शिस्तीचा मानदंड

विवेक मराठी    08-Aug-2016
Total Views |

सुरेशरावांना माणसांची पारख होती. संस्थाजीवनात संचालक, सेवक, स्वयंसेवक यांचा व्यवहार कसा असावा याविषयी ते नेहमी स्पष्ट, अचूक, परखड मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाण्याचा विचारही कार्यकर्ते करू शकत नसत, अशी त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती!


दो
न-तीन दिवस सतत मनात येत होते, 'सुरेशरावांना भेटायला जायला पाहिजे.' त्यामुळे 16 तारखेला सकाळी अनिल बवर्ेंच्या गाडीतून आम्ही दोघे निघालो. भिगवणपर्यंत पोहोचलो आणि उदय लातुरेंचा फोन आला, ''संजयदादा, सुरेशराव गेले!'' मन सुन्न झाले! शेकडो प्रसंग, अनंत आठवणी मनात दाटून आल्या.

1965 साली आम्ही सोलापुरात गेलो. मी पाचवीत होतो. विजयराव कापरे शहर प्रचारक आणि सुरेशराव जिल्हा प्रचारक. संघकार्यालय वेगळे नव्हतेच. त्यामुळे सुरेशराव आमच्या घरीच राहत. तेव्हापासून गेल्या पन्नास वर्षांचा सहवास संपला.

सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर या विभागांचे ते विभाग प्रचारक होते. संघकार्यासोबत जेव्हा 'सेवाकार्य' ही परिवारात संकल्पना नव्हती, तेव्हा सुरेशरावांनी द्रष्टेपणाने या विभागात असंख्य संस्थांच्या निर्मितीस प्रेरणा दिली.

सोलापुरात सोलापूर जनता सहकारी बँक, शिवस्मारक, काका महाजनी विश्वस्त मंडळ, लातुरात विवेकानंद रुग्णालय, अंबाजोगाईत भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ अशा अनेक संस्थांची निर्मिती त्यांनी केली. इतकेच नाही, तर या संस्था नावारूपाला येईपर्यंत त्यांनी त्यांच्या कारभारावर कडक शिस्तीचे संस्कार देत मार्गदर्शनही केले.

दैनंदिन संघकामात शारीरिक विभागात 'शिस्तीचा मानदंड' निर्माण करीत असतानाच त्यांनी अनेक संस्थांची निर्मिती केली. इतकेच नाही, तर महाराष्ट्रातील अनेक परिवारांमध्ये त्यांनी आपुलकीने, प्रेमाने, सलगीने, व्यवहाराने स्वत:चे एक अढळ स्थान निर्माण केले. माझ्या माहितीतील, संघाच्या एका अधिकाऱ्याने आपल्या मृत्युपत्रात लिहिले, 'माझ्या पश्चात घरातील सर्व महत्त्वाचे, मोठे निर्णय सुरेशरावांना विचारून, त्यांच्या सल्ल्याने करावेत. भविष्यकाळात जर परिवारात संघर्षाचे, मतभेदाचे प्रसंग आले, तर त्या वेळी सुरेशरावांचा निर्णय अंतिम मानावा.' 


1971-1972 साली मी प्रथम-द्वितीय वर्षासाठी भावे हायस्कूल, पुणे येथील संघ शिक्षा वर्गात होतो. तेव्हा वर्ग 30 दिवसांचा आणि विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्राचा एकत्र होता. साधारण 500-600 संख्या असायची. सुरेशराव मुख्य शिक्षक असायचे. पहाटे 3-3.30 वाजता उठून, आंघोळ-आन्हिके आवरून, सकाळी 5.30 वाजता सुरेशराव 'शिक्षकवर्ग' घेण्यासाठी एस.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर हजर असत. रात्री झोपायला किमान 11.30 वाजायचे! हे एक-दोन दिवस नाही, तर सलग 30 दिवस चाले. इतक्या व्यग्र आणि कठोर दिनक्रमामध्ये रोजचे 108 सूर्यनमस्कार कधी चुकले नाहीत.

