नाशिकची पथदर्शक अन्नपूर्णा योजना

विवेक मराठी    26-Aug-2016
Total Views |

नाशिक शहरात असलेले शासकीय रुग्णालय, क्षय रुग्णालय व कर्करोग रुग्णालय येथे दररोज वनवासी भागांतून रुग्ण दाखल होतात. या रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईकही असतात. अशा वेळी त्यांच्या जेवणाची आबाळ होते. रा.स्व. संघ जनकल्याण समिती, शाखा नाशिक यांच्या वतीने रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना घरचे ताजे आणि पौष्टिक जेवण देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जातो. 2400 घरांतून महिन्यातून एकदा ही शिदोरी येत असते. वर्षाकाठी 10 हजार रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना 28,800 डबे विनामूल्य वितरित केले जातात.

ज्या कामांची नोंद आवर्जून घ्यावी अशी असंख्य कामे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे केली जातात. नाशिक जिल्हा शाखेतर्फे चालविण्यात येणारी जनकल्याण रक्तपेढी, रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र आणि अन्नपूर्णा योजना या योजनांचा या संदर्भात विचार करावा लागेल. त्यातही अन्नपूर्णा योजना हे तर नाशिकचे खास वैशिष्टय आहे. सर्वप्रथम नाशिकलाच ही योजना सुरू झालेली आहे. ग्रामीण भागातील रहिवाशांना वैद्यकीय उपचाराकरिता नेहमी शहरातील रुग्णालयाकडे यावे लागते. त्यातही पैशाअभावी रुग्ण आणि नातेवाईक यांची धाव सिव्हिल हॉस्पिटलकडे असते. मोठा प्रवास करून आल्यानंतर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. विशेषत: जेवणाचे हाल होतात. या अडचणी पाहून रा.स्व. संघाचे सरकार्यवाह मा. भय्याजी जोशी यांनी नाशिक भेटीत यासाठी काही करण्याची सूचना केली. त्यावर विचार करून राजेंद्र जोशी आणि इलाताई जोशी यांनी 2002मध्ये अन्नपूर्णा योजनेची पायाभरणी केली. तेव्हापासून गेली चौदा वर्षे ही योजना अव्याहत सुरू आहे. पंधरा हजाराहून अधिक रुग्णांच्या नातेवाइकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ग्रामीण आणि वनवासी भागातील रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाइकांची मोठी संख्या लक्षात घेऊन त्यांच्या जेवणाची सोय या योजनेच्या माध्यमातून केली जाते. नाशिकमध्ये सुरू झालेल्या या योजनेनंतर सांगली, जळगाव, धुळे येथेदेखील अशा तऱ्हेच्या योजना सुरू झाल्या आहेत. अन्य महाराष्ट्रात मात्र अद्याप अशी योजना नाही. खरे तर अशा योजना सर्व गावी सुरू व्हायला हव्यात, ज्यामुळे रुग्णालयात रुग्णांवर उपचार होत असताना त्यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाइकांचे हाल कमी होऊ शकतील.

नाशिकच्या अन्नपूर्णा योजनेची अनेक वैशिष्टये आहेत. या योजनेतील सर्व जेवणाचे डबे विविध स्वयंसेवकांच्या घरांतून जमा केले जातात. हे त्यापैकी एक आहे. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक त्यात हिरिरीने भाग घेतात. प्रसंगी पदरमोड करूनदेखील वेळेवर रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण मिळण्यासाठी जिवाचा आटापिटा करताना हे ज्येष्ठ आणि अन्य स्वयंसेवक दिसतात.

सध्या नाशिकचे त्र्यंबक रोडवर असलेले सिव्हिल हॉस्पिटल, आर.टी.ओ.जवळ असलेले कर्करोग रुग्णालय आणि म्हसरूळ येथील टी.बी. सॅनिटोरियम येथे ही सेवा दिली जात आहे. या योजनेत रोज 125 डबे जमा करून ते रुग्णांच्या नातेवाइकांना दिले जातात. दरमहा तीन हजार घरांतून विशिष्ट दिवशी डबा घेतला जातो. प्रत्येक डब्यात आठ पोळया आणि भाजी असे डब्याचे स्वरूप असते. सर्व योजनेत 125 गटप्रमुख सहभागी झाले असून ते काटेकोरपणे व्यवस्था सांभाळतात. सेवा कार्यातील वेगळेपण आणि निरपेक्षपणा पाहून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या एक हॉलदेखील रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे, हे आणखी एक विशेष.

