ईशान्येच्या दीपज्योती...

विवेक मराठी    04-Aug-2016
Total Views |

नुकताच आउटलूक साप्ताहिकात प्रकाशित झालेला'अॉपरेशन बेबीलिफ्ट' हा लेख या साप्ताहिकाच्या, संबंधित पत्रकाराच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवतो.

त्या पार्श्वभूमीवर, साप्ताहिक विवेकमधील 'ईशान्येच्या दीपज्योती' हा लेख पुन:प्रकाशित करत आहोत. राष्ट्र सेविका समितीच्या, वनवासी कन्या छात्रावास या उपक्रमांतर्गत 1987 सालापासून ईशान्येकडील राज्यातील मुली शिक्षणासाठी महाराष्ट्रासह भारतातल्या काही राज्यांत आणल्या जात आहेत. या उपक्रमाला 2012मध्ये 25 वर्षं झाली, त्यावेळी साप्ताहिक विवेकमध्ये 'ईशान्येच्या दीपज्योती' हा लेख प्रकाशित झाला होता. या उपक्रमाची नेमकी आणि संपूर्ण माहिती सर्वांपर्यंत पोचावी हा हेतू त्यामागे होता.


यह भूमी कितनी सुंदर है
,

पर्वतोंकी एक माला है।

पाती प्रथम है सूर्य किरण,

यह कहलाती पूर्वांचल....

ईशान्येच्या कुशीत जन्मलेल्या त्या साऱ्या जणी सुरेल आवाजात आणि एका सुरात गात होत्या...शिकून शहाणं होण्यासाठी आपल्या जन्मभूमीपासून हजारो किलोमीटर दूर येऊन राहिलेल्या त्या सगळयांच्या स्वरांत आपल्या मातीची ओढ, तिच्याविषयीच्या आपुलकीचा ओलावा ओतप्रोत भरला होता. महाराष्ट्रात 'मावशीच्या घरी' आपण काही वर्षांसाठी राहायला आलो आहोत, इथे शिकून इथून परत जायचं ते आपल्या गावी...आपल्या भागातल्या लोकांसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करायचा, हे त्यांच्या मनात पक्कं आहे.  ज्या भूमीला पहिल्या सूर्यकिरणांचा स्पर्श होण्याचं भाग्य लाभलं आहे, त्या भूमीत ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी या दीपज्योती सज्ज होत आहेत...त्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. राष्ट्र सेविका समितीच्या नागपुरातल्या मुख्यालयात - देवी अहल्या मंदिरात त्यांची भेट घेतली. या भेटीची ही झलक...

'माय मरो आणि मावशी उरो' अशी आपल्या मराठीत एक म्हण आहे. मातृसुखाला आचवलेल्या आपल्या बहिणीचं मूल तिची बहीण अधिक उत्तम तऱ्हेने वाढवते, असा त्याचा मथितार्थ. राष्ट्र सेविका समितीच्या छात्रावासात राहणाऱ्या या साऱ्या जणी आईविना पोरक्या नाहीत, पण वर्षानुवर्षं आईपासून दूर राहताहेत. जेव्हा नागपुरातल्या मावश्यांच्या छत्रछायेत, त्यांच्या प्रेमाच्या उबेत वाढताना आपण त्यांना पाहतो, तेव्हा या म्हणीचा अर्थ मनात उलगडत जातो.

सर्वस्वी परक्या वातावरणात आणि त्यांच्यापेक्षा वेगळया दिसणाऱ्या (पण त्यांच्याच असणाऱ्या) माणसांमधे आल्यावर संवादभाषेपासून सगळेच अडथळे असतात. मात्र मावशी ही हाक त्यांना परस्परांच्या जवळ आणते. समितीच्या सर्व सेविका म्हणजे या मुलींच्या मावशी. अगदी

वं. उषाताई चाटी, वं. प्रमिलाताई मेढे यांच्यापासून सर्वांनाच त्या मावशी म्हणतात.


