द्रोणाचार्यांची शिष्योत्तम

विवेक मराठी    20-Aug-2016
Total Views |

काल सगळया भारतवासीयांचे लक्ष हे ऑलिम्पिकमधील महिला बॅडमिंटनच्या अंतिम सामन्याकडे होते. सगळीकडे पी.व्हि.सिंधूच्या नावाची जणू जपत होते. आजपर्यंत महिला बॅडमिंटन आणि सायना नेहवाल एवढेच समीकरण भारतीयांना माहीत होते. सायनाच्या यशस्वी घोडदौडीदरम्यान आणखी एक फुलराणी उमलत होती, ती म्हणजे पी.व्हि. सिंधू अर्थात पुसरला वेंकटेश सिंधू. रिओ ऑलिम्पिकमधल्या पदार्पणातच आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर तिने लक्षणीय कामगिरी केली. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकहाराला पराभूत करून फायनल गाठली, त्याचक्षणी कोटयवधी भारतीयांचे मनही जिंकले. फायनलमध्ये तिचा सामना होता, तो बॅडमिंटन विश्वात नंबर एकच्या स्पॅनिश खेळाडू कॅरेलिना मारिनासोबत. 19-21 या गुणांनी सिंधूने पहिला सेट खिशात घातला. पण त्यानंतरच्या दोन सेटमध्ये कॅरेलिनाने सिंधूला चांगली टक्कर दिली आणि सुवर्णपदक मिळवले. सिंधूने रजत पदक मिळवले व अवघ्या 21व्या वर्षी ऑलिम्पिकसारख्या पदक मिळवणारी ती पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली. या सामन्यात विजेता कोण किंवा खेळ कसा झाला यापेक्षाही सामना संपल्यावर सिंधूने ज्याप्रकारे कॅरेलिनाचे अभिनंदन केले तिचे तेव्हाची तिची खिलाडू वृत्ती खरंच कौतुकास्पद होती.


मैदानावरील आक्रमकता, जोश आणि मैदानाबाहेरचा तिचा शांत स्वभाव यामागे तिच्या गुरूंचा, म्हणजेच प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचा मोठा वाटा आहे. सिंधूचा पुलेला अकादमी ते ऑलिम्पिकचा प्रवास खूपच रोमांचक होता. सिंधूचे आई -वडील हे दोघेही आंतरराष्ट्रीय वॉलीबॉल खेळाडू त्यामुळे खेळाचे बाळकडू तिला घरातूनच मिळालेले. वयाच्या आठव्या वर्षी 2001 साली पुलेला गोपीचंद यांना टि.व्हीवर बॅडमिंटन खेळताना तिने पाहिले तेव्हा आपल्यालाही हा खेळ खेळायचा आहे असे तिने घरी सांगतिले. सिंकदराबादमधील मोहम्मद अकादमीत तिने बॅडमिंटनचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर काही वर्षांनी ती पुलेला अकादमीत बॅडमिंटन शिकण्यासाठी आली. ज्या खेळाडूला आदर्श मानून तिने या खेळात पदार्पण केले, आज त्याच प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली तिने रजत पदक मिळवले हा खर तर सुवर्ण योगच म्हणावा लागेल. याआधी सिंधूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  पुलेला अकादमी म्हणजे गुरू-शिष्य परंपरेचा परिपाठ गिरवणारी संस्था.  गोपीचंद आणि सायना नेहवाल ही या अकादमीतील गुरू शिष्येची गाजलेली जोडी. पण जसजशी अकादमीतल्या मुलांची संख्या वाढू लागली तेव्हा सायनाने बंगलोरच्या प्रशिक्षकाच्या साथीने आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यावेळेस या पुलेला अकादमीच्या आवतीभोवती वादाचे वादळ फिरू लागले. पण पुलेला यांचा स्वभाव मितभाषी असल्यामुळे हे वादळ तिथेच शमले. सायनाच्या उमेदीच्या काळात सिंधू ज्युनियर आणि सब-ज्युनियर स्पर्धेत यश मिळवत होती. गोपीचंद यांच्या हाती एक नवा हिरा गवसला होता. आता या हिऱ्याला पैलू पाडण्याची मेहनत त्यांना करायची होती. आपल्या शिष्येपेक्षा गोपीसर हे सरावाच्या बाबतीत काटेकोर असत. पहाटे 4ला त्यांच्या अकादमीचे दार उघडायचे. सिंधू या अकादमीपासून लांब राहत होती त्यामुळे ती घरातून सकाळी 3.15ला निघत असे . खेळासाठी असलेली निष्ठा आणि मेहनत करण्याची तयारी याच गुणांमुळे गोपी यांनी सिंधूच्या खेळावर परिश्रम घ्यायला सुरवात केली. कदंबी श्रीकांत आणि सिंधू त्याप्रमाणे इतर खेळाडूंना जे काही खाण्याचे पथ्य होते ते गुरू म्हणून स्वतः गोपीसरदेखील पाळत होते. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सिंधूला आवडत असलेली बिर्याणी आणि चॉकलेट खाण्यावरही बंदी होती. 

