जगातील मोठया उत्सवांपैकी एक गणेशोत्सव - 150 देशात होतो साजरा

विवेक मराठी    03-Sep-2016
Total Views |

 भारताचे आद्य ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी इ.सन 1920मध्ये त्यांच्या ज्ञानकोशाच्या पहिल्या खंडात म्हणून ठेवले आहे की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर तेव्हाच्या तरुण पिढीने प्रथम देशाच्या सीमा निश्चित कराव्या आणि ते करण्याची त्यांची पध्दती अशी की, जेथे जेथे गणपती पोहोचला आहे, त्या प्रत्येक ठिकाणी एक एक खुंटी ठोकून त्या साऱ्या खुंटया दोरीने बांधाव्यात. त्यातून तयार होईल तो बृहद् भारताचा नकाशा. गेल्या सव्वाशे वर्षांत गणेशोत्सव व गणपतीही अनेक ठिकाणी पोहोचला आहे. त्याचप्रमाणे यातील महत्त्वाची बाब म्हणजे गणेशोत्सवाच्या वाढीस विजापूरचा आदिलशहा दुसरा इब्राहिम यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे, कारण तो आदिलशहा  गणपती आणि सरस्वती या विद्येच्या दैवतांना आईवडील मानत असे. त्याच्या मुद्रेवरही तसा उल्लेख असे. पुण्याच्या कसबा गणपतीला त्याने 120 एकर जमीन दिली होती. तेच दैवत पुढे सार्वजनिक गणपतीचे मूलाधार बनले.

शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांनी गणेशपूजेस सामाजिक आणि राष्ट्रीय अधिष्ठान दिले. राष्ट्र पुनर्निर्माणाच्या महासंगरात गणेशोत्सवाला अग्रपूजेचा मान मिळाला. सतराव्या शतकात शिवाजी महाराजांना ज्या कारणासाठी स्वराज्य गणेशाची स्थापना करावी लागली आणि एकोण्ािसाव्या शतकाच्या अखेरीस लोकमान्यांना गणेशोत्सवाची स्थापना करावी लागली, त्या कारणासाठी एकविसाव्या शतकातही त्या जागरणाची आठवण विसरून चालणार नाही, कारण कदाचित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून पुन्हा अनेक ईस्ट इंडियन कंपन्या घिरटया घालत आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाची आवश्यकता भासू शकेल.      


णेशोत्सव हा देशाच्या फार मोठया भागात साजरा होतो. त्यामुळे तो राष्ट्रीय महोत्सव आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजराथ, मध्य प्रदेश, आंध्र आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू  होण्यास लोकमान्यांची प्रेरणा कारणीभूत आहे, हे स्पष्ट आहे. शिवाजी महाराजांनी बालवयातच 1636 साली पुण्यात पहिला गणेशोत्सव सुरू केला, त्याची वाढ 'प्रतिपश्चन्द्ररेखेव' होत राहिली. पण गणेशोत्सवाचा एवढा विस्तार होण्यात लोकमान्य टिळक वा छत्रपती शिवाजी महाराज यांची जेवढी र्निणायक भूमिका आहे, तेवढीच र्निणायक भूमिका विजापूरचा इ.स. 1579 ते 1627 दरम्यान गादीवर असलेला इब्राहिम दुसरा आदिलशहा याची आहे. वास्तविक विजापूरची आदिलशाही ही दीर्घकाळ मूर्तिभंजनासाठी प्रसिध्द आहे. तरी दुसरा इब्राहिम आदिलशहा यांचा गणेशोत्सवाच्या वाढीतील सिंहाचा वाटा दुर्र्लक्षण्यासारखा नाही, कारण तो देवी सरस्वती आणि ओम्कारमूलक गणपती या विद्येच्या दैवतांना आपले आई-वडील मानत असे. अठ्ठेचाळीस वर्षे आदिलशाहीवर असलेल्या दुसऱ्या इब्राहिमने स्वत:च्या प्रत्येक पत्राची सुरुवात सरस्वती आणि गणपती यांच्या वंदनाने केली आहे. याचा अर्थ त्याने इस्लामच्या राजकारणातील जेहादी वृत्ती सोडली होती असा नव्हे. इस्लामी राज्याचा विस्तार आणि गणेशभक्ती यापैकी दोन पर्याय त्याच्यापुढे निवडण्यासाठी आले असते, तर त्याने गणपती या दैवताच्या परंपरेचा आदर ठेवण्याचा पर्याय निवडला असता का, हे आज सांगता येणार नाही. तो पर्याय न निवडण्याची शक्यताच अधिक. त्याने लोकांच्या सदिच्छा मिळवण्यासाठीही हा र्माग स्वीकारला असेल. तरीही अन्य आदिलशाही सुलतानांच्या तुलनेत त्याची गणेशभक्ती दुर्लक्षण्यासारखी नाही. तो मनापासून गणेशभक्त असल्याची नोंद इतिहासाने केली आहे.

