खाल्ल्या मिठाला जागा

विवेक मराठी    17-Jan-2017
Total Views |

बहुतेक वेळेला अगदी काटेकोरपणे मीठ खाण्याचं किंवा स्वयंपाकात वापरण्याचं कोणी सांगत नाही. पाकक्रियेच्या कुठल्याही पुस्तकात 'मीठ चवीनुसार' असं म्हणून या महत्त्वाच्या घटकाची बोळवण केलेली दिसते. त्यामुळे हात सोडून आपला मिठाचा वापर होतो. मधुमेहींनी हे नक्कीच टाळायला हवं. मीठ कमीत कमी वापरण्यावर भर द्यायला हवा. कमीत कमी ताटात वेगळं मीठ घेऊ नये. पापड, लोणची, खारवलेले मासे टाळायला हवेत. काही वेळेला मिठाचा वापर किती करावा हे सांगितलं जातं.

मागच्या वेळेला आपण कार्बोहायड्रेट काउंटिंगसारख्या अगदी नव्या विचाराकडे थोडंसं बारकाईने पाहिलं होतं. यात रुग्ण स्वत:चं जेवण वाढून घेतो. त्या ताटात किती कार्ब आहेत ते पाहतो, तितकंच इन्श्युलीन घेतो. अर्थात हा विचार केवळ टाइप वन मधुमेहाला लागू पडतो, किंवा जी मंडळी फक्त आणि फक्त इन्श्युलीनवर आहेत, त्यांना त्याचा उपयोग होतो. टाइप टू मधुमेह हा वेगळा आजार आहे; त्यात जेव्हा तुमचं शरीर पुरेसं इन्श्युलीन बनवायला असमर्थ ठरतं, तेव्हाच इन्श्युलीन वापरण्याची गरज पडते आणि बहुधा टाइप टू मधुमेह असलेले लोक इतर कुठली तरी औषधं घेत असतात. त्यांच्या बाबतीत कार्बोहायड्रेट काउंटिंग फारसं उपयोगी पडताना दिसत नाही.

गर्भारपणातल्या मधुमेहात बहुतेक वेळी इन्श्युलीनचा वापर होतो. तिथे हा प्रकार नक्कीच आजमावता येईल. कारण गर्भारपणातल्या मधुमेहात ग्लुकोज काटेकोरपणे सांभाळावं लागतं. आणि रुग्णाचं ग्लुकोज खूप कमी झालेलंदेखील चालत नाही. फक्त इथे अत्यंत महत्त्वाच्या एक गोष्टीकडे दुर्लक्ष करता येत नाही. तिथे स्त्रीच्या पोटात गर्भ वाढत असतो. त्या वाढणाऱ्या बाळाला प्रोटीन्सची नितांत गरज असते. त्यामुळे आहारात योग्य त्या प्रमाणात प्रोटीन्सचा समावेश करणं आवश्यक असतं.

आताशा इन्श्युलीन पंप हा इन्श्युलीन घेण्याचा नवा प्रकार उदयाला आला आहे. त्या ठिकाणी कार्बोहायड्रेट काउंटिंगचा उपयोग करता येईल. तसं केल्याने ग्लुकोज नीट राखण्यास भरपूर मदत होईल.

गर्भार मधुमेहींचा विषय निघालाच आहे, तर एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेणं आवश्यक आहे. गर्भारपणात बाळ मोठं होत असताना त्याला आईच्या रक्तातून पोषण मिळतं. वार किंवा प्लॅसेंटामधून हा पुरवठा होत असतो. हा पुरवठा अव्याहतपणे आणि जास्तीत जास्त व्हावा, अशी सोय निसर्ग करतो. वारेमध्ये बनणारे हॉर्मोन्स ते काम करतात. ते आईला इन्श्युलीन रेझिस्टन्ट बनवतात. त्यामुळे आईच्या शरीरात बनलेलं इन्श्युलीन तिच्याच शरीरावर तितका प्रभाव टाकू शकत नाही. आईला मिळणारे पोषक पदार्थ बाळाकडे वळतात.

