ऑॅपरेशन बेटी उठाओ 'डाव्यांच्या बौध्दिक दिवाळखोरीचे प्रतीक

विवेक मराठी    06-Aug-2016
Total Views |

नुकताच आउटलुक साप्ताहिकात प्रकाशित झालेला 'ऑपरेशन बेबीलिफ्ट' हा लेख या साप्ताहिकाच्या, संबंधित पत्रकाराच्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवतो. राष्ट्र सेविका समितीच्या, वनवासी कन्या छात्रावास या उपक्रमांतर्गत 1987 सालापासून ईशान्येकडील राज्यातील मुली शिक्षणासाठी महाराष्ट्रासह भारतातल्या काही राज्यांत आणल्या जात आहेत. अत्यंत निर्मळ भावनेने सुरू असलेल्या एका कामाची इतक्या वाईट शब्दात हेटाळणी का करण्यात आली असेल? या प्रश्नाची उत्तरे अनेक आहेत. पण त्यातील काही प्रमुख कारणांचा आपण मागोवा घेऊ.


भारतातील डाव्या विचारसरणीचे पत्रकार, विचारवंत अतिशय मजेशीर आहेत. प्रत्येक बाबतीत 'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कारटा' हे सूत्र डावे बिनधास्तपणे वापरतात. डाव्या संघटनांनी भारताच्या 'रेड कॉरिडॉर'मध्ये चालवलेला निर्लज्ज रक्तपात म्हणजे क्रांती आणि भारतीय सैनिक डाव्या रक्तपाताच्या विरोधात कारवाई करतात ते मात्र दमन! आणि राष्ट्रवादी संघटना शिक्षणासाठी जर कुणाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेत असतील तर ते 'Trafficking'!

दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या, डाव्या विचारसरणीच्या एका इंग्लिश साप्ताहिकाने त्यांच्या नुकत्याच प्रकाशित अंकात राष्ट्र सेविका समिती, विद्या भारती आणि सेवा भारती या संघसंबंधित संस्थांवर आसाममधील बालिकांचे शैक्षणिक कारणासाठी Trafficking करीत असल्याचा आरोप केला. ढीगभर संदर्भ देऊन हे काम कसे बेकायदेशीर, अनैतिक आहे ते ठरवण्याचा प्रयत्न केला. या पत्रिकेची तथाकथित संशोधिका व लेखिका या कामासाठी गेली कित्येक महिने आसाममध्ये तळ ठोकून बसली होती. आणि या महान संशोधनातून तिच्याकडे 12,350 पानांचे पुरावे जमा झाले, असे या पत्रिकेचे म्हणणे आहे. शैक्षणिक कारणासाठी नेल्या जाणाऱ्या बालिकांच्या बाबतीत Trafficking हा शब्द वापरून पत्रिकेने जी बौध्दिक दिवाळखोरी प्रदर्शित केली, त्याला खरोखरच तोड नाही!

'ऑॅपरेशन बेटी उठाओ' विशेषांक प्रकाशित झाल्यानंतर दोन्ही बाजूनी प्रतिक्रियांचा पाऊस पडला. सोशल मीडियावर वादळ निर्माण झाले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आसामच्या बाहेर राहून शिक्षण घेतलेल्या आणि घेणाऱ्या सर्व आजी/ माजी विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.

आता प्रश्न निर्माण होतो तो असा - अत्यंत निर्मळ भावनेने सुरू असलेल्या एका कामाची इतक्या वाईट शब्दात हेटाळणी का करण्यात आली असेल? या प्रश्नाची उत्तरे अनेक आहेत. पण त्यातील काही प्रमुख कारणांचा आपण मागोवा घेऊ.

