आपणच का?

विवेक मराठी    24-Aug-2016
Total Views |

आपल्या प्रगतीचा एक भाग म्हणून आपल्याकडे वाहनं आली. शारीरिक श्रमाच्या जागी प्रत्येक क्षेत्रात यंत्रं काम करू लागली. सायकलपर्यंत ठीक होतं. ती चालवायला थोडेतरी  कष्ट पडायचे. पण मोटारसायकली, रिक्षा, मोटारी यासारख्या वाहनांनी कष्टच संपवले. घरात, कामावर सगळीकडे स्नायूंच्या हालचाली करण्याची गरजच उरली नाही. शरीराचा एक गुणधर्म आहे - जे तुम्ही वापरत नाही, ते कमजोर होतं. तसंच झालं.


खाण्याची चंगळ झाली, शारीरिक कष्ट कमी झाले, त्याबरोबर आपलं वजन वाढू लागलं. शरीरात स्नायूंच्या प्रमाणात चरबी अधिक दिसू लागली. मधुमेह वाढण्याचं हे सगळयात महत्त्वाचं कारण असल्याचा शोध पाश्चात्त्य शास्त्रज्ञांना लागला. बऱ्याच अंशी आणि बराच काळपर्यंत तो टिकून राहिला. चरबीची पुटं आली म्हणजे इन्श्युलीन रेझिस्टन्स वाढणार, हे उघड होतं. त्या इन्श्युलीन रेझिस्टन्सवर मात करून रक्तातलं ग्लुकोजचं प्रमाण काबूत राखायचं म्हणजे इन्श्युलीन बनवणाऱ्या बीटा पेशी ओव्हरटाइम करणार आणि असं खूप जास्त काम करून कधीतरी थकणार, हेदेखील पटण्यासारखं होतं. त्यामुळे त्यांचं हे सोपं स्पष्टीकरण सगळयांनी मान्य केलं.

मात्र जसजसे अधिकाधिक शोध लागू लागले, तसतसं हा प्रकार वाटतो तितका सरळसोट नाही, हे हळूहळू लक्षात यायला लागलं. वाढलेलं वजन पाश्चात्त्यांच्या मधुमेहाचं कारण म्हणून योग्य वाटत होतं. पण आशिया खंडात राहणारी माणसं पाश्चात्त्यांपेक्षा बारीक, कमी वजनाची. त्यांच्यात मधुमेह इतका जास्त का? शिवाय प्रत्येक लठ्ठ माणूस मधुमेही होतोच असं नाही. किंबहुना गलेलठ्ठ शरीराच्या जपानी सुमो मल्लांना तो होत नाही. हे कसं काय? मग कळलं की शरीरात साठवलेली चरबी सारखी नसते. त्वचेखालची चरबी ही पोटातल्या चरबीपेक्षा खूप वेगळी असते. पोटातली चरबी म्हणजे केवळ अतिरिक्त खाण्याचं चरबीत रूपांतर केलेला साठा नव्हे. तिथे असलेली चरबी अनेक प्रकारचे हॉर्मोन आणि इतर दाह निर्माण करणारी रसायनं बनवते. एक प्रकारे ती चरबी हे वेगळं इंद्रिय ठरतं. त्वचेखालची चरबी मात्र बरीच निष्क्रिय असते.

आपल्या शरीराकडे पाहिलं की या विचाराची सत्यता पटते. आपण पश्चिमेकडच्या लोकांपेक्षा बारीक असतो. परंतु आपल्या कमरेच्या पट्टयावरून थोडंसं पोट बाहेर डोकावत असतं. शरीराचा इतर भाग हडकुळा असला तरी आपण चांगलंच पोट राखून असतो. यातूनच 'थिन फॅट इंडियन' ही संकल्पना उदयाला आली. पूर्वी नुसतं काटयावर उभं राहिलं आणि वजन केलं की काम भागायचं. लठ्ठपणाचा तेवढाच काय तो मापदंड होता. नंतर लक्षात आलं की हे योग्य नव्हे. माणसांचे आकार, उंची सगळंच वेगवेगळं. मग नुसतं वजन करून कसं चालेल? त्यानुसार बी.एम.आय. म्हणजे किलोग्रॅममध्ये केलेल्या वजनाला मीटरमध्ये मोजलेल्या उंचीच्या वर्गाने भागून आलेलं उत्तर. आपल्या बाबतीत पुन्हा प्रश्न निर्माण झाला. आपण पाश्चात्त्यांच्या मानाने लुकडे, वजन बेतास बात. पण उंची तशी फार कमी नव्हे. त्यामुळे पाश्चात्त्यांच्या बाबतीत जो बी.एम.आय. नॉर्मल, तो आपल्या बाबतीत जास्त वाटू लागला. म्हणून या घडीला त्यांच्यासाठी वेगळे आणि आपल्यासाठी निराळे असे दोन तक्ते तयार झालेले आहेत.