हा इन्श्युलीन रेझिस्टन्स संपूर्ण दिवस एकसारखा नसतो. तो सकाळी अधिक असतो. म्हणून बहुधा या स्त्रियांचं ग्लुकोज सकाळी अधिक असतं. यावर मात करायची असेल तर एक करता येईल. आपली सकाळची न्याहरी त्यांना दोन भागात विभागून खाता येईल. म्हणजे त्यांचं ग्लुकोज वाढणार नाही आणि त्यांच्या पोषणावर परिणाम होणार नाही. बरेच जण ग्लुकोज ताब्यात ठेवण्याच्या नादात खाणं कमी करतात. त्याने बाळाला हवं असलेलं पोषण मिळण्यात अडचण येऊ शकते. त्याऐवजी न्याहरीचे दोन भाग करणं आणि यातला एकेक भाग दोन तासांच्या अंतराने खाणं अधिक श्रेयस्कर होईल. उदाहरण देऊन सांगायचं झालं, तर समजा - त्यांना न्याहरीसाठी चार इडल्या आणि कपभर दूध घ्यायचे निर्देश असतील, तर त्यांना अर्धा कप दूध आणि दोन इडल्या सकाळी आठ वाजता आणि उरलेल्या दोन इडल्या आणि दूध सकाळी दहा वाजता घेता येईल.

मधुमेह हा एकटादुकटा प्रवासी नाही. त्याच्यासोबत कोलेस्टेरॉल, रक्तदाब असे अनाहूत पाहुणे असतात. शिवाय मधुमेह शरीराच्या अनेक भागांना प्रभावित करतो. त्यामुळे मधुमेहातल्या आहाराचा विचार करताना या सगळया गोष्टींकडे काणाडोळा करून भागत नाही. सगळया गोष्टी लक्षात घेऊनच आहाराचा सल्ला द्यावा लागतो.

कोलेस्टेरॉलबद्दल सध्या जगात वादंग चालू आहे. खाण्यातल्या बदलामुळे कोलेस्टेरॉलमध्ये फारसा फरक पडत नाही. पडला, तरी जेमतेम 30%च कोलेस्टेरॉल कमी होतं, हे सप्रमाण सिध्द झालं आहे. कोलेस्टेरॉल कमी असलेले बाजारातले पदार्थ फक्त तुमचा खिसा खाली करतात, तुम्हाला घाबरवून केवळ स्वत:ची तुंबडी भरतात. म्हणूनच 'कोलेस्टेरॉल फ्री' असलेली महागडी खाणी तुम्ही खाऊ नका, असं अमेरिकेतले तज्ज्ञ सध्या जगाला ओरडून सांगताहेत. याचा अर्थ कोलेस्टेरॉल नीट राहावं म्हणून उगीच आहारात बदल करण्याच्या भानगडीत पडता उपयोगी नाही. अर्थात मधुमेह काबूत राहावा, तुमचं वजन जास्त वाढू नये यासाठी तेलकट, तुपकट पदार्थ आहारातून तडीपार केले पाहिजेत, ही गोष्ट निराळी. पण अंडयातलं पिवळं, किंवा प्राण्यांचं लिव्हर याचा खूप बाऊ करत बसण्याची गरज नाही. जाहिरातींना फसून बाजारातले कोलेस्टेरॉल फ्री वगैरे पदार्थ तर अजिबात नकोत.

रक्तदाब आणि मीठ यांचा जवळचा संबंध आहे. आपण भारतीय मंडळी जरा जास्तच मीठ खातो. 'नमकीन' अधूनमधून तोंडात टाकायला आपल्याला खूप आवडतं. शिवाय प्रत्यक्ष न दिसणारं मीठदेखील आपल्या आहारात अनेकदा असतं. वैद्यकाच्या दृष्टीने मीठ म्हणजे केवळ 'लवण' नव्हे. वैद्यक 'सोडियम'ला मीठ मानतं. आपण स्वयंपाकात मीठ वापरतो ते सोडियम क्लोराइड. परंतु या पलीकडे अनेक पदार्थांत वापरल्या जाणाऱ्या क्षारात सोडियम असतं. खाण्याचा सोडा, चायनीज पदार्थात वापरलं जाणारं अजिनोमोटो किंवा मोनो सोडियम ग्लुटामेट, बेकरीतल्या खाण्यात असलेलं सोडियम, चटण्या, बाटलीबंद सॉस, डबाबंद पदार्थ यातलं मीठ आपण लक्षातसुध्दा घेत नाही. परंतु या सगळयामुळे आपला रक्तदाब वाढत असतो.

