पूर्वांचल - महाराष्ट्र सेतू जनकल्याणाचा

विवेक मराठी    13-Sep-2016
Total Views |

पूर्वांचलातील आणि महाराष्ट्रातील नागरिकांचे परस्परातील नाते दृढ व्हावे, कौटुंबिक जिव्हाळा उत्पन्न व्हावा या हेतूने जनकल्याण समितीतर्फे 'भारत मेरा घर' हा उपक्रम चालवला जातो. या उपक्रमात पूर्वांचलातील नागरिकांना महाराष्ट्रात आणले जाते आणि महाराष्ट्रातील नागरिकांना पूर्वांचलात नेले जाते. त्या त्या गावामध्ये घरोघरी या सर्वांचा निवास असतो आणि परस्परांच्या सहवासातून, संस्कृतीच्या परिचयातून सर्वांना 'भारत मेरा घर' अशी प्रचिती येते. पूर्वांचलच्या या प्रवासातून आम्हाला हा अनुभव नक्कीच आला.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचे काम करण्यास सुरुवात केल्यानंतर जनकल्याण समितीच्या विविध कार्यांची माहिती मिळायला सुरुवात झाली. रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या पूर्वांचल विकास विभागामार्फत महाराष्ट्र प्रांतामध्ये पूर्वांचलमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एकूण आठ वसतिगृहे आहेत. ती डोंबिवली, चिपळूण, सांगली, चिंचवड, नाशिक, पुणे, संभाजीनगर आणि लातूर येथे असून या वसतिगृहांत एकूण 103 विद्यार्थी राहतात. जानेवारी 2016मध्ये मला कामानिमित्त सांगली येथील वसतिगृहाला व तिथल्या विद्यार्थ्यांना भेटण्याचा योग आला. त्यांच्याशी केलेल्या संवादातून पूर्वांचलातील संघाचे काम कसे सुरू झाले, हे जाणून घेण्याची मला उत्सुकता लागली होती. पूर्वांचलमधील सामान्य जनजीवन व थोडाफार तरी अंतर्गत भाग बघणे हा माझा प्रयत्न होता. म्हणून मी त्या वेळी मला पूर्वांचलातील आपले काम असणाऱ्या प्रदेशाला मला भेट द्यायची इच्छा आमचे विभाग कार्यवाह शरदजी छत्रे यांच्याकडे बोलून दाखवली. आपल्या वसतिगृहातील मुले एप्रिलमध्ये शाळांना सुट्टी लागल्यावर त्यांच्या घरी जाताना त्या वेळी त्यांना आणायला सांगलीतून सुनील गोसावी हे जाणार असल्याचे सांगितले. त्याच वेळी मी, तेरवाडकर आणि शिखरे मेघालयाला जायला तयार असल्याचे कळवले. ठरवल्याप्रमाणे 28 मेला जाण्याची आमची आरक्षणे झाली. मी, तेरवाडकर व शिखरे कोल्हापूरहून निघालो आणि सांगलीहून गोसावी, त्यांचे सहकारी, झेंडे व रानडे आणि गोसावींची मुलगी सोनल आणि झेंडेंची मुलगी श्वेता असे एकूण आठ जण निघालो. 