निसर्गसंवर्धक ट्री गणेश

विवेक मराठी    03-Sep-2016
Total Views |

गणेशोत्सव खऱ्या अर्थाने पर्यावरणस्नेही व्हावा, यासाठी आपल्याला काय करता येईल? असा प्रश्न दत्ताद्री कोत्तूर नावाच्या तरुणाला पडला आणि त्यातून साकारली ट्री गणेश ही संकल्पना. या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी त्याने तंत्रज्ञानाची साथ घेतली. ट्री गणेश संकल्पनेविषयीच्या पोस्ट्स फेसबुक-व्हॉट्स ऍपवर प्रचंड व्हायरल झाल्या आणि त्याला उदंड प्रतिसादही मिळाला. दत्ताद्री यांच्या या आगळयावेगळया संकल्पनेची माहिती देणारा हा लेख.....

हा लेख प्रकाशित होईपर्यंत महाराष्ट्रातील घराघरांमध्ये लाडके गणराय मुक्कामाला आले असतील. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या वाडया-वस्त्यांमध्ये उत्साहाला उधाण आलेलं असेल. पूजेतील मंत्रोच्चारणांनी वातावरण मंगलमय झालं असेल, आरत्यांच्या गजरांनी परिसर दणाणून गेला असेल. दर वर्षी नित्यनेमाने आपल्या घरी पाहुणचाराला येणारे गणराय येताना उत्साहाची शिदोरी सोबत घेऊनच येतात. देशाच्या सीमा ओलांडून गणेशोत्सव आता परदेशांमध्ये साजरा होऊ लागला आहे.

पर्यावरणस्नेही अर्थात इकोफ्रेंडली वस्तू हा सध्याचा परवलीचा शब्द. केवळ दैनंदिन वापरातच नव्हे, तर सणासुदीलाही अशी पर्यावरणस्नेही उत्पादनं आवर्जून वापरली जातात. गणपती असो वा नवरात्र, जाणते लोक सण साजरे होताना निसर्गाची  कमीतकमी हानी होईल याकडे कटाक्षाने लक्ष देतात. मग ते गणपतीचं मखर असो वा मूर्ती, सजावटीचं साहित्य असो वा खाण्या-पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिस्पोजेबल डिश आणि चमचे. काही जण तर या सर्वांचा वापर करून गणेशोत्सव खऱ्या अर्थाने पर्यावरणस्नेही पध्दतीने साजरे करतात. पण हे सारं पुरणार नाही, हे लोअर परळला राहणाऱ्या दत्ताद्री कोत्तूर यांना जाणवलं. गणेशोत्सव हा केवळ मखरातून किंवा शाडूच्या मूर्तीतून पर्यावरणस्नेही होणार नाही. यासाठी काहीतरी मुळापासून करायला हवं, असं त्यांना वाटलं आणि त्याच्या या कल्पनेतून साकारला 'ट्री गणेश'.

''आम्ही दक्षिण भारतीय असलो, तरी माझे आईवडील फार पूर्वीच मुंबईकर झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मराठी घराप्रमाणे आमच्याकडेही दर वर्षी गणेशोत्सव असतो. आमच्याकडे गणपती यायला लागला, तेव्हा प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असायची. त्याचे परिणामही गणपती विसर्जनानंतर दिसायचे. आपल्या लाडक्या देवाचे असे भग्न अवशेष पाहणं त्रासदायक वाटायचं. त्यामुळे काही काळानंतर आम्ही पाण्यात विरघळू शकणारी शाडूची मूर्ती आणायला लागलो, पण थर्माकोलचं मखर वगैरे होतंच. मी कमर्शिअल आर्टिस्ट झालो आणि त्यानंतर कागद, कापड वगैरे वापरून इकोफं्रेडली सजावट करायला लागलो. त्यातही निसर्गाशी संबंधित आणि काहीतरी संदेश देणाऱ्या मखराकडे माझा कल असायचा.'' दत्ताद्री सांगत होते.

