क्षितिज रंग जीवनचित्राचा पहिला रंग...

विवेक मराठी    10-Jan-2017
Total Views |

नवे पाक्षिक सदर

कपाट आवरताना जुने अल्बम सापडले आणि मन भुर्रकन भूतकाळात गेलं. साऱ्या फोटोंमधील एका फोटोवर नजर पडली अन् 'त्या दोघांची' प्रकर्षाने आठवण झाली.
आमच्या शेजारीच राहणारे माधव आणि त्याचा लहान भाऊ शुभम. माधव नेहमी पहिल्या क्रमांकाचा मानकरी. सर्व स्पर्धांमध्ये, खेळांमध्ये सहभागी व्हायचा अन् जाईल तिथे अव्वलच. तो भाषण करताना त्याच्याकडे आम्ही सारे जण डोळे भरून पाहायचो. शुभम माझ्या वर्गात होता, पण तो माधवच्या अगदी विरुध्द. एकटा एकटा राहायचा, 'तुझा भाऊ कसा नि तू कसा' असं अनेक जण त्याला म्हणताना मी ऐकलंय. सगळी शाळाच नकळत तुलना करायची त्यांच्यात. मलाही तेव्हा प्रश्न पडायचा, असं का? पण त्याला 'पिंडे पिंडे मति: भिन्न:' या सुभाषिताने उत्तर मिळालं. प्रत्येक व्यक्ती वेगळी. विसाव्या शतकात मानसशास्त्राने सांगितलं - माणसाला विशिष्ट ओळख देणाऱ्या गुणवैशिष्टयांनी त्याचं व्यक्तिमत्त्व बनतं.

माधवला मानसन्मान देणारा आणि शुभमला तुलना अन् अपमान देणारा एक घटक होता 'आत्मविश्वास'.

माधव आणि शुभम यांच्या आठवणीने आत्मविश्वासावर चिंतन करण्याची संधी दिली आपल्याला. आत्मविश्वास म्हणजे स्वत:वरील आणि स्वत:च्या क्षमतांवरील विश्वास. उदाहरण द्यायचं, तर शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना अचानक 'आज विज्ञानाची परीक्षा आहे' असं समजलं, तर ज्यांना 'आपण लिहू शकतो' असं वाटतं ते सहज स्वीकारतील, पण ज्यांना स्वत:बद्दल खात्री नाही, ते परीक्षा टाळण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न करतील.

कमी आत्मविश्वासाची काही लक्षणं आहेत. प्रथम आपल्या मनात नकारात्मक विचार येतात. 'हे मला जमणार नाही' हा संदेश सर्व शरीराला दिला जातो. भीती वाटते, शरीराला कंप सुटतो, शक्ती जाते, विस्मरण, बोलण्यातल्या चुका, धडधड ही लक्षणंही दिसतात. तोंडातून शब्दही फुटत नाही. 'यातून पळून जावं' असा सुटकेचा विचार येतो.

याउलट आत्मविश्वास. यशस्वी माणसाच्या जीवनचित्रातील पहिला रंग...

गुलाम राष्ट्रातून इंग्लड-अमेरिकेतील 'प्रगत' लोकांना वेदान्ताचे धडे देणारे स्वामी विवेकानंद, आपल्या अग्रलेखातून निर्भयपणे राजसत्तेच्या डोळयात झणझणीत अंजन घालणारे लोकमान्य यांच्यात हा स्वविश्वास किती ठासून भरलेला होता.

आत्मविश्वास आणि आत्मप्रतिमा या एकमेकांत गुंफलेल्या गोष्टी आहेत. आत्मप्रतिमेतून व्यक्तीचं स्वत:बाबतचं मत निश्चित होतं.

एकदा आमच्या शाळेतील व्याख्यानात व्याख्यात्यांनी विचारलं, ''तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण?'' कोणी ''आई'' सांगितलं, तर कुणी ''बाबा''. ते म्हणाले, ''चुकताय रे मुलांनो, हा माझ्याकडचा जादूगारच तुम्हाला खरं उत्तर देईल.'' त्यांनी एकेकाला पुढे बोलावलं आणि जादूच्या खोक्यामध्ये डोकावण्यास सांगितलं. त्यात असलेला 'आरसा' आम्हाला आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती दाखवत होता.

प्रथम आपल्या जीवनात आपलं महत्त्व समजून घ्यावं लागेल. स्वत:वर प्रेम करावं लागेल. त्यानंतर स्वत:ला ओळखण्याची प्रक्रिया सुरू होईल.