ते स्वत:च्या दिनक्रमाबाबत आणि संघकार्याविषयी अत्यंत कठोर असत. मुंबईला नाना पालकर स्मृती कार्यालयात मला त्यांच्यासोबत राहण्याचा योग आला. तेव्हा ते महाराष्ट्र प्रांताचे शारीरिक शिक्षण प्रमुख होते. एकदा ते आजारी पडले. तपासणी केल्यावर ध्यानात आले की कावीळ झाली आहे. डॉक्टरांकडे जाऊन आम्ही परत आलो आणि ते बॅग भरू लागले. मी ''काय करताय?''असे विचारल्यावर म्हणाले, ''दुपारी नांदेडला जायचे आहे. प्रवास ठरलेला आहे. तेवढा 8 दिवसांचा मराठवाडयाचा प्रवास पूर्ण करून येतो, मग झोपतो.'' आम्ही खूप समजावले. नाही म्हणालो, तरी त्यांचा निर्णय बदलेना. शेवटी दादरचे मा. संघचालक प्रमोदजी वैद्य यांना फोन करून बोलावून घेतले. सुरेशराव त्यांचा शब्द मोडत नसत. प्रमोदजींनी त्यांची भरलेली बॅग उचलली आणि म्हणाले, ''सुरेशराव, कावीळ बरी होईपर्यंत माझ्या घरीच मराठवाडयाचा प्रवास!'' तेव्हा अगदी नाइलाजास्तव त्यांनी विश्रांती घेतली.

मुंबईत दादरला निवासाला असताना ते सायनला अरविंदराव खरेंकडे चालत जात असत. आम्ही कोणीही 'गाडीने सोडतो' म्हटले तर त्यांचं उत्तर तयार असे, ''अरे, चालत जाताना बौध्दिक वर्गाचा एखादा विषय तयार होतो.'' हे अनाकलनीय लॉजिक पुणे स्टेशन ते मोतीबाग या मार्गावरही असायचे.

स्वत:च्या दिनक्रमाविषयी, संघस्थानावर अत्यंत शिस्तबध्द आणि कठोर असलेले सुरेशराव कार्यकर्त्यांशी संबंध ठेवताना अत्यंत प्रेमळ आणि आत्मीयतेने वागत. माया परांजपे या कार्यकर्तीचा हात मोडला. सुरेशराव तेव्हा चिकुनगुनियामुळे प्रचंड आजारी होते. त्यांना चालताना खूप त्रास होत होता. त्याही स्थितीत मला म्हणाले, ''मायाचा हात मोडलाय. तिच्या घरी जायचंय.'' त्यांच्या इच्छेपुढे इलाज नव्हता. मोतीबागेत गाडी घेऊन गेलो. त्यांना पहिल्या मजल्यावरून खाली गाडीत येऊन बसायला खूप वेळ लागला. मायाच्या घरी पोहोचलो. घर पाचव्या मजल्यावर आणि लिफ्ट बंद! मी म्हणालो, ''मायाला खाली बोलावतो. तिचा हात मोडलाय, पाय नाही. तुम्हाला पाच मजले चढणे शक्य नाही.'' सुरेशराव रागात म्हणाले, ''जिना कुठाय?'' आणि हळूहळू ते जिना चढू लागले. एक तास लागला पाच मजले चढायला... पण मायाला भेटायला जायचे म्हणजे जायचे, हा स्वभावच होता. एकदा ठरले म्हणजे ठरले.

शेवटच्या चार-पाच वर्षांत आजारपणामुळे त्यांना अजिबात हिंडणे फिरणे शक्य नव्हते. त्यामुळे ते संघकार्यापासून नाइलाजास्तव दूर होते. प्रवास करता येत नाही, केंद्र कार्यकारिणीच्या बैठकीला जाता येत नाही याचा त्यांना प्रचंड मानसिक त्रास होत असे. शारीरिक व्याधीपेक्षा या मानसिक आजाराने ते अधिक खचले. 'संघाला आता माझा काहीच उपयोग नाही' या विचाराने ते पूर्णपणे ढासळले.

सुरेशरावांना माणसांची पारख होती. संस्थाजीवनात संचालक, सेवक, स्वयंसेवक यांचा व्यवहार कसा असावा याविषयी ते नेहमी स्पष्ट, अचूक, परखड मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाण्याचा विचारही कार्यकर्ते करू शकत नसत, अशी त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती!