सेवा भारती आणि अन्य सेवा कार्यांचा विस्तार

अनेक प्रकारच्या संकटांचा, सशस्त्र विरोधाचा सामना करून आणि अनेक प्रचारकांच्या, कार्यकर्त्यांच्या हत्यांची पर्वा न करता आसामसह अन्य सहा राज्यांमध्ये गेली सत्तर वर्षे संघ आणि सहयोगी संघटना घाम गाळत आहेत. त्यात आसाममध्ये अतिरेकी संघटना ULFAचा जोर ओसरू लागल्यावर संघाचा वेग आपोआप वाढला. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष संघकामाला विरोध असल्यामुळे सेवा भारतीच्या माध्यमातून प्रवेश झाला. बघता बघता सात राज्यांमध्ये संघ आणि सहयोगी संस्था यांची सुमारे 12,000 सेवा केंद्रे उभी राहिली. यात एकटया सेवा भारतीच्या 6,000 सेवा केंद्रांचा समावेश आहे. आरोग्य, प्राथमिक उपचार, दुर्गम भागात एकल विद्यालये, रोजगार प्रशिक्षण, महिला सबलीकरण, प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती अशा अनेक क्षेत्रांत ही सेवा केंद्रे कार्यरत आहेत.

पण याही पुढे जाऊन सेवा भारतीचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आसामच्या पाचवीला पुजलेला जो महापूर - दर वर्षी कमीत कमी एकदा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा येतो - त्या काळात केली जाणारी मदतकार्ये! सेवा भारतीचे डॉक्टर आणि प्रशिक्षित कार्यकर्ते अन्न, औषधे, प्राथमिक उपचाराचे साहित्य, कपडे आणि अन्य शेकडो प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू घेऊन पूरग्रस्त भागात दाखल होतात. गुवाहाटीहून या पूरग्रस्त मदत मोहिमेचे अत्यंत सुसूत्र संचालन केले जाते. प्रदीर्घ पावसाळा सुरू होऊन तो संपेपर्यंत येथे सेवा भारतीची मदत पथके सदैव तत्पर आणि तैनात असतात व आवश्यक त्या ठिकाणी ती तत्काळ पोहोचत असतात.


नैसर्गिक आपत्तीच्या काळात ख्रिश्चन मिशनरी मदतकार्यापेक्षा  धर्मप्रचाराचे साहित्य प्रामुख्याने घेऊन जात असतात. स्वाभाविकच सेवा भारतीमुळे त्यांचा प्रभावी बंदोबस्त झाला आणि ते दुखावले गेले.

कार्बी-दिमासा संघर्षाच्या वेळीचे मदतकार्य

आसामच्या कार्बी आन्गलोंग जिल्ह्यामध्ये कार्बी आणि दिमासा या दोन हिंदू जनजाती (Tribes) राहतात. यांच्या चारी बाजूंनी ख्रिश्चन जनजाती पसरलेल्या आहेत. अनेक वर्षांच्या प्रयत्नांमधूनही या दोन्ही जाती ख्रिश्चन होऊ शकल्या नाहीत, म्हणून एक अतिशय भयानक योजना आखून NSCN-IM या नागा अतिरेकी संघटनेने एका कार्बी गावावर हल्ला करून अनेक कार्बी गावकऱ्यांची हत्या केली. या हत्याकांडाचे पाप दिमासा लोकांवर घातले गेले आणि हजारो वर्षे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या या दोन हिंदू जातींमध्ये आपापसात खुनी संघर्ष सुरू झाला. यामुळे दोन्ही बाजूंच्या सुमारे 60 ते 70 हजार लोकांना विस्थापित व्हावे लागले. मूळ योजनेनुसार विस्थापित शिबिरांमध्ये ख्रिश्चन मदत पथके पोहोचणे अपेक्षित होते, परंतु सेवा भारतीच्या तत्परतेमुळे ख्रिश्चन मदत पथके निराश होऊन परत गेली. कार्बी-दिमासा समाजात निर्माण झालेली अविश्वासाची दरी दूर करण्यासाठी कल्याण आश्रमाने खूप मोठी भूमिका बजावली आणि दोन्ही समाज पुन्हा गुण्यागोविंदाने एकत्र आले. ख्रिश्चन संघटनांसाठी हा खूप मोठा धक्का होता. तेव्हापासून सेवा भारती त्यांच्या डोळयात सलत होती.

