गरोदरपणा आणि मधुमेह

विवेक मराठी    30-Aug-2016
Total Views |

गरोदरपणामध्ये झालेला मधुमेह आणि मधुमेही स्त्री गरोदर राहणं यात मूलभूत फरक आहे. आधीच मधुमेही असलेली स्त्री जेव्हा गर्भार राहते, तेव्हा गर्भधारणेच्या पहिल्या दिवसापासून तिच्या रक्तातलं ग्लुकोज वाढलेलं असतं. म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून तिच्या बाळाला मधुमेहाचे परिणाम भोगावे लागू शकतात. बाळ आणि त्याचे अवयव पहिल्या तीन महिन्यांत तयार होतात. त्या वेळी सगळं काही आलबेल असणं खूप महत्त्वाचं असतं.


ग्नानंतर स्त्री गरोदर झाल्याची बातमी आली की आख्खं घर आनंदाने उजळून निघतं. अभिनंदनाचा वर्षाव सुरू होतो. प्रत्यक्ष गर्भवती झालेल्या स्त्रीच्या मनात मात्र संमिश्र भावना असतात. सगळं व्यवस्थित पार पडेल ना, बाळ सुखरूप असेल ना, मला किंवा बाळाला कुठलाही त्रास होणार नाही ना.. अशा आनंदाच्या मागे दडलेल्या विचारांचं मोहोळ उठलेलं असतं. कारण सरतेशेवटी सगळं तिलाच भोगायचं असतं. त्यात येणारा प्रत्येक नातेवाईक, ओळखीचं प्रत्येक माणूस तिच्यावर सल्ल्यांचा भडिमार करत असतं. अशा वेळी जर डॉक्टरांनी तिला सांगितलं की ''बाई, तुला मधुमेह झाला आहे'', तर बऱ्याचदा तिच्या पायाखालची जमीन सरकते. आई होण्याच्या सुखाची जागा प्रचंड तणाव घेतो. मधुमेह आणि गरोदरपणा यांचा नेमका संबंध काय हे पाहणं त्यासाठीच आवश्यक ठरतं. अर्थात आपण तो का होतो या गोष्टीचा विचार प्रथम करणार आहोत. त्यानंतर काय पावलं उचलायची ते पुन्हा कधीतरी पाहणार आहोत.

मुळात गर्भारपणात मधुमेह होतोच का, हा मूळ प्रश्न आहे. त्याचं सोपं उत्तर देता येईल. जेव्हा कुठलीही स्त्री गरोदर होते, तेव्हा ती किमान पाळी येण्याइतपत मोठी झालेली असते. म्हणजे तिची शारीरिक वाढ बऱ्यापैकी पूर्ण झालेली असते किंवा निदान पूर्णत्वाच्या जवळ पोहोचलेली असते. पण तिच्या गर्भात वाढणारं बाळ हा नवीन जीव असतो. त्या नव्या पाहुण्याच्या शारीरिक वाढीत बाधा येऊ नये, यासाठी निसर्ग योजना करणं स्वाभाविक असतं.

त्यामुळे गर्भाने वार धरली, म्हणजे Placenta तयार झाला की त्यातून हॉर्मोन स्रवतात. हे हॉर्मोन आईच्या शरीराला इन्श्युलीन रेझिस्टन्ट बनवतात. बाळ मात्र नेहमीसारखं इन्श्युलीनला योग्य दाद देणारं असतं. मला वाटतं हे जरा अधिक स्पष्ट व्हायला हवं. स्त्रीच्या शरीरात नवा जीव तयार होतोय याचा सगळयात पक्का पुरावा म्हणजे गर्भाला आईच्या शरीराशी जोडणारी वार. वार हॉर्मोन बनवायला लगोलग सुरुवात करते. त्या हॉर्मोनचं सर्वात महत्त्वाचं काम असतं बाळाला त्याच्या वाढीसाठी लागणारी पोषक द्रव्यं कमी पडू न देणं. मध्ये एक अडचण असते. बाळ खात नसतं. आई जेवत असते. तिला जेवणातून मिळालेल्या गोष्टी जर पूर्ण वाढ झालेल्या आईच्या शरीराने पळवल्या, तर बाळाला पुरेसं पोषण मिळणार नाही. निसर्गाने यावर मात केली ती हॉर्मोनच्या माध्यमातून. त्याने आईला रेझिस्टंट बनवलं. वेगळया शब्दात सांगायचं तर हॉर्मोन प्रथम बाळाला पोषण मिळेल याची व्यवस्था करतात.

