अमेरिकेत चर्च इमारती ओस पडू लागल्या

विवेक मराठी    26-Sep-2016
Total Views |

अमेरिकेत सध्या दर वर्षी चार हजार चर्चेस बंद होत आहेत. दुसऱ्या बाजूला दर वर्षी एक हजार नवी चर्चेस उभी राहत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. अमेरिकेतील चर्च इमारती यामध्ये मुख्य फरक असा की येथील चर्चा इमारती या वैभवी आहेत.  तरीही त्या बंद पडल्या आहेत. येथे चर्च इमारती उभ्या राहण्याची प्रक्रिया 500 वर्षांची आहे. पण त्यांचा संदर्भ संपण्याची प्रक्रियागेल्या पंचवीस वर्षांपासून वेगाने सुरू झाली आहे. येथील पन्नास टक्के ख्रिस्ती लोकसंख्या कोणत्याही चर्चला जोडली गेलेली नाही आहे. इ.स. 1980 साली प्रथम असे लक्षात आले की, चर्चशी संबंधित न राहण्याची प्रक्रिया वेग घेत आहे. त्या वर्षी दहा टक्के लोकांनी चर्च सदस्यत्व कमी केले.

पाच वर्षांत संपूर्ण युरोप, संपूर्ण ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिका या भागात 15 ते 30 टक्के लोकांनी ख्रिश्चन धर्माला 'नाही' असे सांगितल्यामुळे तेथे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे बहुतेक ठिकाणी ख्रिश्चानिटी अल्पसंख्य झाली ही तर समस्या आहेच, त्यापेक्षा मोठी समस्या आहे ती म्हणजे ख्रिश्चन धर्माला 'नाही' सांगण्याची ही त्सुनामी अशीच सुरू राहिली, तर त्या त्या ठिकाणाचा ख्रिश्चन धर्म पंचवीस वर्षांनंतर 25 टक्क्यांपेक्षाही खाली घसरण्याची शक्यता जाणकारांना दिसू लागली आहे. त्या दृष्टीने याची कारणमीमांसा करणारी हजारो पुस्तके निघू लागली आहेत. असे असले, तर जेथे ख्रिश्चन धर्मीयांचे 50 टक्क्यांच्या आजूबाजूला प्रमाण आहे किंवा कोठे शंभर टक्के लोकसंख्या आहे, अशा जगातील पन्नासापेक्षा अधिक देशात त्यावर फारशी चर्चा होताना दिसत नाही. कोठेतरी एखादी बातमी दिसते. यात कोठे आशादायक चित्र निर्माण झाले तर तेवढी बातमी मात्र लगेच दिसते. त्यामुळे त्या विषयाच्या बातम्यांवर नियंत्रण ठेवले जात असावे, या चर्चेला वाव मिळतो.

'ख्राईस्ट, वुई हॅव लेफ्ट बिहाइंड' अशा स्वरूपाची साऱ्या पुस्तकांची नावे आहेत. प्रामुख्याने ज्यांनी ख्रिश्चन धर्माची व युरोपीय राष्ट्रांची साऱ्या जगभर सत्ता असण्याचा काळ पाहिला आहे, ते लोक या विषयावर तेथे पोटतिडकीने चिंता व्यक्त करताना दिसतात. प्रामुख्याने 'तरुण पिढी आपल्यावर एवढी नाराज का झाली?' असा त्यांच्या काळजीचा विषय असतो. जगातील या अडीच खंडांचा विचार केला, तर तरुण पिढीने ख्रिश्चन धर्माला 'नाही' सांगितल्याचे प्रमाण 60 ते 85 टक्के आहे. सर्वसाधारणपणे धार्मिक विषयाला जी प्रसारमाध्यमे महत्त्व देतात, त्यांच्या हा विषय हाताळण्यास 'झुंडीच्या झुंडी' असा शब्द येतो.

