सर्जनशील गणेशोत्सव

विवेक मराठी    03-Sep-2016
Total Views |

काही जण घरातील गणपतीसाठी पर्यावरणस्नेही मखर करताना जाणीवपूर्वक वेगवेगळे संदेश देणारे देखावे करतात. ते देखावे बघण्यासाठी अनेक जण मुद्दामहून लांबलांबून येतात. भांडूप पूर्व येथील भागवत कुटुंब हे पर्यावरणस्नेही आणि सामाजिक संदेश देणारी सजावट करणाऱ्यांपैकी एक. रा.स्व. संघाचे कोकण प्रांत सहसेवाप्रमुख विवेक भागवत आणि ज्येष्ठ पत्रकार शर्मिला भागवत हे दांपत्य गेली अनेक वर्षं अतिशय वेगवेगळया संकल्पनांवर आधारित मखरं तयार करत आहे.


णपती म्हटलं की उकडीचे मोदक आणि त्याच्याभोवतीची सजावट या दोन गोष्टींना पर्याय नाही. भाद्रपद शु. चतुर्थीला गणपती घरात येणार असले, तरी नित्यनेमाने येणाऱ्या या लाडक्या पाहुण्याच्या आगमनाचे वेध लागतात ते 'यंदा मखर काय करायचं?' या प्रश्नातून... कोणी ताज्या फुलांची आरास करतं, तर कोणी थर्माकोलचे देखावे उभे करतं. कोणी कागदाच्या वस्तूंपासून मखर तयार करतं, तर कोणी झगमगते दिवे टांगतं. मात्र गेल्या काही वर्षांत सर्वसामान्यांमध्ये रुजू लागलेल्या पर्यावरण रक्षणाच्या भानामुळे, इकोफ्रेंडली मखर करण्याची पध्दत सुरू झाली आहे.

यातही काही जण पर्यावरणस्नेही मखर करताना जाणीवपूर्वक वेगवेगळे संदेश देणारे, माहितीपूर्ण असे देखावे करतात. भांडूप पूर्व येथील भागवत कुटुंब हे पर्यावरणस्नेही मखर करणाऱ्यांपैकी हौशींपैकी एक. पत्रकार शर्मिला भागवत आणि रा.स्व. संघाचे कोकण प्रांत सहसेवाप्रमुख विवेक भागवत हे दांपत्य गेली अनेक वर्षं अतिशय वेगवेगळया संकल्पनांवर आधारित मखर तयार करत आहे.

''आम्ही 1990 साली भांडूप पूर्वेला राहायला आलो. त्यानंतर साधारण 1993पासून आम्ही या घरात गणपती आणायला सुरुवात केली. तोपर्यंत गणपती गावी असायचा आणि त्यासाठी सासू-सासरे गावी जायचे. गणपती इथे आणायला सुरुवात केली तेव्हाच ठरवलं होतं की थर्माकोल, प्लास्टिक असं काहीही सजावटीसाठी वापरायचं नाही. आमच्याकडे एक लाकडी टेबल होतं आणि त्याला मागे मोठा आरसा होता, त्या टेबलावर आम्ही गणपती बसवायचो. बंदिस्त मखरात गणपती करायचा नाही, असं सासऱ्यांचं मत होतं. घराच्या अंगणात भरपूर फूलझाडं, शोभेची झाडं होती, त्यामुळे आम्ही त्याचीच सजावट करायचो. सुरुवातीची दोन-तीन वर्षंप्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणल्यानंतर मात्र आम्ही कायम शाडूची मूर्ती आणायला सुरुवात केली.'' शर्मिला भागवत सांगत होत्या.

1997च्या सुमारास त्यांच्या घराचा विस्तार करण्यात आला. त्याच वर्षी त्यांच्या मुलीचा - संहिताचा जन्म झाला. घर मोठं झाल्यावर मखरासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण आणि ज्यात सामाजिक संदेश असेल अशी सजावट करावी, असं भागवत यांना वाटलं. त्याविषयी शर्मिला सांगतात, ''गणपती ही बुध्दीची देवता. त्यामुळे तिची सजावट करताना बुध्दीला चालना देणारं काहीतरी तयार करावं असं मला वाटलं. त्यामुळे आपल्याही बुध्दीला थोडीशी चालना मिळेल, त्यायोगे थोडंसं संशोधन होईल हाही विचार होता.''


