नोटबंदीमुळे मोदी गेले घरोघरी

विवेक मराठी    14-Jan-2017
Total Views |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून 1000च्या आणि 500च्या नोटा काढून घेण्याचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016 रोजी घेतला. 'दुसरा सर्जिकल स्ट्राईक' या शब्दात त्याचे वर्णन केले गेले. सर्व बेसावध असताना नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला. निर्णय घेताना लोकांत गोंधळ निर्माण होऊ नये, याची त्यांनी काळजी घेतली. नोटबंदीच्या एका निर्णयामुळे नरेंद्र मोदी हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात गेले. ज्या कुणाचा पैशाशी संबंध येतो, त्या प्रत्येकाला मोदी यांचे नाव घ्यावेच लागते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून 1000च्या आणि 500च्या नोटा काढून घेण्याचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016 रोजी घेतला. 'दुसरा सर्जिकल स्ट्राईक' या शब्दात त्याचे वर्णन केले गेले. सर्व बेसावध असताना नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला. निर्णय घेताना लोकांत गोंधळ निर्माण होऊ नये, याची त्यांनी काळजी घेतली. त्यांनी पुढील गोष्टी सांगितल्या - 1) तुमचा पैसा बँकेत सुरक्षित राहील. 2) 50 दिवसांच्या आत तुम्हाला जुन्या नोटा बदलून मिळतील. 3) बँकेतून ठरावीक रक्कम तुम्हाला काढता येईल. 4) एटीएममधूनदेखील काही दिवस फक्त 2000 रुपये काढता येतील. बाद केलेल्या नोटांऐवजी नवीन नोटा त्यांनी चलनात आणल्या. युध्दपातळीवर देशभर त्यांचा पुरवठा केला. आपला देश अतिशय विशाल आहे. देशातील कानाकोपऱ्यात एटीएम मशीनमध्ये नवीन नोटा घालण्याचे काम अतिशय वेगाने करण्यात आले. नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर मी काही दिवस परप्रांतात प्रवासाला गेलो होतो. त्या-त्या ठिकाणी मुद्दाम एटीएमच्या रांगेत उभे राहून पैसे काढले. रांगेत उभे राहण्यास मला साधारणत: 15 ते 20 मिनिटे लागत होती. माझ्या ओळखीचा मी काहीही उपयोग केला नाही. माझ्या अनुभवावरून एटीएममध्ये उभे राहण्याचा त्रास फक्त 10 ते 12 मिनिटांचा होता आणि सामान्य माणूस आनंदाने एवढा त्रास सहन करतो. आठवडयातून अनेक दिवस मला मुलुंड ते ठाणे गाडी पकडण्यासाठी 15 ते 20 मिनिटे प्लॅटफॉर्मवर उभे राहावे लागते. तेव्हा तक्रार कोणाकडे करायची?

नोटबंदीच्या एका निर्णयामुळे नरेंद्र मोदी हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात गेले. ज्या कुणाचा पैशाशी संबंध येतो, त्या प्रत्येकाला मोदी यांचे नाव घ्यावेच लागते. चलनी नोटांवर महात्मा गांधीचे नाव आहे, पण चलनात मोदींचे नाव आहे. देशनेता आपल्या कर्तृत्वाने सर्व देशाला माहीत व्हावा लागतो. काही राजनेते लोकांपुढे सतत राहण्यासाठी नौटंकी करीत राहतात. अत्यंत खुळचट बोलतात. सध्या या बाबतीत अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यात स्पर्धा लागली आहे. महात्मा गांधी आणि मोदी यांची प्रसिध्दी व केजरीवाल, ममता बॅनर्जी यांची प्रसिध्दी यांच्यात फार मोठे नैतिक अंतर आहे. 'सर्व काही समष्टीसाठी' हा गांधी आणि मोदी यांचा जीवनमंत्र आहे, तर केजरीवाल आणि ममता यांचा मंत्र 'सर्व काही स्वत:साठी' असा आहे.