निसर्गाला परतफेड

दत्ताद्री कोत्तूर यांनी पर्यावरणस्नेही मखर करायला सुरुवात केली असली, तरी केवळ निसर्गाची हानी होऊ न देणं म्हणजे पर्यावरणस्नेही नाही असं त्याला वाटतं. निसर्ग दर क्षणाला आपल्याला भरभरून देत असतो. या बदल्यात आपण परतफेड म्हणून निसर्गाला काय देऊ शकतो? असा विचार मनात आला आणि यातूनच त्यांना 'ट्री गणेश' ही कल्पना सुचली. ट्री गणेश म्हणजे दत्ताद्रीने तयार केलेला चिकणमातीचा गणपती. पण केवळ चिकणमातीची मूर्ती ही या ट्री गणेशची खासियत नाही.

याविषयी दत्ताद्री यांनी अधिक माहिती दिली, ''मूर्ती शाडूची असली तरी तिला निरनिराळे रासायनिक रंग दिलेले असतात. विसर्जनानंतर ते पाण्यात मिसळतात. म्हणजे या ना त्या प्रकारे निसर्गाचं नुकसान होतंच ना! हे मला खटकत होतं. 2015 साली घरातल्या गणपती उत्सवासाठी मी पहिल्यांदा चिकणमातीची मूर्ती तयार केली. चिकणमातीच्या या गणपतीच्या मूर्तीला मी ठरवूनच कोणताही रंग दिला नाही. अगदीच ओकंबोकं वाटू नये म्हणून फक्त कानांच्या कडा, नखं आणि कपाळावर नाम एवढाच भाग रंगवला आणि नेहमीच्या मूर्तींपेक्षा ही मूर्ती जास्त रेखीव आणि नैसर्गिक दिसायला लागली. या मूर्तीच्या पोकळीत मी झाडाच्या काही बिया आणि कंपोस्ट खत भरलं. गणपतीच्या मूर्तीचं आपण बादलीत विसर्जन करू आणि तो लगदा जमिनीतल्या खड्डयात भरू, असं घरच्यांना सुचवलं. विसर्जनाच्या पारंपरिक पध्दतीची सवय झालेली असल्यामुळे त्यांना राजी करायला खूप वेळ गेला, पण शेवटी ते तयार झाले.''

गुरूंकडून प्रेरणा

''माझे कलाक्षेत्रातील गुरू स्वतः गणपतीचा कारखाना चालवायचे. या वर्षी काही वैयक्तिक कारणामुळे त्यांना त्यांचा कारखाना बंद ठेवावा लागला. त्याच दरम्यान 2016 साली घरापुरती असलेली पर्यावरणस्नेही गणेशमूर्तींची कल्पना बाजारात आणण्याचा माझा विचार सुरू होता. माझ्याऐवजी या वर्षी तू गणेशमूर्तींचा कारखाना चालवशील का? असं त्यांनी विचारलं. त्याचबरोबर त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी मला मदत करण्यासाठी दिले आणि हळूहळू ट्री गणेश बाजारात येण्याची चिन्हं दिसू लागली.''

दत्ताद्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धारावीतल्या कुंभारवस्तीतून चिकणमाती आणून गणपती बनवायचं ठरवलं.  कुंभारवस्तीतून माती आणल्यामुळे ती वस्त्रगाळ असते, त्यामुळे तिच्यावर कोणतीही प्रक्रिया करावी लागली नाही. घरातल्या गणपतीसाठी आणलेला साचा होताच. जागेचीही सोय होती. त्यामुळे प्रकल्प सुरू व्हायला काहीच अडचण नव्हती.


प्रकल्प सुरू करण्याचं निश्चित झालं, पण तो लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा? हा प्रश्न होता. या वेळी दत्ताद्री यांना मदत मिळाली ती तंत्रज्ञानाची. त्यांनी स्वतःची वेबसाइट आणि फेसबुक लाईक पेज तयार केलं. तसंच प्रकल्पाची संपूर्ण माहिती देणारी चित्रं व्हॉटस् ऍपवर पाठवायला सुरुवात केली आणि हीच प्रकल्पाची खऱ्या अर्थाने सुरुवात ठरली. समाज माध्यमांनी आपलं काम एकदम चोख पार पाडलं होतं. त्याचप्रमाणे अनेक वृत्तपत्र-वृत्तवाहिन्यांनी या प्रकल्पाची दखल घेतली. निरनिराळया ठिकाणांहून त्यांना मूर्तीच्या मागणीसाठी फोन येऊ लागले. आपल्याला कितपत प्रतिसाद मिळेल याची शंका असलेल्या दत्ताद्री यांना फोन उचलायलाही वेळ मिळेनासा झाला. याविषयी ते सांगतात,