विद्या भारतीचा विस्तार

विद्या भारतीचे सगळयात मोठे शैक्षणिक जाळे आसाममध्ये आहे. उत्तर-पूर्वांचलाच्या सात राज्यात विद्या भारती एकूण 600 शाळा चालवते. त्यापैकी 500 शाळा एकटया आसाममध्ये आहेत. मिशनरी शैक्षणिक संस्थांच्या तुलनेत ही संख्या नगण्य आहे, पण आसामसारख्या सर्वात मोठया राज्यात विद्या भारतीने स्वत:चा एक ब्रँड चांगला विकसित केला. त्यामुळे अन्य सहा राज्यांतही संस्था वेगाने पसरत आहे. त्यात या वर्षी एक आश्चर्यकारक घटना घडली. संपूर्ण आसाममध्ये दहावीच्या परीक्षेत एक मुस्लीम मुलगा पहिला आला आणि तो गुवाहाटीच्या बेटकुची विद्या भारती शाळेचा विद्यार्थी होता. त्याने आणि त्याच्या पालकांनी विद्या भारती शाळेचे माध्यमांमध्ये खूप कौतुक केले. अशा अनेक कारणांमुळे विद्या भारती निशाण्यावर येणे स्वाभाविक होते!


राष्ट्र सेविका समितीचा विस्तार

आसामसह सर्व सात राज्यांतील हिंदू जाती-जनजातींमध्ये समितीच्या थेट शाखा किंवा संपर्क आहे. उत्तर पूर्वांचलात महिलेला समाजात मानाचे स्थान आहे आणि अनेक जाती मातृसत्ताक आहेत. अशा परिस्थितीत समिती इथे न पोहोचती तरच नवल! अर्थात सुरुवातीचा काळ समितीसाठी खूप कठीण गेला, पण आता समितीचा विस्तार खूपच मोठा आहे.

आसाममधील सत्तांतर आणि भाजपा उदय

याच वर्षी मे महिन्यात आसाममध्ये सत्तांतर होऊन भाजपाचे सरकार आले. उत्तर-पूर्वेत हे निवडून आलेले प्रथम भाजपा सरकार आहे. आसाम हे जम्मू-काश्मीरनंतर मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक दोनचे राज्य आहे. आता मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक एक आणि दोनची राज्ये भाजपाच्या हातात आहेत. या भाजपा विजयानंतर माध्यमे, पत्रकार, विचारवंत यांनी संघ आणि संघसंबंधित संस्थांच्या कामाचा भाजपाच्या विजयात असलेला मोठा वाटा गौरवाने सतत अधोरेखित केला आणि बरोबर त्याच दिवशी या संस्था डाव्या पत्रकारांच्या रडारवर आल्या.

दुसरी गोष्ट अशी की आसाममधील अत्यंत ताकदवान अशी मुस्लीम मतपेढी हिंदू मतांच्या भाजपाच्या बाजूला झालेल्या ध्रुवीकरणामुळे पूर्णपणे निष्प्रभ ठरली. त्यामुळे संघसंबंधित संस्थांना गलिच्छ आरोपात अडकवणे ही डाव्यांची व्यावसायिक गरज (Professional Compulsion) बनली. त्यातूनच 'ऑॅपरेशन बेटी उठाओ'चा जन्म झाला.

डाव्यांचे बंदूकप्रेम आणि जातीयवादी मानसिकता

डाव्या विचारसरणीच्या नक्षली आणि माओवादी संघटनांचा जबरदस्त प्रभाव असलेल्या दक्षिण आणि पूर्व भारताच्या प्रदेशाला 'रेड कॉरिडॉर' म्हणतात. भारताची सर्वात जास्त नैसर्गिक साधनसंपत्ती असलेला आणि त्याच वेळी सर्वात जास्त मागासलेला असा हा भाग आहे. डाव्या सशस्त्र नक्षलींनी या भागातील शाळांवर सर्वाधिक हल्ले केले आहेत. शिक्षणाला डाव्या विचारसरणीचा कायमच विरोध राहिलेला आहे. त्यांना नेहमी उच्चशिक्षित नेते आणि अशिक्षित अनुयायी हीच रचना आवडते. अनुयायी अशिक्षित राहिले की ते नेत्याला प्रश्न विचारीत नाहीत, असा त्यांचा कयास असावा!