काही प्रसारमाध्यमांनी धर्मविषयक आकडेवारीच्या अभ्यासाला प्राधान्य देणे 10-12 वर्षांपूर्वीच सुरू केले होते. 'टाईम' मॅगझीन, न्यूजवीक मॅगझीन, नॅशनल जिऑग्राफिक किंवा बीबीसी यांनी हा विषय एकेकदा हाताळून झाला आहे. दीड महिन्यापूर्वी ब्रिटनच्या पंतप्रधानपदावरून पायउतार झालेले डेव्हिड कॅमेरून यांनी मात्र ब्रिटनमध्ये या विषयावर अनेक चर्चासत्रांमध्ये हजेरी लावून आपली ठाम मते मांडली होती. पायउतार झाल्यावर ते राजकारणातून निवृत्त होण्याची शक्यता दिसते आहे. या विषयावर या देशाने फार काम करण्याची शक्यता आहे असे त्यांच्या काही भाषणात बोलून दाखवले आहे. ते लक्षात घेता ते निवृत्तिकाळात या विषयात अधिक रस घेण्याची शक्यता जाणवू लागली आहे. त्यांनी ज्या शब्दात या विषयावर टिप्पणी केली, ते शब्द असे की जगाच्या अनेक कोपऱ्यात जेहादी दहशतवादी त्यांच्या विस्ताराची छोटी संधीही सोडताना दिसत नाहीत. त्याच्या तुलनेत आपण मात्र झुंडीच्या झुंडीने स्वत:ला विसरत आहोत.

अमेरिकेतील फ्रान्सिस ए. शेफर इन्स्टिटयूट ऑफ चर्च लीडरशीपने या विषयाच्या अभ्यासाला 25 वर्षांपूर्वीच आरंभ केला, असे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे असे की, अमेरिकेत सध्या दर वर्षी चार हजार चर्चेस बंद होत आहेत. दुसऱ्या बाजूला दर वर्षी एक हजार नवी चर्चेस उभी राहत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. जगातील अन्य देशांतील चर्च इमारती व अमेरिकेतील चर्च इमारती यामध्ये मुख्य फरक असा की येथील चर्चा इमारती या वैभवी आहेत. बाहेरून आणि आतूनही प्रत्येक इंचाइंचावर त्याच्या वैभवी श्रीमंतीचा दाखला मिळत असतो, तरीही त्या बंद पडल्या आहेत. येथे चर्च इमारती उभ्या राहण्याची प्रक्रिया 500 वर्षांची आहे. पण त्यांचा संदर्भ संपण्याची प्रक्रियागेल्या पंचवीस वर्षांपासून वेगाने सुरू झाली आहे. येथील पन्नास टक्के ख्रिस्ती लोकसंख्या कोणत्याही चर्चला जोडली गेलेली नाही आहे. इ.स. 1980 साली प्रथम असे लक्षात आले की, चर्चशी संबंधित न राहण्याची प्रक्रिया वेग घेत आहे. त्या वर्षी दहा टक्के लोकांनी चर्च सदस्यत्व कमी केले. इ.स. 1990नंतर ही प्रक्रिया वाढू लागली. एकविसावे शतक सुरू झाल्यावर ती प्रक्रिया अधिक वेगवान झाली.

दर वर्षी एक हजार चर्चेस नव्या सुरू होत असल्याची प्रक्रिया सुरू असली, तरी दर वर्षी चार हजार चर्चेस बंद होत आहेत, असा अहवाल दशवार्षिक जनगणनेने दिला आहे. दर वर्षी सुमारे 27 लाख लोक आपले चर्च सदस्यत्व रद्द करताना दिसत आहेत. याचाच अर्थ असा की चर्चला सोडून देण्याचा प्रक्रिया झुडीझुंडीने सुरू झाली आहे. एखाद्या मोठया संस्थेकडे अमुक अमुक हजार सदस्य होते व ते आता नाहीत अशी ही फक्त आकडेवारीची प्रक्रिया नाही. चर्चवर मोठया प्रमाणावर नाराज होऊन आणि स्वत:चे जीवन विस्कळीत असतानासुध्दा बाहेर पडत आहेत. चर्चकडून त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण न झाल्याने ते बाहेर पडत आहेत ही वस्तुस्थिती पावलोपावली दिसत आहे. युनायटेड स्टेट्समधील प्रोटेस्टंट पंथाचे सदस्यत्व 50 लाखांनी कमी झाले, ते फक्त इ.स. 1990 ते 2000 या दहा वर्षांच्या काळात. 50 लाख हा आकडा तेथील प्रोटेस्टंट लोकसंख्येच्या साडेनऊ टक्के आहे. या काळात तेथील एकूण लोकसंख्या 24 लाखांनी, म्हणजे 11 टक्क्यांनी वाढली.

एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी, म्हणजे इ.स. 1900मध्ये दहा हजार लोकसंख्येमागे 27 चर्चेस असे प्रमाण होते. ते विसाव्या शतकाच्या आरंभीवर दहा हजारी 11 चर्चेस असे आहे. त्याचप्रमाणे लोक ख्रिश्चन आहेत, पण चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करत नाहीत अशा संख्येत साऱ्या जगातच वाढ झाली आहे. अशा लोकांच्यात चीनचा क्रमांक पहिला लागतो. दुसरा क्रमांक भारताचा लागतो. त्यानंतर मात्र युनायटेड स्टेट्सचा लागतो. चीन आणि भारत यांची पार्श्वभूमी लक्षात घेता तेथे असे असणे समजण्यासारखे आहे. पण हाच प्रकार यू.एस.मध्ये होणे ही फार मोठी घटना आहे. अमेरिकेतील निम्म्या चर्चमध्ये गेल्या दोन वर्षांत एकाही सदस्याची वाढ झालेली नाही.


ख्रिश्चन समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या चर्चची नोंदणीकृत सदस्य असणे आवश्यक असते. त्यांच्या धर्मगुरूला त्यांच्या संदर्भात अनेक अधिकार असतात. आपल्याकडे तशी स्थिती नसते. व्यक्तिगत पातळी, कुटुंबपातळी, मित्रमंडळ पातळी व समाजपातळी यावर अनेक धार्मिक, आध्यात्मिक, सुसंस्कारक्षम, योगाभ्यासक्षम अनेक उपक्रम सुरू असतात. धर्मपीठांकडे त्यांची नोंद नसते. पण सेमेटिक पध्दतीत नोंदणी व सदस्यत्व याला अपरिहार्य महत्त्व आहे. वीस वर्षापूर्वीच्या अभ्यासात चर्चचे सदस्य असूनही चर्चशी संबंध व संपर्क नसणे या आकडेवारीला महत्त्व आले. आम्हाला प्रथम अमेरिकेतील आकडेवारी धक्कादायक वाटली, म्हणून कॅनडातील व युरोपमधील आकडेवारी पाहिली, तेव्हा असे लक्षात आले की अमेरिकेपेक्षा कॅनडातील स्थिती गंभीर आहे व युरोपमधील स्थिती गंभीरतेच्याही पलीकडची आहे. अमेरिकेत वीस वर्षांपूर्वीच्या काळात पन्नास ते साठ टक्के सदस्य हे नोंदणीकृत सदस्य असूनही चर्चकडे फिरकत नाहीत, ही वस्तुस्थिती होती. कॅनडामध्ये अशी स्थिती होती की फक्त वीस टक्के लोकच चर्च प्रार्थनेला असतात आणि युरोपमध्ये प्रार्थनेला येणारांची संख्या आठ टक्क्यावर खाली आली होती. जे येणारे लोक होते, तेही नियमित येणारे नव्हते. नियमित न येणारांची संख्या 22 टक्के झाली होती. प्रत्येक पंथांच्या बाबतीत ही टक्केवारी किरकोळ फरकाने तशीच होती. आम्ही प्रामुख्याने प्रोटेस्टंट, ऑर्थोडॉक्स व इन्हॅन्जेलिकल पंथांची पाहणी केली. त्यांच्या 'अनियमितता' प्रकाराचाही आम्ही अभ्यास केला. आठवडयात एकदा प्रार्थनेची अपरिहार्यता असतानाही महिन्यातून दोन वेळा यापासून ते वर्षातून दोन-तीन वेळा अशी ती अनियमितता जाणवली. त्यात इ.सन 1995मध्ये साडेवीस टक्के लोक वारंवार येत असत. इ.स. 1999मध्ये ही संख्या 19 टक्के होती व इ.स. 2002मध्ये ही संख्या 18 टक्के होती.