या योजनेतून रुग्ण आणि स्वयंसेवक यांच्यात आगळे नाते तयार होते. त्यामुळे दिवाळी आणि रक्षाबंधन सणांचा आनंदही घरापासून दूर आलेल्या रुग्णांना  लुटला येतो. नुकत्याच झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात अशा एक हजार रुग्णांना राख्या बांधण्यात आल्या होत्या. दिवाळीत पुरुष रुग्णांना शर्ट-पँट आणि महिलांना साडी-ब्लाउज, तसेच लाडू, चिवडा, चकली आदी फराळाचे पदार्थ, मिठाई, उटणे, तेल, कंगवा आदी भेट दिले जातात. नाशिक जिल्हा रुग्णालयात विकास माकुणे आणि विद्या विकास माकुणे हे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करतात. दररोज दुपारी 12 ते 4 या वेळात सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्व वॉर्डांतून फिरून नातेवाइकांना धीर देणे, त्यांचे पत्रलेखन, पुस्तक वाचन, फोनवर त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधणे अशी कामे करतानाच डब्यातील शिदोरी वाटप करत असतात.

या योजनेत सहभागी व्हायचे असल्यास अत्यंत सोपी पध्दत आहे. मनोहर रुग्ण सेवा केंद्राशी संपर्क साधल्यास आपल्या आणि केंद्राच्या सोयीने महिन्यातील एक तारीख ठरविली जाते आणि त्यानुसा ठरावीक केंद्रावर ठरावीक वेळेत शिदोरी आणून दिली की त्याची पुढील व्यवस्था केली जाते. त्यातील पोळया वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून आणता येतील, तर भाजी रिकाम्या प्लास्टिक डब्यांमधून आणता येईल. अनेकदा घरात रिकामे डबे असतात. श्रीखंड, दही, मिठाई आणताना आलेले हे डबे यासाठी वापरता येतील.


सध्या तीन हॉस्पिटल्समध्ये ही योजना सुरू असली, तरी पुढील काळात नाशिक रोडचे बिटको रुग्णालय आणि शालिमार येथील आय.एम.ए.चे देसाई हॉस्पिटल येथे देखील ही योजना राबविण्याची योजना आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आता पाच ठिकाणी रुग्णांच्या नातेवाइकांना या योजनेचा लाभ होऊ  शकेल.

या योजनेत सहभागी होण्यसाठी मनोहर रुग्ण सेवा केंद्र, रत्नमनोहर संकुल, अहिल्यादेवी होळकर पुलाजवळ, रविवार कारंजा, नाशिक - 422001, दूरध्वनी क्र. 2598746 येथे दुपारी 4 ते 6 या वेळात अथवा विकास माकुणे यांच्याशी 9422048329 या क्रमांकावर किंवा प्रकल्प प्रमुख प्रमोद मोहरीर यांच्याशी 9421511200 या क्रमांकावर संपर्क साधून आपला सहभाग नोंदविता येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी झाल्यास अधिक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना ही सेवा देणे शक्य होणार आहे.

योजनेची वैशिष्टये

नाशिकमध्ये रोज 125 घरांमधून एक याप्रमाणे जेवणाचे डबे गोळा केले जातात.

रोज दहा गटप्रमुख हे काम करतात.

दरमहा तीन हजार घरांमधून डबा गोळा केला जातो.

नाशिकमधील तीन हजार कुटुंबे या योजनेत डबा देतात.

आठ पोळया आणि भाजी असे डब्याचे स्वरूप असते.

सर्व गटप्रमुख सेवाभावी वृत्तीने हे काम वर्षभर करतात.