राष्ट्र सेविका समितीच्या वनवासी कन्या छात्रावास या उपक्रमांतर्गत 1987 पासून ईशान्येच्या राज्यातल्या मुली शिक्षणासाठी येताहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरातच पूर्वांचलातल्या मुली शिक्षणासाठी यायला सुरुवात या छात्रावासाने झाली. त्या काळी पूर्वांचलात  वं. प्रमिलाताईंचा कामानिमित्त प्रवास होत असे. 'आमच्या मुलींना तुमच्याकडे न्या आणि शिकवा' अशी मागणी तिथल्या काही घरांतून होऊ लागली. आणि या मागणीतूनच पूर्वांचलातील मुलींच्या छात्रावासाची सुरुवात झाली. अबुना आणि अलिम या दोन अगदी छोटया इथल्या पहिल्या विद्यार्थिनी. तृतीय वर्षाच्या वर्गासाठी जे कार्यकर्ते पूर्वांचलातून आले, त्यांच्याबरोबर या मुली आल्या. इतका मोठा प्रवासही त्यांनी पहिल्यांदा केला. गाडीचं दर्शन पहिल्यांदा झालं. विजेचे दिवेच जिथे कधी बघितले नव्हते, तिथे फ्रीज म्हणजे तर त्यांच्यासाठी अद्भुत वस्तू होती. छात्रावासातल्या या मुलींच्या संगोपनाविषयी सांगताना वं. प्रमिलाताई म्हणाल्या, ''त्या जेव्हा पहिल्यांदा त्यांचं घर, नातेवाईक, गाव सोडून येतात तेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी एकच भाषा असते, ती म्हणजे आपुलकीच्या स्पर्शाची भाषा...त्यांना प्रेमानं जवळ घ्यावं लागतं, आपल्या मांडीवर बसवावं लागतं, जवळ झोपवावं लागतं. त्यातून त्यांच्या मनात आपल्याबद्दल खरोखरच मावशी वाटावी इतकी माया निर्माण होते. आपल्याबद्दल विश्वास निर्माण होतो. आणि त्यातून हे बदल होतात.'' छात्रावासातल्या पहिल्या दोघी मुलींना वर्षभराने घरच्यांच्या भेटीसाठी पाठवलं, तेव्हा त्यांच्यात झालेला लक्षणीय बदल पाहून घरचे आणि शेजारपाजारचेही थक्क झाले.

आज भारतात निरनिराळया ठिकाणी असलेल्या छात्रावासातून ईशान्य भारतातील मुलं-मुली शिक्षण घेताहेत. त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं हा हेतू तर आहेच; पण त्याचबरोबर, देशापासून दुरावलेल्या ईशान्य भागाला या माध्यमातून उर्वरित भारताशी जोडावं, हा हेतूही आहे. या संदर्भात बोलताना वं. प्रमिलाताई म्हणाल्या, ''या मुलींना इकडे अाणलं, आपल्याकडे ठेवलं तर आपण एकटे नाही हे तिथल्या लोकांना कळेल. आपला देश किती मोठा आहे याची जाणीव होईल. देशाबद्दल आपुलकी निर्माण करता येईल आणि त्यांच्या माध्यमातून ईशान्य भारतात या भावनेचा प्रसार करता येईल, हा विचार या कामामागे पहिल्यापासून होता. आणि त्याचं अपेक्षित फळ आता मिळतं आहे.''

समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या चित्राताई जोशी यांचा निवास अहल्या मंदिरातच असतो. त्यामुळे या मुलींना चित्रामावशींचा भरपूर सहवास लाभतो. आपल्या तोंडी सहजी न रुळणारी अशी त्यांची वैचित्र्यपूर्ण नावं चित्राताईंच्या लक्षात राहतात ती केवळ उत्तम स्मरणशक्तीमुळे नाही, तर मुलींबद्दल त्यांच्या मनात असलेल्या जिव्हाळयामुळे. म्हणूनच त्यांच्याविषयी बोलताना चित्राताई अगदी सहज त्यांचा उल्लेख 'माझ्या मुली' असा करतात. काही मुलींचं मात्र त्यांनी पुन्हा बारसं केलं आहे....अगदी पौर्णिमा, प्राची, विमला, दीपाली अशी नावं देऊन. आता त्या मुलीही स्वत:चा परिचय करून देताना तीच नावं सांगतात, हे विशेष!


