देश बदल रहा है...

विवेक मराठी    20-Aug-2016
Total Views |

णखी 2-3 दिवसांत रिओ इथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेची सांगता होईल आणि त्यानंतर आपल्या देशाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत काय कमावलं-काय गमावलं याची चर्चा सुरू होईल. यंदाच्या वर्षी वेगवेगळया स्पर्धांसाठी 114 भारतीय खेळाडू गेले होते. अनेकांकडून पदकांच्या अपेक्षा होत्या, त्या अर्थातच त्यांच्यातल्या गुणवत्तेमुळेच आणि ऑलिम्पिकच्या स्पर्धेत प्रवेश करेपर्यंत त्यांना मिळालेल्या यशामुळेच. म्हणूनच खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक यांच्याइतकाच उत्साह भारतातल्या क्रीडाप्रेमींमध्येही संचारला होता. मात्र अपेक्षेप्रमाणे घडलं नाही. खेळाडूंची संख्या आणि त्यांची गुणवत्ता याच्या तुलनेत पदकांची कमाई नगण्य म्हणावी इतकी कमी झाली आहे. हे संपादकीय लिहून होईपर्यंत कुस्तीपटू साक्षी मलिकला मिळालेलं कांस्यपदक आणि बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने मिळवलेलं रजतपदक भारताच्या खात्यावर जमा आहे. सिंधूचं सुवर्णपदक हुकलं असलं तरी तिने स्पेनच्या मारीनला दिलेली कडवी झुंज कायम स्मरणात राहिल अशीच आहे.


मात्र केवळ संख्येच्या आधारावर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचं मूल्यमापन करणं हे चुकीचंच नाही, तर अन्यायकारकही ठरेल. आजवर भारताने एका हाताची बोटं मोजायला पुरतील इतक्याच पदकांची कमाई दर ऑलिम्पिकमध्ये केलेली आहे. कधीकधी तर पदकांची पाटी कोरी ठेवूनच भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. थोडक्यात, या वेळच्या कामगिरीने धक्का बसावा असा काही आपला इतिहास नाही. मात्र तरीही आजवरच्या ऑलिम्पिक स्पर्धा आणि रिओ यात एक महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे या वेळी बहुतेक खेळाडूंनी उत्तम कामगिरीचं प्रदर्शन करून जागतिक क्रमवारीत स्वत:चा आणि पर्यायाने भारताचा क्रमांक खूप वर आणला आहे. अन्य देशांना भारतीय खेळाडूंची दखल घ्यावी लागेल इतपत चांगली कामगिरी खेळाडूंनी केली आहे. त्यांनी दिलेली कडवी झुंज, आक्रमक शैली आणि जिंकण्याच्या ऊर्मीने घेतलेला सहभाग ही सर्वच नोंद घेण्याजोगी वैशिष्टयं म्हणता येतील.

अशी अनेक उदाहरणं समोर आहेत. अक्षरश: नाममात्र फरकाने पदक हुकलेल्या जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिची कामगिरी असेल किंवा उपांत्यपूर्व फेरीत खेळताना बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत याची अविस्मरणीय खेळी असेल किंवा दत्तू भोकनळसारख्या नौकानयनपटूची कामगिरी असेल... यांची आणि अन्य अनेकांची कामगिरी लक्षवेधी, आजवर मरगळलेल्या क्रीडाक्षेत्राला नवसंजीवनी देईल अशी झाली आहे. आपल्या देशात क्रिकेटला असलेलं अवास्तव महत्त्व, राजकारणाने बरबटलेलं क्रीडाविश्व, प्रशासकीय स्तरावर होणारी अक्षम्य दिरंगाई ही कारणं तर आत्ताही आहेतच. असं असतानाही खेळाडू लक्षवेधी कामगिरी करताहेत असं लक्षात येत आहे. काय असतील यामागची कारणं? याचा विचार या घडीला करणं जास्त गरजेचं आहे. कारण नकारात्मक शेरेबाजी ही कधीही सकारात्मक बदला घडवून आणत नाही, फक्त अधिक खच्चीकरण करण्यासाठी तिचा उपयोग होतो.

