इथं चॅम्पियन घडतात!

विवेक मराठी    19-Aug-2016
Total Views |

2012 साली लंडन ऑलिंपिकमध्ये 'फुलराणी' सायना नेहवालने कांस्यपदकाची कमाई केली. हे वर्षच तिच्यासाठी विशेष ठरलं. कारण ऑलिंपिकव्यतिरिक्त स्विस ओपन, थायलंड ओपन ग्रांप्री, डेन्मार्क ओपन, फ्रेंच ओपन याही स्पर्धा गाजवल्या. या पार्श्वभूमीवर, सायनासारखी बॅडमिंटनपटू जिथे घडली त्या गोपीचंद पुलेला बॅडमिंटन ऍकॅडमीचा परिचय करून देणारा लेख साप्ताहिक विवेकच्या 2013 दिवाळी अंकात प्रसिध्द झाला होता. क्रिडा पत्रकार ऋजुता लुकतुके यांनी लिहिलेला हा दीर्घ लेख माहितीपूर्ण आणि अतिशय ओघवत्या लिखाणामुळे वाचकांच्या पसंतीस उतरला होता. तो लेख पुन्हा विवेकच्या नेट एडिशनवर प्रकाशित करत आहोत. वाचावा, प्रतिक्रिया नोंदवावी आणि आवडल्यास शेअर करावा.


याच वर्षी मार्च महिन्यात जय महाराष्ट्र या वाहिनीसाठी क्रीडा प्रतिनिधी या पदासाठी मुलाखत देण्यासाठी गेले असताना तिथे मला एक प्रश्न विचारण्यात आला ः सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यावर काय करणार? प्रश्नाचा रोख असा होता की पुढे क्रीडा क्षेत्राला बातम्या/हेडलाईन कुठून मिळणार? तेव्हा मी छातीठोकपणे संपादकांना सांगितलं होतं, की बॅडमिंटन हा भारतातला क्रिकेटनंतरचा मोठा आणि हॅपनिंग खेळ आहे. नवीन नवीन चॅम्पियन या खेळातून येताहेत आणि आपल्याला बातम्या आणि त्याही सकारात्मक, या खेळातूनच मिळतील.

मी त्या वेळी हे बोलले हा माझा आत्मविश्वास नव्हता, तर माझा भरवसा होता पुलेला गोपीचंद यांच्यावर... मी म्हटलं त्यातलं सुदैवाने काहीही चुकीचं ठरलं नाही. भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स करंडक जिंकला, त्यानंतरची वेस्ट इंडीजविरुध्दची मालिकाही जिंकला. पण त्याच वेळी बॅडमिंटनमध्येही एक मोठी घटना घडत होती. भारतीय बॅडमिंटन असोसिएशन इंडियन प्रिमिअर लीगच्या धर्तीवर बॅडमिंटन लीग सुरू करण्याच्या प्रयत्नात होती. आणि राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांच्याच स्वप्नातून ती साकार होत होती. या लीगमुळे देशात बॅडमिंटन या खेळाला क्रिकेटसारखं ग्लॅमर मिळालं आणि आर्थिकदृष्टया पहिलाच प्रयत्न तोटयात गेला, तरी प्रेक्षकांनी लीग चांगलीच उचलून धरली. ज्या चारही शहरात ही लीग झाली, तिथे प्रेक्षकांनी सामन्यांना गर्दी केली. ही लीग यशस्वी झाली, कारण जागतिक बॅडमिंटनमध्ये भारताचे चार खेळाडू तोपर्यंत पहिल्या पन्नासात होते. सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू तर पहिल्या दहात होत्या आणि दुहेरीतही दोन जोडया पहिल्या विसात होत्या. आणि सगळयात महत्त्वाचं म्हणजे हे सगळेच्या सगळे खेळाडू पुलेला गोपीचंद यांचे शिष्य आहेत. खेळाडूंच्या कामगिरीमुळे तर खेळ देशात लोकप्रिय होतो.

