आफ्रिकेच्या सब-सहारा प्रदेशात लोकसंख्यावाढीचे पाशवी प्रयत्न

विवेक मराठी    12-Sep-2016
Total Views |

 गेल्या शतकात साऱ्या जगाने काही महासत्तांचा अनुभव घेतला आहे. त्यात कोणी भांडवलशाहीवाले होते, तर कोणी साम्यवादीवाले होते, असे शिक्केही त्यांच्यावर मारले जायचे. त्यातूनच जागतिक पातळीवर ध्रुवीय राजनीतीचा उदय झाला. आता लोकसंख्येच्या आधारावर पुन्हा एक महासत्तांचा काळ येताना दिसतो आहे. भारताने गेल्या एक हजार वर्षांत या लोकसंख्यावाल्या महासत्तांचीच गुलामगिरी अनुभवली आहे.


ध्य आफ्रिकेत सध्या लोकसंख्या वाढविण्याची अतिशय तीव्र स्पर्धा लागली आहे. हा विषय असा आहे की त्यावर सभ्यतेच्या परिभाषेत चर्चा करणेही अशक्य असते. पण ज्या बाबींचा पुढील शतकावर किंवा त्याच्या पुढच्याही काळावर प्रचंड परिणाम होणार आहे, त्यावर चर्चा करणे टाळणेही शक्य होणार नाही. एखाद्या भागाची लोकसंख्या पन्नास-साठ वर्षांत पंधरा कोटीची पंचाहत्तर कोटी होणे ही काही साधी बाब नाही. जगातील महत्त्वाच्या अभ्याससंस्थांनी त्यावरील अनेक अहवाल व नकाशे प्रकाशित केले आहेत. हे आकडे एवढे मोठे आहेत की त्यावर सकृतदर्शनी विश्वासही बसणे कठीण आहे. पण आपला धर्म येणाऱ्या काळात जगज्जेता होण्यासाठी आपण संख्येने क्रमांक एकवर असले पाहिजे, अशा भूमिकेतून त्याला चालना दिली जात आहे. अशा ज्या बाबी घडत असतात, त्या अज्ञानातूनच होत असण्याची शक्यता असते. पण काही गट त्याचा दीर्घकालीन उपयोग करून घेण्यासाठी सरसावले आहेत. परिणामाच्या परिभाषेत एखादी घटना कळत होवो किंवा नकळत होवो, त्याच्या समस्या कमी होत नाहीत. मध्य आफ्रिकेतील या लोकसंख्यावाढीच्या बाबीवर जगातील मोठमोठया संघटना व संस्था लक्ष ठेवून आहेत, त्यात संयुक्त राष्ट्र संघटना, जागतिक बँक, पॉप्युलेशन रेफरन्स ब्युरो, पीयू, त्याचप्रमाणे व्हॉइस ऑॅफ अमेरिका, बीबीसी अशा प्रसारमाध्यम संस्था लक्ष ठेवून आहेत. त्यांची दर वर्षीची आकडेवारीही प्रकाशित होत आहे.

लोकसंख्येचा प्रस्फोट

एका बाजूने या लोकसंख्या प्रस्फोटामुळे जगासमोर कोणत्या समस्या उभ्या राहणार आहेत व त्याचे निराकरण कसे करायचे यावर विचार करणाऱ्या संस्था आहेत, तर दुसऱ्या बाजूला वर्षावर्षाला कोटींनी वाढणाऱ्या या लोकसंख्येचा आपण फायदा कसा करून घ्यायचा, याचा विचार करणाऱ्या संघटना कामाला लागल्या आहेत. जगात आपण एकमेव महासत्ता होण्यासाठी आपल्याला आणखी एक एक अब्ज लोकसंख्या लागणार आहे, असा विचार करणाऱ्या जगात काही संघटना आहेत. लोकसंख्यावाढीचा मुद्दा फक्त आफ्रिकेपुरता मर्यादित नाही. भारत हाही त्यापैकी एक देश आहे. येथे सर्वसामान्य माणूस शांततेने राहू इच्छितो, त्यामुळे 'हम दो हमारे दो' यावर त्याचे समाधान असते. तरीही काही गट आपण लवकरात लवकर या देशात लोकसंख्या क्रमांक एक झाले पाहिजे म्हणून 'मस्टर मेन्टेन' करून प्रकल्प राबवत आहेत. भारतात प्रत्येक जनगणनेत त्याची प्रचिती येते.

