एक तरी ओवी...

विवेक मराठी    26-Sep-2016
Total Views |

नेतृत्व करणं किंवा एखादी गोष्ट अनेकांना बरोबर घेऊन स्वत:च्या जबाबदारीवर करणं हा माणसातला एक विशेष गुण आहे. तो प्रत्येकाकडे नसतो, शिकून येतोच असं नाही. ज्यांच्याकडे तो उपजत असतो, ते स्वत:च्याही नकळत सहज एका समूहाला पुढे नेण्याचं काम करतात. नेतृत्व याचा अर्थ राजकारणातील नेतागिरी किंवा पुढारीपणा मला इथे अभिप्रेत नाही. म्हणजे ते नेतेपण आहेच, पण अगदी रोजच्या छोटया छोटया घटनांमध्ये, कुटुंबांमध्ये, छोटया गटांमध्येही नेतृत्व सापडतंच की! किंबहुना हे नेतृत्व अधिक निःस्वार्थी, विधायक आणि समाजाला कणाकणाने पुढे नेणारं असतं.


आपल्या समाजात काय होत नाही, आपला समाज किती निष्क्रिय आहे, रस्ते कसे वाईट आहेत, कचरा कसा वाट्टेल तिथे टाकला जातो, किती लोक रस्त्यात पान खाऊन पचापचा थुंकतात, रहदारीचे नियम कसे पाळले जात नाहीत, प्लास्टिक वापरणं वाईट पण तरी कसं वापरलं जातं, विजेचा आणि पाण्याचा अपव्यय कसा होतो, झोपडयांची संख्या कशी वाढते आहे, फेरीवाल्यांनी कसे बेकायदा रस्ते व्यापले आहेत, मुलांवर अभ्यासाचं आणि दप्तराचं कसं ओझं पडतं आहे, इतर मुलांमुळे आपल्याही मुलांना कसं टयूशनला घालणं भाग पडतं आहे.... खरोखरच किती किती हे प्रश्न आणि किती वाईट हे जग... आजकाल या विषयांवर तासन्तास चर्चा करण्याची फॅशन आली आहे. घर, क्लब्ज, महिला मंडळं, किटी पार्टीज, सणासुदीला एकत्र आलेले लोक, शाळा-कॉलेजच्या स्टाफ रूम्स... जिथे जिथे लोक एकत्र येतात, तिथे तिथे या विषयावरची चर्चा रंगू शकते. मुंबईत किंवा मोठया शहरात तुम्हाला ट्राफिक जॅमचा सामना सतत करावा लागतो. मग काय, एकत्र जमल्यावर प्रथम ट्राफिकमुळे झालेली कोंडी, त्यामुळे झालेला उशीर आणि त्याचं समर्थन करणं सुरू होतं. समाजात फार मोठया संख्येने लोक प्रश्नांची चर्चा करताना दिसतात. पण एक गट असाही आहे की जो या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न यथाशक्ति करत असतो. त्यातही पुन्हा एक फरक आहे. काही लोक हे प्रश्न सोडवण्यासाठी गाजावाजा करतात, संघटना उभ्या करतात. तर ही कामं करण्यासाठी काही लोक अगदी शांतपणे पुढाकार घेतात आणि दिव्याने दिवा पेटावा तसे समविचारी लोक त्यांच्या विचारांशी सहमत होतात आणि ही संख्या हळूहळू वाढत जाते. मग आजूबाजूच्या परिसराच्या हवेतही हे तेज मिसळू लागतं.

