म्हातारी, मी आणि वर कुठेतरी घेतलेला निर्णय

विवेक मराठी    10-Jan-2017
Total Views |

वर कुठेतरी सरकारी पातळीवर निर्णय झालेला असतो आणि स्थायी समितीने दहा मशीन्स मागवलेली असतात. सिंगापूरच्या धर्तीवर. शहरातले चाळीस चौक स्वच्छ करायला. निवांतपणे मशीन आख्खा चौक स्वच्छ करत पुढे जात राहतं आणि ती म्हातारी कुठल्याशा अस्वस्थतेने कोपऱ्यात बसून राहते. मशीन दूर निघून जातं. चौक स्वच्छ झालेला असतो. म्हातारीचं गोणपाट आज रिकामं असतं. ती पूर्ण चौकात एक फेरी मारते. तिच्याकडे कुणाचंच लक्ष जात नाही. नेहमीच्या लोकांचंही नाही. ती शांतपणे चालू लागते, दूरदूर जाऊ  लागते. कधीही न परतणाऱ्या मार्गावर. क़ाही वेळेला वैयक्तिक घेतलेल्या निर्णयांचे समाजमनावर दूरगामी परिणाम होत असतात. असाच समाजमनाचा कानोसा घेणारे नवे पाक्षिक सदर आपण सुरू करीत आहोत.
मच्या बिल्डिंगमधून खाली उतरलात की लगेच चौक लागतो. नेहमी गजबजलेला, अगदी प्रातिनिधिक असा. चार रस्ते चार बाजूंनी अस्ताव्यस्तपणे एकत्र येतात तिथे. एका कोपऱ्यात वाण्याचं दुकान फूटभर रस्त्यावर आलेलं असतंय. तिकडे तो भाज्या मांडतो. वरती लावलेल्या हिरव्या रंगाच्या दिव्याने त्या दिवसभर ताज्या दिसत राहतात. दुसऱ्या कोपऱ्यात चहावाल्याने त्याचा संसार थाटलाय. त्याने दुकानासमोर टाकलेल्या बाकडयांवर दिवसभर गर्दी असते. एखादे टोपीवाले आजोबा, रोजंदारीवरचे मजूर, समोरच्या स्टँडवरचे रिक्षावाले, काळया काचांच्या गाडीतून उतरणारे 'गुंठामंत्री' आणि असे कित्येक जण. प्रत्येकाच्या वेगळया गप्पा, वेगळे विषय. सकाळी सकाळी आलात, तर तिकडे 25-30 वयोगटातल्या तरुणांची गर्दी असते. हातातला चहा संपवत ते कंपनीच्या बसची वाट बघत उभे असतात. त्यांच्या गळयात वेगवेगळया रंगाचे पट्टे आणि खांद्यावर बॅग असते. त्यांची ती गर्दी पाहून हा 'लेबर चौक' आहे काय, अशी शंका येऊ शकते. मात्र ते संगणक अभियंते असतात. त्यांना या शहरातले लोक 'IT'वाले असंही म्हणतात.

दुपारी कधी येऊन बसलात, तर चारपाच चुकार रिक्षावाले बाकडयांवर बसून अर्ध्या दिवसाची कमाई मोजत आकडे लावत असतात. चहाला उकळी येत जाते, तशी बाकडयांवरच्या गप्पांची रंगत वाढत जाते. ऊनकलतीच्या वेळी आलात, तर तीनचार म्हातारे फार पूर्वीच्या - म्हणजे त्यांच्या लक्षात असतील तेवढया जुन्या गावगप्पा एकमेकांना ऐकवत विडया ओढत असतात. समोरच महापालिकेचा बसथांबा असतो. तिथे महापालिकेच्या कमी आणि खाजगी गाडयाच जास्त थांबतात. गाडयांच्या गर्दीत, माणसांच्या कोलाहलात ओथंबणाऱ्या चौकाच्या मध्यभागी, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होईल अशा योग्य ठिकाणी चौकाच्या नावाचा बोर्ड असतो. ती त्या चौकाची ओळख असते.

ती त्या चौकात रोज सकाळी येते. ठरलेल्या वेळेला. तिच्या हातात एक झाडू असतो आणि पाठीला मोठ्ठालं गोणपाट. चार रस्त्यांच्या कडेकडेने झाडते आणि गोळा होणारा कचरा गोणपाटात भरत  जाते. एका कोपऱ्यातल्या टपरीपासून सुरुवात करत ती झाडत जाते आणि उडणाऱ्या धुळीसोबत गोळा होत जातात असंख्य गुटख्याची पाकिटं, सिगारेटींची थोटकं आणि चुरगाळून टाकलेले कागद. ती सारं काही पाठीवरच्या गोणपाटात भरत जाते आणि पुढे सरकते. पुढे सरकण्याआधी टपरीवाला तिच्या हातात एक विडी टेकवतो. वाण्याच्या दुकानासमोर ती थोडा जास्त वेळ थांबून नीटपणे झाडते. तिने रस्ता झाडल्याशिवाय तो त्याच्या ताज्या हिरव्या भाज्या मांडून ठेवत नाही. दुकानासमोरचा सगळा कचरा गोणपाटात भरल्यावर काही वेळ त्याच्या पायरीवर रेंगाळते. गल्ल्यावर बसलेला शेठ ते पाहून उठतो. एका हाताने नाकाला लावलेला रुमाल तसाच ठेवून दुसऱ्या हाताने दहा-वीसची एखादी नोट काढून तिच्या हातात टेकवतो. ती पुढे सरकत राहते झाडू आणि गोणपाट घेऊन. काय काय पडलेलं असतं रस्त्यांच्या कडेला... प्लास्टिकच्या पिशव्या, रात्रभर चौकात दारू पिऊन फेकून दिलेल्या बाटल्या, चुरगळून फेकलेली जुनी बिलं, तिकिटं, वापरून फेकलेल्या असंख्य गोष्टी - ज्यात टूथपेस्टच्या संपलेल्या टयूबपासून ते चुरगळून फेकलेल्या प्रेमपत्रांपर्यंत सगळं काही असतं. ती सगळयांवर आपला झाडू फिरवत जाते आणि गोणपाट भरत जाते.

