रशियातही धर्म सोडण्याची त्सुनामी आणखी जोरात

विवेक मराठी    17-Jan-2017
Total Views |

इस्लाम हा रशियातील जो दुसरा धर्म आहे, तोही पंचवीस वर्षांपूर्वी जेवढा तेथील स्वास्थ्याला 'आव्हान' ठरला होता, त्याची स्थिती तशीच आहे. याचा सारांश असा की, सोव्हिएत काळात जी स्थिती दडपणामुळे होती, तीच स्थिती दडपणे संपल्यावर झाली आहे. धर्मपीठांनी मात्र आपापल्या चर्चची आणि कॅथेड्रलची स्थिती अगदी चकचकीत ठेवली आहे. त्यांना असलेला सरकारचा पाठिंबा ते अगदी प्राधान्याने वापरत आहेत आणि त्यातून त्यांना परदेशातील एखादे केंद्र चालवायला मिळते का, यासाठीचा त्यांचा प्रयत्न नेटाने सुरूच आहे.
मेरिका, युरोप व ऑॅस्ट्रेलिया या श्वेतवर्णीय खंडांत ख्रिश्चन धर्म सोडण्याची जशी त्सुनामी सुरू झाली आहे, तसाच प्रकार रशियातही आहे. पण तेथील वस्तुस्थिती अतिशय भिन्न आहे. तेथे सोव्हिएत सत्ता असताना धर्माला विरोध होता, तेव्हा तेथील लोक संघर्षात्मक भूमिका घेऊन धर्मभावनेचे समर्थन करत असत. पण आता सरकार धर्माच्या पाठीशी उभे राहण्यास तयार आहे, तरी तेथील जनतेने मात्र धर्म नाकारायला आरंभ केला आहे. धर्माला अफू मानणाऱ्या माक्र्सवादाच्या काळात जेवढा धर्म पाळला जायचा, त्यापेक्षा तो निम्म्यानेही नाही. तेथील धर्माचार्य सत्ताधीशांच्या बरोबरीने आलिशान जीवन जगण्याच्या प्रयत्नात आहेत. सामान्य जनता मात्र आणखी काही निराळा पर्याय मिळतो का, याच्या प्रयत्नात आहे.

जगात श्वेतवर्णीय म्हणून जेवढे खंड आणि उपखंड आहेत, त्यात रशिया हा भौगोलिकदृष्टया सर्वात मोठा प्रदेश आहे. अमेरिका, युरोप, ऑॅस्ट्रेलिया या भौगोलिकदृष्टया मोठया खंडांत व देशांत ख्रिश्चन धर्माचा ऱ्हास अतिशय वेगाने सुरू आहे. यात रशिया आणखी एक पाऊल पुढे आहे. रशियामध्ये दीर्घकाळ साम्यवादी वर्चस्व होते, त्यामुळे धर्म 'नकोशी'च्या यादीत होता. सोव्हिएतच्या साम्राज्याच्या काळात धर्मावर बंधने होती, म्हणून येथील लोक धर्माचे अधिकार मिळाले पाहिजेत, या आग्रहासाठी लढत होते. पण सोव्हिएतचे पतन झाल्यावर धर्माची तेवढीही ओढ राहिलेली नाही. त्यामुळे अनेक अडचणीत भर पडली आहे. आज तेथील सरकारलाच असे वाटते की, तेथे धार्मिक संस्था वाढाव्यात आणि त्यातून जग अधिक जवळ येईल. पण तेथील लोक त्या मानसिकतेत नाहीत. याचा अर्थ धर्म ही कल्पना तेथे संपुष्टातच आली आहे, असे नाही. आजमितीला पस्तीस टक्के लोकांना धर्म हा त्यांच्या त्यांच्या जीवनशैलीचा भाग वाटत आहे. पण यातील दुसरा भाग असा आहे की, धर्म मानणे आणि न मानणे या जीवनशैलीतून तेथे दहशतवादी चळवळी मात्र फोफावल्या आहेत. त्याबाबत रशिया आणि भारत यांच्या समस्या समान आहेत. पाश्चात्त्य देशातील ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कारवाया तर रशियाने 'त्या देशाच्या एकात्मतेला आव्हान' असे मानून त्याविरोधात दहशतवाद नियंत्रण कायदा केला आहे. तेथे मुस्लीम समाज साडेसहा टक्के आहे. आजूबाजूच्या मुस्लीम देशांत काय चालले आहे, त्या घटनांच्या परिणामापासून रशिया सुटलेला नाही. त्याबाबत प्रतिकार करण्याबाबत रशिया हा अमेरिकेच्याही एक पाऊल पुढे आहे. पण ती समस्या सोडवण्यासाठी जी क्षेपणास्त्रे वापरता येतात, ती क्षेपणास्त्रे त्या पध्दतीच्या विचारशैलीच्या देशांतर्गत दहशतवादी चळवळींना लागू पडत नाहीत. तेथे आणखी एक दहशतवाद आहे, तो म्हणजे साम्यवादी दहशतवाद. भारताप्रमाणेच तेथेही या तिन्ही दहशतवादांना प्रोत्साहन देण्याची पाश्चात्त्य देशांची भूमिका आहे. भारत महासत्तेच्या स्पर्धेत येऊ नये, म्हणून पाश्चात्त्य देशांनी दहशतवादाचे धुमसते निखारे जागे ठेवले आहेत. त्याचप्रमाणे रशियाबाबतही त्यांची तीच भूमिका आहे. भारत आताशा कोठे जागतिक स्पर्धेत आला आहे. पण रशियाला तर 'महासत्ता' असण्याची चव अंगवळणी पडली आहे.