28 मेला निघून आम्ही गुवाहाटी येथे 31 मे रोजी पोहोचलो. तेथील संघकार्यालयात गेलो. तेथे कार्यालय प्रमुख रमेश बोरा यांनी आमच्या राहण्याची व्यवस्था केली. या कार्यालयात बाहेरील प्रांतातून येणाऱ्या स्वयंसेवकांची राहण्याची सोय आहे. तसेच त्या भागातील प्रचारक व संघाचे पदाधिकारी यांची जेवण, निवास याचीही सोय आहे. या संघाच्या कार्यालयाला लागूनच वनवासी कल्याण विभागाचा कल्याण आश्रम आहे. आम्ही एक दिवस राहून गुवाहाटी येथील प्रसिध्द कामाख्या देवीचे मंदिर व इतर प्रेक्षणीय ठिकाणे पाहिली आणि दुसऱ्या दिवशी मेघालयची राजधानी शिलाँगला गेलो. हा पूर्वांचल जाणून घेणे, मुलांच्या घरी जाणे, त्यांच्या पालकांना भेटणे हा आमचा मुख्य उद्देश होता. आम्ही तसे तिथल्या संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना कळवले होते. त्याप्रमाणे तिथे आम्हाला तिथला पूर्णवेळ कार्यकर्ता बाडेंग भेटायला आला होता. बाडेंगचे खरे नाव इस्टर विंग आहे असे त्याने आम्हाला सांगितले. तो हिंदू असून त्याच्या जन्माच्या वेळी ख्रिश्चन नर्सने त्याचे नाव इस्टर असे ठेवले. बाडेंग आमची पुढची सर्व व्यवस्था करणार होता. मेघालयातून महाराष्ट्रातील वसतिगृहात येणाऱ्या सर्व मुलांची व्यवस्था बाडेंग व तिथले प्रचारक करतात. त्यामुळे बाडेंगला सर्व गावांतील मुलांची घरे माहीत होती. आम्हाला बाडेंग दुसऱ्या दिवशी काही मुलांच्या घरी घेऊन जाणार होता, पण त्यापूर्वी पूर्वांचलमधील मुले शिकण्यासाठी महाराष्ट्रातील वसतिगृहात नेण्यामागचा संघाचा उद्देश मला जाणून घ्यायचा होता. म्हणून मला जेव्हा तिथले प्रचारक प्रवीण शेवाळे भेटले, तेव्हा मी त्यांना हे सांगितले. त्यांच्याबरोबर केलेल्या चर्चेतून आम्हाला समजले की पूर्वांचल भारतापासून तोडण्यासाठी अनेक फुटीरतावादी संघटना प्रयत्न करत आहेत. कारण पूर्वांचल हा बांगला देशाला लागून असल्याने बांगला देशातून होणारी घुसखोरी ही पूर्वांचलची मोठी समस्या आहे. सन 1841मध्ये पहिल्या मिशनऱ्याने येथे पाऊल ठेवले व त्यांचे क्रमश: कार्य वाढले. आज मेघालयमध्ये जवळजवळ 90% ख्रिस्तीकरण झाले आहे. त्या काळात मिशनऱ्यांच्या बऱ्यावाईट कृत्यांना आळा घालण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेतून 1924मध्ये स्वामी प्रभानंद यांनी खासी समाजाची सेवा व त्यांची संस्कृती जपण्यासाठी मेघालयामध्ये कार्य सुरू केले. चेरापुंजी येथे 1931 साली रामकृष्ण आश्रम स्थापन केला. सन 1934मध्ये शिलाँग येथे व जयतिया टेकडयांमध्ये प्राथमिक शाळा सुरू केल्या.