निश्चलनीकरणामुळे लोकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते, लोकांचे हाल होतात, अशा बातम्या आणि फोटो वारंवार येत होते. काही बँकांपुढे खरोखरच रांगा होत्या. परंतु रांगेत उभे राहणाऱ्यांची मानसिकता कोणती होती? तो नरेंद्र मोदी यांना शिव्या देत होता का? सामान्य माणूस रांगेत उभे राहण्याचा त्रास असूनही आनंदी होता. त्याला एक गोष्ट समजली होती की, ज्या श्रीमंतांनी आपला पैसा या मोठया नोटांमध्ये दडवून ठेवला आहे, ते आता उघड होईल किंवा त्यांच्या पैशाला वाळवी लागेल. या काळया पैशामुळे महागाई वाढते आणि गुन्हेगारीदेखील वाढते. या दोन्ही गोष्टींतून माझी सुटका होणार आहे, याचा त्याला आनंद होता.

नोटबंदीचा मुद्दा न्यायालयात गेला. एखादा प्रश्न न्यायालयात गेला की न्यायालयाला त्याचा विचार करावा लागतो आणि आपले मत द्यावे लागते. न्यायालय आपणहून कोणता प्रश्न आपल्याकडे आणीत नाही. नोटबंदीमुळे बँकांपुढे मोठमोठया रांगा लागल्या आहेत, लोकांना त्रास होत आहे, तर तो त्रास कमी होण्यासाठी काही उपाययोजना करा, हे कोर्टाने सांगितले आणि नीट काळजी घेतली नाही तर लोक दंगे करतील. सर्वोच्च न्यायालयाचे हे वाक्य साधारणत: कुणालाही आवडले नाही. काहींनी त्याचा असा अर्थ काढला की न्यायालय लोकांना दंगे करायला सांगते आहे का? अर्थात हा अर्थ सर्वस्वी चुकीचा आहे. समाजात शांतता आणि सुख कसे नांदेल, याची न्यायालयाला चिंता असते. लोकांनी काही दंगे केले नाहीत. अपवादात्मक एखादी घटना घडल्यास कुठे अतिप्रसंग घडल्याचेही उदाहरण नाही. जनतेने सार्वजनिक शिस्तीचे जे दर्शन घडविले आहे, ते अभूतपूर्व आहे. समाजात शिस्त असायला हवी आणि ती लोकांनी आपणहून पाळली पाहिजे, हे सशक्त समाजाचे लक्षण समजले जाते. या वेळेस साऱ्या देशाने त्याचे दर्शन घेतले. महान भारताची एक पूर्वअट जनतेने पूर्ण केली. अभिमान वाटावा अशी ही घटना आहे.

नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर देशातील सर्व राजकीय पक्षांनी त्याचे मनःपूर्वक स्वागत करायला पाहिजे होते, असे कुणी म्हणू शकत नाही. उद्या भारताने संपूर्ण काश्मीर मुक्त केला, तरीदेखील 'हे उत्तम काम केले' असे विरोधी पक्ष म्हणणार नाहीत. हे किती चुकीचे काम आहे, देशाला कसे धोक्यात आणणारे आहे, यावर भाषणे, लेख यांचा पाऊस पडेल. चिंदबरम, मनीष तिवारी, दिग्विजय सिंग, सीताराम येच्युरी, माध्यमातील राजदीप सरदेसाई, बरखा दत्त अशी मंडळी काय काय बोलतील आणि लिहितील, याची आपणा सर्वांना उत्तम कल्पना आहे. नोटबंदी विरोधात लेखन, भाषणे, मोर्चे आणि संसद बंद पाडणे सगळे प्रकार झाले. हे प्रकार करणाऱ्यांचा युक्तिवाद एकच - तो म्हणजे नोटबंदीमुळे गरिबांचे हाल झाले. श्रीमंताचे काही वाकडे झाले नाही. श्रीमंताला रांगेत उभे राहावे लागले नाही. त्याने काळा पैसा पांढरा केला. जमिनीत-सोन्यात गुंतविला. श्रीमंतांना त्रास झाला नाही, हा भ्रम आहे. ज्यांच्याकडे काळा पैसा होता, त्यांचे काय हाल झाले, हे त्यांनाच जाऊन विचारायला पाहिजे. काहींनी नोटांची बंडले नदी-नाल्यात फेकून दिली आहेत. अनेक जन धन खात्यांत लाखो रुपये आपोआप गोळा झालेले आहेत. श्रीमंतांचे सेवेकरी एका रात्रीत दशलक्षपती झालेले आहेत. या सर्वांच्या कथा हळूहळू येत राहतील. कर न भरलेल्या बँकेत भरलेल्या रकमेवर करवसुली होईल आणि तीदेखील लाख-कोटीच्या घरात जाईल. ज्याच्या घरात श्रमाची कामे करण्यासाठी माणसे आहेत, तो कुठल्याच कारणासाठी रांगेत उभा राहत नसतो. त्याचे नोकर रांगेत उभे राहतात. टीका करणाऱ्यांना हे माहीत नसले, तरी सामान्य लोकांना हे माहीत असते.

रांगा लावताना काही लोकांना मृत्यू आला. यमराज असा आहे की तो कोणाला कुठे उचलेल हे अचूकपणे जगात कुणीच सांगू शकत नाही. एका लोककथेत म्हातारपणाला वैतागून एक माणूस मरायला जात असतो आणि एका धर्मशाळेत राहतो. रात्री एक नाग येतो आणि तो त्याला सोडून अन्य दहा जाणांना चावतो. ते सर्व मरतात. तो माणूस त्या नागाच्या मागोमाग जातो. नाग नदीत जातो आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर त्या नागाची म्हैस होते. नदी खोल असते. काठावर काही माणसे उभी असतात. त्यांना पलीकडे जायचे असते. ते म्हशीला आपल्याकडे आणतात. तिच्या पाठीवर बसतात आणि नदी पार करू लागतात. म्हैस पाण्यात आल्यानंतर डुबकी मारते. पाठीवर बसलेले सर्व जण पाण्यात पडतात. कोणाला पोहायला न येत असल्यामुळे बुडून मरतात. नंतर ती म्हैस पलीकडच्या काठावर जाते. तिच्या मागोमाग तो म्हाताराही जातो. म्हैस क्षणात एक सुंदर तरुणीचे रूप घेते. तिकडून दोन शिपाई येत असतात. ती तरुणी त्यांना म्हणते, ''मी एकटीच आहे आणि तुम्ही कुणीतरी माझा स्वीकार करा.'' स्वीकार कुणी करायचा यावरून त्या दोघांत भांडण सुरू होते. ते तलवार काढतात आणि एकमेकांवर वार करतात. शेवटी जखमी होऊन दोघेही जण मरतात. नंतर ती तरुणी माणसाचे रूप घेते आणि जायला लागते. म्हातारा म्हणतो, ''तू कोण आहेस? आणि अशी माणसांना का मारतेस?'' ती म्हणते, ''मी यमदूत आहे, माणसांना मारणे हेच माझे काम आहे. या सर्वांची आयुष्य संपली होती, म्हणून मी त्यांना न्यायला आलो.'' म्हातारा म्हणतो, ''मी येथे मरणाची रोज वाट बघतोय, तर तू मला का नाही मारत?'' तो म्हणातो, ''तुला अजून खूप वर्षे जगायचे आहे, तुझी वेळ अजून झाली नाही. मुकाटयाने घरी जा, आणि वेळेची वाट बघत बस.'' ज्यांचा मृत्यू बँकेच्या रांगेत लिहिला असेल, त्याला मोदी काय करणार? रांगेत उभा राहिल्यामुळे मृत्यू आला, नसता राहिला तर आला नसता, असे छातीठोक विधान कुणाला करता येत नाही. हा झाला तत्त्वज्ञानाचा भाग. परंतु सरकारला संवेदनशील असावे लागते. ज्यांचा रांगेत मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूची काही ना काही जबाबदारी शासनावर येते आणि शासनाने 'मायबाप सरकार' या भूमिकेतून त्याची भरपाई करणे म्हणजे कर्तव्य करणे होय.

