मधुमेहाचं निदान

विवेक मराठी    19-Sep-2016
Total Views |

कुठल्याही आजाराच्या बाबतीत नॉर्मल काय हे समाजाचा अभ्यास करून ठरवलं जातं. मधुमेहाच्या बाबतीत असा अभ्यास झाला. मधुमेहात शरीरावर जे वैशिष्टयपूर्ण परिणाम होतात, ते कधी? याचा धांडोळा घेतला गेला. तेव्हा लक्षात आलं की जेवल्यानंतर ग्लुकोज 200च्या वर जायला लागल्यानंतर अचानक डोळे किंवा मूत्रपिंड यावर परिणाम झालेला दिसतो. डोळे आणि मूत्रपिंड यावर झालेला हा परिणाम फक्त आणि फक्त मधुमेहातच दिसत असल्याने ती पातळी नॉर्मल नाही, हे ठरवलं गेलं.


म्हाला मधुमेह झालाय की नाही, हे कसं ठरवायचं? लगेच उत्तर येईल - ''हॅऽऽ, त्यात काय आहे? जायचं, रक्त तपासायचं आणि त्यात ग्लुकोजचं प्रमाण एका विशिष्ट पातळीच्या वर आलं, म्हणजे झालं मधुमेहाचं निदान.''

बरोबर आहे. तुमच्या मधुमेहाचं निदान हे असंच केलं जातं. रित्या पोटी 140च्या आणि जेवणानंतर दोन तासांनी 200च्यावर ग्लुकोजची पातळी गेली म्हणजे तुम्हाला मधुमेह झाला यावर शिक्कामोर्तब होतं. परंतु इथे मूलभूत प्रश्न अनुत्तरित राहतो. ही विशिष्ट पातळी ठरली कशी? शिवाय कमी महत्त्वाचे, तरीही दुर्लक्ष न करण्यासारखे इतर विषय चर्चेविना राहतात, ते वेगळंच. म्हणूनच केवळ अमुक एक पातळी नॉर्मल आणि त्यावरील सगळे मधुमेही असं ढोबळ विधान करून समाधान मानून घेण्यात अर्थ उरत नाही. थोडं खोलात शिरणं आवश्यक ठरतं.

असं विस्तृत सांगण्याचं दुसरंही एक कारण आहे. अनेकांच्या मनात शंका आहे की हल्ली जी मधुमेहाच्या निदानाची पातळी खाली खाली आणली जातेय, त्यामागे कटकारस्थान आहे. औषधी कंपन्यांच्या दबावाखाली हे सगळं होतं आहे. खरं काय, खोटं काय, याचं मार्गदर्शन करणं आवश्यक आहे.

कुठल्याही आजाराच्या बाबतीत नॉर्मल काय हे समाजाचा अभ्यास करून ठरवलं जातं. मधुमेहाच्या बाबतीत असा अभ्यास झाला. मधुमेहात शरीरावर जे वैशिष्टयपूर्ण परिणाम होतात, ते कधी? याचा धांडोळा घेतला गेला. तेव्हा लक्षात आलं की जेवल्यानंतर ग्लुकोज 200च्या वर जायला लागल्यानंतर अचानक डोळे किंवा मूत्रपिंड यावर परिणाम झालेला दिसतो. डोळे आणि मूत्रपिंड यावर झालेला हा परिणाम फक्त आणि फक्त मधुमेहातच दिसत असल्याने ती पातळी नॉर्मल नाही, हे ठरवलं गेलं.

आता अडचण होती रित्या पोटी ग्लुकोजची नॉर्मल पातळी किती, हे ठरवण्याची. तिथेदेखील रक्तातली ग्लुकोजची पातळी 126च्या वर गेल्यानंतर अचानक डोळयांवर होणाऱ्या परिणामात वाढ होतेय, त्यासाठी मांडलेला आलेख 126नंतर अकस्मात उंची गाठू लागतोय, हे लक्षात आलं. म्हणून रित्या पोटी 126 आणि भरल्या पोटी 200च्या वर ग्लुकोज गेल्यास मधुमेहाचं निदान निश्चित करण्यात आलं.