आपल्या भारतात नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटन खेळाची पहिली दखल घ्यायला लावली होती. आणि त्यानंतर खुल्या स्पर्धांचा जमाना सुरू झाल्यावर प्रकाश पदुकोण आपले पहिले बॅडमिंटन स्टार होते. 1980मध्ये त्यांनी 'ऑल इंग्लंड ओपन' जिंकली होती आणि जागतिक क्रमवारीतही अव्वल स्थान गाठलं होतं. पण नंतरचा जमाना होता तो पुलेला गोपीचंद यांचा. 2001मध्ये त्यांनीही प्रतिष्ठेची 'ऑल इंग्लंड ओपन' स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारे ते फक्त दुसरे भारतीय बॅडमिंटनपटू होते. तेव्हा मी कॉलेजमध्ये होते आणि स्पोट्र्सची आवड असल्याने वर्तमानपत्र शेवटच्या पानापासून वाचायचे. गोपीचंद यांचा विजय, त्यानंतर झालेलं कौतुक, भारतात परतल्यावर झालेलं जंगी स्वागत, त्यानंतर मिळालेला 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' हे सगळं तेव्हा मी वर्तमानपत्रातून आणि काही टीव्हीवर पाहिलं होतं. सचिन तेंडुलकर तेव्हा माझ्या पिढीचा स्टार होताच, पण पुलेला गोपीचंद यांनीही माझं लक्ष वेधून घेतलं.


1994च्या राष्टीय स्पर्धेच्या वेळी त्यांच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली होती. दुखापत इतकी मोठी होती की स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना दहा महिन्यात दोन मोठया शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागल्या. ज्यांनी तो अपघात बघितला आणि ज्यांना त्याची भीषणता कळत होती, त्यांना गोपीचंद परत बॅडमिंटन कोर्टवर उतरेल असंही वाटलं नव्हतं. पण लढवय्या गोपीचंदनी पुनरागमन केलं आणि 1995पासून सलग पाच वेळा राष्ट्रीय स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. 2001मध्ये तर आंतरराष्ट्रीय यश मिळवताना ऑल इंग्लंडबरोबरच स्विस ओपनही जिंकली आणि महत्त्वाच्या चार स्पर्धांमध्ये उपान्त्य फेरी गाठण्याची किमया केली. तेव्हाचा अव्वल खेळाडू तौफिक हिदायतला कोर्टवर धूळ चारली. लढवय्या आणि हार न मानणारा खेळाडू अशीच त्यांची प्रतिमा तेव्हा तयार झाली. पण गोपीचंद फक्त एवढेच नव्हते, हे मी त्यांना प्रत्यक्ष भेटले तेव्हा माझ्या लक्षात आलं. मी क्रीडा पत्रकारिता करायला लागले आणि दोनच वर्षात भारताला बॅडमिंटनमधली पहिली महिला चॅम्पियन मिळाली. हैद्राबादच्याच सायना नेहवालने 2009मध्ये इंडोनेशियन ओपन ही सुपर सीरिज जिंकली होती आणि विजयी सायनाबरोबर फोटो झळकत होता तो कोच पुलेला गोपीचंद यांचा. या विजेतेपदानंतर सायना भारतात परतली तेव्हा एका कार्यक्रमासाठी मुंबईला आली होती. मला तिच्याबद्दल कुतूहल होतंच. तिने आणि पुलेला गोपीचंद यांनी मोकळेपणाने मला हैद्राबादला गोपीचंद ऍकॅडमीला भेट देण्याचं निमंत्रण दिलं. तेव्हा मी आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीसाठी काम करत होते. त्यांनीही परवानगी दिली आणि मी कॅमेरा घेऊनच हैद्राबादला गेले. गोपीचंद यांना तीन दिवस जवळून बघता आलं आणि त्याच भेटीत त्यांची खरी ओळख पटली. पुलेला गोपीचंद ही काय चीज आहे, हे कळले.