लोकसंख्येच्या आधारावर महासत्ता बनण्याचे स्वप्न

जागतिक पातळीवर या प्रश्नाची उग्रता तर अधिक आहे. सहा महिन्यांपूर्वी जगातील सर्व प्रसारमाध्यमांनी हा विषय पंधरा दिवस हाताळला होता. अमेरिकेतील पीयू (PEW - पीईडब्ल्यू) या सामाजिक पातळीवर पाहणी अहवाल करणाऱ्या संघटनेचा तो एक अभ्यासपूर्ण अहवाल प्रकाशित झाला होता. पुढील पन्नास-साठ वर्षांत जगात या लोकसंख्या युध्दाची एक आकडेवारी त्यात देण्यात आली होती. त्यात त्यात एक एक अब्ज लोकसंख्यावाढीची उद्दिष्टे पुढे आली होती. ती सारी माहिती भारतातील सर्व प्रसारमाध्यमांनी आणि जगभरच्या प्रसारमाध्यमांनी अतिशय ठळकपणे दिली होती. त्यात असे म्हटले होते की, सध्या जगात मुसलमानांची संख्या 160 कोटी आहे आणि ख्रिश्चनांची संख्या 220 कोटी आहे. पुढील दोन-तीन शतकांत जर जगावर वर्चस्व निर्माण करायचे असेल, तर आपली लोकसंख्या सर्वात अधिक हवी, यासाठी जगातील मुस्लीम संघटनांनी जगातील मुस्लिमांना पुढील तीस-चाळीस वर्षांत ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन केले असल्याची माहिती दिली होती. त्या दृष्टीने जगातील प्रत्येक देशात त्याचे प्रत्यंतर येते आहे. या विषयावर जगभर अनेक लेख येऊनही गेले आहेत. जी स्थिती मुस्लीम संघटनांची आहे, तीच स्थिती ख्रिश्चनांचीही. म्हणून त्यांची जर सध्या 220 कोटी संख्या असेल, तर आत्ताच तीन अब्जचे उद्दिष्ट समोर ठेवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी त्यांचे वर्चस्व असलेल्या देशांसमोर ठेवले आहे. गेल्या शतकात अमेरिका आणि सोव्हिएत या महासत्तांची रूपे जगाने पाहिली आहेत. आता लोकसंख्येच्या आधारे आपले महासत्तापण सिध्द करणाऱ्या शक्ती पुढे येताना दिसत आहेत. ख्रिश्चनांच्या बाबतीत ही समस्या आणखीनच बिकट झाली आहे. एका बाजूला ते आज त्या दृष्टीने महासत्ता असूनही त्यांचेच लोक त्यांचा धर्म सोडत असल्याने त्यांनाही पाच पन्नास कोटीची जादा व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे अशा मायबाप संस्थांना आफ्रिकेतील ते देश हे मायबाप वाटायला लागले आहे.

आफ्रिकेतील प्रचंड लोकसंख्यावाढीची माहिती वर उल्लेखिलेल्या पीयू संस्थेबरोबरच जागतिक बँकेने पुढे आणली  आहे, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी त्यांच्या अहवालात असे म्हटले आहे की, आफ्रिकेतील सब-सहारा म्हणून जो प्रदेश आहे, तेथे इ.सन 1950मध्ये अठरा कोटी साठ लाख एवढी लोकसंख्या होती, ती इ.सन 2010पर्यंतच्या मोजणीत पंचाऐंशी कोटी साठ लाख एवढी झाली आहे. ही संख्या फक्त टांझानिया, इथोपिया, नायजेरिया, नायगर, काँगो (फ्रेंच), झांबिया आणि युगांडा या देशांची आहे. गेल्या साठ वर्षांतील ही वाढ लक्षात घेता पुढील पंचेचाळीस वर्षांत ती दोन अब्ज सत्तर कोटी होण्याची शक्यता आहे. जगातील दहा-बारा संस्थांनी या प्रचंड मोठया वाढणाऱ्या लोकसंख्येबाबत आपापले अहवाल प्रकाशित केले आहेत. प्रत्येकात चार पाच टक्क्यांचा फरक आहे पण सर्वसाधारणपणे निष्कर्ष समान आहेत.

