पवारांचे संकेत

विवेक मराठी    03-Sep-2016
Total Views |

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार शरद पवार यांनी मागच्या आठवडयात संभाजीनगरमध्ये आणि मुंबईत काही वक्तव्ये केली आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी यावर चर्चांची गुऱ्हाळे चालू केलीअसली, तरी प्रिंट मीडियातील लोकांनी त्यावर फारसे भाष्य केले नाही. मात्र वृत्तवाहिन्यांमुळे समाजमनावर त्याचा नक्कीच काहीतरी परिणाम झाला असणार. मुळात दोन्ही ठिकाणी शरद पवार यांनी ज्या विषयावर भाष्य केले, ते समाजजीवनात कायम धगधगते विषय राहिले आहेत. अशा विषयावर पवार जेव्हा बोलतात, तेव्हा तो सहज योगायोग नक्कीच नसतो. पवारांच्या प्रत्येक वाक्याला असंख्य छटा असतात आणि त्यातून प्रत्येक जण आपल्याला हवा तो अर्थ घेऊन काम करतो. पवारांची आजवरची राजकीय कारकिर्द आणि त्यांच्या पक्षाची वाटचाल पाहिली की हे सहजच लक्षात येते. मुळात शरद पवारांसारखा अभ्यासू आणि समाजातील तळागाळात संपर्क असणारा नेता महाराष्ट्रात नाही. त्यांना विकासाची दृष्टी आहे. नोकरशाहीवर जबरदस्त पकड आहे. या साऱ्याचा आधार घेऊन ते मागील काही वर्षांत महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करू शकले असते. पण विकासाची दृष्टी असणाऱ्या शरद पवारांचा राजकीय प्रवास मात्र गुन्हेगारी जगताशी संबंध, धनदांडग्यांचे समर्थन, जातीय समीकरण आणि भ्रष्टाचार या चार गोष्टींच्या आधाराने झाला. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन पुरोगामी महाराष्ट्राचा हा 'जाणता राजा' म्हणून गौरवलेला नेता पुरोगामित्वाची झूल पांघरून जातीय राजकारण करत आलेला आहे, याचा अनुभव वांरवार येत असतो. वरवर पुरोगामी वाटणारा हा इसम जातवादाचे समर्थन करतो. मतपेढी कायम करण्यासाठी त्यांनी मुस्लिमांचे वेळोवेळी लांगूलचालनही केले आहे. एका बाजूला फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करायचा, या महापुरुषांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र उभा करण्याची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला जातकेंद्री भाष्य करायचे आणि समाजात खळबळ निर्माण करून आपले राजकीय उद्दिष्ट साध्य करायचे, अशी शरद पवारांची आजवरची नीती राहिली आहे.