या संदर्भातली एक कथा आठवते मला. एक गरीब मुलगा असतो. साधारण 5-6 वर्षांचा. रंगाने काळा-सावळा. यावरून त्याला सारे जण चिडवायचे. एकदा त्याच्या घरासमोर एक फुगेवाला येतो. त्याच्याकडे सगळया रंगाचे फुगे असतात. हा मुलगा फुगेवाल्याकडे जातो आणि ''हा काळा फुगा उडतो का?'' असं विचारतो. त्याला होकारार्थी उत्तर मिळतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रश्न विचारतो. फुगेवाला म्हणतो, ''हो रे बाळा. तो पण उडतो.'' तरीही तिसऱ्या दिवशी मुलगा तोच प्रश्न त्याला विचारतो. शेवटी फुगेवाला तो काळा फुगा काढतो अन् अलगद आकाशाच्या दिशेने सोडतो. फुगा उंच-उंच जाताना पाहून मुलगा आनंदाने उडया मारू लागतो. फुगेवाल्याच्या सारं लक्षात येतं, तो मुलाच्या खांद्यावर हात ठेवतो अन् म्हणतो, ''अरे, फुगा काही रंगामुळे नाही उडत, तो उडतो त्यातील हवेमुळे.''

बघा ना, माणसाचंही तेच आहे. माणूस यशस्वी होतो ते त्याच्यातील क्षमतांमुळे, गुणांमुळे. म्हणूनच स्वत:ची ओळख करायची तर आपल्या क्षमता अन् कमतरता दोन्ही समजून घ्याव्या लागतील. क्षमतांच्या योग्य वापरावर आणि कमतरतांवर काम करावं लागेल.

जीवनात यश मिळवायचं, तर व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा विकास व्हायला हवा आणि त्यातला अग्रणी आहे आत्मविश्वास. तो आत्मसात करायचा, तर आपल्या दैनंदिन जीवनात काही सोप्या गोष्टी आपण करू शकतो. संयमाने त्या अंगी बाणवू शकतो.

या साऱ्या गोष्टी जर आपण प्रयत्नपूर्वक आणि नियमित केल्या तर आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला आपण ही आत्मविश्वासाची सुंदर भेट नक्कीच देऊ शकतो. आयुष्य अधिक सुंदर होण्यासाठी!!!

 

* नेहमी सकारात्मक विचार करावा. आव्हान घेतानाही सकारात्मकतेने स्वीकारावं.

* चूक होणं हा गुन्हा नाही. चुकांमधूनच माणूस शिकतो. त्यामुळे स्वत:च्या क्षमतेवर शंका घेणं टाळलं पाहिजे. इतरांनी केलेल्या टीकेने दु:खी होऊ नये. त्याचा शांतपणे विचार करावा. त्यात जे योग्य असेल तेवढं स्वीकारावं, अन्य गोष्टी सोडून द्याव्या.

* आपलं यश साजरं करावं, लहान-सहान गोष्टीत आनंद शोधावा. इतरांनी आपलं कौतुक केल्यास त्याचा स्वीकार करावा. आभार मानावेत. तसंच इतरांच्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करावं.

* आपल्याशी संबंधित विषयाची माहिती, ज्ञान मिळवत राहिलं पाहिजे. ज्याची माहिती नाही, असे प्रश्न कोणी केले असता 'आपल्याला याची माहिती नाही' हे स्पष्टपणे सांगावं.

* इतरांशी स्वत:ची तुलना करू नये. इतरांचं यश म्हणजे आपलं अपयश नाही, हे मनाला ठामपणे सांगावं.

* कठीण वाटणाऱ्या गोष्टींबाबत संयमाने टप्प्याटप्प्याने काम करावं. लहान-लहान ध्येय ठरवावीत.

* वेळेचं योग्य नियोजन केल्यास आपण काळाबरोबर पुढे सरकतो. त्यामुळे आत्मप्रतिमा सुधारण्यासाठी मदत होते.

* नवनवीन गोष्टींमध्ये रस घेऊन ते केल्यास आत्मविश्वास वाढतो.

* बोलण्यापूर्वी वा कोणतंही काम करण्यापूर्वी एकदा मनातल्या मनात सराव केला, तर प्रत्यक्ष कामाच्या वेळी अधिक आत्मविश्वासाने आपण ते करू शकतो.

* निरोगी, सुदृढ शरीरातच सकारात्मक आत्मप्रतिमा तयार होते. यासाठी नियमित व्यायाम, पौष्टिक आहार व पुरेशी झोप आवश्यक असते.

* आपला पेहराव आपल्या हालचालींमध्ये सहजता आणणारा असावा. अव्यवस्थितपणा, अजागळपणा यांच्याबरोबर भडकपणाही टाळला पाहिजे.

* बोलताना ज्याच्याशी बोलतो, त्याच्याकडे पाहून बोलावं. खूप वेगाने बोलणं टाळावं.

* चालणं, बसणं या कृतींमध्ये ऊर्जा असली पाहिजे.

* आत्मविश्वासाने मी परिपूर्ण होत आहे असं वाक्य रोज आरशात पाहून म्हटल्यास त्या जादूगाराची नक्कीच प्रचिती येईल.

* आत्मविश्वास आणि फाजील आत्मविश्वास यातील सीमारेषेचं भान असावं.

 

समुपदेशक

 9273609555, 02351-692000

ssuchitarb82@gmail.com