गदर्शन केलं आहे.

2007पासून सुरू झालेल्या या प्रकल्पाने आता चांगलाच वेग घेतला आहे. महापालिकेच्या मदतीने शहरातील अनेक प्रमुख ठिकाणांहून निर्माल्य गोळा करणं संस्थेला आता शक्य झालं. 2010 ते 2012 या कालखंडात पालिकेच्या सर्वच गणेश विसर्जन घाटांवरील निर्माल्य संकलित करून तब्बल 600 टन खतनिर्मिती करण्यात संस्थेला यश आलं.

सुरुवातीला फक्त उत्सवादरम्यान करण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची व्याप्ती हळूहळू वाढत गेली. आज शहरातील देवालयं, स्मशानघाट, आणि गृहसंकुलं यामधील निर्माल्य संकलित करून त्याचा खतनिर्मितीसाठी वापर केला जात आहे. याचे फायदे म्हणजे हे निर्माल्य प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून खाडीत किंवा तलावात टाकण्यात येत असे. प्लॅस्टिकच्या आणि निर्माल्याच्या प्रदूषणापासून काही प्रमाणात तरी खाडी व तलाव यांची मुक्तता झाली. त्याचबरोबर क्षेपणभूमीवरचा ताणही कमी झाला. पहिली काही वर्षं गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांना व सचिवांना जनजागृती म्हणून तयार खत उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे लोकसहभाग प्राप्त झाला.


प्रत्येक प्रकल्पाला चांगली क्षमता असलेले पूर्णवेळ कार्यकर्ते मिळणं आवश्यक असतं. भावेश गुराम या समर्थ भारत व्यासपीठच्या कार्यकर्त्याने ही गरज पूर्ण केली. त्याने या प्रकल्पाची धुरा सांभाळली. त्यांच्याबरोबर या प्रकल्पात 6 कामगार काम करतात तर कार्यालयीन कामात 6 कर्मचारी मदत करतात. तयार झालेलं खत प्रदर्शनादरम्यानही विकलं जात. त्याचबरोबर संस्थेने गरजू महिलांना याद्वारे एक रोजगार मिळवून दिला आहे. परित्यक्तांना किंवा संसारात अडचणी असणाऱ्या अनेक महिलांना यामुळे स्वयंपूर्ण होता आलं. संस्थेच्याच 'ती महोत्सव' या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक महिलांना बाजारपेठ उपलब्ध झाली. 

हे सर्व करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा होता आणि त्यासाठी संस्थेने उत्सवांदरम्यान या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी खास जनजागृती कार्यक्रमही राबवले. त्यामुळे लोकांना संस्थेच्या या प्रकल्पाची माहिती मिळाली आणि निर्माल्य पाण्यात टाकून पाणी प्रदूषित करण्यापेक्षा, त्या निर्माल्याचा उपयोग खतनिर्मितीसाठी व्हावा या विचाराने लोक संस्थेकडे निर्माल्य दान करू लागले.

असे उपक्रम राबवण्यासाठी गरज असते निधीची. मात्र देणगीद्वारे असे प्रकल्प राबवायचे नाहीत, हे संस्थेचं ब्रीद! त्यामुळे स्वयंशिस्तीने  निरनिराळे प्रकल्प राबवून त्यातूनच निधीची निर्मिती केली जाते. शहर हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होतो.