शिवाजी महाराज आणि लोकमान्य यांनी पुढे गणेशोत्सवाला राष्ट्रीय महत्त्व दिले, म्हणून आजचा गणेशोत्सव निम्म्या देशात मोठा महोत्सव सुरू आहे, त्यात आदिलशहाचाही वाटा आहे. त्याचा केवळ बादरायण संबंध नाही, तर एका सूत्रात बांधता येईल एवढा त्याचा प्रत्यक्ष संबंध आहे.

दुसऱ्या इब्राहिमच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. म्हणजे त्या दोहोंचा प्रत्यक्ष संबंध नाही. तसेच  श्ािवकालातील परंपरेतून लोकमान्यांच्या काळात गेलेला गणेशोत्सव हे दोन्ही पुण्यातील असले, तरी तो प्रवास मात्र दूरवरचा आहे. लाल महालातून किंवा शनिवार वाडयातून हा गणेशोत्सव दगडूशेठ हलवाई मंडळ किंवा लोकमान्यांचा गायकवाड वाडा येथे आला असे झालेले नाही, तो ग्वाल्हेरर्मागे आला आहे. लाल महालापासून गायकवाड वाडा किंवा दगडूशेठ हलवाई गणपती ही जागा एक किलोमीटरच्या आत आहे. तरी प्रवास 100 वर्षांचा आणि अडीच हजार किलोमीटरचा आहे.

दुसरा इब्राहिम आदिलशहा याची गणेशभक्ती ही महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे कारण आहे, असे मानले तर ती अतिशयोक्ती होऊ नये. अर्थात नंतर शिवाजी महाराज यांनी या विषयाला दिलेली चालना आणि लोकमान्य टिळक यांनी दिलेली चालना हा विषय त्याच्याशी जोडणे हे अतिशयोक्तीचे होणार आहे. आदिलशाही आणि मोगलाई यांना विटलेल्या सामान्य माणसाला आत्मविश्वासाचे सामर्थ्य यावे यासाठी शिवाजी महाराजांनी गणेशोत्सव सुरू केला.  प्रत्यक्षात त्या आदिलशहाने गणेशभक्तीची एक स्वतंत्र परंपरा सुरू केली हे खरे; पण राजमाता जिजाबाई व बालशिवाजी यांनी ती पुढे चालू ठेवली असा त्याचा प्रत्यक्ष संबंधही नाही. तरीही दोन्हीमध्ये भक्कम धागा आहे, तो म्हणजे ज्या गणेश मंदिरातील गणेशाच्या पूजेतून शिवाजी महाराजांनी ही परंपरा सुरू केली, त्या कसबा गणपतीला पूजेसाठी एकशे वीस एकर जमीन दिल्याचे बादशाही फर्मान आज उपलब्ध आहे. हे फर्मान कोणा सरदाराची देणगी नाही. ते शाही फर्मान आहे. नंतर या दख्खनच्या पठाराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मलिक अंबरनेही कसबा गणपती (त्या वेळच्या भाषेत मोरेस्वर देव) या दैवताची उपासना करण्यासाठी विशेष काळजी घेतली होती. शहाजी महाराजांनीही त्यांच्या परगण्यातील दैवत म्हणून त्याची काळजी घेतली होती. इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांनी या संदर्भात अनेक पुरावे पुढे मांडले आहेत.