खेळाचा अभ्यासक, या खेळाचा फॅन, प्रशासक, वक्तशीर आणि शिस्तप्रिय कोच, अशी लढवय्या खेळाडू ही आधीची ओळख वेळेनुसार बदलत गेली. मुळात प्रशिक्षण सुरू करण्याचा त्यांचा निर्णयच क्रांतिकारी होता. आता कुठे त्यांनी ऑल इंग्लंड जिंकलं होतं. त्यांच्या स्वत:च्या कारकिर्दीसाठी ते सुगीचे दिवस होते. पण वेळेचं महत्त्व त्यांना कळत होतं. 28व्या वर्षी आपण जे मिळवलं, ते इतरांनी योग्य वयात म्हणजे विशी-बाविशीत जिंकावं, हा विचार त्यामागे होता. शिवाय विश्लेषक मन असंही सांगत होतं की आता विजेतेपद मिळवलंय, आपल्या नावाची चर्चा आहे तोपर्यंत सरकारकडून अनुदान मिळवून जमीन पदरात पाडून घ्यावी, आर्थिक जुळवाजुळव करावी आणि जमीन आणि पैसे सत्कारणी लावावे. दूरदृष्टी आणि वेळेचं महत्त्व हे गुण त्यांच्याकडे जन्मत:च असावेत. एक खेळाडू स्पर्धा जिंकतो, त्यातून इतर दहा जण प्रेरणा घेतात आणि यातले पाच जणतरी खेळाकडे वळले पाहिजेत, असं गणित त्यांनी मनातल्या मनात जुळवलंय. आणि तेच प्रत्यक्षात आणण्यासाठी ते झटतायत. सायनापाठोपाठ सिंधू, पी.कश्यप पाठोपाठ गुरुसाई दत्त आणि सौरभ वर्मा तयार झाले, ते हे गणित गोपीचंद यांना सुटल्यामुळेच.


शिवाय बॅडमिंटनमध्ये नवीन खेळाडू तयार होतील त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण चांगलं मिळेल तेव्हाच, खेळाची व्यवस्था निकोप असेल तेव्हाच आणि खेळाचा शास्त्रीय आणि तंत्रशुध्द अभ्यास देशात होईल तेव्हाच, असं त्यांना सुरुवातीपासूनच वाटायचं. ते खेळाडू असताना बऱ्याच गोष्टी ते स्वत:च्या बळावर, फक्त प्रयत्नातून शिकले होते. इतर वरिष्ठ खेळाडूंना खेळायची संधी आधी मिळायची. मग हा वेळ फुकट न घालवता गोपीचंद वेगाने पायऱ्या चढ-उतर, वेगवेगळे व्यायाम करून बघ, भिंतीवर शटल मारून सराव, अशा कल्पना स्वत:च लढवायचे. जो काही फिटनेस मिळवला तो त्यातूनच. त्यासाठी ट्रेड मिल किंवा इतर व्यायाम नव्हता. हे करताना खेळाडूला दुखापत झाली तर त्याचाही वेगळा अभ्यास व्हायचा नाही. घरगुती डॉक्टर सर्दी-खोकल्यावर उपाय करेल, तसा फिजिओ दुखापतींवर उपाय करायचा. पण खेळात व्यावसायिकता आणण्याच्या दृष्टीने हे पुरेसं नव्हतं. नाही म्हणायला भारतातही भारतीय क्रीडा प्राधिकरणाची (Sports Authority of Indiaची) केंद्रं सगळीकडे होती. पण तिथंही सगळया सुविधा एका जागी नव्हत्या. शिवाय कारभार लाल फितीत अडकलेला होता आणि व्यावसायिकता नावालाही नव्हती. गोपीचंदने स्वत: बंगळुरूच्या साई केंद्राचा अनुभव घेतला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले खेळाडू घडतील, असं प्रशिक्षण तिथं नव्हतं. म्हणून पुलेला गोपीचंद ऍकॅडमीला पर्याय नव्हता.