तडजोडीची तयारी

सध्या या छात्रावासात 44 मुली आहेत. अगदी प्राथमिक शाळेत जाणाऱ्या ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एवढी मोठी ही 'रेंज' आहे. अगदी लहान वयात इथे येणाऱ्या मुलींना सगळयाच गोष्टींशी जुळवून घ्यावं लागतं. चित्राताई म्हणाल्या, ''खाणंपिणं, भाषा, इथल्या चालीरिती, इथली संस्कृती... सुरुवातीला काही महिने त्यांना त्रास होतो, पण हळूहळू जुळवून घेतात. त्यांचं खाणं म्हणजे उकडलेल्या भाज्या आणि नॉनव्हेज - तेही उकडलेलं. आपल्याकडे मात्र मसालेदार भाज्या, शिवाय नॉनव्हेज नाही. पण या मुलींचा तो मूळ आहार असल्याने त्यांच्यासाठी मांसाहारी जेवण होणाऱ्या घरांतून कधीतरी आवर्जून व्यवस्था केली जाते.

पूर्वांचलात पहाटे 4 वाजताच उजाडतं...त्यामुळे तिथले लोक तेव्हा उठून सगळं आवरून, खाऊन साडेपाचला कामावर जाणं, मग कामावरून येऊन आंघोळ करणं, अशी त्यांची सवय. आणि आपण त्यांना सकाळी उठल्याउठल्या आधी आंघोळ करायला लावतो. इथल्या तुलनेत तिथे मुक्त-स्वच्छंद जीवनाची सवय. एखादा मुलगा आवडला तर त्याच्याबरोबर मुलगी सरळ निघून जाऊ शकते. इथे आपण पावलापावलाला, हे करू नको-ते करू नको, अशी बंधनं घालणार. अशा पूर्णपणे वेगळया जीवनशैलीशी - राहणीमानाशी जुळवून घेत, इथल्या नियमांच्या चौकटीत त्यांना स्वत:ला बसवावं लागतं.''

या मुली ईशान्येतल्या विविध प्रांतांतून आणि वीसेक जनजातीतून आलेल्या असतात. त्यांना केवळ इथल्या लोकांशीच नाही, तर परस्परांशीही जुळवून घ्यावं लागतं. यांच्यातल्या अनेक मुली अशा आहेत की ज्यांच्या घरात याआधी कोणी शिकलेलं नाही. त्यामुळे अभ्यासाचं महत्त्व कळणं, त्यासाठी स्वत:ला एका वेळापत्रकात बांधून घेणं हे जमायला वेळ लागतो. सुरुवातीच्या काळात 'करेंगे, हो जायेगा' अशी थोडी मानसिकता असते. पण हळूहळू चांगला बदल घडतो. या मुलींच्या शिक्षणाचं माध्यम मात्र इंग्रजीच ठेवावं लागतं. कारण, समजा, काही कारणाने एखादीवर शिक्षण अर्धवट सोडून घरी परतायची वेळ आली तर त्यांच्या इथे इंग्रजी माध्यमाला पर्याय नाहीये. त्याचाही विचार माध्यम निवडताना करावा लागतो. त्याचबरोबर त्यांच्या प्रगतीसाठी केवळ शाळेतल्या शिकवण्यावर अवलंबून राहता येत नाही. छात्रावासात त्यांच्यासाठी विशेष मार्गदर्शनाची सोय करावी लागते. वेगवेगळया विषयांचं मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांची - हौशी मंडळींची एक मोठी टीम मदत करते.

संगीत, नृत्य आणि खेळ...विशेष आवडीचे

संगीत आणि नृत्य तर त्यांच्यात उपजतच असतं. त्यातल्या एकीने अगदी अरंगेत्रमपर्यंत शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. त्याचबरोबर इथे त्यांना संगीत शिकवण्याचीही सोय करण्यात आली आहे. काही मुली तर मध्यमापर्यंत शिकल्या आहेत. मोनिका नावाच्या मुलीने गाण्यात इतकी चांगली प्रगती केली की खास प्रशिक्षणासाठी तिला एक महिना बकुळ पंडितांकडे ठेवलं होतं.