अशी ही गंभीर स्थिती सावरायची कशी, यावर अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे. प्रत्येकाशी संबंध वाढवणे असे कार्यक्रम अनेक संस्थांनी हाती घेतले आहेत. तरी अमेरिकेपेक्षा युरोपची स्थिती दयनीय आहे. अमेरिकेतील या विषयाच्या चर्चेत याचा उल्लेख पदोपदी येतो. इ.स. 2025मध्ये अमेरिकेत फक्त 15 टक्के सदस्य चर्चमधील साप्ताहिक प्रार्थनेस पोहोचतील आणि त्यानंतरच्या 25 वर्षांत हे प्रमाण 11 ते 12 टक्क्यावर खाली येईल असा अंदाज व्यक्त होत आहे. युरोपमध्ये सध्याच हे प्रमाण आठ टक्के आहे, तर येणाऱ्या 30-35 वर्षांत ते प्रमाण 3 टक्के किंवा 4 टक्के असेल, अशी शक्यता अमेरिकेतील त्या फ्रान्सिस इस्टिटयूट ऑफ चर्च लीडरशीप या संस्थेच्या पाहणी अहवालात दाखवली आहे. त्या संस्थेच्या कामाचाच भाग असलेल्या डॉ. रिचर्ड फ्रेजीर यांनी तो अहवाल प्रकाशित केला आहे.

ख्रिश्चन विचार, ख्रिश्चन धर्मगुरू व ख्रिश्चन सामान्य माणूस यांच्यातील संवाद संपला असल्याचे चित्र वरील अहवालात स्पष्ट झाले आहे. धर्मगुरूंना अधिक नेटाने काम करता यावे म्हणून त्या सर्व पध्दतीच्या सुखसोयी उपलब्ध करण्यात आल्या. पण त्या सुखसोयींमुळेच त्यांचा सामान्य साधकापासून संपर्क तुटला आहे. तरुणाच्या मनाची भाषा व त्यांच्या समस्यांची भाषा धर्मगुरूंना समजेनाशी झाली आहे. अमेरिकेत ज्या चर्चमध्ये लोकांची ये-जा दिसते, तेथे निम्यापेक्षा अधिक लोक चर्चचे सदस्य नसलेले आणि ख्रिश्चनही नसलेले असतात. त्यांच्याशी संवादाचा कसलाही प्रयत्न होत नाही. असे ख्रिश्चन नसलेले लोक रविवारच्या धार्मिक विरंगुळा म्हणून येतात. पूर्वी चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र रेकॉर्ड तयार केले जायचे व प्रत्येक दिवशी त्याच्याशी संपर्क साधला जायचा. आता चर्चेच्या अधिकृत सदस्यांशीच संपर्क होताना दिसत नाही. त्यामुळे त्यापलीकडची यादी हा सध्या कार्यक्रम पत्रिकेचा विषयच राहिलेला नाही.

ख्रिश्चन धर्म नाकारलेले लोक काय करत आहेत, यात साहजिकच अनेक संस्था व अनेक विद्यापीठे काम करू लागली आहेत. समाजातील न्यायाधीश, प्राध्यापक व राजकारणी यामध्ये मुस्लीम धर्म स्वीकारणाऱ्यांची संधी वाढू लागली आहे. पण सर्वसाधारणपणे असे दिसते आहे की, अनेक लोक चीनमधील 'ताई ची', तिबेटमधील 'रेकी' आणि भारतातील 'योग' यांचा अनुभव घेत आहेत. ताई ची हे मूलत: चीनमधील मार्शल आर्ट म्हणजे कुंग फू, कराटे यांच्यासारखे व्यक्तिगत संरक्षण कौशल्याचे शास्त्र आहे. पण ताई चीमध्ये जीवनाकडे बघण्याची एक स्वतंत्र दृष्टी आहे. व्यक्तिगत संरक्षण कौशल्य यामध्ये पाश्चात्त्य विश्वात कोणाला फारसा रस नाही. पण त्यातील ध्यानधारणा आणि सूर्यनमस्कारासारखा प्रकार तेथे स्वीकारला जात आहे. रेकी हा प्रकार आपल्याकडे उपासनेवरील आधारित व्याधी उपचार म्हणून वापरला जातो. तिबेटमधील बौध्द मठातील काही गूढ योगाभ्यास सूत्रांचे ख्रिश्चन फादर उसोई यांनी दैनंदिनी आचरण पध्दती व उपचार पध्दती यात केलेले ते रूपांतर आहे. भारतीय पध्दतीचे नाव अजूनही 'योग' असे असले, तरी पतंजलीची योगसूत्रे समजून घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आणखी पंचवीस वर्षांनी या घटनांचे कशात रूपांतर होते, हे बघणे हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

9881717855