सिंधूच्या खेळातील एक वेगळेपणा म्हणजे प्रत्येक सामन्यात गुण मिळाल्यावर ती ज्या आक्रमकतेने ओरडायची तो एक तिच्या सरावाचाच भाग होता. याला शाऊट ऍण्ड प्ले असे म्हणतात. प्रत्येक गुण मिळाल्यावर त्यावर तुमच्या खेळातील आक्रमकता सिध्द होते. खेळताना आपला आत्मविश्वास आणि जोश कमी होऊ नये म्हणून क्लृप्ती केली जाते. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याच्या काही दिवसांआधी गोपीसरांनी तिला बॅडमिंटन कोर्टमध्ये उभे केले आणि तिच्या सभोवताली 50 मुलांना उभे राहण्यासाठी सांगितले त्यानंतर त्यांनी तिला जोरजोरात ओरडायला सांगितले. स्वभावाने शांत आणि हळव्या असणाऱ्या सिंधूला हे जमतच नव्हते. तेव्हा  सरांनी तिला रॅकेट खाली ठेव व पुन्हा कधीच रॅकेटला हात लावायचा नाही असे ठणकावले. रॅकेट पुन्हा हातात घ्यायचे नाही या कल्पनेने कासावीस होऊन ती ओरडू लागली. त्यानंतर सिंधू प्रत्येक विजयी गुण मिळाल्यावर आत्मविश्वासाने ओरडते आणि आपली आक्रमकता कायम ठेवते.


ऑलिम्पिक स्पर्धेत जाण्यापूर्वी कुस्तीपटू नरसिंह यादव ज्याप्रकारे उत्तेजक पदार्थांच्या प्रकरणात अडकला, तसा आपला कोणताही शिष्य अडकू नये, म्हणून सर त्यांना बाहेर पाणीदेखील पिऊ देत नसे. एवढेच नव्हे तर जेवणाच्या टेबलपर्यंत ते सिंधूसोबत असायचे. आपल्या प्रशिक्षकावर खेळाडूच्या असलेल्या विश्वासाचे हे एक उत्तम उदाहरण होते. कदंबी आणि सिंधूच्या प्रत्येक सामन्याच्यावेळी गोपी सर त्यांच्यासोबत असायचे. आपल्या शिष्य आत्मविश्वास गमावत आहे असे वाटल्यास ते त्यांना कानमंत्र द्यायचे. त्या कानमंत्रानंतर जणू कोणती तरी अद्भुत शक्ती या दोघांमध्ये संचारत असे आणि त्यानंतर ते दोघे उत्तम खेळ करत असत. गोपी सरांनी आपल्या खेळाच्या कारर्किदीत जेवढी उत्तम कामगिरी केली तेवढीच उत्तम कामगिरी त्यांनी प्रशिक्षक म्हणून देखील केली. म्हणूनच बॅडमिंटन खेळाचे  राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून त्यांची निवड करण्यात आली. पुलेला गोपीचंद यांना द्रोणाचार्य तर सिंधूला अर्जून पुरस्कार सन्मानित करण्यात आले होते. या दोघांनी आपल्या पुरस्काराला साजेशी कामगिरी या ऑलिम्पिकमध्ये करून दाखवली.