तरीही थोडी अडचण होतीच. आपण सगळे एकाच प्रकारचं भोजन करत नाही, शिवाय रोज तेच तेच पदार्थ खात नाही. अभ्यास करताना, नॉर्मल आणि ऍबनॉर्मल ठरवताना असं वेगवेगळं खाऊन करता येत नाही. तुलना करण्यासाठी दोन गोष्टी सारख्या असाव्या लागतात. असमान गोष्टींची तुलना करणं शास्त्राला धरून होत नाही. म्हणून तिथे अनहायड्रस (पाण्याचा अंश नसलेलं) ग्लुकोज वापरलं गेलं. शेवटी आपण कुठलाही पदार्थ खाल्ला, तरी तो पचून त्यातल्या कार्बोहायड्रेटचं ग्लुकोजमध्येच रूपांतर होत असल्याने हे योग्य होतं. मग नेमकं किती ग्लुकोज घेऊन रक्त तपासायचं, हा प्रश्न सोडवला गेला. जागतिक आरोग्य संघटनेने एक प्रकल्प हाती घेतला, तज्ज्ञांची मतं मागवली. 75 ग्रॅम अनहायड्रस ग्लुकोज हे सर्वत्र समान असावं, असा निर्णय झाला. नॉर्मल असलेल्या आणि नॉर्मल नसलेल्या पातळीशी त्याची सांगड घातली गेली. या तपासणीला 'ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट' असं नाव दिलं गेलं. आजही ही तपासणी गोल्ड स्टँडर्ड म्हणून वापरली जाते.

अर्थात आपण रोज अन्न खातो. ग्लुकोज घेत नाही. अन्नात केवळ ग्लुकोज नसतं. प्रथिनं, चरबी, व्हिटॅमिन्स, मिनरल्स असं सर्व त्यात असतं. शिवाय अन्न शिजवण्याच्या पध्दतीही भिन्न असतात. आपली शरीरं, त्यांच्या इंद्रियांचा कारभार वेगवेगळा असतो. त्यावर जीन्सचं नियंत्रण असतं. परदेशी माणसांची आणि आपली तुलना सहजी होऊ शकत नाही, इतकंच कशाला, आपल्या देशात अन्नाच्या बाबतीत इतकी विविधता आहे की सांगता सोय नाही. त्यात अठरापगड धर्म-जाती यांची सरमिसळदेखील आहे. म्हणून सगळया बाबतीत एकवाक्यता आणून कुठलाही, रोजच्या व्यवहाराशी नीट जुळवून घेणारा अभ्यास व्हायची गरज असते. दुर्दैवाने आपल्या मातीशी एकरूप झालेला, संपूर्ण देशाला आधारभूत वाटावा असा मोठा अभ्यास करणं बरंच जिकिरीचं काम आहे. तशी कुठलीही सरकारी यंत्रणा आपल्याकडे नाही. त्यासाठी लागणारी साधनसामग्री नाही. हे जोपर्यंत नाही, तोपर्यंत परदेशी अभ्यासांवर आणि त्यांनी नेमून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपल्याला अवलंबून राहावं लागणार.

कदाचित तुमच्या मनात एक प्रश्न डोकावला असेल - रक्त तपासायला लॅबोरेटरीमध्येच जायला हवं का? घरच्या घरी छोटेखानी मशीनवर - म्हणजे ग्लुकोमीटरवर ग्लुकोज तपासलं, तर चालणार नाही का? असं काहीही नाही. तुम्हाला जिथे करायचं तिथे तपासा. त्याने पडलाच तर जेमतेम 10 ते 15 टक्के फरक पडतो. डॉक्टरांच्या निर्णय प्रक्रियेत अशा अल्प फरकाने काहीच बदल होण्याची शक्यता नसते. हा दहा ते पंधरा टक्के फरक असण्याचं कारण स्पष्ट आहे. लॅबोरेटरीमध्ये तुमच्या नीलेतून रक्त घेतलं जातं. ते शरीरातल्या भागांना ग्लुकोज देऊन परत आलेलं असतं. बोटातून घेतलेलं थेंबभर रक्त मात्र रोहिणीतलं असतं. ते अजून शरीरभर फिरायचं असतं. साहजिकच तिथून घेतलेल्या रक्तातलं ग्लुकोज थोडंसं जास्त असणारच. मात्र बोटातून थेंबभर रक्त घेतलं जातं, तर नीलेतून 2 मि.ली. हा फरक काहींना खूप महत्त्वाचा वाटतो. विशेषत: ज्यांच्या नसा सहजी सापडत नाहीत, त्यांच्यासाठी ग्लुकोमीटर उपयुक्त आहे हे नक्कीच. दोन्हीमध्ये एकसारखं तंत्रज्ञान वापरलं जातं, त्यामुळे दोन्हींवर तितकाच विश्वास ठेवण्यात अडचण नाही.