वाढत जाणारी लोकसंख्या ठरली मोठी समस्या

सध्या चीन आणि भारत यांच्या लोकसंख्या अब्जच्या आकडयात मोजाव्या लागतात. पण त्यांचे क्षेत्रही विशाल आहे. जगाच्या फार मोठया भागात दर चौरस मैलात त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेले अनेक देश आहेत. आफ्रिकेत बहुतेक देशांत ती सीमा ओलांडली आहे. त्यांच्या तुलनेत त्या सात देशांचे क्षेत्र कमी आहे, तरीही त्याना अब्जाचा आकडा वापरावा लागण्याचा दिवस दूर नाही. त्यातील नायजेरिया देशाचीच लोकसंख्या इ.सन 2050मध्ये अमेरिकेच्या लोकसंख्येएवढी होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वीच या भागातील महिलांना होणाऱ्या अपत्यांची सरासरी काढली, तर ती साडेसहा होती. म्हणजे एका जोडप्याला त्यांच्या तीस वर्षांच्या काळात सरासरी साडेसहा मुले होत. पण गेल्या काही वर्षांत लोकशिक्षण वाढले व त्यामुळे हे प्रमाण 5.1 इतके खाली आले आहे. अर्थात ही साऱ्या आफ्रिका खंडाची स्थिती नाही. तरीही त्यांची सरासरी जगाच्या सरासरीपेक्षा दुप्पट आहे. बोटस्वाना, केनिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांत मुले होण्याचे प्रमाण कमी आहे. सब-सहारा प्रदेशात अलीकडे बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. इ.सन 1950च्या काळात ते हजारी 183 होते, ते आता इ.सन 2010-15 या काळात 69 झाले आहे. तेथे बालमृत्यू, कुपोषण, रोगराई यांच्या जोडीला एचआयव्हीसारखे महाभयंकर रोग मुक्कामाला होते. त्यामुळे सरासरी वयोमान 36 होते, ते आता 56 झाले आहे.


मध्य आशियातील देशांत सर्वसाधारणपणे साठ टक्के लोक ख्रिश्चन आहेत, तर चाळीस टक्के लोक मुसलमान आहेत. एकूणच इजिप्तपासून दक्षिण आफ्रिका देशापर्यंत सर्वच देशांत लोकसंख्यावाढीचे प्रमाण अन्य जगापेक्षा अधिक आहेत. मध्य आफ्रिकेत तर ते फारच मोठे आहे. इजिप्तमध्येही यातील काही समस्या आहेत. मुलींची लग्ने अठरा वर्षांपूर्वी होणे आणि नंतर एका वर्षात पहिले मूल होणे ही मोठी समस्या आहे. नायजेरिया हा सतरा कोटी लोकसंख्येचा देश आहे, त्यात सात कोटी ख्रिश्चन आहेत. इथियोपियामध्ये सव्वा पाच कोटी ख्रिश्चन आहेत, ते तेथील लोकसंख्येच्या 45 टक्के आहेत. बोटस्वानामध्ये दोन कोटी लोकसंख्येपैकी निम्मे ख्रिश्चन आहेत. बुरुंडीतील एक कोटी लोकसंख्येपैकी 71 लाख लोक ख्रिश्चन आहेत. काँगो डेमोक्रॅटिक रिपब्लिकमध्ये ऐंशी टक्के खिश्चन आहेत. ती संख्या पाच कोटी सत्तर लाख आहे. युगांडामध्ये 89 टक्के ख्रिश्चन आहेत व ते तीन कोटी आहेत. रवांडामध्ये 94 टक्के ख्रिश्चन आहेत व ते एक कोटी आहेत. टांझानियामध्ये 50 टक्के, झांबियामध्ये 85 टक्के, झिम्बाब्वेमध्ये 70 टक्के अशी ख्रिश्चनांची संख्या आहे. 105 कोटी असलेल्या तेथील लोकसंख्येच्या 42 टक्के लोक ख्रिश्चन आहेत.

अशा वाढणाऱ्या लोकसंख्येचा जगात शिक्षण, गरिबी, नागरीकरण, कुटुंबनियोजन याबाबत जागृती किंवा अज्ञान यांच्याशी संबंध जोडला जातो. त्यामुळे तेथील प्रत्येक देश ही एक स्वतंत्र कथा आहे. नायजर देशाची लोकसंख्या दर वर्षी तीन टक्क्यांनी वाढते, तर बोटस्वाना देशात ती एक टक्का या दराने वाढते.