कसबा गणपती हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ ठरला. हा प्रवास श्ािवकालाच्या आधीपासूनच बरीच ऐतिहासिक वळणे घेतलेला आहे. जिजाबाई, दादोजी कोंडदेव आणि बालशिवाजी ही मंडळी जेव्हा श्ािवनेरीवरून पुण्यात झांबरे पाटील यांच्या वाडयात आली, तेव्हा पुण्याची स्थिती भयानक म्हणजे स्मशानवत झाली होती. दुसऱ्या इब्राहिमनंतरच्या आदिलशहाने येथे भयंकर लूट केली होती, पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता, आणि झांबरे पाटीलांच्या वाडयासमोरील चौकात पहार ठोकून त्यावर वहाण (चप्पल) पालथी ठेवली होती. त्या वहाणेला हात लावणे हे आदिलशहाला आव्हान समजण्यात येईल, अशा फर्मानाने दहशत निर्माण केली होती. त्याविरुध्द 'ब्र' काढण्याची कोणाची हिंमत नव्हती. राजमाता जिजाबाईंनी ते आव्हान पेलले. कसबा गणपतीची पूजा चोरून चोरून चालत असे. जिजाबाईंनी त्या पूजेला बालशिवाजीला बसवले. अथर्ववेदातील शीर्षसूक्ताचा - म्हणजे गणपती अथर्वशीर्षाचा घनपाठ सुरू  झाला. चौकातील पहार व त्या वरील वहाण स्वत:हून फेकून दिली. जमीन नांगरण्यासाठी मुद्दाम छोटा नांगर घडविला. त्याचा फाळ सोन्याचा केला आणि बालशिवाजीच्या हस्ते भूमीचार् जीणोध्दार केला. श्ािवकालातील या उदाहरणाला अशासाठी महत्त्व आहे की, या देशातील लोकांचे स्वातंत्र्य आणि श्रध्दा यांच्यावर अत्याचाराच्या आधारे परचक्र लादणाऱ्यांच्या विरोधात लोकंाना आत्मविश्वासाच्या मुठी वळण्याचे सामर्थ्य त्यातून उभे राहिले. त्यापूर्वी नऊशे त्रेसष्ट वर्षांपूर्वी महंमद बिन कासीमचे आक्रमण झाले, तेव्हापासून म्हणजे जवळजवळ एक हजार वर्षे या देशातील लोकांचा आत्मविश्वासच नाहीसा झाला होता, तो परत मिळवायला सामर्थ्य हे शिवाजी महाराजांनी दिले. गणेशपूजेचे माध्यम झाले. पेशवाईत गणेशपूजा अधिक विकसित पावली. उत्तरेत स्वारीच्या निमित्ताने जे सरदार गेले, त्या सर्वांच्या बरोबर गणेशपूजा उत्तरेत गेली. बडोदा, इंदूर, उज्जैन, देवास, जबलपूर, ग्वाल्हेर, खांडवा येथे याच काळात गणेशपूजेच्या परंपरा निर्माण झाल्या. 

