स्वागतार्ह बदलाच्या दिशेने

विवेक मराठी    20-Aug-2016
Total Views |

गेल्या काही वर्षांपासून मुस्लीम राष्ट्रीय मंचाने सर्व मुस्लीम बांधवांना आवाहन केले होते की, मदरसे, मशिदी आणि अन्य अशा सार्वजनिक ठिकाणी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हा मोठया प्रमाणात साजरा करावा. देशभरात नऊ  हजार मदरशांत तिरंगा फडकला. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, आंध्र, कर्नाटक, तेलंगण, दिल्ली, हरयाणा, जम्मू-काश्मीर अशा अनेक राज्यांत मंचाच्या कार्यकर्त्यांनी मदरशांत स्वातंत्र्यदिन धूमधडाक्यात साजरा केला.


'आमच्या देशाचे नाव हिंदोस्तान आहे याचा अर्थ हा देश मुळात हिंदूंचा आहे. इस्लामची स्थापना होऊन फक्त 1400 वर्षे झाली आहेत. भारताने इस्लामचे केवळ स्वागतच केले नाही, तर स्वीकारदेखील केला आहे. भारतातील मुसलमानांनी ही वास्तविकता लक्षात घेऊन हिंदुस्तानची संस्कृती आपलीशी करावी. हिंदुत्व ही जीवन जगण्याची पध्दती आहे आणि भारतातील मुसलमानांनी तिचा स्वीकार करावा हेच योग्य आहे.'

हे उद्गार संघाच्या कोणा एखाद्या प्रचारकाचे किंवा हिंदुत्ववादी नेत्याचे नाहीत. ते आहेत नागपूरच्या दाउदी बोहरा समाजाचे नेते शेख शब्बीर फिर्दी यांचे. प्रसंग होता बोहरा मदरसा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकविण्याचा आणि प्रमुख पाहुणे होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक आणि संरक्षक इंद्रेश कुमार.

मंचाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. शहीद अख्तर (रांची), सह संयोजक एस. के. मुद्दिन (जबलपूर), महाराष्ट्र संयोजक मोहम्मद फारूक शेख, आणि अन्य कार्यकर्त्यांसह इंद्रेश कुमार बोहरा मदरसा परिसरात येताच 'भारतमाता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. इंद्रेश कुमार आणि बोहरा समाजाचे प्रमुख नेते यांनी मिळून राष्ट्रध्वज फडकविला आणि पुन्हा एकदा 'जन गण मन', 'वंदे मातरम', 'भारतमाता की जय' या घोषणांनी वातावरण भारून गेले.

नागपूरचा हा असा एकच कार्यक्रम नव्हता, तर मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या पुढाकाराने देशभरात जवळपास 9000 मदरशांत 70व्या स्वातंत्र्यदिनाचे असे कार्यक्रम झाले. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, आंध्र, कर्नाटक, तेलंगण, दिल्ली, हरयाणा, जम्मू-काश्मीर अशा अनेक राज्यांत मंचाच्या कार्यकर्त्यांनी मदरशांत स्वातंत्र्यदिन धूमधडाक्यात साजरा केला.

केंद्रात भाजपाप्रणीत रालोआ सरकार सत्तेत आल्यापासून मुस्लीम समाजाला भडकविण्याचे, दिशाभूल करण्याचे प्रयत्न तथाकथित सेक्युलर आणि मुस्लीम कट्टरतावादी नेते आणि संघटना करीत आहेत. त्यांच्या मदतीला डावे बुध्दिजीवी आणि पत्रकारदेखील आहेत, हे आपण सर्व जाणतोच. काश्मीर, जे.एन.यू., कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांतील घटना, गोहत्येचा, गोमांस बंदीचा मुद्दा, वंदे मातरम इत्यादी अनेक मुद्दे उकरून मुस्लीम आणि हिंदू समाजात फूट पाडण्याचे, वैरभाव जागविण्याचे सर्व प्रयत्न ही समाजविरोधी आणि देशविघातक मंडळी करीत आहेत.

या सर्व दुष्टचक्रातून बाहेर पडण्याच्या हेतूने गेल्या काही वर्षांपासून मुस्लीम राष्ट्रीय मंचाने सर्व मुस्लीम बांधवांना आवाहन केले होते की, मदरसे, मशिदी आणि अन्य अशा सार्वजनिक ठिकाणी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन मोठया प्रमाणात साजरा करावा. गेल्या वर्षी सुमारे 1000 मदरशांतून असे कार्यक्रम झाले होते. या वर्षी अधिक उत्साहाने देशभरात सुमारे 9000 ठिकाणी असे कार्यक्रम साजरे करण्यात आले.

नागपूरचा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा होता, कारण अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम संघाच्या केंद्रस्थानी होत होता आणि तोदेखील संघाच्या वरिष्ठ प्रचारकांच्या उपस्थितीत. सकाळी संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला होता. त्यानंतर हा कार्यक्रम इंद्रेश कुमार यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमात हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन मंडळी सहभागी झाली होती, हे विशेष! तसेच सुन्नी मदरशांचे विद्यार्थी आणि त्यांचे मौलानादेखील उपस्थित होते.