आंध्र प्रदेशचे तेव्हाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडे पाठपुरावा करून गचिबाऊली इथं जागा मिळवली. 2003मध्ये जागा ताब्यात आली, तरी ऍकॅडमी सुरू व्हायला 2008 साल उजाडलं. कारण अर्थातच आर्थिक होतं. हैद्राबादमधले एक उद्योजक निमगडा प्रसाद यांनी देणगीदाखल पंधरा लाख अमेरिकन डॉलर देऊ केले. यॉनेक्स कंपनीने सामानासाठी प्रायोजकत्व दिलं. तरीही पैसे कमी पडत होते. आणि क्रिकेटशी स्पर्धा करण्यात खेळ कमी पडत होता. म्हणावा तसा निधी जमत नव्हता. अखेर गोपीचंदने आपलं राहतं घर गहाण टाकलं आणि ऍकॅडमीचं बांधकाम सुरळीत सुरू झालं. बांधकाम पूर्ण झाल्यावर साकारली ती अद्ययावत सुविधा असलेली भारतातली एकमेव बॅडमिंटन ऍकॅडमी... आठ बॅडमिंटन कोर्ट असलेला सरावाचा प्रशस्त हॉल, स्वीमिंग पूल, वेट ट्रेनिंग आणि कार्डिओसाठी जिम, मसाजसाठी वेगळी खोली आणि खेळाडूंना राहण्यासाठी वीस वातानुकूलित खोल्या. त्याचबरोबर जेवण आणि नाश्त्यासाठी खानावळ. खेळाडूंच्या गरजेप्रमाणे फिजिओथेरपी, आहार यांचा कार्यक्रम आखण्याची सोय. गोपीचंद आता गोपीसर झाले होते.

ऍकॅडमी बांधून होईपर्यंत दुसऱ्या ठिकाणी गोपीसरांचं प्रशिक्षण सुरूच होतं. पण गोपीसरांना पहिलं यश सायनाच्या रूपाने मिळालं ते अकॅडमी सुरू झाल्यावरच. 2008मध्ये सायनाने चायनिज तैपेईमधली ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली आणि पाठोपाठ 2009मध्ये इंडोनेशियन ओपन सुपर सीरिज जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू होती. गोपीचंदनी जे उद्दिष्ट ठेवून ऍकॅडमी स्थापन केली होती, ते साध्य होत होतं. योग्य वयात त्यांना चॅम्पियन घडवायचा होता आणि सायना हे त्यांना मिळालेलं पहिलं यश होतं. ती सतरा वर्षांची चॅम्पियन होती.

सायनाला यश मिळालं, तरी ऍकॅडमीसमोरची आर्थिक आव्हानं संपली नव्हती. तीन लाख अमेरिकन डॉलर हा ऍकॅडमीचा वर्षाचा खर्च, पण गाठीला होते फक्त एक लाख डॉलर. तेवढयातच भागवावं लागणार होतं. तरीही एक इंडोनेशियन कोच गोपीचंद यांनी बोलावलाच. प्रशिक्षणाच्या दर्जाशी तडजोड करायची नव्हती. आणि याचा फायदाही लगेचच खेळाडूंना मिळाला. आर्थिक अडचणी असल्या तरी ऍकॅडमीचा प्रवास यशाच्या मार्गावरच सुरू राहिला. खेळाडूंची गर्दी तर इतकी वाढत होती की गोपीसर सुरुवातीला साडेआठ वाजता ऍकॅडमी सुरू करायचे, ती वेळ वाढत वाढत पहाटे साडेचार इतकी झाली. गेली काही वर्षं अगदी 2009पासून सव्वाचारला ऍकॅडमीची पहिली घंटा होते. वेळेच्या बाबतीत आणि वर्ग न चुकवण्याबाबतीत गोपीसर इतके काटेकोर, की एकदा ते अमेरिकेहून घरी परतले मध्यरात्री दीड वाजता. त्यांची पत्नी पी.व्ही.व्ही. लक्ष्मी (त्या स्वत: ऑलिम्पियन आहेत) यांनी त्यांना पहाटे उठवलं नाही. पण गोपीसर साडेतीनला उठलेच आणि वेळेवर ऍकॅडमीत पोहोचले. त्यांचं उत्तर ठरलेलं होतं - आधीच अमेरिका दौऱ्यामुळे पंधरा दिवस वाया गेले आहेत. आता आणखी एक दिवसाचा खाडा नको.