चौकाच्या एका कोपऱ्यात पोहे, मेदूवडे विकणारा असतो. त्याच्या आजूबाजूला नेहमी गर्दी असते. गर्दी सहजपणे तिला वाट करून देते. लोक तोंड फिरवतात, काही तोंड वाकडं करतात, काही एका हाताने आपली खाण्याची प्लेट झाकून घ्यायचा प्रयत्न करतात. ती सहजपणे पुढे जाते, कोपऱ्यात ठेवलेला कचऱ्याचा डब्बा - ज्यात लोकांच्या खरकटया प्लेट्स, प्लास्टिकचे चमचे, अर्धवट उरलेलं सांबार, फेकून दिलेली चटणी असं सारं काही असतं. ते ती उचलते आणि आपल्या गोणपाटात रिकामं करते आणि पुढे जात राहते. त्याच्या शेजारी फूलवली आजी दुकान मांडत असते. शिळी फुलं गोणपाटात टाकून ती पुढे सरकते. कधीकधी आजी तिच्या हातात एखादा गजरा ठेवते, तेव्हा ती खूश होते. एका कोपऱ्यात उभं राहून ती स्वच्छ झालेल्या चौकाचा अंदाज घेते. निघताना तिला कधीकधी एखादी प्लेट मेदूवडा किंवा पोहे मिळतात किंवा चहा करणाऱ्या पोराच्या हातून एखादा कप गरमगरम चहा. त्याने चहा दिला की खूपशा प्रेमाने ती त्याच्याकडे पाहते. चहा पिऊन झाल्यावर कप ठेवताना सहज ती त्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून जाते. कदाचित तिला तिचा नातू आठवत असावा.

चहा आटोपला की चौकाच्या एका कोपऱ्यात काळी छत्री उघडून चांभाराचं सामान घेऊन बसलेल्या आजोबांच्या शेजारी बसून टपरीवाल्याने दिलेली विडी ओढते. रोज सकाळी तीन-चार चौक झाडून पन्नासेक रुपये कमावणारी म्हातारी आमच्या चौकाचं अविभाज्य अंग झालेली असते. मला वाटत असतं, कचरा गोळा करणाऱ्या त्या म्हातारीला आणि चौकाला एकमेकांशिवाय करमत नसेल.

एक दिवशी नाश्ता करताना मला लक्षात येतं, एका कोपऱ्यात ती एकटीच बसलीये, रस्त्याकडे पाहत. निरपेक्ष नजरेने. मी आधी तिच्याकडे पाहतो आणि मग रस्त्याकडे. मला दिसतं रोड स्वीपिंग मशीन. दहा मिनिटात ते मशीन चारी रस्ते झाडून काढतं. धुळीचा एक कणसुध्दा उडत नाही. सगळा रस्ता स्वच्छ होत जातो. बाकडयावर बसलेला एक तरुण डोळयांवरचा गॉगल न काढता बाजूच्याला म्हणतो, ''भावडया, मशीन पाह्यलास काय? सिंगापूर होणारे आपलं शहर, सिंगापूर. उगाच नाय मत दिला आपण भाऊंना.'' बाजूला उभा असलेला 'IT'वाला त्याच्या सहकाऱ्याला सांगतो, ''This is automation bro. This is the future.''

माझ्या मनात विचार येतो, खरंय! आता कदाचित टपरीवाल्याला एक विडी द्यावी लागणार नाही, चहावाल्याचा रोजचा एक फुकटचा चहा वाचेल. शेठचे दहा रुपये आणि गल्ल्यावरून चालत बाहेर येण्याचा वेळ वाचेल. मग मला आठवतं पेपरमध्ये स्वीपिंग मशीनबद्दल वाचलेलं. वर कुठेतरी सरकारी पातळीवर निर्णय झालेला असतो आणि स्थायी समितीने अशी दहा मशीन्स मागवलेली असतात. सिंगापूरच्या धर्तीवर. शहरातले चाळीस चौक स्वच्छ करायला. निवांतपणे मशीन आख्खा चौक स्वच्छ करत पुढे जात राहतं आणि ती म्हातारी कुठल्याशा अस्वस्थतेने कोपऱ्यात बसून राहते. मशीन दूर निघून जातं. चौक स्वच्छ झालेला असतो. म्हातारीचं गोणपाट आज रिकामं असतं. ती पूर्ण चौकात एक फेरी मारते. तिच्याकडे कुणाचंच लक्ष जात नाही. नेहमीच्या लोकांचंही नाही. ती शांतपणे चालू लागते, दूरदूर जाऊ  लागते. कधीही न परतणाऱ्या मार्गावर.

उतरंडीच्या वर कुठेतरी असणाऱ्या चार डोक्यांनी मिळून घेतलेला एखादा निर्णय फार खाली राहिलेल्या कुणाला बघता बघता असा नामशेष करून जातो. चौक मात्र नेहमीसारखा त्याच्या माणसांत आणि कोलाहलात विरून जातो. मग मला जाणवतं की अरे, आपल्याला उगाचंच असं वाटत होतं की कचरा गोळा करणारी ती म्हातारी आणि तो चौक यांना एकमेकांशिवाय करमणार नाही.

9773249697