रशियासह पाश्चात्त्य देशांची ही स्थिती असल्याने, 'धर्म या संकल्पनेचा उपयोग कसा करून घ्यायचा आणि तोटा कसा टाळायचा' असा आजही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण वास्तविक परिस्थिती निराळी आहे. जगात श्वेतवर्णीय म्हणून जेवढा ख्रिश्चन समाज आहे, त्या प्रत्येक ठिकाणी महासत्ता होण्याची एक तीव्र महत्त्वाकांक्षा आहे, ती त्यांनी ख्रिश्चन धर्माच्या साहाय्याने पूर्ण केली आहे. त्याला अपवाद रशियाचा आहे. धर्माला अफूची गोळी मानण्यातून त्यांनी तीच महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तो आज परिपूर्णतेला गेलेला दिसत नाही. युरोप-अमेरिकेत गेली अनेक शतके ख्रिश्चन म्हणून मिरवून घेणारा सर्व पंथ आणि उपपंथ यातील ख्रिश्चन समाज वेगाने तो धर्म सोडताना दिसत आहे. त्यात तेवढयाच वेगाने रशियाही सहभागी आहे. रशियाची स्थिती तर सर्वात गंभीर आहे. कारण तेथे पन्नास वर्षे धर्माला कधी अफूची, तर कधी विषाची गोळी मानली जायची. इ.सन 1989साली सोव्हिएत साम्राज्याचे पतन झाल्यावर धर्माची आस्था परत येईल, असे वाटले होते; पण परिस्थिती नेमकी विरुध्द आहे. सोव्हिएत काळात 67% लोक धर्म पाळत असत, ती स्थिती आता 37 टक्क्यांवर आली आहे. तुलनेने युरोप-अमेरिकेतील स्थिती बरी आहे, असे म्हणायची वेळ आली आहे. 'इकॉनॉमिस्ट' या जगातील नावाजलेल्या नियतकालिकाने केलेल्या पाहणीनुसार 'धर्माचा कधीकधी उपयोग होतो' असे मानणारांची संख्या वाढली आहे. पण धर्माचे स्थान सोव्हिएतपेक्षा कमी झाले आहे. त्यांचे म्हणणे असे की, धर्माचा तोटा होण्यापेक्षा उपयोगही काही कमी नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या 61वरून 36 टक्क्यांवर आली आहे. त्याचप्रमाणे धर्माच्या फायद्यापेक्षा तोटाच अधिक असे मानणाऱ्यांची संख्या 5 टक्क्यांवरून 23 टक्क्यांवर पोहोचली आहे. सोव्हिएत काळात धर्म मानण्यावर बंधने होती, तेव्हा तो आधार वाटायचा. पण ती बंधने मोकळी झाल्यावर परिस्थिती नेमकी बदलली आहे. वास्तविक रशियन सरकार आल्यावर तेथे धर्माबाबत चांगला दृष्टीकोन स्वीकारला गेला आहे. पण धर्म ही कल्पना जनेतेने दीर्घकाळ न स्वीकारल्याने त्याबाबत एक निराळीच पोकळी निर्माण झाली आहे. सध्यातरी धर्म या कल्पनेचा उपयोग राजकारण्यांना अधिक जाणवतो आहे.