पहिल्या वर्षी भागवत कुटुंबीयांनी गणपतीची वेगवेगळया रूपातली छायाचित्रं सजवलेल्या भिंतीवर कोलाज करून चिकटवली होती. त्यात वादन करणारा गणेश, कॉम्प्युटर चालवणारा गणेश, लिहिणारा गणेश अशी गणपतीची वेगवेगळी रूपं होती. त्यावर्षी ज्येष्ठ पत्रकार मुजफ्फर हुसेन दर्शनाला आले असता त्यांच्यासोबत तिथे आय.आय.टी.चे काही विद्यार्थीदेखील उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी विश्वरूप गणेश ही संकल्पना सुचवली. दुसऱ्या वर्षी विश्वरूप गणेश ही संकल्पना घेऊन भागवत यांनी सजावट केली होती. जगभरातील गणपतीची रूपं यात साकारली होती. मलेशियातील गणपती, अमेरिकेतील गणपती, कंबोडियातील गणपती, त्यांची थोडी माहिती अशी स्वरूपात मांडणी करण्यात आली होती.

''एका पेपरच्या पुरवणीसाठी मी काम करत होते. गणपती विशेषांकांनिमित्त वेगवेगळे विषय हाताळले जायचे. त्याचाही आधार मखर करताना आम्हाला मिळत होता. साधारण 2000 साली आम्ही गणपती सिम्बॉलिझम हा विषय सजावटीसाठी निवडला. गणपतीचे निरनिराळे अवयव, त्याची आभूषणं, चित्र वापरून आम्ही गणपतीचं मखर तयार केलं. उदाहरणार्थ - गणपतीचं पोट मोठं का, त्याची सोंड काय सांगत असते, त्याला पितांबर का नेसवतात, त्याला मोठे कान का असतात, त्याला मोदक का आवडतात असे अनेक मुद्दे आम्ही यात घेतले होते. आमची मुलगी मोठी होत होती. तिलादेखील संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि तिने स्वतःहून या सगळयात सहभागी व्हावं यासाठी तिला आवडतील असे आणि तिच्या जिज्ञासा पूर्ण करतील असेच विषय आम्ही निवडत होतो.''

2003 साली भागवत यांच्या घरी 'चौदा विद्या, चौसष्ट कला' हा विषय घेऊन गणपतीची सजावट करण्यात आली होती. चौदा विद्या कोणत्या, चौसष्ट कला कोणत्या याची अनेकांना माहिती नसते. त्यांची माहिती, त्यांची वैशिष्टयं स्पष्ट करणारे माहितीचे फलक भिंतीवर लावण्यात आले होते. अनेकदा त्या विषयावर माहिती लिहून लावणं पुरेसं ठरत नाही. अशा वेळी काही चलतचित्र किंवा मॉडेल बनवूनही ठेवली गेली, अर्थात तीही इकोफ्रेंडलीच. कागद किंवा पुठ्ठयापासून बनवलेली.

1857च्या स्वातंत्र्यसंग्रामाला दीडशे वर्षं पूर्ण झाली, तेव्हा स्वातंत्र्यसंग्रामाची महती, इतिहास सांगणारा तर वंदे मातरम्ला शंभर वर्षं झाली तेव्हा त्या गीताचं महत्त्व विशद करणारा देखावा उभा करण्यात आला होता. शर्मिला सांगत होत्या, ''सुरुवातीच्या काही वर्षांनंतर केवळ छापील माहिती देणं अपुरं वाटायला लागलं. मग आम्ही दृक-श्राव्य माध्यमांचा आधार घ्यायला सुरुवात केली. कधी व्हिडिओच्या माध्यमातून, तर कधी ऑडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून 5-10 मिनिटांचं सादरीकरण आम्ही दर्शनाला येणाऱ्यांसाठी ठेवायचो. त्याचा अधिक चांगला परिणाम दिसून आला. माहितीच्या फलकांपेक्षा अधिक परिणामकारक माहिती या माध्यमातून आम्हाला देता आली.''

सफरचंद, केळी, पेरू यांसह लोकांना आवडणारी पण सहसा बाजारात न आढळणारी पपनस, रामफळ अशी फळांसह त्यांची संपूर्ण माहिती देणारा देखावा 2008 साली त्यांच्याकडे करण्यात आला होता. पूर्णपणे पक्व फळं किंवा भाज्या यांच्या नैसर्गिक रंगांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यावर नुकतंच परदेशात संशोधन झालं होतं. फळांवर देखावा करताना त्या माहितीचा गोषवारा या देखाव्यात घेण्यात आला होता. यासाठी खऱ्याखुऱ्या फळांचा वापर करण्यात आला होता. माहिती मिळवण्यासाठी अनेकांनी स्वतःहून मदत केल्याचं त्या मुद्दामहून नमूद करतात.

''हल्ली सजावटीची संपूर्ण जबाबदारी नव्या पिढीने घेतली आहे. स्वतःची कल्पकता आणि कलात्मक दृष्टी वापरून मुलगी व तिच्या मैत्रिणी सगळी सजावट करतात. गणपतीची सजावट हा सुरुवातीला घरापुरता अभ्यासाचा विषय होता. लोकांना समजायला लागलं, तसतसं अनेक जण स्वतःहून रस घेऊन वेगवेगळे विषय सुचवायला लागले, त्यासंबंधी माहिती पुरवायला लागले. आजूबाजूच्यांची वाढलेली जिज्ञासा पाहून खरंच बरं वाटतं.'' असं शर्मिला सांगतात.