एकोण्ािसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात गणपतीला सार्वजनिक गणेशाचे जे रूप मिळाले, त्याला ग्वाल्हेरचा गणपती अधिक कारणीभूत आहे. 1891च्या सुमारास पुण्याचे वैद्य खासगीवाले ग्वाल्हेर येथे गेले असताना तेथे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गणेशपूजेमुळे ते प्रभावित झाले. मोठमोठया वाडयात, चौकात होणारे शास्त्रीय मनोरंजनाचे मेळे, नाटके, भाषणे, प्रवचने, हे कार्यक्रम त्यांना अतिशय आवडले. हा उपक्रम पुण्यात सुरू करावा आणि त्यासाठी लोकमान्यांची मान्यता मिळवावी, असे त्यांना वाटले. एकोण्ािसाव्या शतकातील शेवटची 15-20 वर्षे पुण्यात 'टिळकवर्षेच' मानली गेली होती. प्रत्येक गोष्टीवर लोकमान्य कसा विचार करतील असा विचार करण्याची तरुणांमध्ये एक प्रवृत्तीच निर्माण झाली होती. वैद्य खासगीवाले यांनी त्यांचे समवयस्क मित्र दगडू हलवाई, भाऊ रंगारी आदी मंडळींना गणेशोत्सवाची ही कल्पना सांग्ाितली. हा विषय आपण टिळक यांना सांगू अशी कल्पना पुढे आली. पण 'आधी केले मग सांग्ाितले' या विषयावर लोकमान्यांचे नुकतेच भाषण झाले होते. अर्ध्या दमडीची अफू घेतली की राष्ट्रोध्दाराच्या शेकडो कल्पना सुचतात, पण त्यातील एखादी राबवणेही कठीण असते, असे निराळया एका प्रसंगाने त्यांनी सांगून झाले होते. म्हणून या मंडळींनी प्रथम सार्वजनिक गणपती बसवले, काही कार्यक्रम ठरवले आणि नंतर ते लोकमान्यांना भेटायला गेले.  लोकमान्य तेव्हा सदाश्ािवपेठेतील विंचूरकर वाडयात राहत असत. त्यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना अतिशय आवडली. विसर्जनाच्या मिरवणुकीला आपण स्वत: येऊ असे त्यांनी सांग्ाितले. आणि त्या दिवशी सध्याच्या नगरकर तालीम चौकापासून सध्याच्या विजय टॉकीज चौकापर्यंत ते त्या मिरवणुकीत होते. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत लोकमान्य आल्याची बातमी आजूबाजूच्या पेठांतून वाऱ्यासरशी पसरली आणि पुढे प्रचंड गर्दीही झाली.

मिरवणुकीतून परत आल्यावर त्यांचे स्वीय सचिव धोडोपंत विद्वांस यांना त्यांनी डेस्कवर दौत-टाक घेऊन बसण्यास सांग्ाितले. विंचूरकर वाडयाच्या पहिल्या मजल्यावरील त्या 30 फूट लांब दालनात येरझाऱ्या घालण्यास सुरवात केली, आणि धोंडोपतांना म्हणाले, ''घ्या! या आठवडयाचे संपादकीय... आपले राष्ट्रीय उत्सव....''

त्यांच्या त्या संपादकीयाने स्वातंत्र्यचळवळीत एक अध्यायच सुरू झाला. गणेश मंडळाच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ लागले आणि त्यातून स्वातंत्र्यचळवळीचे अनेक उपक्रम उभे राहिले.


लोकमान्य कमी बोलण्याबाबत प्रसिध्द होते. पण जे बोलत ते वज्रलेप असे. हळूहळू हा विषय वाढत गेला. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी त्याचे अनुकरण होऊ लागले. लोकमान्यांनी गणेशोत्सवाला चालना दिली एवढया वाक्याने त्याचे महत्त्व कळणार नाही. लोकमान्य ज्या विषयाला हात लावत त्याला राष्ट्रीय महत्त्व मिळत असे. यात लोकमान्यांची काळाला भेदून चिंतन करण्याची शैलीच स्पष्ट होते. ज्या एका वाक्यामुळे ते देशाचे अनभिषिक्त नेते झाले तेही असेच प्रभावी होते. गणेशोत्सवाप्रमाणे हाही प्रसंग तेवढाच स्पृहणीय आहे.