अलीकडे जगात 'मेडियन एज' म्हणून एक संकल्पना प्रचारात आली आहे. ती म्हणजे त्या त्या देशाची लोकसंख्या आणि प्रत्येकाचे वय हे एकत्र करून लोकसंख्येच्या आकडयाने भागणे. हा आकडा सरासरी आकडयापेक्षा बराच निराळा असतो आणि त्या आकडयातून त्या देशाचे लोकसंख्याविषयक चित्र अधिक बोलके होते. काही वर्षांपूर्वी तेथे हा आकडा 14 होता, तो आता 16 झाला आहे. जगातील सर्वात तरुणांची अधिकाधिक संख्या असलेले जगातील जे दहा देश आहेत, त्यात सब-सहारामधील हे आठ देश आहेत. पुढील तीस-पस्तीस वर्षांत दहाच्या दहा देश हे सब-सहारामधीलच असणार आहेत. त्यामुळे या भागात पुढील काही वर्षांत जन्माला येणाऱ्या आणखी एक अब्ज लोकांचे भवितव्य काय असणार आहे, ही आज नव्हे पण येणाऱ्या काही वर्षांत एक गंभीर समस्या असणार आहे. या लोकंाना चांगले शिक्षण, चांगले पाणी आणि चांगल्या आरोग्याच्या सोयी मिळण्यावर साऱ्या बाबी अवलंबून आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या आधारे महासत्ता होणऱ्या देशापुढे त्यासाठी कोणताही भरीव कार्यक्रम नाही.


ज्या निमित्ताने हा लोकसंख्येचा प्रश्न पुढे आला, त्या संदर्भात आफ्रिकेतील वाढत्या लोकसंख्येचा अन्वयार्थ लावणे आवश्यक आहे, तो म्हणजे युरोपात व अमेरिकेत फारच मोठया प्रमाणावर ख्रिश्चन धर्माचा त्याग करून आपण कोणत्याही धर्माचे नाही, असे जाहीर करणाऱ्यांच्या संख्येने स्थानिक ख्रिश्चन पंथांना अल्पसंख्य केले आहे. ख्रिश्चन धर्म नाकारणाऱ्यांबाबतची वस्तुस्थिती अशा पध्दतीने पुढे येत आहे की, हे लोक परमेश्वराचे अस्तित्व मानायला तयार आहेत, पण ख्रिश्चन धर्म त्यांना नकोसा वाटत आहे. त्यामुळे ज्या ख्रिश्चन संघटना जगभर आपण युरोप-अमेरिकेच्या जनतेचे प्रतिनिधी आहोत असे मिरवतात, त्यांतील पोकळपणा स्पष्ट झाला आहे. त्याचप्रमाणे ज्या संस्थांनी, संघटनांनी, देशांनी आणि काही देशांच्या संघटनांनी गेल्या तीनशे-चारशे वर्षांत या लोकसंख्येच्या सामर्थ्यावर जगावर साम्राज्य केले, त्या संघटना व ते देश युरोप अमेरिकेतील 'नो रिलीजन'च्या त्सुनामीमुळे अस्वस्थ आहेत. कोणत्याही परिस्थितीत भारत, चीन यासारख्या देशांत धर्मांतरे घडवून आणणे आणि दुसऱ्या बाजूला आफ्रिकेतील 'त्या' प्रदेशात धान्याच्या बोटी पाठवणे अशा मोहिमा राबवत आहेत. या लोकांनी त्यांच्या याच सामर्थ्यांच्या आधारे जगातील शंभरपेक्षा अधिक देशावर अनेक शतके राज्य केले आहे. यांचा जगातील अनुभव लक्षात घेता त्यांचा स्वभाव हा विषारी साप, नाग, फुरसे यांच्यासारखा आहे.

गेल्या शतकात साऱ्या जगाने काही महासत्तांचा अनुभव घेतला आहे. त्यात कोणी भांडवलशाहीवाले होते, तर कोणी साम्यवादीवाले होते, असे शिक्केही त्यांच्यावर मारले जायचे. त्यातूनच जागतिक पातळीवर ध्रुवीय राजनीतीचा उदय झाला. आता लोकसंख्येच्या आधारावर पुन्हा एक महासत्तांचा काळ येताना दिसतो आहे. भारताने गेल्या एक हजार वर्षांत या लोकसंख्यावाल्या महासत्तांचीच गुलामगिरी अनुभवली आहे. गेल्या एक हजार वर्षांपैकी पहिली आठशे वर्षे जेहादी लोकसंख्यावाल्यांचा दहशतवाद होता, तर नंतरची दोनशे वर्षे युरोपीय वर्चस्वाचा काळ होता. भारतीयांच्या स्वभावाचा आपल्यापेक्षा त्यांनाच अधिक परिचय आहे, कारण त्यांनी येथे साम्राज्य व लूट केली आहे. ते परत नव्या दमाने कामाला लागले आहेत, त्यासाठी आपण काय खबरदारी घ्यायची ते आपण ठरवायचे आहे.

9881717855