 शिवाय आता मध्ये आणखी एका गोष्टीची भर घालण्यात आली आहे. कंबर आणि ढुंगण यांच्या घेराचं गुणोत्तर. हे सेंटिमीटरमध्ये मोजून त्याचा भागाकार करायचा. याला 'वेस्ट-हिप रेशो' असं म्हणतात. पुरुष आणि स्त्रिया यांच्या शारीरिक जडणघडणीमध्ये फरक असल्याने याचाही तक्ता बनणं आवश्यक होतं.

पोटाची उंची हा तिसरा प्रकार. यात रुग्णाला टेबलावर पाय दुमडून झोपवतात आणि टेबलाच्या पृष्ठभागावरून पोटाची उंची सेंटिमीटरमध्ये मोजतात. इंग्लिशमध्ये याला 'सजायटल डायमीटर' असं म्हणतात.

रासायनिकदृष्टया सजग असलेली ही पोटातली चरबी मोठया प्रमाणात स्निग्ध आम्ल (फॅटी ऍसिड) बनवते. आपल्या पोटात आतडयांमध्ये रक्ताभिसरणाची वेगळी व्यवस्था असते. तिला 'पोर्टल सक्र्युलेशन' असं म्हणतात. अन्न पचल्यानंतर पोर्टल सक्र्युलेशनद्वारा ते यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) जावं, यकृत हा रासायनिक घडामोडींचा केंद्रबिंदू असल्याने अन्न थेट तिथे पोहोचावं हा निसर्गाचा हेतू असतो. त्यामुळेच नेमका घात होतो. पोटातल्या चरबीतून निघालेली स्निग्ध आम्लं थेट यकृतामध्ये पोहोचतात. तिथे आपलं बस्तान बसवतात. यकृतामध्ये चरबी साचून फॅटी लिव्हर नावाचा प्रश्न तयार होतो. यकृताच्या पेशींमध्ये इन्श्युलीन रेझिस्टन्स होतो. त्या आपलं काम नीट करू शकत नाहीत. साहजिकच आपलं ग्लुकोज नियंत्रणात राखण्यात यकृत जी महत्त्वाची भूमिका बजावतं, त्यावर परिणाम होतो. आपल्याला मधुमेह होतो.

आपल्या प्रगतीचा एक भाग म्हणून आपल्याकडे वाहनं आली. शारीरिक श्रमाच्या जागी प्रत्येक क्षेत्रात यंत्रं काम करू लागली. सायकलपर्यंत ठीक होतं. ती चालवायला थोडेतरी कष्ट पडायचे. पण मोटारसायकली, रिक्षा, मोटारी यासारख्या वाहनांनी कष्टच संपवले. घरात, कामावर सगळीकडे स्नायूंच्या हालचाली करण्याची गरजच उरली नाही. शरीराचा एक गुणधर्म आहे - जे तुम्ही वापरत नाही, ते कमजोर होतं. तसंच झालं. स्नायूंच्या पेशी कमी होत चालल्या आहेत आणि स्नायूंमधलं चरबीचं प्रमाण वाढलंय. अशा जास्त चरबी असलेल्या स्नायूंमध्ये इन्श्युलीन रेझिस्टन्स तयार झाला. त्यामुळे इन्श्युलीन स्नायूंना ग्लुकोज वापरायला भाग पाडायचं, तेच काम करीनासं झाल्यावर ग्लुकोज कशी वापरली जाणार? ती रक्तात तशीच साचून राहू लागली. मधुमेहाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झाली.  