पूर्वांचलातील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम वयातच महाराष्ट्रात आणून त्यांच्यावर राष्ट्रीयत्वाचे संस्कार करण्याच्या हेतूने जनकल्याण समितीने 1995मध्ये 'पूर्वांचल वसतिगृह' हा एक आगळावेगळा प्रकल्प सुरू केला. या वसतिगृहातील विद्यार्थी प्रत्येक वर्षी शैक्षणिक वर्ष संपले की सुट्टीत त्यांच्या घरी जातात. त्यातील सांगलीच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सांगलीचे सुनील गोसावी आणि आम्ही गेलो होतो. सांगलीच्या वसतिगृहात राहत असलेला शौस्तार याच्या घरी आम्ही निघालो, तेव्हा बाडेंग आमच्याबरोबर होता. शौस्तारचे घर खासी जिल्ह्यातील हुमसाब या गावी आहे. हे गाव लहानशा टेकडीवर होते. घरे एकाला एक लागून नाहीत. दोन-तीन घरांचा समूह असतो. शौस्तारचे वडील नसल्याने त्याची आई शौस्तारच्या आजीजवळ राहत होती. तिथे पोहोचल्यावर बाडेंगला आम्ही त्यांच्या रूढी आणि परंपरेबद्दल विचारले, तेव्हा त्याने सांगितलेली माहिती खूप गमतीदार होती. मेघालयमध्ये मातृसत्ताक पध्दती असल्याने मुलाचे लग्न झाल्यावर नवरा मुलगा मुलीच्या घरी राहायला जातो. नंतर ती दोघे एक वर्ष मुलीच्या आईकडे - म्हणजे सासूकडे राहतात. एक वर्षानंतर मुलीची आई आपल्या मुलीला आणि जावयाला आपल्या घराजवळ दुसरे घर बांधून देते व ते स्वतंत्र राहायला जातात. त्यामुळे बहिणीबहिणींची घरे जवळ जवळ असतात. घरातील बायकाच कुटुंबप्रमुख असतात. त्याच पाहुण्यांचे स्वागत करतात. सर्व पैशांचे व्यवहार बायका पाहतात. त्या दुकाने, हॉटेल चालवतात, पण त्यांचे चालणे-बोलणे सभ्यतेचे असते. बायका धीट व महत्त्वाकांक्षी असतात. जन्मल्यावर मुलाला आईचे नाव लावतात. पुरुषाला मामा या नात्याने अधिकार असतात. शौस्तारच्या घरात सर्व सत्ता आजीकडेच होती. त्यांचे घर लाकडीच होते, पण सुबक होते. घरातील बाहेरील खोलीत सजावट केली होती. भिंतींवर बांबूपासून बनवलेल्या वस्तू लावल्या होत्या. त्याच्या आईने व आजीने आमचे स्वागत केले. आम्हाला काळा बिनदुधाचा चहा दिला. तिकडे सगळेच बिनदुधाचा चहा पितात. आमच्याशी बोलल्यावर त्याच्या आईला व आजीला बरे वाटले. आपला मुलगा जरी इतक्या दूर असला, तरी सुरक्षित आहे हे पाहून त्यांना आनंद झाला. इतके दिवस तेथील लोकांत राहून संघाच्या कार्यकर्त्यांनी हा विश्वास संपादन केला आहे. नंतर आम्ही सांगलीच्या वसतिगृहात राहून दहावीची परीक्षा दिलेल्या नथानियन याच्या नॉगस्पुंग या गावी गेलो. हे गाव संपूर्ण डोंगराने वेढलेले आहे. सभोवताली हिरवळ असून टेकडीवर लहान-लहान घरे दिसत होती. नथाचे घर एका ओढयाच्या पलीकडे टेकडीवर होते. आम्ही चालत चालत तिकडे गेलो. घर अगदी साधे होते. आतून लाकडी व बाहेरून पत्रा मारलेला होता. नथाच्या आईने आमचे स्वागत केले. त्याच्या आजीचे घर जवळच होते. तिथे आमच्या दुपारच्या भोजनाची सोय केली होती. नथाची आई हॉटेल चालवत होती व वडील तिला मदत करत होते. आम्ही महाराष्ट्रातून त्यांच्या मुलाला भेटायला आलो, हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्या घरी जेवण झाल्यावर आम्ही नथानियन पुढे काय करणार असे विचारले. तेव्हा त्याने आपण पुढचे शिक्षण शिलाँग येथे घेणार आणि पदवीधर होणार असे सांगितले. आम्ही नथाचा निरोप घेताना त्याला खूप वाईट वाटले. पुन्हा त्याच्या घरी येण्याचे कबूल करून आम्ही निघालो. वाटेत बाडेंगच्या आईचे घर होते, तिथे त्याच्या आईचे आणि तिच्या सात मुलींची घरे जवळ जवळ होती. बाडेंगची एक बहीण नाशिकच्या वसतिगृहात राहत होती. तिथे शिकून ती आता शिलाँगला नोकरी करते. ती आमच्याबरोबर मराठीत बोलली. तिला भेटून आम्हाला वाटले. महाराष्ट्रातून परत गेलेले हे विद्यार्थी पूर्वांचलातही त्याच संस्काराचा वसा पुढे चालवतात.