शेख शबीर फिर्दी आपल्या भाषणात म्हणाले की, ''मुस्लीम राष्ट्रीय मंच आणि रा.स्व. संघ यांनी समाजात शांती, बंधुभाव आणि धार्मिक सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले आहेत, ते स्तुत्य आहेत. काही लोक धर्माच्या नावाखाली दोन्ही समाजांत तेढ निर्माण करण्याचे, कुराणातील आयतांचा चुकीचा अर्थ लावून युवकांना भडकविण्याचे काम करीत आहेत.'' अशा सर्व लोकांपासून सावधान राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. सच्चा मुसलमान हा देशाशी द्रोह करू शकत नाही, कारण कुराणात असे स्पष्ट म्हटले आहे की आपल्या देशाशी प्रामाणिक असणे हे अर्धे इमान आहे.

''भारत हाच जगाच्या पाठीवर एकमेव देश आहे की जेथे मुस्लीम समुदाय शांततेत आणि अहिंसक वातावरणात राहत आहे'' असे सांगून फिर्दी म्हणाले की ''संघासारख्या संघटना समाजाच्या विभिन्न घटकांत ऐक्य आणि सामंजस्य निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत, तेव्हा मुस्लीम समाजानेदेखील त्यांच्या मदतीला आले पाहिजे.''

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि कुख्यात आतंकवादी याकूब मेमन यांची उदाहरणे देत इंद्रेश कुमार म्हणाले की ''भारताने अब्दुल कलाम आणि याकूब मेमन या दोघांनाही पाहिले आहे. एक देवाने पाठविलेला 'फरिश्ता' होता, तर दुसरा देशद्रोही आतंकवादी होता. मुस्लीम समुदायाने अब्दुल कलामांचा आदर्श समोर ठेवावा आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वत:ची आणि देशाची प्रगती साधावी.'' बोहरा समाजाच्या धर्मगुरूंसोबत झालेल्या भेटीचा त्यांनी या वेळी आवर्जून उल्लेख केला.

मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात अनेक मुस्लीम मौलवींनी आणि धर्मगुरूंनी मदरशात तिरंगा फडकविण्याचे स्वत:हून आवाहन केले. राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि राष्ट्रगीताचा आदर हे एकतेचे प्रतीक आहे. भारतीय समाजात सर्व घटकांना एकोपा हवा आहे.


या वेळी इंद्रेश कुमार यांनी मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या 'आतंकवाद विरोधी युवा जागरण आघाडी'चे विधिवत उद्घाटन केले. मंचाच्या नागपूर येथे एप्रिल महिन्यात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत मुस्लीम युवकांना आतंकवादी विचारधारेकडे आकर्षित होण्यापासून परावृत्त करण्यासाठी अशी आघाडी उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्वातंत्र्यदिनी नागपूर येथेच त्याची विधिवत घोषणा व्हावी, हा एक सुखद योगच होता.

या वेळी इंद्रेश कुमार म्हणाले की ''युवक आता इसिस, लष्कर ए तोयबा, किंवा हिजबुल मुजाहिदीन यासारख्या अतिरेकी विचारधारेकडे वळणार नाहीत याची खबरदारी प्रत्येक पालकांनी घेतली पाहिजे. आपली मुले आय.एस.कडे नाही, तर आय.ए.एस., आय.पी.एस.कडे जावीत असा आपण प्रयत्न केला पाहिजे.''

काही महिन्यांपूर्वी देशातील काही मुस्लीम नेत्यांनी 'वंदे मातरम', 'भारतमाता की जय' यासारख्या देशभक्तिपर घोषणा देण्याला विरोध दर्शविला होता. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर चालणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होणारे मुस्लीम धर्मगुरू आणि राजकारणी नेते या मुद्दयावर वेगवेगळी मते मांडत होते. ओवेसीसारखे काही कट्टरवादी नेते तर 'माझ्या गळयावर धारदार सुरी ठेवली तरी मी वंदे मातरम म्हणणार नाही' अशी गर्जना करीत होते.

पण हे वातावरण आता बदलले आहे. आज मोठया प्रमाणावर मुस्लीम समाज पुढाकार घेत 'वंदे मातरम' किंवा 'भारतमाता की जय' उच्च स्वरात म्हणतोय, अशी दृश्ये दिसताहेत. हा एक स्वागतार्ह असा बदल आहे. आणि याचे श्रेय मोठया प्रमाणात मुस्लीम राष्ट्रीय मंच या सामाजिक सुधारवादी चळवळीला द्यावे लागेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांच्या मार्गदर्शनात मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे काम गेली 15-16 वर्षे सुरू आहे. 2002 साली सुरू झालेल्या या मंचाचा विस्तार आता देशातील 325हून अधिक जिल्ह्यात झाला आहे. मंचाने मुस्लीम समाजाच्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न सुरू केला आहे, त्याला बऱ्यापैकी यश मिळताना दिसत आहे.

नागपूरचा हा कार्यक्रम किंवा देशात अन्य प्रांतांत मदरशांतून झालेले असे कार्यक्रम हे या स्वागतार्ह परिवर्तनाचे प्रकट रूप आहे.

9422870842