स्नायू, चरबी आणि यकृत ही आपली तीन मोठी इंद्रियं. त्यांचा आकार मोठा आणि इन्श्युलीनचा उपयोग करून ग्लुकोज वापरायची क्षमता मोठी. या तीन महत्त्वाच्या इंद्रियांमध्येच इन्श्युलीन रेझिस्टन्स झाला, म्हणजे सारंच बिघडलं. ग्लुकोजचा वापरच कमालीचा कमी झाला. ग्लुकोज रक्तात वाढू लागलं. मधुमेहाला आमंत्रण गेलं.


रक्तात ग्लुकोज वाढलं की त्याच्याही समस्या होणार, हे निश्चित होतं. आपल्या बीटा पेशी कशा काम करतात हे समजून घेतलं की या समस्या आपोआपच कळतील. तुम्ही-आम्ही जेवलो, ते अन्न पचलं आणि अन्नातून मिळणारं ग्लुकोज रक्तात आलं, म्हणजे ते ग्लुकोज बीटा पेशींमध्ये जातं. बीटा पेशींमध्ये सेन्सर्स असतात. ते ग्लुकोज आलं हे पाहून त्या प्रमाणात हवं तितकंच इन्श्युलीन बनवायला घेतात. हे बनवताना त्या पेशींना पुरेशी जागा लागते. फारच जास्त ग्लुकोज आलं की पेशींच्या आत खूप गर्दी होते. आपलं काम करायला पुरेशी जागा नसल्याने कामावर परिणाम होतो. समजा, एखादा उत्तम धावपटू आहे. शंभर मीटर अंतर तो केवळ काही सेकंदांत पार करतो. पण त्याला गर्दीच्या ठिकाणी धावायला सांगितलं, तर त्याची जशी पंचाईत होईल... तो धावूच शकणार नाही. तस्मात धावलाच, तर त्याचा वेग खूपच कमी झालेला असेल. तसाच काहीसा हा प्रकार. ही झाली ग्लुकोज टॉक्सिसिटी किंवा भरमसाठ ग्लुकोज वाढल्याने पेशींना होणाऱ्या त्रासाचं परिमाण. दुर्दैवाने स्निग्ध पदार्थांनाही हाच निकष लागू पडतो. तेल जास्त पोटात गेलं आणि त्यातून ट्रायग्लिसराइड वाढलं की पेशींना त्यांच्या भाऊगर्दीचा परिणाम भोगावा लागतो.

सगळं तेच, फक्त नाव निराळं. लायपो किंवा चरबीची टॉक्सिसिटी.

'आपणच का?' या प्रश्नाचं उत्तर आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलंय. मधुमेहाला खतपाणी घालणारे आपले जीन्स, कृषिप्रधानतेकडून ऐश्वर्यसंपन्नतेकडे झालेला आपला जलद प्रवास, पारंपरिक जेवणाला फारकत देऊन पाश्चिमात्य खाण्याचा वाढत चाललेला प्रसार, व्यायामाचा अभाव. मुळातच थोडी श्रीमंती आली की पाय दाबायलाही नोकर ठेवण्याची मानसिकता, शाकाहारी खाणं - तेही शिजवलेलं, कच्चं सॅलड नव्हे, कोशिंबिरीसाठी ताटातली सर्वात कमी जागा व सगळयात लहान चमचा राखून ठेवण्याची सवय, गोडाकडे असलेला ओढा, जेवणातच साखर-गूळ वापरणं, चमचमीत, मसालेदार तेलकट तुपकट खाणं, 'आम्ही बुवा घरात भरपूर साजूक तूप वापरतो' असला वृथा अभिमान या सगळयाचे परिणाम म्हणून आपल्याला मधुमेह मोठया प्रमाणात व्हायला लागला आहे. त्यात वाढत चाललेल्या स्पर्धेचा येणारा तणाव, जगण्यासाठी करावी लागणारी रोजची धावपळ, टी.व्ही.-मोबाइल-व्हॉट्स ऍप वगैरेत केवळ 'बैठं' राहण्याची प्रवृत्ती, अशा डोक्याचा तणाव वाढवणाऱ्या अनेक नव्या साधनांची रेलचेल. सारं स्फोटक वातावरण. म्हणूनच आज आपल्याकडे मधुमेहाचा प्रसार अचानक खूप वाढलाय. दुर्दैवाने आपण मधुमेहाची जागतिक राजधानी असल्याचं बिरुद मिरवतो आहोत.

9892245272