एका संस्थेत 'इंटर्नल ऑडिटर' नेमायचा होता. संस्था आपलीच, सुरेशरावांच्या प्रेरणेतून सुरू झालेली होती. चार्टर्ड अकाउंटंट असलेला एक स्वयंसेवक त्यांना भेटला आणि त्या जागेवर त्याची नेमणूक करावी, अशी सूचना संचालकांना देण्यासंबंधी गळ घालू लागला. सुरेशरावांनी त्याला इतके चपखल उत्तर दिले. ते म्हणाले, ''अरे, संस्थेत इंटर्नल ऑडिटर असावा की नाही याविषयी संचालकांना मी काही सुचवणे योग्य आहे; परंतु एकदा 'असावा' असे ठरल्यावर कोण असावा हा निर्णय संचालकांनी करावयाचा आहे. तू अर्ज कर. पात्र असलास तर ते तुला नेमतीलच. तेही स्वयंसेवकच आहेत ना!''

त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता पुनरुज्जीवित करण्याचा प्रसंग आला, तेव्हा त्या जागेवरील नवीन प्रस्तावित इमारतीत मिळणाऱ्या जागेऐवजी त्यांनी रक्कम गुंतवण्यास सांगितली आणि त्याचे येणारे व्याज ते प्रतिवर्षी मा. अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार विविध सेवा प्रकल्पांना देत असत; परंतु त्या देणगीत कुठेही स्वत:चे नाव येणार नाही याची काळजी घेत असत. इतकेच नाही, तर प्रांतात कोणत्या कार्यकर्त्याची काही आर्थिक अडचण आहे याकडेही त्यांचे बारीक लक्ष असे. एका कार्यकर्त्याची आई कॅन्सरने आजारी होती. त्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची होती. सुरेशरावांनी मला त्या वर्षीची व्याजातील काही रक्कम दिली आणि त्याला देण्यास सांगितली व बजावले, ''मी दिलेत हे त्याला कळता कामा नये.''

लहानपणापासून अनेक बौध्दिक वर्गातून ऐकले होते की नाना पालकर शेवटच्या दिवसांमध्ये ग्लानीमध्ये तासा-तासाचे बौध्दिक वर्ग देत असत. संघकार्याशी असलेली ही तादात्म्यता सुरेशरावांच्या शेवटच्या दिवसांमध्ये मी अनुभवली. अनेकांनी अनुभवली. लातूरच्या विवेकानंद रुग्णालयात त्यांच्या अंतिम दिवसांत जे जे त्यांना भेटायला गेले, त्यांनी हा अनुभव घेतला. सुरेशरावांचे तासा-तासाचे बौध्दिक वर्ग, गण समता, शिबिर, बैठका सर्व काही तसेच सुरू होते! इतकेच नाही, तर त्या ग्लानीत ते मनाने ज्या प्रांताच्या प्रवासात असत, त्यानुसार मराठीत किंवा हिंदीत ते अखंड बोलत असत.

त्यांच्या आठवणी लिहाव्यात तितक्या कमी आहेत, पण लेखनाला जागेची मर्यादा आहे, म्हणून थांबावे लागणार.

प.पू. गुरुजी गेल्यानंतर एका पत्रकाराने मा. बाबा भिडेंना विचारले, ''गोळवलकर गुरुजी गेले, तुमची प्रतिक्रिया काय?'' बाबा म्हणाले, ''आमचे वडील गेले. प्रतिक्रिया काय विचारता?'' तेव्हा ते समजण्याइतका मोठा नव्हतो. आज इतक्या वर्षांनी मा. बाबांच्या मनातली भावना समजली, अंत:करणापासून जाणवली!

9766626040

cconsultwithsanjay@gmail.com

 

एका थोर व्यक्तिमत्त्वाला आदरांजली!

सुरेशराव केतकरांच्या दुःखद निधनाने हाँगकाँग हिंदू स्वयंसेवक संघाच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि स्वयंसेवकांना धक्का बसला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच प्रार्थना.

भारतमातेसाठी व रा.स्व. संघाच्या कामासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वाला आदरपूर्वक श्रध्दांजली.

ओम् शांती!

- डॉ. मनोज मोटवानी,

कार्यवाह - हिंदू स्वयंसेवक संघ,

हाँगकाँग