माझ्याकडे गाणं शिकणारी एक मुलगी आहे अनुजा नावाची! कॉलेजमध्ये जाणारी आहे. रोज ट्रेनमधून प्रवास करते. एक विशिष्ट डबा, विशिष्ट ग्रूप! समोर बसणारी एक बाई रोज वेफर्स, केक असलं काहीतरी खाते आणि ट्रेनच्या खिडकीतून रॅपर बाहेर फेकून देते. अनुजाने हे पाहिलं आणि तिला म्हणाली, ''मॅडम, आप रॅपर बाहर मत फेंको ना, अपनी पर्स में रखो, घर जाने के बाद या ट्रेन से उतरने के बाद डस्ट बिन में फेंक देना!'' समोरच्या बाईने नाक मुरडलं. दुसऱ्या दिवशीसुध्दा तोच प्रकार! पण आज अनुजा सावध होती. बाईंचं खाणं संपताच अनुजाने हात पुढे केला. ''मै फेंक दूंगी उतरने के बाद। आप प्लीज मुझे दे दीजिये!'' बाईंनी पुन्हा नाक मुरडलं. अतिशय रागाने तो रॅपर अनुजाच्या हातात कोंबला आणि म्हणाली, ''क्या लडकी हो। बाहर देखो जरा, कितना कचरा है। एक भी पटरी, एक भी स्टेशन साफसुथरा नहीं है। मेरा एक उसमे फेकूंगी तो क्या आफत आएगी?'' अनुजा तिला म्हणाली, ''मॅडम, आप इस बारेमें थोडा उल्टा सोच के देखों । अगर हममें से हर एक व्यक्ती खुद का कचरा अपने साथ रखेगा और डस्ट बिन में फेंकेगा, तो स्थिती अपने आप बदल जाएगी। है ना?'' बाईंनी पुन्हा नाक मुरडलं. रोज अनुजाने हात पुढे केला की अगदी निर्लज्जपणे बाई आपला कचरा अनुजाकडे सुपुर्द करत असत. काही दिवस असेच गेल्यावर एके दिवशी बाई अनुजाला म्हणाली, ''क्या मिलता है तुम्हे हररोज यह कर के? पगली गयी हो तुम तो! मेरा एक रॅपर डस्ट बिन में फेंकने से क्या होगा?'' ''होगा? हो गया है। देखिये तो, हमारे डिब्बेमें जितनी भी महिलाएं है, उनमें से कोई भी अब कचरा ट्रेन से बाहर नहीं फेंकती। अब उन सब के पास कचरे के लिए एक कॅरी बॅग भी होता है। है ना दीदी?'' अनुजाने समोरच बसलेल्या दुसऱ्या बाईला विचारलं. ''Yes! You are right! मैं तो कचरा अब इधर उधर नहीं फेंकती। इतना ही नहीं, मैं हररोज मेरे बच्चे के स्कूल के बाहर खडे पेरेंट्स के भी रॅपर्स इकठ्ठा कर के डस्ट बिन में फेंकती हूँ। बदलाव जरूर आयेगा, आना ही चाहिये. बस ठान लेने की जरूरत है।'' समोरची कचरेवाली बाई काहीशी चकित आणि बरीचशी खजील झाली. रॅपर पर्समध्ये जाऊ लागला आणि तीही एके दिवशी अगदी उत्स्फूर्तपणे या छोटया चळवळीचा भाग झाली. 'जे जे उत्तम, उदात्त, उन्नत' त्याचा संस्कार करण्याचं वय म्हणजे बालपण! आणि समाजाला सर्वार्थाने स्वच्छ, वळणदार, नेटकं बनवण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या विशाल संघटना म्हणजे शाळा!

संस्कार सर्वच शाळांमध्ये होतात, नाही असं नाही. पण 'संघटित संस्कार' हा दूरगामी, चिरस्थायी आणि एखाद्या शिलालेखासारखा कोरीव असतो. मला आठवतात माझे शाळेतले ते विलक्षण दिवस! प्राथमिक शाळेत आम्हाला एक कार्ड दिलं होतं गणिताचं! त्यात 1 ते 100 अंक आणि पाढे होते. आमच्या मुख्याध्यापकांनी त्या कार्डचा इतका सुंदर उपयोग आम्हाला शिकवला होता - उभ्या, आडव्या, तिरक्या बेरजा, आडवे पाढे... हे सगळं आम्ही प्रार्थनेनंतर समूहस्वरात म्हणायचो. आठवीत असताना आमच्या शाळेत गायन हा विषय होता. गाण्यातला सर्वाधिक कठीण प्रकार म्हणजे विलंबित ख्याल! ही ख्यालाची बंदिश आमचे शेंडे सर 60 मुलींना इतकी सुविहितपणे शिकवत की बस! मुली काही फार सुंदर गात नसत. पण सरांचं शिकवणं आणि समूहस्वरात गाऊन घेणं फारच लक्षात राहिलं माझ्या! आज 400 ते 500 मुलांना एकत्र शिकवताना सरांच्या त्या खुब्या मला सटासट आठवतात.

'शाळा' नावाची लहान मुलांची एक अतिशय नितळ, तरल आणि संवेदनाक्षम संघटना आपल्या हाती आहे, हे अनेक शालेय संस्थांपैकी ज्या संस्थेच्या संचालक मंडळाला पूर्णपणे कळलं आहे, अशी एक संस्था म्हणजे आमची 'सांगली शिक्षण संस्था!' संस्थेच्या स्थापनेला नुकतीच 102 वर्षं पूर्ण झाली. संस्थेतील 35 शाळा, हजारो मुलं, त्यांचे पालक, शिक्षक आणि संचालक मंडळ सर्वांनीच संस्थेचं शताब्दी वर्ष अतिशय वाजत गाजत साजरं केलं. हे तुमच्या शाळेचं शताब्दी वर्ष आहे हे मुलांच्या मनावर बिंबवण्यात संस्था यशस्वी झाली आणि मुलांनी आपापल्या वर्गांमध्ये डोळयांचं पारणे फिटेल अशी सजावट, रांगोळया, रोशणाई केली. आठ हजार मुलांनी लेझीम खेळण्याचा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवला गेला.