मैदानी खेळ हा त्यांच्या खास आवडीचा प्रांत. इथली प्रत्येक जण किमान दोन मैदानी खेळांत तरी तरबेज असतेच. तायक्वांडोचं प्रशिक्षण देण्याची सोय अहल्या मंदिरातच करण्यात आली आहे. आठवडयातून 3 दिवस त्यांना हे प्रशिक्षण देण्यात येतं. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या तायक्वांडो स्पर्धांसाठी यातल्या बहुतेकींची निवड झाली आहे.

गुरुपौर्णिमेचा कृतज्ञता सोहळा

या मुलींना अभ्यासापासून ते अभ्यासेतर विषय शिकवण्यासाठी अनेक जण वर्षभर येत असतात. त्यांना नाममात्र शुल्क किंवा कधीकधी फक्त प्रवासखर्च दिला जातो. या सगळया गुरूंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा! या दिवसाची विशेष तयारी केली जाते. मुलींनी स्वहस्ते बनवलेल्या वस्तू देऊन गुरुजनांचा सत्कार केला जातो. एखाद्या वर्षी चादरीवर भरतकाम करून किंवा पेंटिंग करून ती भेट दिली जाते, तर कधी सिरॅमिक पॉटवर पेंटिंग करून तो गुरुजनांना देण्यात येतो. पण गुरूंना द्यायची वस्तू मुलींनी केलेली असेल यावर कटाक्ष असतो.

संस्कृती-परंपरेची ओळख करून देणारे उपक्रम

महाराष्ट्रातल्या प्रमुख सण-उत्सवांची, आपल्या परंपरांची ओळख व्हावी यासाठी अनेक उपक्रम योजले जातात. याविषयी माहिती देताना चित्राताई म्हणाल्या, ''शालेय सत्र सुरू झाल्यानंतर भारतमाता पूजनाचा कार्यक्रम केला जातो. सत्यनारायणाच्या पोथीसारखी त्याची पोथी आहे. पाच-पाच मुलींच्या गटाने भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येतं. एका वर्षी इथे राहणाऱ्या सगळया मुलींकडून सत्यनारायणाची पूजा करून घेतली होती. पौरोहित्य वर्गात येणाऱ्या मावश्यांनी त्यांच्याकडून यथास्थित पूजा करवून घेतली. एका वर्षी सगळयांना दीप देऊन त्यांच्याकडून दीपपूजन करवून घेतलं होतं.

छात्रावासातला गणेशोत्सव तर खूप दणक्यात साजरा होतो. गणपतीची शाडूची मूर्ती याच मुलींनी तयार केलेली आहे. पूर्ण दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची इथे रेलचेल असते.''

संगणक ते स्वयंपाक...सर्व काही!

आजच्या युगाचं प्रतीक असलेला संगणक जसा त्यांचा दोस्त व्हायला हवा, तशी स्वयंपाकघरातल्या कामाशीही त्यांची ओळख असायला हवी, याकडे कटाक्ष असतो. छात्रावासातला स्वयंपाक सगळया जणी मिळून करतात. स्वत:ची ताटवाटी घासून ठेवायची असा नियम आहे. यातूनच श्रमप्रतिष्ठा रुजायलाही मदत होते.

सुट्टयांच्या काळात आपल्या घरातल्या मुलांना जसं वेगवेगळया छंदवर्गांना पाठवलं जातं, तसं या मुलींनाही पाठवण्यात येतं. दर दोन वर्षांनी त्यांना आपल्या घरी जायला मिळतं. त्यामुळे सुट्टीचा खूप मोकळा वेळ हातात असतो, तो सत्कारणी लागावा म्हणून प्रत्येकीची आवड लक्षात घेऊन त्यांच्या छंदांना प्रोत्साहन दिलं जातं. काही जणी भोसला मिलिटरी स्कूलच्या शिबिरांना जातात, तर काही पेंटिंग-हस्तकौशल्याच्या वर्गांना प्रवेश घेतात. पोहायला तर बहुतेक सर्व जणी शिकल्या आहेत.

बसोली ही विविध कलांचं प्रशिक्षण देणारी नागपुरातील एक प्रख्यात संस्था आहे. ती दरवर्षी उन्हाळी सुट्टीत विविध छंदवर्गांचं आयोजन करते. त्यात छात्रावासातल्या मुलीही सहभागी होतात. यंदा या संस्थेनं पु.लं.नी मराठीत अनुवादित केलेल्या रवींद्रनाथांच्या गाण्यांचा कार्यक्रम बसवला होता. त्यात छात्रावासातल्या खसरंती या मुलीनं 6 मराठी गाणी सादर केली.