ग्लुकोमीटरचा सर्वात जास्त उपयोग होतो तो टाइप वन मधुमेहात, गरोदरपणात आणि जेव्हा ग्लुकोज फार वर-खाली होत असेल तेव्हा. घरी ग्लुकोमीटर असलं म्हणजे केव्हाही रक्त तपासता येतं - अगदी अपरात्रीसुध्दा. इन्श्युलीन सुरू असलेल्या मंडळींनी ग्लुकोमीटर आवर्जून घरी बाळगावं. न जाणो कधी ग्लुकोज खूपच कमी झालं, तर चटकन तपासता येतं आणि झटपट उपाय करता येतात. एका गोष्टीची खूणगाठ मात्र बांधून ठेवा. ग्लुकोमीटरला मर्यादा असतात. जेव्हा ग्लुकोज खूपच कमी किंवा अतिशय जास्त होतं, तेव्हा ग्लुकोमीटर अचूक आकडा दाखवेलच याची शाश्वती देता येत नाही. काही ग्लुकोमीटरमध्ये कोड असलेल्या पट्टया वापराव्या लागतात. चुकीचा कोड घातला गेला की रिझल्ट बरोबर येत नाही. अधूनमधून बॅटरी तपासून घ्यायला हवी. शक्यतो पट्टया स्वस्त असलेला ग्लुकोमीटर घ्यावा. मशीन काही आपण रोज फेकून देत नाही. परंतु प्रत्येक वेळी नवी पट्टी वापरावी लागत असल्याने ती फार महाग असून चालणार नाही.


लॅबोरेटरीमध्ये रक्त तपासताना काही पथ्य पाळावी लागतात. प्रथम हे समजून घ्यायला हवं की उपास म्हणजे वैद्यकीयदृष्टया काय. साधारण आठ ते चौदा तास, ज्याने तुमचं ग्लुकोज वाढेल अशा कुठल्याही पदार्थांचं सेवन न करता तुम्ही लॅबोरेटरी गाठायला हवी. पाणी प्यायला हरकत नाही. ही आठ किंवा चौदा तासांची भानगड काय, हेदेखील सांगायला हवं. आपलं जेवण झाल्यावर ते पचून त्यातली पोषक द्रव्यं रक्तात जायला सात-आठ तास लागतात. म्हणून कमीत कमी आठ तास आणि आपण फार काळ उपाशी राहिलो की शरीर वेगवेगळी हॉर्मोन्स बनवू लागतं. त्या हॉर्मोन्समुळे रक्तात येणारं ग्लुकोज उपाशी पोटीचं ग्लुकोज म्हणता येत नाही. हा प्रकार साधारण शेवटचं खाल्ल्यानंतर चौदा तासांनी सुरू होतो. म्हणून जास्तीत जास्त काळ झाला चौदा तासांचा.

तपासणीदरम्यान धूम्रपान करू नये. इकडे तिकडे फिरू नये, त्याने रक्तातल्या ग्लुकोजवर परिणाम होतो. तुम्ही तुमची औषधं घ्यायला हवी. फार तर सकाळी लॅबोरेटरीमध्ये जाताना घेण्याऐवजी खाण्यासोबत घ्या. इन्श्युलीन घेत असाल, तर तेही चुकवू नका. शक्यतो एकाच जागी बसलात तर बरं. पण हे अनेकदा शक्य नसतं. लॅबोरेटरीत बसून राहायला जागा नसते. अशा वेळी कमीत कमी हालचाल करण्याचं लक्षात ठेवावं, म्हणजे झालं.

9892245272