नोटबंदीचा निर्णय हा अर्थकारणाचा निर्णय आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाला देशाचे अर्थकारण फारसे समजत नाही. महिन्याचे उत्पन्न आणि महिन्यात करावे लागणारे खर्च, पुढे वर्ष-सहा महिन्याने करावे लागणारे खर्च आणि आठ-दहा वर्षांनी करावे लागणारे खर्च याचा विचार एवढेच आपले अर्थकारण असते. संपत्ती उत्पन्न कशी करावी? उत्पादित मालाचे मूल्य कसे वाढवावे, नवनवीन बाजारपेठा कशा मिळवाव्यात, बाजारपेठात वस्तू नेण्यासाठी दळणवळणाच्या साधनांचा विकास कसा करावा? संपत्ती उत्पन्न करण्यासाठी भांडवल कसे गोळा करावे? उद्योगधंदे नीट चालण्यासाठी व्याजदराचा कसा उपयोग करावा? अशा अनेक गोष्टी देशाच्या अर्थशास्त्रात येतात. नोटबंदीचा निर्णय दीर्घकालीन अर्थशास्त्राला अडचणीत आणणारा आहे, असे याविषयाचे पंडित सांगतात. त्यासाठी संख्याशास्त्राचा उपयोग करतात. सर्व शास्त्रांत माणसाला भ्रमित करणारे शास्त्र म्हणजे संख्याशास्त्र असते. माणूस जेवढा बुध्दिमान, तेवढी त्याची भ्रमित करण्याची शक्ती जास्त. इंग्लिशमध्ये शब्द आहे 'लाँग टर्म' म्हणजे दीर्घकालीन अर्थव्यवस्थेला खूप तोटे सहन करावे लागतील. अर्थशास्त्रातील दीर्घकालीन हा शब्द एक भंपक शब्द आहे. दीर्घकालीन म्हणजे किती काळ? 10 वर्षे, 50 वर्षे की 100 वर्षे की 1000 वर्षे म्हणून म्हणतात की, दीर्घकाळात आपण सर्व जण मृत झालेलो असतो. म्हणून दीर्घकालीन विचार हा हास्यास्पद विचार असतो. त्याबद्दल ठामपणे कुणीही काहीही सांगू शकत नाही.

मोदींच्या नोटबंदीचा परिणाम आत्तापासूनच जाणवायला लागला आहे आणि पुढे पाच-सहा वर्षांत तो प्रकर्षाने जाणवायला लागेल. जेवढा पैसा आज बँकेत गोळा झालेला आहे, त्यातील फार मोठा भाग वेगवेगळया क्षेत्रांत गुंतविला जाईल. कपाटात बंद असलेली रक्कम बाजारात आलेली आहे. ती चलन-वलनात येईल. त्यामुळे आर्थिक व्यवहार म्हणजे देव-घेवीचे व्यवहार वाढतील. हे जेवढया प्रमाणात वाढतील, तेवढया प्रमाणात अर्थव्यवस्था चालायला आणि धावायला लागली असे म्हटले जाईल. पैसा हे भांडवल असते, भांडवलातून उद्योग उभा राहतो, उद्योगातून संपत्ती निर्माण होते, उद्योगातून रोजगार निर्मिती होते, रोजगार निर्मितीतून पगाराच्या रूपाने लोकांच्या हातात पैसा येतो, तो पैसा वेगवेगळया वस्तूंच्या खरेदीसाठी खर्च होतो, आताच्या नवीन व्यवस्थेप्रमाणे तो बँकेत येईल, त्यातून भांडवल उभे राहील आणि त्यातून हे चक्र चालू राहील. मोदींची नोटबंदी अर्थव्यवस्थेला गतिमान करणारी ठरेल, यात शंका नाही.