याचसारखा दुसरा प्रकल्प आस्थेनं राबवला, तो म्हणजे हरित कचऱ्यापासून इंधन! महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग अनेकदा झाडांची छाटणी करतो किंवा अनेकदा झाडं पडतात. हे सर्व शेवटी जमा होऊन पोहोचतं ते क्षेपणभूमीवर! त्यामुळे या हरित कचऱ्याचा वापर करण्याची संकल्पनासुध्दा संस्थेतर्फे राबवण्यात येते. या हरित कचऱ्याचं रूपांतर होतं इंधनामध्ये! तब्बल 4 ते 5 हजार टन कचरा असाच फेकून दिला जात असे. या प्रकल्पासाठी मात्र त्यांना देणगीदारांनी यंत्रसामग्री देऊ केली आणि त्यातून उभा राहिला हरित कचऱ्यापासून कोळसा निर्मितीचा प्रकल्प! यातून निर्माण होणारं हे इंधन, संस्था महापालिकेला पुढील दहा वर्षं पुरवत राहणार आहे. दर दिवशी 1 टन इतकं इंधन महापालिकेला या प्रकल्पातून मिळत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात असलेल्या बॉयलरसाठी या इंधनाचा वापर मोठया प्रमाणात होतो. त्याचबरोबर शहरातील कॅडबरी या चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीलासुध्दा या इंधनाचा पुरवठा केला जाणार आहे. बॉयलर ज्या ठिकाणी वापरला जातो, त्या ठिकाणी कोळश्याचा वापर करण्यात येतो. यामुळे बाहेरील राज्यातून कोळसा आणण्याची वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया आपोआप थांबली. इंधन पुरवठा स्थानिक पातळीवर होऊ लागल्याने शहरातील अनेक कंपन्या या इंधनाची मागणी करू लागल्या असल्याची माहिती भटू सावंत यांनी दिली. कुणाल गोडांबे हा इंजीनियर तरुण हरित कचऱ्यापासून कोळसा म्हणजेच ब्रीकेट तयार करण्याच्या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळतो. त्याच्या सोबतीला 7 कर्मचारी या प्रकल्पावर काम करतात.

 


कोणताही गाजावाजा न करता ही संस्था अविरतपणे हे काम करत आहे आणि शहराला भेडसावणाऱ्या एका गंभीर समस्येचं निराकरण करण्यासाठी झटत आहे. संपूर्ण देशभरात अनेक मंदिरं आहेत. या सर्व ठिकाणच्या निर्माल्याचा अशा प्रकारे उपयोग व्हायला हवा. निदान महाराष्ट्रापुरतं तरी शासनाने त्या त्या मंदिरांच्या ठिकाणी असे प्रकल्प राबवले तर प्रदूषण आणि कचरा हे दोन्ही प्रश्न बऱ्याच अंशी सोडवले जातील.

समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेची स्थापना 3 सप्टेंबर 2005 रोजी पुण्यात मुकुंदराव गोरे यांनी केली. पुणे येथे मुख्य कार्यालय असून संजय सफई, रामचंद्र भट, विभावरी गोखले, श्रीकांत बक्षी हे संचालक समर्थ भारत व्यासपीठाच्या कामाची दिशा निश्चित करत असतात. आज सोलापूर, ठाणे, धुळे आदी ठिकाणीसुध्दा या संस्थेचं काम सुरू आहे. ठाण्यात अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी, उपाध्यक्ष उल्हास कार्ले, कार्याध्यक्ष मंगेश वाळंज, अनंत तेलखडे, पुरुषोत्तम आगवण, भटू सावंत, आरती नेमाणे, आरती परब, पल्लवी जाधव आदी पदाधिकारी आणि सदस्य मोठया हिरिरीने हे काम करीत आहेत.

समाजात असणारी विषमता, आरोग्य, शिक्षण, ग्लोबल वॉर्मिंग, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, अत्याचार, तस्करी असे अनेक प्रश्न विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवून परिवर्तन घडवणं हे संस्थेचं उद्दिष्ट आहे. यासाठी जागतिक पटलावरसुध्दा संस्थेचं काम पोहोचलेलं आहे. समर्थ भारत व्यासपीठाची मातृसंघटना असलेल्या श्रमसेवा न्यास या संस्थेस विश्व व्यापार संघटनेची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विविध देशांमध्ये होणाऱ्या मंत्रिपरिषदांमध्ये या संस्थेला आपलं कार्य सादर करण्याची संधी मिळते. आजवर मेक्सिको, हाँगकाँग, केनकुन, इंडोनेशिया आदी ठिकाणी संस्थेचे प्रतिनिधी आपल्या कार्याच्या सादरीकरणासाठी गेले आहेत.

ती महोत्सव, ग्रीन आयडिया, प्लॅस्टिकमुक्त मंडई, शून्य कचरा मोहीम, घरच्या घरी खतनिर्मिती, सिग्नलवरील मुलांसाठी अनोखी सिग्नल शाळा आदी अनेक प्रकल्प संस्था राबवत आहे आणि या उपक्रमांना समाजाचा भरभरून पाठिंबा मिळत आहे.

9987030916