8422969603

 

 

रुग्णांच्या इतर समस्यांवरही मार्ग काढत आहोत
याबाबत नाशिकचे कार्यकर्ते विकास माकुणे यांना आलेले अनुभव त्यांनी नोंदविले आहेत. त्यांनी सांगितले, ''नाशिक जिल्हा रुग्णालयात 'अन्नपूर्णा योजने'चे काम करत असताना एक समस्या दिसली. जे रुग्ण रुग्णालयात दीर्घकाळ - म्हणजे सुमारे तीन-चार महिने राहतात, त्या रुग्णांचे केस कापले जात नाहीत. त्यांची दाढी केली जात नाही. मनात आले, मी हे काम करू शकेन का...? हा विचार मनात आल्यावर प्रथम मी स्वत:च दुकानात गेलो आणि तीन महिने रोज दोन-तीन तास दुकानदाराकडून हे काम शिकलो. मग दररोज एका रुग्णाचे केस कापण्याचे, दाढी करण्याचे काम करण्यास सुरुवात केली. या कामाला आधी खूप वेळ लागत असे. नंतर सरावाने व्यवस्थित आणि कमी वेळेत अधिक संख्येने रुग्णांचे केस कापण्याचे, दाढी करण्याचे काम चांगले जमू लागले. मी हे काम करत असताना तेथील कर्मचारीदेखील हे काम पाहायचे. काही महिन्यांनंतर एक कर्मचारी विजय भोसले यांनी मला विचारले, 'हे काम मीसुध्दा करू शकेन का?' मी 'हो' म्हणालो. मग तेदेखील हे काम करू लागले. काही दिवसांनी 'तुम्ही केस कापण्याचे काम दुकानात जाऊन शिकून घ्या' असे मी त्यांना सांगितल्यावर दोन महिने दुकानात जाऊन ते हे काम शिकले. मग आम्ही दोघे मिळून हे काम करू लागलो. पुढे असेच एकाचे दोन झाले. आता सहा कर्मचारी रुग्णांकडून पैसे न घेता, मनापासून व्यवस्थितपणे हे काम करत आहेत. मला या कामात आता लक्ष द्यावे लागत नाही. त्यामुळे आता मी अन्य समस्यांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे.''

 

अनामिक नात्याची वीण
विद्या माकुणे यांनी आणखी एक अनुभव सांगितला -
नांदगाव येथील अनिल सीताराम पवार हा वीस-बावीस वर्षांचा तरुण गाडीच्या अपघातात पायाला लागल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोन-तीन महिने भरती होता. मला नेहमी ''ताई, तुझं बाळ कसं आहे?'' असे विचारत असे. एक दिवस त्याला रक्त पिशवी लावलेली पाहून मला वाईट वाटले. मी विचारले, ''का रे, तुला रक्त चढवावं का लागतंय?'' तर त्याची आई म्हणाली, ''तो जेवतच नाही.'' त्याक्षणी अनिल मला म्हणाला, ''ताई, तू रोज येत जा ना. मला तू भरवलंस तर मी रोज जेवेन. मला इथलं जेवण जात नाही.'' ते ऐकून खूप बरे वाटले. मी त्याला म्हटले, ''ठीक आहे. मी तुला जेवू घालेन.'' हे ऐकताच तो खूप आनंदित झाला. पुढे पंधरा दिवसांनी काळाने घात केला आणि अनिल देवाघरी गेला. पण आमच्यातल्या भाऊ-बहिणीच्या वेगळया नात्याची आठवण मनात कायम ठेवून गेला.

 

 समाधानाचे अकाउंट
मोहन गावित हा अस्थिरोग कक्षात भरती होता. त्याची आई बरोबर होती. त्यांना डबा देणे सुरू झाले. मोहनशी संवाद सुरू झाला. मी मोहनचा मित्र झालो. मोहन पेठ तालुक्यातला. शिक्षण बेताचेच. शेती नाही. त्यामुळे शहरात कामासाठी आला होता. बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला लागला. रात्री साईट सांभाळायचा. दिवसा सेंट्रिंगच्या कामाला जायचा. नेहमी आमचे बोलणे होऊ लागले. मित्रत्वाची वीण घट्ट झाली. एके दिवशी बोलता बोलता मोहनला विचारले, ''पैशाचे काय करतोस? गावी पैसे पाठवतोस का?'' त्यावर तो उत्तरला, ''कधीकधी गावाला पैसे पाठवतो.'' मग मी विचारले, ''पैसे कोठे ठेवतोस?'' त्यावर तो म्हणाला, ''पैसे घरीच असतात.'' मी त्याला विचारले, ''पैसे बँकेत का ठेवत नाहीस?'' तर तो म्हणाला, ''बँकेत खूप कागद मागतात. त्यामुळे नाही ठेवत.'' थोडयाच दिवसांत मोहनला जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आले. मी त्याला गाडीवर घेऊन त्याच्या घरी गेलो. घर म्हणजे काय, तर एक पत्र्याची खोली होती. दरवाज्याला लाकडी खुंटी होती. मोहन चहा करतो म्हणाला, मी नको म्हणालो. नंतर त्याने गादी वर उचली आणि पाहतो तर काय...? तेथे सारे पैसेच. आम्ही ते पैसे मोजले. एक लाख सत्तावीस हजार पाचशे नव्वद  रुपये होते. मोहनची पंधरा वर्षांची मेहनत समोर दिसत होती. मी विचार केला. बँकेत जाऊन त्याचे खाते काढले. पासबुक मोहनला दिले आणि म्हणालो, ''हे तुझे पैसे आहेत. जेव्हा पाहिजे त्या वेळी घेत जा.'' मोहनचा आनंद त्याच्या डोळयात दिसत होता. तो पाहत मी तेथून निघालो.