लॉर्ड कर्झनने हिंदू-मुस्लिम यांच्यात फूट पाडण्याच्या तत्त्वावर बंगालची फाळणी जाहीर केल्यावर बंगालमध्ये संतापाची लाट उसळली. सारा बंगाल पेटला. त्या चळवळीला राष्ट्रीय रूप देण्याचे काम लोकमान्यांच्या एका वाक्याने केले. लोकमान्य म्हणाले,''हा वंगभंग नाही. हा तर भारत भंग आहे.'' या वाक्यामुळे पंजाबपासून मद्रासपर्यंत सर्वत्र बंगालच्या फाळणीच्या विरोधात आंदोलन उभे राहिले. बंगालमधील चळवळीला प्रथम महाराष्ट्रातून आणि नंतर प्रत्येक प्रांतांतून प्रतिसाद मिळाला. त्यातून बंगालमधील प्रत्येक माणूस शहारला. पुढे लोकमान्यांच्या स्वागताचा प्रचंड मोठा कार्यक्रम आयोजित झाला. त्या प्रचंड सभेत लोकमान्य येत असताना रवींद्रनाथ टागोर यांनीही अशाच प्रभावी शब्दात त्यांचेर् वणन केले. हजारो लोकांमधून लोकमान्य सभास्थानाकडे जात होते. त्यावर त्या साठ-सत्तर हजार लोकंाच्या उपस्थितीत रवींद्रनाथ एवढेच म्हणाले, ''हा तर शिवाजी!''

त्यामुळे सारा आसमंत शहारला. ज्या बंगालमध्ये एक एक हृदयाची जोपासना स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी केली होती, त्या बंगालमध्ये हृदयाहृदयात लोकमान्यांना अनभिषिक्त सम्राटाचे स्थान मिळाले. महाराष्ट्राचे लोकमान्य अवघ्या देशाचे लोकमान्य झाले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या तेज:पुंज राष्ट्रीयत्वाची धग लंडनमधील थेम्स नदीपर्र्यत जाऊन पोहोचली.

वंगभंगविरोधाची चळवळ हा काही गणेशोत्सवाचा भाग नव्हता. पण एकदा निर्माण झालेले स्फुल्लिंग प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटवत असते, त्याचे ते उदाहरण होते.

या सार्वजनिक उत्सवाने आता शताब्दी ओलांडली आहे. मध्य प्रदेशसह सर्व दक्षिणेतील जवळजवळ प्रत्येक गावात सार्वजनिक गणपती सुरू  झालेला आहे. दहा दिवसांचा गणेशोत्सव ही समाज एकत्र येण्याची पर्वणी असते.

स्वातंत्र्योत्तर काळात अनेक ठिकाणी या गणेशोत्सवाला विकृत वळण लागले. पण तरीही या महोत्सवाला चांगले वळण लावणारीही मंडळीही पुढे आली. पुण्यासारख्या ठिकाणी आज जवळजवळ 500 ठिकाणी भव्य आणि चांगल्या कार्यक्रमांचा गणेशोत्सव आहे. प्रत्येक राज्यात तेथील तेथील वैश्ािष्टये घेऊन गणेशोत्सव उभा आहे. आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी 40 दिवस गणपती बसतो. तेथील मूर्तीही 15 ते 40 फूट उंचीच्या असतात. तामिळनाडूतील आराशी म्हणजे रामेश्वर आणि मीनाक्षी मंदिर यांच्या प्रतिकृतीप्रमाणे असतात. केरळमध्ये दैनंदिन जीवनातही गणेशपूजेला महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्यक्ष गणेशोत्सवात त्याला नगर महोत्सवाचे स्वरूप येते. कर्नाटकातील गणेशोत्सवावर संस्थानिक परंपरेचा परिणाम आहे. गोव्यातील उत्सवप्रिय वातावरणात गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो.

गुजरातमध्ये या उत्सवाचा एवढा उत्साह असतो की गणेशोत्सव मूळचा महाराष्ट्राचा की गुजरातचा, अशी शंका यावी. 

गणेशोत्सव आता शतकोत्तर अंतर कापत आहे आणि जगातल्या दीडशे देशांत पोहोचला आहे. आगामी काळात या गणेशोत्सवात कदाचित काही आंतरराष्ट्रीय विषयही हाताळावे लागणे शक्य आहे. गेल्या चारशे वर्षांत आपापल्या पिंडप्रकृतीनुसार यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.  

9881717855