वक्तशीर गोपीसरांना शिष्यही तसेच आवडतात. पी.व्ही. सिंधू ऍकॅडमीपासून पन्नास किलोमीटर लांब राहते. तिला सव्वाचारचा वर्ग गाठण्यासाठी साडेतीनला घर सोडावं लागतं. पण गोपीसरांच्या आधी ती कोर्टावर हजर असते. सायनाही वडिलांबरोबर स्कूटरवर बसून यायची, तेव्हा तिला स्कूटरवरच झोप लागायची. शेवटी वडिलांनी तिला रिक्षाने पाठवायला सुरुवात केली. गोपीचंद हीच एक ऍकॅडमी आहे. तिथं शिस्त आहे. आणि देखरेखही. 2008पासून मागच्या पाच वर्षांत इथल्या खेळाडूंची संख्या दोनशेच्या घरात गेलीय. या दोनशेंमध्ये सायना, सिंधू, राष्ट्रीय चॅम्पियन तन्वी लाड आहेत, तशीच भविष्यातले चॅम्पियन रितुपर्णा दास, सिकी रेड्डी आहेत. गोपीसर नवीन खेळाडू तर हेरतातच, पण त्यापेक्षा जास्त खेळाडूच गोपीसरांकडे खेचले जातात. त्यातून खेळाची शैली, शिस्त, मेहनतीची तयारी, स्पर्धात्मकता या निकषावर उतरलेले खेळाडू मग गोपीसरांचे लाडके होतात. बॅडमिंटन हा गोपीसरांचा श्वास आहे आणि ही ऍकॅडमी त्यांचा प्राण. म्हणूनच ऍकॅडमीतल्या खेळाडूंच्या बारीकसारीक गोष्टी त्यांना माहीत असतात. त्यांच्या आवडीनिवडी, छंद, अगदी त्यांची भावंडं आणि घरची माणसं याबद्दलही त्यांना माहिती असते. मुलं गोपीचंद यांना सर म्हणतात किंवा गोपीभैय्या किंवा गोपीअण्णा. चांगलं प्रशिक्षण, तंदुरुस्ती (Fitness) आणि सकस अन्न हा मंत्र गोपीसरांनी आपल्या प्रत्येक शिष्याला दिलाय. त्यामुळे खेळाडू कसा सराव करतात, याबरोबरच ते काय खातात याकडेही त्यांचं लक्ष असतं. ठाण्याची प्राजक्ता सावंत दुहेरीतली खेळाडू आहे. तिने ऍकॅडमीत सराव सुरू केल्यावर तिला लगेच आहार ठरवून दिला गेला. ती सकाळी ओट्स खात नाही, ही तक्रार गोपीसरांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तिला चांगलीच तंबी दिली होती.

जिंकण्यासाठी कुठलीही जादूची गोळी मिळत नाही. कठोर परिश्रमांनंतरच जिंकता येतं, हे गोपीचंद अनुभवातून शिकलेत. आणि ऍकॅडमीत आपल्या खेळाडूंनाही ते हेच शिकवताहेत. पण जी मेहनत घ्यायची ती एकाच मार्गाने नाही, तर खेळाचा सर्वंकष विचार करायचा, याची जाण त्यांना खेळाडू असतानाच आली होती. त्यांना गुडघ्याची दुखापत झाली, तेव्हा ते फक्त डॉक्टरवर अवलंबून राहिले नाहीत. त्या दुखापतीचं स्वरूप त्यांनी स्वत: माहीत करून घेतलं. त्याविषयीची पुस्तकं पिंजून काढली. आणि दुसऱ्या वेळी जेव्हा त्यांना परत दुखापत झाली, तेव्हा डॉक्टरकडे जाऊन नक्की कुठल्या स्नायूला दुखापत झालीय, हे त्या स्नायूच्या शास्त्रीय नावासकट डॉक्टरांना स्वत:च सांगितलं. कारण तोपर्यंत फक्त गुडघ्याच्याच नाही, तर सगळया प्रकारच्या दुखापतींचा सेल्फ स्टडी कधीच करून झाला होता. थोडक्यात काय, सरावाबरोबरच हे ज्ञानही महत्त्वाचं होतं, खासकरून जेव्हा ते देणारे डॉक्टर आजूबाजूला नसतील तेव्हा. दुखापतींवर उपाय शोधत असतानाच त्यांना ध्यानधारणा (Meditation) हे एक अस्त्र सापडलं. श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचाही चांगला अनुभव आला. लगेच हा अनुभव शिष्यांबरोबर वाटण्यात आला. सायनालाही सामन्यापूर्वीच्या रात्री आर्ट ऑफ लिव्हिंगची सीडी ऐकण्याची सवय लागली. अर्थात हे उपाय ऐच्छिक होते. तुम्हाला पटले तर उचला, नाहीतर तुमचे नवे उपाय शोधा. कोर्टवरचा दिनक्रम गोपीसरांनी ठरवायचा, बाकी खेळाडूंना मनाप्रमाणे वागण्याची मुभा आहे.