तुम्ही म्हणाल, हे ठीक आहे, पण याचा मधुमेहाशी संबंध कुठे आला?

या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी बहुतेक स्त्रियांना गरोदरपणामध्ये मधुमेह का होत नाही, हे समजून घेतलं पाहिजे. असं उलटं शिरण्याचं कारण आहे. कधीकधी उलट विचार केल्याने काही गोष्टी समजणं सोपं होतं. जरी प्रत्येक स्त्रीमध्ये ती गरोदर झाल्यावर इन्श्युलीन रेझिस्टन्स होत असला, तरी त्यांच्या इन्श्युलीन बनवणाऱ्या बीटा पेशी अधिक जागृत, अधिक तत्पर होतात. नेहमीपेक्षा दीडपट इन्श्युलीन बनवून त्या इन्श्युलीन रेझिस्टन्सवर मात करतात. साहजिकच जेव्हा गरोदर स्त्रीच्या बीटा पेशी असं दीडपट इन्श्युलीन बनवण्यात कमी पडतात, तेव्हा त्या स्त्रीला मधुमेह होतो. 


याच उत्तरात पुढचं गुपित दडलं आहे. गरोदरपणात जसजसे महिने वाढत जातात, तसतसं इन्श्युलीन रेझिस्टन्सचं प्रमाण वाढत जातं. सुरुवातीला या इन्श्युलीन रेझिस्टन्स कमी असल्याने त्यावर मात करण्याइतपत इन्श्युलीन बीटा पेशी बनवू शकतात. वेगळया शब्दात सांगायचं तर एखादी स्त्री गरोदरपणात मधुमेही व्हायची शक्यता असेल तर ती गर्भारपणाच्या उत्तरार्धात होते, पूर्वार्धात नाही. बहुधा गर्भधारणा होऊन वीस आठवडयांचा किंवा पाच महिन्यांचा काळ उलटला की हळूहळू रक्तातलं ग्लुकोज वाढायला लागतं.  यातून दोन संकेत मिळतात. एक म्हणजे गरोदरपणातला मधुमेह जरा उशिराने येतो. प्रथम गर्भधारणा होते, त्यानंतर बऱ्याच काळानंतर मधुमेह येतो. तो गरोदरपणाच्या संपूर्ण काळात केव्हाही डोकं वर काढू शकतो. म्हणजे एखाद्या स्त्रीने सुरुवातीला रक्त तपासून घेतलं आणि त्यात सगळं नॉर्मल निघालं, तरीही पुढच्या काही महिन्यात ती मधुमेही होणारच नाही याची शाश्वती देता येत नाही. दुसरं म्हणजे हा मधुमेह हळूहळू वाढत जातो. एकदम तीनशे ग्लुकोज निघालं असं होत नाही. असं असेल तर स्त्री आधी मधुमेही होती आणि नंतर ती गरोदर राहिली किंवा दुसऱ्या कुठल्यातरी कारणाने तिचं ग्लुकोज वाढलं असा अर्थ काढणं सत्याला धरून म्हणता येईल.

गरोदरपणामध्ये झालेला मधुमेह आणि मधुमेही स्त्री गरोदर राहणं यात मूलभूत फरक आहे. आधीच मधुमेही असलेली स्त्री जेव्हा गर्भार राहते, तेव्हा गर्भधारणेच्या पहिल्या दिवसापासून तिच्या रक्तातलं ग्लुकोज वाढलेलं असतं. म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून तिच्या बाळाला मधुमेहाचे परिणाम भोगावे लागू शकतात. बाळ आणि त्याचे अवयव पहिल्या तीन महिन्यांत तयार होतात. त्या वेळी सगळं काही आलबेल असणं खूप महत्त्वाचं असतं. अवयव तयार होत असतानाच्या काळात बाळाच्या पेशींना जराही इकडे तिकडे झालेलं चालत नाही. त्याने अवयव चुकीच्या पध्दतीत बनायची किंवा त्यात कुठलातरी दोष निर्माण व्हायची भीती असते. या काळात गरोदर स्त्रीने चुकून जरी दारू घेतली एखाद्या वेळेला.. पुन्हा अधोरेखित करतो - 'एखाद्या वेळी जरी' पेला ओठाला लावला, तरी बाळावर त्याचे परिणाम होतात. यावरूनच बाळाच्या पेशी किती नाजूक असतात हे लक्षात यावं. एक प्रकारे गरोदरपणाआधीच मधुमेह जास्त प्रश्न निर्माण करतो. जन्मापासून व्याधी असलेलं बाळ व्हायची शक्यता त्यात जास्त असते, हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

