सामूहिक शक्तीचा आविष्कार

विवेक मराठी    08-Aug-2016
Total Views |

'जलयुक्त लातूर - सर्वांसाठी पाणी' या स्वतंत्र चळवळीची, संस्थेची स्थापना झाली. या स्थापनेनंतर अवघ्या चार दिवसांत - म्हणजे आठ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते या कामाचा शुभारंभही झाला. त्याच दिवशी जनकल्याण समितीने 11 लाख रुपयांचा धनादेशही दिला. त्यामुळे या कामाला गती आली. आर्ट ऑॅफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी सर्व तांत्रिक बाजू सांभाळली. कामासाठी समाजाच्या दृष्टीने लौकिकदृष्टया अत्यंत लहानात लहान माणसापासून कोटयधीशापर्यंत अनेकांनी सहकार्य केले, सढळ हस्ते देणग्या दिल्या. हे काम करताना विविध विचारांचे, विविध प्रवृत्तींचे असे सारे एकत्र आले होते.


राठीत एक म्हण आहे - गाव करील ते राव काय करील?.. राज्यभर लोकसहभागातून जलयुक्त शिवार ही मोहीम राबविताना अनेकांना या म्हणीचा प्रत्यय येत आहे. याबाबत थोडा वेगळा विचार केला, तर हेतू शुध्द असला तर पाणी समाज एकत्र आणते आणि हेतू शुध्द नसला तर पाणी एक गाव एक पाणवठा या चांगल्या योजनेतसुध्दा गावात दुही निर्माण करू शकते, असाही समाजाचा अनुभव आहे.

 लातूर जिल्ह्याला गेल्या उन्हाळयात पाणीटंचाईचा 'न भूतो' असा त्रास सहन करावा लागला. लातूर शहरासाठी तर रेल्वेने पाणी आणावे लागले. सरकारने योग्य वेळी निर्णय घेऊन रेल्वेचा प्रयोग केला असला, तरी सरकारने लातूरच्या पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेतलाच असे म्हणणे योग्य ठरणार नाही. आजही लातूरचा पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा यासाठी सरकार वरिष्ठ आणि सनदी अधिकाऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून आहे.  गावपातळीवर काम करणाऱ्यांशी संपर्क नसल्यामुळे कमी खर्चात मुबलक पाणी देण्याचे श्रेय घेण्यात भाजपाचे सरकार कमी पडत आहे.

जे काही करायचे ते सरकारने, अशी सरकारला आणि सरकारी योजनांचा लळा लागलेल्या लातूरकरांना सवय जडली होती. त्यामुळेही अनेक प्रश्न जटिल बनत गेले. पाण्याच्या विषयात मात्र सगळेच उघडे पडले. त्यामुळे सरकार या संस्थेशिवाय आपणही काही करू शकतो, या विचाराला प्रत्यक्षात बळ मिळाले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सक्रिय पाठिंब्याने आणि डॉ. अशोकराव कुकडे यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे.

मांजरा नदीचे खोलीकरण, रुंदीकरण करावे यासाठी रा.स्व. संघाचे कार्यकर्ते शिवदास मिटकरी, सुनील देशपांडे आणि आर्ट ऑॅफ लिव्हिंगचे मकरंद जाधव, महादेव गोमारे हे फेब्रुवारी महिन्यापासून तयारी करीत होते. त्यांनी मांजरा नदीच्या खोलीकरणासाठीचा तांत्रिक अभ्यास, लातूरला लागणाऱ्या पाण्याचा अभ्यास केला होता व त्यासाठी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचीही भेट घेतली होती, हा इतिहास फार कमी लोकांना माहीत आहे.

चार एप्रिलला चार-पाच जणांनी एक व्यापक बैठक बोलाविली आणि मग 'जलयुक्त लातूर - सर्वांसाठी पाणी' या स्वतंत्र चळवळीची, संस्थेची स्थापना झाली. या स्थापनेनंतर अवघ्या चार दिवसांत - म्हणजे आठ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते या कामाचा शुभारंभही झाला. त्याच दिवशी जनकल्याण समितीने 11 लाख रुपयांचा धनादेशही दिला. त्यामुळे या कामाला गती आली. आर्ट ऑॅफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी सर्व तांत्रिक बाजू सांभाळली. त्यामुळे रणांगणावरचे सैन्य अशी त्यांची स्थिती झाली. परंतु युध्दसामग्रीसाठी लागणारी रसद पुरविणारे आणि समाजमनाला विश्वास देण्याचे काम करणारे शेकडो हात होते, याचा उल्लेख केला नाही, तर तो कृतघ्नपणा ठरेल.