मैदानाबाहेर तर गोपीसर त्यांचे चांगले मित्र आहेत. ते मुळातच फार बोलणारे नाहीत, मृदुभाषी आहेत. पण त्यांना खेळात रस आहे. ते लहान मुलांमध्ये रस घेणारे आहेत, त्यांच्याशी मैदानी खेळ खेळणारे आहेत. घरच्या मध्यमवर्गीय परिस्थितीमुळे ते फारच जपून पैसे खर्च करतात. सिनेमा तर त्यांनी कित्येक वर्षांत पाहिलेला नाही. पण शिष्यांना आवडतं म्हणून गेली काही वर्षं त्यांनी त्यांचा वाढदिवस त्यांच्याबरोबर अगदी केक कापून साजरा करायला परवानगी दिलीय. अर्थात ती सरप्राईज पार्टी असते.

पुरुषांमधला भारताचा नंबर एक खेळाडू पी.कश्यपने गोपीसरांना असं माणसाळवण्यात मोठा वाटा उचललाय. गोपीअण्णा हे त्याचे मैदानाबाहेरचे मित्र आहेत. आपण अगदी कुठल्याही विषयावर त्यांच्याशी बोलू शकतो, असं कश्यप कौतुकाने सांगतो. काही महिन्यांपूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कश्यप क्वार्टर फायनलमध्ये मॅटपॉइंटवरून हरला. त्याच्या मॅचच्या वेळी कोच गोपीचंद तिथे नव्हते. ते सायनाबरोबर होते. पण सायनाही मॅच हरली. खेळाडूची शैली ओळखून गेमप्लान ठरवण्यात गोपीसरांचा हात कोणी धरणार नाही, असं कश्यप म्हणतो.

तर सायना नेहवालला लहान वयात मिळालेल्या यशाचं सगळं श्रेय ती गोपीभैय्याला देते. तिने सरावाला सुरुवात केली, तेव्हा ऍकॅडमी नव्हती. मग ट्रेडमिल आणि इतर उपकरणांसाठी गोपीभैय्या तिला चक्क हॉटेलमध्ये न्यायचे, तिथली जिम वापरण्यासाठी. पण ऍकॅडमीत या सुविधा असतील, याची दक्षता त्यांनी घेतली. त्यासाठी तडजोड केली नाही. सायनाच्या खेळातल्या कच्च्या दुव्यांचा विचार ती करणार नाही, इतका गोपीभैय्या करतो आणि त्यावर उपायही शोधून काढतो. मुंबईची तन्वी लाड दोन वर्षांपूर्वी ऍकॅडमीत रुजू झाली. मुंबईत प्रवासाचे चार तास रोज फुकट जात होते. शिवाय लोकल ट्रेनचा प्रवास. त्यामुळे शिणवटाही होता. पण तन्वी हैद्राबादला गेल्यापासून हे चार तास सरावासाठी वापरू शकते. ऍकॅडमीतच ती राहते. तिच्या मते ती गोपीसरांच्या प्रेमळ देखरेखीखाली आहे

रोजचा प्रशिक्षण वर्ग संध्याकाळी पाच वाजता संपतो. पण गोपीसर इथले प्रशासकही आहेत. त्यामुळे पाचनंतर सुरू होतो त्यांचा प्रशासकीय कार्यक्रम. ऍकॅडमीला कसली गरज आहे, अगदी रोजचा जमाखर्च, पुढचे उपक्रम, त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव हे सगळं पाचनंतर सुरू असतं. मीडियाची गरजही त्यांनी ओळखलीय. त्यामुळे तुम्ही मुलाखत मागितलीत, तर कधीच नकार येणार नाही. आणि त्या वेळी वेळेचाही हिशोब काटेकोरपणे ठेवला जात नाही. मीडिया आणि बॉलिवूड, टॉलीवूड यांनी बॅडमिंटनला प्रसिध्दी द्यावी, अशी शिफारस त्यांनी पूर्वीच केलीय. त्यातून बॅडमिंटनचं भलं साध्य व्हावं, इतकीच अपेक्षा आहे.