या अवस्थेत काही वेगळे प्रश्नसुध्दा असतात. पहिला म्हणजे स्त्री गरोदर झाल्या झाल्या तिला कळत नाही. पाळी चुकल्यावर साधारणत: एक आठवडा किंवा दहाएक दिवस झाल्यावर ती प्रेग्नन्सी टेस्ट करते, तेव्हाच तिला समजतं की ती गरोदर आहे. प्रत्यक्षात गर्भाचं बीज रोवलं गेल्याला तोपर्यंत वीस-पंचवीस दिवस उलटून गेलेले असतात. बाळाचे अवयव तयार होण्यातला खूप महत्त्वाचा काळ तीन महिन्यांचा असतो हे पाहिलं, तर स्त्री पोटुशी आहे हे तिला कळेपर्यंत जवळपास एक चतुर्थांश काळ आधीच निघून गेलेला असतो. कल्पना करा, स्त्रीला कळलं आपण गरोदर आहोत तेव्हा ती सजग होईल, आपली ग्लुकोज पूर्ण नियंत्रणात राहील याची काळजी घेईल. अहो, पण ते कळेपर्यंतच्या काळाचं काय? तोपर्यंत तिचं अनियंत्रित ग्लुकोज आणि ते ग्लुकोज काबूत राखण्यासाठी ती घेत असलेली औषधं गर्भाला त्रासदायक ठरणार नाहीत याची खात्री कशी देता येईल? आधीच मधुमेह असलेली स्त्री गरोदर होण्यात आणि गरोदरपणामध्ये पहिल्यांदा मधुमेह असल्याचं दिसण्यात मूलभूत फरक आहे तो हाच.

या एकाच कारणासाठी मधुमेह असलेल्या स्त्रीला तिच्या गर्भार राहण्याचं प्लॅनिंग करणं आवश्यक ठरतं. डॉक्टर तसा सल्ला देतात. त्यामुळे गरोदर राहण्याआधीच ग्लुकोज नीट नियंत्रणात आणणं शक्य होतं. रोजची, गर्भाला कदाचित त्रास देतील अशी औषधं बंद करून त्या जागी इन्श्युलीनसारखी गर्भाला अत्यंत सुरक्षित अशी औषधं देता येतात. म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून गर्भ सुरक्षित असल्याची हमी मिळते.

इथे बहुतेकांना कल्पना नसलेली आणखी एक गोष्ट नमूद करायला हवी. मधुमेहाच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लुकोजच्या पातळीतही फरक आहे. नॉर्मल माणसांचं उपाशी पोटीचं ग्लुकोज 140च्या वर गेलं की मधुमेहाचं निदान होतं. गर्भार स्त्रीसाठी ही पातळी 126 इतकी खाली आहे आणि जेवणानंतर नॉर्मल माणसांमध्ये 200पर्यंत ग्लुकोज जाईपर्यंत त्यांच्यावर मधुमेहाचा शिक्का बसत नाही. पण गरोदर स्त्रीचं ग्लुकोज 140च्या आत असणं अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्त आढळलं तर ती मधुमेही असल्याचं जाहीर केलं जातं. हे माहीत नसल्याने कित्येकदा माणसं रिपोर्ट पाहतात, ग्लुकोज नॉर्मल रेंजमध्ये आहे हे पाहून खूश होतात. फक्त रिपोर्टमध्ये दाखवलेली ग्लुकोजची रेफरन्स रेंज नॉर्मल निरोगी माणसांसाठी आहे, गरोदर स्त्रीसाठी नाही, हे विसरतात.

गरोदरपणात मधुमेहाचं निदान करताना सर्वात चांगला मार्ग म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करणं. थोडक्यात जेवणानंतर ग्लुकोज तपासण्यापेक्षा प्रत्यक्ष ग्लुकोजची पावडर खाऊन रक्त तपासायला जाणं. इथे थोडी विचित्र परिस्थिती होते. 75 ते 100 ग्रॅम ग्लुकोज पाच मिनिटात गट्टम करणं तुम्हा-आम्हालादेखील शक्य नसतं. आधीच वांत्या करून थकलेली स्त्री हे कसं करणार? म्हणून पाण्यात विरघळवून त्यात लिंबू पिळून लिंबू सरबत बनवून दिलं तर निदान ती ते पिऊ तरी शकेल.

गरोदरपण आणि मधुमेह याचं आख्यान इथेच संपत नाही. त्याच्या इतर पैलूंची आपण नंतर कधीतरी माहिती घेऊ.

9892245272