या कामासाठी समाजाच्या दृष्टीने लौकिकदृष्टया अत्यंत लहानात लहान माणसापासून कोटयधीशापर्यंत अनेकांनी सहकार्य केले, सढळ हस्ते देणग्या दिल्या. हे काम करताना विविध विचारांचे, विविध प्रवृत्तींचे, सत्ता ज्यांनी पाहिली आणि ज्यांना सत्तेची ओळखसुध्दा नाही, असेल तर तो सत्तेशी संघर्ष असाच राजकीय, सामाजिक प्रवास असणारे सारे एकत्र आले होते. ज्यांचा उल्लेख केलाच पाहिजे, ते मार्गदर्शक मंडळातील ऍड. त्र्यंबकदास झंवर, समाजवादी नेते ऍड. मनोहरराव गोमारे, वैधानिक मंडळाचे सदस्य बी.बी. ठोंबरे, उद्योजक निलेश ठक्कर, शिवदास मिटकरी, मकरंद जाधव आणि पडद्यामागे राहून आठ किंवा त्याहीपेक्षा जास्त तास काम करणारे जनकल्याण समितीचे प्रांत सहकार्यवाह अरुण डंके, प्राचार्य जोगेंद्रसिंह बिसेन, विशाल अग्रवाल, असे अनेक लोक आहेत, जे कुठेही पदाधिकारी नाहीत, परंतु ज्यांनी शेतकरी आणि समितीच्या समन्वयाचे काम केले, ते माजी आमदार वैजनाथराव शिंदे असतील... यांच्या मेहनतीला तोड नाही. रविवारी जेव्हा मांजरेला पाणी आले, ते पाहताना या मंडळींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. हे सारे काम म्हणजे समाजाच्या पुरुषार्थाचे यथार्थ दर्शन होते, जे देशाला मार्गदर्शक ठरत आहे.

लातूर जिल्ह्याने लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामाचा आदर्श निर्माण केला आहे. त्याला फूल नाही तर फुलाची पाकळी या स्वरूपात रा.स्व. संघ जनकल्याण समितीने लातूर, उदगीर, रेणापूर तालुक्यांतील खरोळा इथल्या कामांना आर्थिक मदत केली आहे. निलंगा तालुक्यातील औराद, उदगीर तालुक्यातील रामचंद्र तिरुकेचे सताळा, अहमदपूर तालुक्याचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांचे सताळ या ठिकाणी, निलंगा आणि औसा या तालुक्यात माजी आमदार पाशा पटेल यांनी खासदार संजय काकडे यांच्या निधी आणि लोकसहभागातून केलेल्या जलयुक्त शिवाराच्या कामांच्या ठिकाणी, विविध ठिकाणी नाम फाउंडेशन, रोटरी क्लब, विविध संस्था यांनी केलेल्या कामांच्या ठिकाणी आता पाणी साठू लागले आहे.

समाजातील स्वयंसेवी वृत्तीच्या लोकांनी पुढाकार घेऊन सर्व अभिनिवेश बाजूला ठेवून समाजासाठी केलेला हा भगीरथ प्रयत्न आहे. या भगीरथ प्रयत्नातून जे पाणी साठले आहे, ते पाणी प्रथम पिण्यासाठी वापरले जाईल, यासाठी दक्षता घेण्याची गरज ही स्थानिक प्रशासनाची आहे. तसेच हे पाणी काटकसरीने वापरण्याची खबरदारी जनतेने घेतली पाहिजे. मी उसापेक्षा पिण्याच्या पाण्याला महत्त्व देईन असा शेतकऱ्यांनी निर्धार केला पाहिजे. अन्यथा पुन्हा 'आलू सुगी, फुगले गाल, सुगी संपले, पुन्हा तेच हाल' या म्हणीसारखी अवस्था होईल.

समाजाच्या या प्रयत्नाबद्दल, यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व 'जलयुक्त लातूर - सर्वांसाठी पाणी' या चळवळीचे मार्गदर्शक डॉ. अशोकराव कुकडे यांनी खूप मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. डॉ. अशोकराव कुकडे म्हणतात, ''जलयुक्त मोहिमेत लोकांनी प्रश्न हाताळण्याचे ठरविले, संघटन उभे केले, तर उत्तम प्रतिसाद मिळून अपेक्षित यश प्राप्त होते. विविध विचारधारा असणारे, विविध सामाजिक संघटनांशी संबंध असलेले असे लोक तळमळीने एका सामाजिक उद्दिष्टासाठी एकत्र आले, तर उत्तम यश मिळू शकते. 'ऑॅफ द पीपल, बाय द पीपल ऍंड फॉर द पीपल' या विख्यात इंग्लिश वक्तव्याचे भारतातील हे दर्शन आहे. आणि हे तात्कालिक न होता नेहमीच्या समाजजीवनात अवलंबिले, तर आपली लोकशाही खऱ्या अर्थाने समर्थ आणि समृध्द होईल.''

9422071169