महाराष्ट्रातील नाशिकच्या वसतिगृहात शिकून गेलेली डेलीना आम्हाला भेटली. ती सध्या शिलाँग येथे हायकोर्टात वकील असून ती गरजूंसाठी कायदा सल्ला केंद्र चालवते. डॉक्टर अयुम हिने नाशिक येथे वसतिगृहात व नंतर कोल्हापूर येथे राहून शिक्षण पूर्ण केले. मेघालयात ती आता शासकीय सेवेत आहे. खासगी वैद्यकीय व्यवसाय न करता तिने रुग्णसेवेचे व्रत हाती घेतले आहे. महाराष्ट्रातून शिकून परत गेलेले हे विद्यार्थी पूर्वांचलात नोकरी, उद्योग व स्वत:चा व्यवसाय करत असतानाच सामाजिक जाणीवही आवर्जून जपत आहेत. त्यातील अनेक जण शिक्षक, काही जण शासकीय सेवेत उच्चपदस्थ अधिकारी झाले आहेत. अनेकांनी चांगले व्यवसाय सुरू केले आहेत आणि हे सर्व जण इथल्या सामाजिक जीवनातही सक्रिय आहेत.

सांगलीच्या वसतिगृहात राहणाऱ्या काही मुलांच्या घरी जाऊन आल्यावर आम्ही शिलाँग येथील डॉन बॉस्की म्युझियम पाहिले. डॉन बॉस्की या इंग्लिश गृहस्थाने हे म्युझियम बांधल्यामुळे त्याला त्याचे नाव दिले आहे. इंग्रज येण्यापूर्वी आसाममधील सात राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे, शिल्पे येथे पाहायला मिळतात. त्यानंतर तेथे झालेला बदल व सध्याची स्थिती दाखवली आहे.

आम्ही चेरापुंजी येथील मौसमाई येथील तयार झालेली गुहा पाहिली, तसेच स्वामी प्रभानंद यांनी विवेकानंद यांच्या प्रेरणेतून उभारलेला रामकृष्ण आश्रम पाहिला. तिथे गेल्यावर स्वामी श्री प्रभानंद यांनी पूर्वांचलमध्ये केलेल्या कार्याची कल्पना येते. स्वामी प्रभानंद यांनी खासी समाजाची सेवा व त्यांची संस्कृती जतन करण्यासाठी या भागात शाळा, आरोग्यकेंद्रे सुरू केली. चेरापुंजी येथे सध्या रामकृष्ण मिशनच्या 37 पूर्व प्राथमिक शाळा, 16 प्राथमिक शाळा व 9 माध्यमिक शाळा आहेत. मेघालयात रामकृष्ण मिशनचे वस्तुसंग्रहालय, रामकृष्ण व श्री शारदादेवी यांचे मंदिर आहे. चेरापुंजी हे सर्वात जास्त पावसाचे ठिकाण असल्याचे तेथील घनदाट जंगल पाहून लगेच समजते. तेथील निसर्गसौंदर्य तर डोळयांना भुरळ पाडणारे आहे. आम्ही चेरापुंजी पाहिल्यावर परतीच्या दिवशी आमच्याबरोबर नाशिक येथील वसतिगृहातील 26 मुली व सांगली येथील वसतिगृहातील 20 मुले आणि आम्ही इथून गेलेले आठ जण शिलाँग ते गुवाहाटी बसने आलो व नंतर आम्ही सांगलीच्या वसतिगृहातील मुलांना घेऊन गुवाहाटीहून रेल्वेने सांगलीला परत आलो.

पूर्वांचलातील आणि महाराष्ट्रातील नागरिकांचे परस्परातील नाते दृढ व्हावे, कौटुंबिक जिव्हाळा उत्पन्न व्हावा या हेतूने जनकल्याण समितीतर्फे 'भारत मेरा घर' हा उपक्रम चालवला जातो. या उपक्रमात पूर्वांचलातील नागरिकांना महाराष्ट्रात आणले जाते आणि महाराष्ट्रातील नागरिकांना पूर्वांचलात नेले जाते. त्या त्या गावामध्ये घरोघरी या सर्वांचा निवास असतो आणि परस्परांच्या सहवासातून, संस्कृतीच्या परिचयातून सर्वांना 'भारत मेरा घर' अशी प्रचिती येते. पूर्वांचलच्या या प्रवासातून आम्हाला हा अनुभव नक्कीच आला.

9422034500