आणि या वर्षी.... या वर्षी गोकुळाष्टमीचा मुहूर्त साधून संस्थेने संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या बावीस शाळांमधील मुलांकडून उत्तम पूर्वतयारी करून 'एक मिनिटात ज्ञानेश्वरी लेखन' हा अतुलनीय उपक्रम सिध्द केला. एक मिनिटात ज्ञानेश्वरी लेखन? कसं शक्य आहे?... आला ना विचार मनात? याचं एकच उत्तर! संघटित शक्ती आणि सुविहित यंत्रणा! खरं तर कुठल्याही कार्यालयात दिलेल्या कामापेक्षा जास्त काम करणं कुणालाही आवडत नाही. शिक्षकही त्यापेक्षा वेगळे थोडेच असणार? पण सांगली शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाने - विशेषत: अध्यक्ष नितीन खाडिलकर आणि उपाध्यक्ष जनार्दन लिमये यांनी ही संकल्पना आखली, सर्व शिक्षकांना सांगितली, त्यांना विश्वासात घेतलं आणि मग सगळयाच स्टाफचं एका विधायक, कार्यरत यंत्रणेमध्ये रूपांतर झालं. लेझीमच्या वेळी शिक्षकांना मिळालेली ऊर्जा त्यांनी ज्ञानेश्वरी लेखनाच्या वेळीही पणाला लावली आणि हा उपक्रम प्रत्यक्षात आला. यासाठी संस्थेने बरीच पूर्वतयारी केली. प्रत्येक मुलाला श्लोक वाटून देणं, तो रोज त्याच्याकडून सुमारे महिनाभर घटवून घेणं, त्यासाठी प्रत्येक मुलासाठी सुलेखन पुस्तक तयार करणं आणि विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळात तो सुवाच्य अक्षरात कागदावर लिहून घेणं. यासाठी बावीस शाळांमध्ये गोकुळाष्टमीच्या दिवशी एकाच वेळी सकाळी साडेआठ वाजता हे लेखन सुरू झालं आणि एक मिनिटात संपलं.

मला जेव्हा या उपक्रमाबद्दल कळलं, तेव्हा मुळात या संकल्पनेबद्दलच मला कौतुक वाटलं. ज्ञानेश्वरीशी एका श्लोकापुरता झालेला परिचय (जो उत्सुकतेतून वाढू शकतो), वळणदार अक्षर, ऱ्हस्व-दीर्घाचा नेमकेपणा, एका श्लोकाचं पाठांतर, त्याच्या अर्थाविषयी निर्माण होणारी जिज्ञासा हा या मूळ प्रकल्पाचा उद्देश आहे. एक श्लोकी ज्ञानेश्वरी लिहिण्याचा संकल्प खरं तर एका मिनिटात संपून जातो, पण त्यासाठी घेतलेले प्रयत्न मुलांना संघटितपणे काम करण्याची आणि त्याच वेळी वैयक्तिक विकासाची ऊर्जात्मक संजीवनी देत असतात. प्रकल्प, उपक्रम, त्याचा वेगळेपणा हे सगळं आगळंवेगळं आणि मुलांना आकर्षित करणारं आहे. घोषणा 'प्रकल्पाची' होते, तेव्हा तोच प्रधान हेतू असतो. पण काम सुरू झालं, तिला मेहनतीची जोड मिळू लागली की अंतिमतेकडे नेणारा प्रवास हा प्रधान हेतू बनतो. त्या प्रयासामध्ये हजारो मनं आनंदाने डोलू लागतात, लिहू लागतात, ज्ञानेश्वरीबद्दल बोलू लागतात, एकमेकांच्या अक्षराबद्दल अधिक दक्ष होऊ लागतात, चुका न करण्यासाठी सावध होऊ लागतात. प्रत्येकाच्या आत जागणारी उत्साहाची लहर आनंदलाटांच्या भव्य सागरात परिवर्तित होते. प्रयासाच्या प्रवासाची ही ऊर्मी, ऊर्जा अनावर असते, असीम असते. लहान मुलांच्या मनांवर हीच ऊर्जा चिरंजीव शिलालेखासारखी कोरली जाते. मुलांच्या भावी आयुष्यात येणारे अघटिताचे काळे ढग थोडेतरी विरळ करण्याचं काम हे असे संकल्प करत असतात.

जिथे जिथे समूह काम करतो, त्या त्या सर्व कार्यालयांमध्ये थोडीशी वेगळी वाट काढून समूहाला ऊर्जा देणारे आणि औदासीन्य दूर करणारे संकल्प, प्रकल्प कार्यान्वित करायला हवेत. शाळाशाळांमधून मुलांच्या विधायक विकासाची पावलं उचलली गेली पाहिजेत. नक्कीच, समाजमन अधिक सक्षम व्हावं म्हणून कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था आहेतच; पण 'असलं काहीतरी करणं' हे आपलं कामच नाही असं मानणाऱ्यांचाही एक फार मोठा गट आहे समाजातला! त्यांनीही पाऊल पुढे टाकावं. त्यांना ही कविताच सांगेल,

आता वागण्याची तऱ्हा

जरा निराळी असावी

अभंगाची एक तरी ओवी

अनुभवा यावी...

कलांगण  9594962586