सामाजिक भान
नाशिकमधील जुना गंगापूर नाका येथे राहणारे केशव गंगाधर जाधव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. काकू धुणी-भांडी करून उदरनिर्वाह चालवायच्या. घरी कोणीच नव्हते. म्हणून डबा देण्याचे काम सुरू झाले. बोलताना काकू नेहमी उत्साही दिसायच्या. रुग्णालाही उत्साहित ठेवण्याचा प्रयत्न करायच्या. एक-दीड महिन्यांत जाधव यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. काही दिवसांनी आम्ही दोघे आणि मुलगी जनकल्याण रक्तपेढीत काही कार्यक्रमासाठी जात होतो. काकू रिक्षातून उतरताना दिसल्या. अगदी तशाच, नेहमीसारख्या. मी हाक मारून त्यांना थांबवले. काकू थांबल्या. मी जवळ जाताच त्या रडू लागल्या. मला कळेना, काय झाले तरी काय. मग शांत होत त्यांनी काकांचे निधन झाल्याचे सांगितले. मला वाईट वाटले. त्यांचा संसार आठवला. ती परिस्थिती आठवली. मी त्यातून बाहेर येईपर्यंत त्या सावरल्या होत्या. मग माझ्या मुलीच्या हातात त्यांनी दहा रुपये दिले आणि तिला म्हणाल्या, ''हे तुला आजीकडून, बरं का?'' मग मला म्हणाल्या, ''खाऊ घे तिला. खाऊ घाल माझ्या नातीला.'' असे म्हणत त्या निघाल्या आणि जाता जाता परत आल्या. त्यांनी मला विचारले, ''दहा डबे द्याल का?'' मी ''हो'' म्हणताच त्यांनी माझ्याकडे दोनशे रुपये दिले. मी देणगीची पावती दिली. काकू निघून गेल्या. थक्क होऊन आम्ही काकूंकडे कितीतरी वेळ पाहत राहिलो.

 

अनेकांचे मौलिक योगदान
अन्नपूर्णा योजनेत अनेकांनी आपले मौलिक योगदान दिले आहे. आजही देत आहेत. त्या सर्वांची नावे देणे शक्य नाही. मात्र प्रारंभीच्या कठीण काळात अनेकांनी काम केले, त्याची नोंद घेणे आवश्यक आहे. या सर्व नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये गजानन गोडबोले, नलिनी गोडबोले, गजानन दीक्षित, गिरीश वैशंपायन, शोभा कुलकर्णी, आशा मोहरीर, सुभाष कुलकर्णी, अनिल ओढेकर, विजय गोयल, उदय पाटील, चंद्रशेखर विंचूरकर, संतोष पाटील,  केदार मुंडले आदींचा समावेश आहे. सध्या अन्नपूर्णा योजनेचे प्रकल्प प्रमुख म्हणून प्रमोद मोहरीर काम पाहत आहेत. तृप्ती देसाई, विदुला पाठक, जयश्री टोपे, रत्ना पेंढे, सुनंदा जाधव, सुधाकर नेवे, आत्माराम शेटे, शशिकांत कुलकर्णी, विवेक देशपांडे, गणेश दिमोठे, राजाभाऊ किंजवडेकर, विजय सोनांबेकर, वासुदेव चांदवडकर आदींचा समावेश आहे. याशिवाय नियमित डबे देणारी कुटुंबे आहेतच.