स्विस बँकांच्या खात्यांमध्ये अनेक भारतीयांची खाती आहेत आणि त्यात लाखो-करोडो रुपये ठेवले आहेत. मोदींना प्रश्न विचारणारे प्रश्न करतात की, तुम्हाला काळा पैसा काढायचा होता तर त्या बँकेतला सगळा पैसा का नाही आणला? युक्तिवाद करणाऱ्याला वाटते की काय बिनतोड युक्तिवाद केला आहे! या स्विस बँका कशा चालतात आणि त्यांची गुप्त खाती का गुप्त असतात, राज्यसंस्थेचे त्यांना संरक्षण कसे आहे, याची कवडीची माहिती आरोप करणाऱ्याला नसते. जेफरी आर्चर याची कथा सांगतो, मग ही गोष्ट लक्षात येईल. दक्षिण अफ्रिकेच्या देशातील एक राजप्रमुख स्वित्झरलँडमधील एका बँकेत जातो. देशातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे वचन देऊन तो सत्तेवर आलेला असतो. आपल्या देशातील कुणाची या बँकेत खाती आहेत, त्यांची नावे त्याला पाहिजे असतात. तो बँकप्रमुखाला भेटतो. स्वत:ची ओळख देतो आणि मागणी करतो की, माझ्या देशातील कुणी-कुणी या बँकेत पैसा लपवून ठेवला आहे ते सांगा. बँक अधिकारी म्हणतो, ''कायद्याप्रमाणे यातील मला काही सांगता येणार नाही.'' तो राज्यप्रमुख भडकतो आणि धमक्या द्यायला लागतो. बँक अधिकारी म्हणतो, ''साहेब, तुम्ही रागावू नका, परंतु मी माहिती देऊ शकत नाही. तुम्ही मला कितीही धमक्या दिल्या, कसल्याही प्रकारचे राजकीय दडपण आणले, देशाशी राजनैतिक संबंध तोडण्याचे जरी ठरविले तरी त्याचा काही उपयोग नाही.'' शेवटचा उपाय म्हणून तो राज्यप्रमुख - जो सेनाधिकारीच असतो, आपल्या कमरेचे रिव्हॉल्वर काढतो, त्याच्या कपाळावर ठेवतो आणि म्हणतो, ''सांगतोस की गोळी झाडू?'' अधिकारी म्हणतो, 'महाराज, माफ करा. तुम्ही गोळी झाडलीत तरी मी बोलणार नाही.'' सेनाधिकारी शांतपणे बसतो. त्याने बरोबर बॅग आणलेली असते, ती अमेरिकन डॉलर्सनी भरलेली असते. तो म्हणतो, ''ही बॅग तुम्ही जमा करा आणि माझेही खाते उघडा.''

स्विस बँकांतली खाती शोधून काढणे वाटते तितके सोपे काम नाही. हिंदीमध्ये म्हण आहे - 'सीधी उंगली से घी नही निकलता, तब उंगली टेढी करनी चाहिये।' ग़ुप्तचर यंत्रणेला काहीच गुप्त नसते. कुणी सांगावे, भविष्यात मोदी आपल्या गुप्तचर यंत्रणेमार्फत ही गुप्त खाती उघड करतील. आता रांगेत उभे राहिल्यामुळे काही जणांना हार्ट अटॅक आला. ती उघड झाल्यानंतर घरबसल्या किती जणांना हार्ट अटॅक येईल, ही बातमी वाचण्यासाठी आपण संयम ठेवावा.

vivekedit@gmail.com