ऍकॅडमी चालवण्याबरोबरच गोपीसर भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन कोचही आहेत. खरं तर देशातली खेळाची व्यवस्था त्यांना बुरसटलेली वाटते. त्यातली राजकीय ढवळाढवळ त्यांना आवडत नाही. पण त्यांनी राष्ट्रीय कोच होण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून व्यवस्थेविरुध्द दोन हात करण्याचं नाही, तर तिच्याशी जुळवून घेण्याचं धोरण त्यांनी घेतलंय. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मात्र संघटनेकडून मिळवलंय. राष्ट्रीय कोच झाल्यावर आपल्याच ऍकॅडमीतल्या मुलांना राष्ट्रीय संघात संधी देतात, असा आरोप त्यांच्यावर अलीकडे झाला, पण तो सिध्द होऊ शकला नाही. कारण खेळाडूंची कामगिरी खणखणीत होती.

गोपीचंद ही एक व्यक्ती नाही, ती संस्था आहे, असं मी सुरुवातीलाच म्हटलं आहे. कारण खेळाचा इतका सखोल आणि सर्व बाजूने विचार कुणी भारतात तरी केलेला नाही. प्रकाश पदुकोण सरांची ऍकॅडमी जवळच बंगळुरूमध्ये आहे. तीही अद्ययावत आहे आणि सायली गोखले, अजय जयराम यांच्यासारखे कैक राष्ट्रीय चॅम्पियन खेळाडू त्यांनी घडवलेत. पदुकोण सरांना या खेळातील एक कलाकारच म्हटलं पाहिजे इतकी त्यांची शैली सहज आहे. पण खेळाडूंना खेळाची गोडी लागावी, त्यांनी खेळावर प्रेम करावं, स्वत: खेळातले खाचखळगे समजावून घ्यावेत, याकडे त्यांचा कल आहे. गोपीचंद यांचा कल काळाची पावलं ओळखणारा आहे. प्रकाश पदुकोण सर बॅडमिंटनमधले भारताचे भीष्माचार्य आहेत. तर गोपीचंद कृष्ण....

बॅडमिंटनवर गोपीचंद यांचं प्रेम आहे. आणि प्रेम असेल तर खेळात पुढे जाण्यासाठी तुम्ही मेहनत घेणारच, असं त्यांना आतापर्यंच्या प्रवासाबद्दल वाटतं. बॅडमिंटनने त्यांना खेळाडू म्हणूनही यश दिलं आणि आता प्रशिक्षक म्हणूनही. अर्जुन, राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य हे खेळातले राष्ट्रीय पातळीवरचे सगळेच्या सगळे पुरस्कार त्यांना मिळालेत. त्या त्या वयात हे सगळे पुरस्कार महत्त्वाचे होते, असं ते नम्रपणे सांगतात. खेळाडूने प्रशिक्षक म्हणून यशस्वी व्हावं किंवा चांगला प्रशिक्षक एक यशस्वी खेळाडू असावा, असा काही नियम नाहीए. पण गोपीचंद यांच्या बाबतीत हा योग जुळून आलाय.

खेळाडूंवर लहान वयातच काम करता यावं यासाठी त्यांची धडपड असते. आणि अद्ययावत ऍकॅडमीमुळे त्यांना ते शक्यही होतंय. त्यातूनच नवीन खेळाडू आणि चॅम्पियन घडणारेत. खेळाडू गोपीचंद आणि प्रशिक्षक गोपीचंद यांची तुलना अनेकदा केली जाते. अशी तुलना करू नये याच मताची मी आहे. पण मला त्यासाठी वाटणारं कारण कदाचित वेगळं आहे. खेळाडू गोपीचंद आणि प्रशिक्षक गोपीचंद हे वेगळे नाहीच आहेत मुळी. दोघांचाही स्वभाव तोच आहे, धोरण तेच आहे आणि ध्यासही एकच आहे. गोपीचंद बॅडमिंटनप्रेमी आहेत आणि अभ्यासकही. ते खेळत होते तेव्हाही आणि आताही...