चांगल्या कामासाठी दात्यांची कमतरता नाही

छात्रावास हा नि:शुल्क आहे. त्यांना शालेय शिक्षणाव्यतिरिक्तच्या गोष्टी शिकवण्याचंही शुल्क आकारलं जात नाही. 'आजच्या महागाईच्या दिवसांत हे अवघड नसतं का?' या प्रश्नावर वं. प्रमिलाताई म्हणाल्या,''मला असं वाटतं, काम चांगलं असेल तर पैसा ही कधी अडचण नसते. आपण या कामासाठी सरकारकडून एकही पैसा घेत नाही, अगदी एन.डी.ए.च्या काळातही घेतला नाही. लोकांना काम दिसलं तर लोक पैसे देतात. आपल्या मुलींमधे होणारं परिवर्तन, त्यांचा व्यवहार, वेगवेगळया क्षेत्रात त्यांनी मिळवलेलं यश हे दिसतं लोकांना...मग आपणहून आर्थिक मदत येते. समाजाचं काम आहे, तर समाजाने मदत केली पाहिजे. एखाद वेळी अडचण आलीच तर, कुठून तरी अचानक मदतीचा हात येतो आणि अडचण दूर होते. ईश्वरी कृपा याहून काय वेगळी असते?''


ईशान्येच्या दीपज्योती...

यंदा या छात्रावासाला 25 वर्षं पूर्ण होताहेत. त्यानिमित्ताने डिसेंबरमधे या सगळया मुलींच्या एकत्रीकरणाचा मोठा कार्यक्रम होणार आहे. ज्या हेतूने या मुलींना महाराष्ट्रात आणलं गेलं, तो हेतू साध्य होताना दिसतो आहे. आणि याची सुरुवात काही वर्षांपूर्वीच झाली आहे. आपण उच्चशिक्षण घ्यावं आणि ज्ञानाचा हा वसा आपल्या बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या गावी परतावं, ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजली आहे. पसिले जेनिया नावाची मुलगी या छात्रावासात होती, तिने इथे एम.पी.एड. पूर्ण केलं. आज ती विद्याभारतीच्या एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करते. एवढंच नाही, तर तिथलं लोकदैवत असलेल्या राणीमाँ गायदेन्ल्यूवर तिने संशोधनात्मक पुस्तक लिहिलं आहे. राणीमाँवर नागा भाषेत लिहिलं गेलेलं ते पहिलं पुस्तक. याबरोबरच त्यांच्या भाषेतल्या लोककथांचं संकलन करून त्याचंही पुस्तक तिने प्रकाशित केलं आहे. तिच्या या सगळया कामाबद्दल तिला युवा ओजस्विनी पुरस्कार मिळाला आहे.

अगोई ही इथे शिकलेली मुलगी आज पूर्वांचलात विद्याभारतीच्या एका शाळेची मुख्याध्यापिका आहे, तर मालती ही आज तिथल्या कॉलेजमध्ये हिंदीची लेक्चरर आहे. मंदिरा ही छात्रावासातील विद्यार्थिनी आता पूर्वांचलात समितीची प्रचारिका आहे.

या पूर्वसुरींच्या पावलावर पाऊल टाकत, शालेय शिक्षणात उत्तम कामगिरी करत आजच्या मुलींची वाटचाल सुरू आहे. बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, एल.एल.बी., एम.एस.डब्ल्यू. असे वेगवेगळे कोर्सेस आज त्या निवडताहेत. काही जणी शिक्षिका होण्याची स्वप्नं पाहताहेत, तर काही अन्य नोकरीची... काही कदाचित स्वत:चा व्यवसाय सुरू करतील. एक नक्की की, स्वत:ची भौतिक प्रगती साधतानाच त्यांना आपल्या पूर्वांचलालाही समृध्द करायचं आहे. आपल्या हाती असलेल्या ज्ञानदिव्याने ही 'पूर्वा' उजळायची आहे. निसर्गसौंदर्याने समृध्द असलेली आपली भूमी ज्ञानसमृध्द करायची आहे. त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरूही झाली आहे.

9594961865