प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करत, तिला दूषणं देण्यात आपली शक्ती न दवडता या खेळाडूंनी आणि आधुनिक द्रोणाचार्य शोभतील अशा त्यांच्या प्रशिक्षकांनी फक्त खेळावर, उत्तरोत्तर कामगिरी सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं. आणि त्याचा परिणाम ऑलिम्पिकमधील त्यांच्या कामगिरीवर दिसून आला. खेळायचं ते जिंकण्याच्यार् ईष्येनेच, या इराद्याने अतिशय आक्रमकपणे आणि आत्मविश्वासाने ते मैदानात उतरले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उतरताना जिंकण्याची मनीषा सोडा, पण दखलपात्र ठरू अशी कामगिरी करण्याची इच्छादेखील, काही सन्माननीय अपवाद वगळता आजवर भारतीय खेळाडूंनी दाखवली नव्हती.

मैदानाबाहेरची आपली प्रतिमा कितीही शांत, कोमलहृदयी असली तरी मैदानात उतरायचं ते विजय मिळवण्याच्यार् ईष्येनेच, अशी यातल्या बहुतेकांची देहबोली होती. म्हणूनच दीपा कर्माकर काय किंवाकिदंबी श्रीकांत काय, हरले तरी सर्वोत्तम खेळाची नोंद करतच.

क्रीडाविश्वातील मानसिकतेत हा बदल व्हायला कळत-नकळत कारणीभूत ठरते आहे ती भारताची जागतिक स्तरावर बदलत असलेली, उंचावत असलेली प्रतिमा. ही प्रतिमा भारतीय लोकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करणारी आहे, याचं प्रतिबिंब या वेळच्या ऑलिम्पिकमध्ये स्वच्छ महायला मिळालं. ऑलिम्पिकमुळे जागतिक स्तरावर या उंचावलेल्या आत्मविश्वासाची एक चाचणी झाली असं म्हणता येईल. त्यामुळे क्रीडाविश्वाला यापुढच्या काळात चांगले दिवस येतील असं समजायला हरकत नाही. 

आदर्श प्रशिक्षक कसा असावा याचंही दर्शन या स्पर्धेतल्या विविध खेळांमधून घडलं आहे. गेली 16 वर्षं त्रिपुरामध्ये दीपाला कसून प्रशिक्षण देणारे, तिला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याच्या योग्यतेची बनवणारे बिश्वेश्वर नंदी असतील किंवा हरयाणातल्या एका खेडयातून आलेल्या साक्षी मलिकची तयारी करून घेणारे, अणिबाणीच्या वेळी तिला योग्य मार्गदर्शन करणारे कुलदीप मलिक असतील किंवा श्रीकांत-सिंधू या आपल्या शिष्यद्वयासाठी त्यांच्यासारखाच मोजका आहार घेणारे, त्यांच्यासाठी मध्यरात्रीपासून दिनक्रम चालू करणारे पुलेला गोपीचंद असतील... असे गुरू लाभणं हे या खेळाडूंचं भाग्यच म्हणायला हवं. कांस्यपदक मिळवलेल्या आपल्या शिष्येला खांद्यावर बसवून मैदानाला फेरी मारणाऱ्या मलिक यांचा चेहरा त्यांना किती सार्थक वाटतं आहे, याची साक्ष होता. सामाना संपायला शेवटची काही सेकंदं बाकी असताना मलिक यांनी साक्षीला विचारलं, ''पदक मिळवायचं आहे ना? देशाचं झेंडा खांद्यावर मिरवायचा आहे ना?'' या प्रश्नाने तिच्यात पुन्हा चैतन्य निर्माण केलंआणि त्यातूनच ती विजयी झाली. तात्पर्य, जेव्हा अडीअडचणींचा बाऊ न करता त्यातून आपल्या ईप्सित स्थळी पोहोचण्यासाठी मार्ग दाखवणारे, व्यक्तिगत विजयापेक्षा देशासाठी खेळण्याची इच्छा मनात जागी करणारे गुरू लाभतात, तेव्हा आपलेही खेळाडू अतुलनीय कामगिरी करू शकतात, हे आता सिध्द झालं आहे.

याच सुमारास देश म्हणूनही आपला स्वभाव बदलतो आहे, हे लक्षात येईल. आमच्या सहिष्णुतेला जर कोणी हिणवत असेल तर आम्ही आक्रमक होऊ शकतो आणि विजिगीषू वृत्तीने समोर आलेल्या प्रश्नांना भिडू शकतो, याची जाणीव पंतप्रधानांनी आपल्या लाल किल्ल्यावरील भाषणातून जगाला करून दिली आहे. बलुचिस्तानबाबत ज्या आक्रमकतेने नरेंद्र मोदी बोलले, त्यामागे हाच विचार आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण असो वा क्रीडाजगत... इथे आवश्यकतेनुसार आक्रमक व्हावं लागतं, याची जाणीव संबंधितांना झाली आहे. मेरा देश बदल रहा है...