''हा प्रकल्प सुरू करताना मला शंका होती ती प्रतिसादाची. पारंपरिक पध्दतीने सण साजरे करणारे आपण सर्व हा असा न रंगवलेला गणपती आणि विसर्जनाची वेगळी पध्दत स्वीकारू शकू का असं वाटत होतं. मूर्तीची उंची 20 इंचाहून जास्त ठेवायची नाही, ही मर्यादाही आखलेली होती. पण या उपक्रमाला सुरुवातीच्या काळापासूनच इतका भन्नाट प्रतिसाद मिळाला की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयातच मला बुकिंग बंद करावं लागलं. या वर्षी मला 500 मूर्तींची ऑर्डर आहे. याहून अधिक ऑर्डर घेणं शक्य नव्हतं. कारण ट्री गणेश आम्ही हस्ते पोच करतो. पुढच्या वर्षी मात्र अधिक ऑर्डर घेण्याचा विचार आहे.''

Embeded Objectखऱ्या अर्थाने पर्यावरणस्नेही

दत्ताद्री यांच्याकडे 15, 18 आणि 20 इंचाच्या ट्री गणेशाच्या मूर्ती मिळतात. मागणीप्रमाणे या मूर्ती घरपोच पाठवल्या जातात. विशेष म्हणजे घरपोच देताना केलेल्या पॅकिंगमध्ये थर्माकोलचे तुकडे किंवा प्लास्टिक अजिबात वापरलं जात नाही. फायबरच्या ट्रेमध्ये मातीवर हा गणपती ठेवलेला असतो. तयार करतानाच या मूर्तीत भेंडीच्या बिया आणि कंपोस्ट खत भरलेलं असतं. फुलांच्या किंवा फळांच्या बिया का नाहीत? असं अनेकांनी दत्ताद्री यांना विचारलं, तेव्हा त्यांनी त्याचं शास्त्रीय कारण सांगितलं. मूर्ती तयार करायला अनेक दिवस लागतात. अशा वेळी बिया आतल्या आत खराब होऊ शकतात. भेंडीच्या बिया टिकायला आणि रुजायला सोप्या आहेत असं त्यांना समजलं. त्यानुसारच त्यांनी भेंडीच्या बिया मूर्तीत ठेवायचं ठरवलं.

घरी आणल्यावर आपण सजवलेल्या मखरात या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची. विसर्जनाच्या दिवशी उत्तरपूजा झाल्यावर गणपती एखाद्या कुंडीत ठेवून या गणपतीच्या मूर्तीवर रोज थोडं थोडं पाणी घालायचं, जेणेकरून ती मूर्ती हळूहळू विरघळत जाईल. किंवा त्याच दिवशी मूर्ती पाण्याच्या बादलीत विसर्जित करायची. तयार झालेला लगदा हा एखाद्या खड्डयात भरायचा. यातील बिया रुजतील व काही दिवसांनी तिथे रोप उगवेल. अर्थात गणरायांच्या निर्मितीपासून ते अगदी प्रतिष्ठापना होईपर्यंत व विसर्जनानंतरही खऱ्या अर्थाने पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद ट्री गणेशच्या माध्यमातून आपल्याला घेता येतो. हा सगळा उपक्रम करताना आपण जो रस दाखवतो, तोच तशीच मखर आणि अन्य सजावट करतानाही दाखवायला हवा. थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर न करता फुलांचे, कागद-कापडाचे मखर तयार करा व पर्यावरणसंवर्धनात भर घाला असंही दत्ताद्री कोत्तूर सुचवतात.

सण, व्रतवैकल्यं म्हणजे काय? तर उपवासाच्या, धार्मिक कृत्यांच्या साहाय्याने देवाच्या अधिक जवळ जाणं. निसर्ग हाच देव मानला तर कोणताही सण असो, कोणताही धार्मिक विधी असो, तो अधिकाधिक पर्यावरणसंवर्धक करणं ही आज काळाची गरज आहे. दत्ताद्री कोत्तूरसारखे अनेक तरुण यासाठी धडपडत आहेत. ट्री गणेशसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्गसंवर्धनाचं काम करत आहेत. अशा कामांची सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी असा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेणं म्हणजे निसर्गसंवर्धनाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल ठरेल.

9920450065

mrudula.rajwade@gmail.com