शिवाय, डावे पराकोटीचे जातीयवादी असल्याने ते जनजातीय (Tribal) तरुण-तरुणीला सुशिक्षित झालेले बघू शकत नाहीत. त्यांना जनजातीय तरुणाच्या एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात बाँब हेच बघणे जास्त आवडते. त्यामुळे आसाममधील बोडो, कार्बी, कोच, दिमासा, राभा, कचारी, नागा, हजोंग, आदि, न्यीशी, अपातानी आणि अन्य शेकडो जातीजमाती शिकल्या की त्यांचा पोटशूळ उठतो. त्यातूनच त्यांच्या शिक्षणात बाधा निर्माण करण्याचे उपद्वयाप त्यांना सुचत राहतात.

गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात राहून शिकणारा मेघालयातील एक विद्यार्थी वैष्णव के. रोंजा याने संबंधित साप्ताहिकाला लिहिलेल्या पत्रात याच भावना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केल्या आहेत. (https://t.co/io2LWEcFMz).


'ऑपरेशन बेटी उठाओ'चा निष्कर्ष

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून डाव्या पक्षांची घुसमट लपून राहिलेली नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात डाव्यांवर कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड आणि नामवंत संस्थांवरून होत असलेली हकालपट्टी यामुळे संतापलेले डावे आता मिळेल त्या मार्गाने भाजपा-संघाला झोडपण्याच्या प्रयत्नात आहेत. सर्वप्रथम FTIIच्या प्रमुखपदाच्या नियुक्तीच्या निमित्ताने त्यांनी मोठे आंदोलन उभे केले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही, उलट FTIIमध्ये शिकणारे बारा-पंधरा वर्षांपासून तथाकथित शिक्षण घेत असलेले 35-40 वर्षे वयाचे घोडनवरे विद्यार्थी पाहून आंदोलनकर्त्यांचीच पुरती बेअब्रू झाली. त्यानंतर मिळेल तेव्हा, मिळेल तिथे बेरोजगार कंपू निमित्त शोधत फिरत आहे.

याहूनही मोठे कट रचले जातील. कारण भाजपाला पराभूत करायचे असेल, तर संघाला बदनाम करावे लागेल, हे सूत्र त्यांना पक्के माहीत झालेय.

थोडक्यात काय - सावधान! रात्र वैऱ्याची आहे!

 

 गुवाहाटी इथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर

मिझोराममधील एका युवतीची प्रतिक्रिया

मी मूळची मिझोरामची. राष्ट्र सेविका समितीच्या नागपूरच्या वसतिगृहात माझं शिक्षण पूर्ण झालं. समितीच्या प्रचारिकांच्या मदतीनेच मी हे सगळं करू शकले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच मी स्वतः आज मिझोराममध्ये महिलांसाठी संघमित्रा ट्रस्ट सुरू केलं आहे. केवळ मीच नाही, पूर्वांचलातल्या अनेक जणी अशाच पध्दतीने शिक्षण घेऊन आज स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. आउटलुक साप्ताहिकाच्या लेखात नेहा दीक्षित यांनी समितीच्या कार्यावर उगाच ठपका ठेवला आहे. आमच्या भल्यासाठी जे जे शक्य होतं, ते सगळं राष्ट्र सेविका समितीच्या कार्यकर्त्यांनी केलं - अभ्यास घेण्यापासून ते परीक्षेच्या वेळी आमच्यासोबत जागण्यापर्यंत सगळंच. त्यामुळे या आरोपात अजिबात तथ्य नाही.

 

9260241469