 2009 साली 'गोग्राम' या संकल्पेवर आधारित सजावटीत गो-उत्पादनं, त्यांचं महत्त्व, त्यांचे औषधी गुणधर्म, त्यांची निर्मिती प्रक्रिया, त्यांची भारतातील निर्मितीच्या पध्दती यांची माहिती देण्यात आली होती. त्यासंबंधीचं मॉडेलही तयार करण्यात आलं होतं. एका वर्षी 'मंदिरसंस्कृतीचा विश्वसंचार' असा विषय घेऊन देखावा उभा करण्यात आला होता. जगभरातील गणपतीची मंदिरं, त्यांच्या रचना, बांधकामाची वैशिष्टयं यांचा त्यात समावेश होता. 2012 साली स्वामी विवेकानंदांच्या सार्धशतीचं औचित्य साधून त्या विषयाशी संबंधित देखावा करण्यात आला होता. तर एकदा 'पुष्पम् समर्पयामि' अशा संकल्पनेवर देखावा तयार करण्यात आला होता. वेगवेगळया फुलांची माहिती या देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आली होती. या वेळी जास्वंदीचं मोठं फूल भिंतीवर रंगवून त्यात फुलांच्या वेगवेगळया भागांची माहिती देण्यात आली होती. एकदा 'सेंद्रिय शेती' या विषयावर देखावा करण्यात आला होता. गणपतीला वाहायच्या 21 पत्रींसंबंधीची माहिती व सजावट आणि औषधी वनस्पतीविषयक देखावा लोकांना विशेष भावणारा ठरला.

गणपती मखराच्या या उपक्रमाविषयी विवेक भागवत म्हणाले, ''अनेक छोटे छोटे विषय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या नजरेतून सुटतात. पण असे विषय समाजाच्या समोर येणं गरजेचं असतं. त्यातही आपण जे करतोय ते पर्यावरणाला पूरक असणंही आवश्यक आहे. पर्यावरणस्नेही उपक्रमांसाठी आज अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. पण त्यात काही प्रमाणात व्यावसायिक-सामाजिक गुंतवणूक असतेच. ती बाजूला ठेवून गणपती उत्सवाच्या निमित्ताने हे विषय लोकांपर्यंत प्रत्यक्ष जातात, विचार करायला लावतात. त्यांची जीवनशैली बदलायला कारणीभूत होतात आणि हेच अशा व्यक्तिगत उपक्रमांचं यश असतं. काही भव्यदिव्य करण्यापेक्षा साध्या, सहजसाध्य पण कल्पकतेला पूरक अशा गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. ''


भागवत यांच्याकडे मखरासाठी केलेली सजावट विसर्जनानंतरही काही दिवस घरात तशीच ठेवलेली असते. अनेकांना स्वतःच्या घरात गणपती असल्यामुळे दर्शनाला येणं शक्य होत नाही. असे लोक विसर्जनानंतर केवळ मखर बघायला म्हणून येतात. अनेक जण त्यांच्याकडचं मखर सार्वजनिक गणेशोत्सवात वापरण्यासाठी घेऊन जातात. गणपती दर्शनासाठी येणाऱ्यांना मिठाई-खवा-मोदक असा प्रसाद देण्याऐवजी घरी केलेल्या वडया, पंचखाद्य, खिरापत, चणे-कुरमुरे, ताजी फळं असा प्रसाद देण्यात येतो. गेल्या वर्षी तर चक्क त्रिफळा चूर्ण आणि ज्येष्ठमध पावडर प्रसाद म्हणून देण्यात आलं. फराळ देताना कटाक्षाने प्लास्टिकच्या किंवा थर्माकोलच्या प्लेट्स, ग्लासेस या वस्तूही टाळल्या जातात.

गणेशोत्सव पर्यावरणस्नेही असणं ही आज काळाची गरज आहेच. यापुढे जाऊन, भागवत कुटुंबीयांचा गणपती उत्सव केवळ पर्यावरणस्नेही न राहता तो संशोधनवृत्तीला चालना देणारा, जिज्ञासापूर्ती करणारा आहे, त्याचबरोबर स्वास्थ्याचीही काळजी घेणारा आहे. त्यांची सामाजिक जाणीव, अनुभवसंपन्नता, जिज्ञासू वृत्ती आणि त्यांना वाट करून देण्यासाठी वापरलेले गणेशोत्सवाचं माध्यम हे निश्चितच अनुकरणीय आहे.   

9920450065