बहुतेक वेळेला अगदी काटेकोरपणे मीठ खाण्याचं किंवा स्वयंपाकात वापरण्याचं कोणी सांगत नाही. पाकक्रियेच्या कुठल्याही पुस्तकात 'मीठ चवीनुसार' असं म्हणून या महत्त्वाच्या घटकाची बोळवण केलेली दिसते. त्यामुळे हात सोडून आपला मिठाचा वापर होतो. मधुमेहींनी हे नक्कीच टाळायला हवं. मीठ कमीत कमी वापरण्यावर भर द्यायला हवा. कमीत कमी ताटात वेगळं मीठ घेऊ नये. पापड, लोणची, खारवलेले मासे टाळायला हवेत. काही वेळेला मिठाचा वापर किती करावा हे सांगितलं जातं. दोन ग्रॅमपेक्षा अधिक मीठ वापरण्यावर बंदी घातलेली असते, तेव्हा ते बंधन मनापासून पाळायला हवं. सोबत हेही लक्षात ठेवायला हवं की जेव्हा डॉक्टर मंडळी दोन ग्रॅम 'मीठ' म्हणतात, तेव्हा ते दोन ग्रॅम 'सोडियम'बद्दल बोलत असतात. आपण प्रत्यक्षात ज्याला 'मीठ' म्हणतो, त्या सोडियम क्लोराइडमध्ये दोन ग्रॅम सोडियम व्हायला पाच-साडेपाच ग्रॅम 'आपलं' मीठ लागेल. आपल्या दोन बोटांच्या चिमटीत मावणारं दाणेदार बारीक मीठ साधारण अर्धा ग्रॅम असतं असं म्हणतात. तीन बोटांच्या चिमटीत साधारण याच्या दुप्पट, म्हणजे एक ग्रॅम मीठ बसतं. अर्थात हा ढोबळ प्रकार झाला. पण रोजच्या जेवणात तराजूत मोजून मीठ घालणं हे तितकंच अवघड असल्याने अशा ढोबळ पध्दतींचा वापर करावा लागतो.

आता कुठल्या पदार्थात मीठ जास्त आहे आणि कुठल्या पदार्थात कमी, हे पाहू. ज्या पदार्थांच्या 100 ग्रॅममध्ये 200 मिलिग्रॅम इतकं मीठ आहे, ते पदार्थ नक्कीच टाळायला हवेत. पाव, केक, पेस्ट्री, डोनट, बिस्किटं, खारवलेले शेंगदाणे-सुका मेवा, चाट, शेवचिवडा, भजी, वडे, इडली, ढोकळा, बाजारात मिळणारं लोणी-चीज, लिची आणि टरबूज यासारखी फळं, नवलकोल-वाल-चवळीची पालेभाजी, मटणात येणारं लिव्हर, ब्रेन, किडनी यासारखी इंद्रियं, खेकडा-लॉबस्टर-कोळंबी-शिंपल्या यासारखे समुद्री जीव यामध्ये असं बरंच जास्त मीठ असतं.

ज्या पदार्थांमध्ये प्रत्येक 100 ग्रॅममागे 100 ते 200 मिलिग्रॅम मीठ असतं, त्यांना मध्यम स्वरूपाचे पदार्थ गणलं जातं. आहारात त्यांचा थोडाबहुत वापर करायला हरकत नसते. लाह्या, पोहे, कॉर्न फ्लेक्स, मक्याचे दाणे, सॅलडसाठी वापरली जाणारी लेटयुसची पानं-बीटरूट-गुलाबी मुळा-पालक-पावटा-पडवळ यासारख्या भाज्या, चणा-तूर-मूग-उडीद यासारख्या डाळी, केळं-सफरचंद-आंबा-कलिंगड-अननस यासारखी फळं, मटण-अंडी, दूध-आइसक्रीम-मिल्क शेक-आटवलेलं दूध-दही यामध्ये मध्यम स्वरूपाचं मीठ असतं.

याउलट ज्या पदार्थांमध्ये प्रत्येक 100 ग्रॅममागे 100 मिलिग्रॅमपेक्षा कमी मीठ असतं, त्या पदार्थांचा आहारात मुक्त वापर व्हायला हरकत नाही. वाटाणे-कोबी-फ्लॉवर-मुळा-वांगी-काकडी-फरसबी-भेंडी-तुरई-भोपळा-कारलं यासारख्या भाज्या, आवळा-पेरू-संत्री-मोसंबी-पपई-पीच-प्लम-पेअर-चिकू यासारखी फळं आणि तांदूळ-गहू-ज्वारी-बाजरी-नाचणी यासारखी तृणधान्यं यात खूप कमी मीठ असतं. दुर्दैवाने आपण भात शिजवताना व पोळया, भाकऱ्या करण्यासाठी पीठ मळताना त्यात मीठ घालून किंवा फळांवर मीठ पेरून हा फायदा घालवून टाकतो.

तर हे मीठपुराण असं आहे. रक्तदाब व्यवस्थित राहण्यासाठी खाल्ल्या मिठाला जागा किंवा तुम्ही खात असलेल्या मिठाच्या एकंदर प्रमाणाबद्दल जागरूक राहा, असं ठासून सांगणं भाग आहे.

 9892245272