मागील काही वर्षांतील शरद पवार यांची व्यक्तव्ये वाचली की आमच्या म्हणण्याची साक्ष पटेल. 2009च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी जाहीरपणे राजू शेट्टी यांची जात विचारली होती आणि तीन-चार महिन्यांपूर्वी शरद पवार म्हणाले होते, ''फडणवीस आता छत्रपतींची नेमणूक करू लागले आहेत.'' संभाजीनगर येथे आणि मुंबईतील पत्रकार परिषदेतही शरद पवारांनी अशाच प्रकारची वक्तव्ये केली. ''ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करा'', ''एटीएसचे अधिकारी अल्पसंख्याक तरुणांचे इसिसच्या संशयावरून अटकसत्र चालवत असून ते कायद्याचा गैरवापर करत आहेत'' असे संभाजीनगरमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात वक्तव्य केले, तर मुंबई येथील पत्रकार परिषदेत त्यांनी आपली हीच भूमिका पुन्हा मांडली. फक्त ऍट्रॉसिटीबाबत त्यांनी थोडे स्पष्टीकरण दिले की या कायद्याचा काही ठिकाणी गैरवापर होतो आहे आणि तो राजकीय स्वरूपाचा आहे. प्रश्न असा आहे की या कायद्याचा राजकीय वापर करण्याची परंपरा कोणाच्या नेतृत्वाखाली विकसित झाली? आपल्या प्रतिस्पर्धाला जेरीस आणण्यासाठी हा कायदा वापरला जाऊ शकतो, ही प्रेरणा गावोगावीच्या गणंगांना कोणी दिली? दलित समाजाच्या संरक्षणासाठी असणारा हा कायदा राजकीय स्वार्थासाठी, आपल्या विरोधकांचे राजकीय जीवन संपवण्यासाठी वापरण्याकरता कोणी फूस लावली? या साऱ्यामागे दोन-अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आलेला भाजपा आहे असे शरद पवार यांना म्हणायचे आहे काय? आणि तसे नसेल, तर ऍट्रॉसिटी कायद्याचे राजकारण करण्याचे पाप कोणाच्या पदरात बांधायचे? शरद पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत या प्रश्नांची उत्तरे देऊन जर कायद्यात बदल करण्याची मागणी केली असती, तर कदाचित त्यांच्या मागणीचे समर्थन करणारा कोणीतरी पुढे आलाही असता. या साऱ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची पत्रकार परिषद आणि अलीकडची वक्तव्ये यांचा विचार करायला हवा. 

शरद पवार यांनी महाराष्ट्राला पुरोगामी दिशेने नेले अशी त्यांचे भाट नेहमीच आरती गात असतात. वास्तव तसे नाही. पुरोगामित्वाची झूल पांघरून त्यांनी कांगारूसारखे आपल्या पोटात जातवाद, भ्रष्टाचार आणि संघटित गुन्हेगारी यांना आसरा दिला आहे. हे सत्य झाकोळून जावे इतके मोठे पुरोगामित्वाचे अवडंबर शरद पवार यांनी उभे करण्यात यश मिळवले आहे. सुरुवातीपासून त्यांनी बेरजेचे राजकारण केले. वेगवेगळया जाती-जमातीचे नेतृत्व त्यांनी घडवले आणि आवश्यक तेव्हा ते नेतृत्व संपवलेही आहे. हे सर्व करत असताना त्यांनी कधी उघडपणे जातीय भूमिका घेतली नव्हती. त्यांची भाषा पुरोगामी महाराष्ट्राची आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची होती. मग आताच अशा प्रकारची जातीय भाषा शरद पवार का करत आहेत? कोपर्डी प्रकरणानंतर, म्हणजे 13 जुलैला घडलेल्या घटनेनंतर आता - म्हणजे ऑगस्ट महिना संपताना मराठा समाज जिल्ह्याजिल्ह्यातून मोर्चे काढत आहे. 'त्याच्या आयोजनात राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग नाही' असे स्पष्टीकरण देण्याची वेळ शरद पवारांवर का आली? या साऱ्याच्या मागे काय गोलमाल आहे? शरद पवार यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीचा अभ्यास करणारे सांगतात की ते एका दगडात अनेक पक्षी मारतात. असे जर असेल, तर संभाजीनगरचे भाषण आणि मुंबईतील पत्रकार परिषद यातून शरद पवार यांनी कोणावर निशाण साधले आहे? आपल्या या वक्तव्यातून शरद पवार यांनी भावी राजकारणाचे, उघडपणे जातीय राजकारण करण्याचे संकेत तर दिले नाहीत ना? असे असेल, तर पुरोगामी महाराष्ट्राचे कसे होणार? आणि फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा यापुढे कोण सांगणार? या प्रश्नाचे उत्तर आज काळाच्या उदरात बंद असले, तरी पवारांचे संकेत आणि त्यानुसार होणारे प्रकटीकरण यातून लवकरच एक नवे राजकीय-सामाजिक वास्तव आकाराला येऊ घातले आहे, हे मात्र नक्की.