रशियाच्या पुनःस्थापनेनंतर धर्म हा परमेश्वराच्या शोधासाठी न वापरता 'फॅशन' म्हणून वापरला गेला. त्यातही 'परमेश्वरावरील विश्वास' आणि धर्मसंस्थांतून सांगितला जाणारा धर्म यात सर्वसामान्य लोकांनी फरक केला. परमेश्वरातील विश्वास हा अजूनही मूळच्या एवढाच दिसतो आहे. याचा अर्थ असा काढला जात आहे की, तेथील धर्म संप्रदाय हे तेथील जनतेच्या आशा-आकांक्षांना पुरेसे पडताना दिसत नाहीत. तेथील पारंपरिक अशा ऑॅर्थोडॉक्स या ख्रिश्चन पंथाच्या अनुयायांची संख्या 41 टक्के आहे. त्यातीलही बरेच जण नाममात्र सदस्य आहेत. पण आध्यात्मिकता मानणाऱ्यांची तेथील संख्या पंचवीस टक्के आहे. योगाभ्यास हा विषय रशियात फार मोठया प्रमाणावर प्रचलित आहे. हरेकृष्ण पंथीयांचे काम गेल्या दहा-पंधरा वर्षांतील आहे, त्यामुळे त्यांचा परिणाम अजून तेथील दशवार्षिक जनगणनेमध्ये आलेला नाही, पण त्यांच्या भजनफेऱ्या हा तेथील परिचयाचा विषय आहे. तेथील निरीश्वरवादी लोकंाची संख्या तेरा टक्के आहे. तेथे कॅथलिक, प्रोटेस्टंट, जुडाइझम, अन्य ख्रिश्चन पंथ आणि बौध्द यांची संख्या प्रत्येकी एक टक्का आहे. अमेरिकेत व युरोपमध्ये ज्याप्रमाणे ख्रिश्चन धर्माला लेखी सोडचिठ्ठी देण्याची लाट आहे, त्याप्रमाणे स्थिती रशियात नाही, कारण तेथील धर्मदृष्टया समाजबांधणीही विस्कळीत आहे. पण परिणाम मात्र युरोप-अमेरिकेपेक्षा अधिक आहे.


इस्लाम हा रशियातील जो दुसरा धर्म आहे, तोही पंचवीस वर्षांपूर्वी जेवढा तेथील स्वास्थ्याला 'आव्हान' ठरला होता, त्याची स्थिती तशीच आहे. याचा सारांश असा की, सोव्हिएत काळात जी स्थिती दडपणामुळे होती, तीच स्थिती दडपणे संपल्यावर झाली आहे. धर्मपीठांनी मात्र आपापल्या चर्चची आणि कॅथेड्रलची स्थिती अगदी चकचकीत ठेवली आहे. त्यांना असलेला सरकारचा पाठिंबा ते अगदी प्राधान्याने वापरत आहेत आणि त्यातून त्यांना परदेशातील एखादे केंद्र चालवायला मिळते का, यासाठीचा त्यांचा प्रयत्न नेटाने सुरूच आहे. येथील अल्पसंख्य समाजाची आणि त्या समाजाच्या संघटनांची स्थिती चांगली आहे, कारण त्यांना सरकारला त्यांच्या मूळ देशातील सरकारचा राजकीय उपयोग असतो, त्यामुळे या संस्था अंशत: 'एम्बसी' हा दर्जा मिळतो. इस्लामच्या बाबतीत तर हे खरे आहेच, तसेच 'जिहोवा विटनेस' या ख्रिस्ती पंथाबाबतही हीच स्थिती आहे. या सगळयाचा परिणाम असा होतो की धर्माचा प्रसार अधिकाधिक झाला पाहिजे, या दृष्टीकोनाची तेथील सरकारची भूमिका राहते. जगभर ज्या धर्माचे आणि पंथाचे स्वरूप सौम्य आहे, अशा ठिकाणच्या धर्माचार्यांना पाचारण करून जागतिक पातळीवरील परिषदा भरवण्याचा रशियाच्या सरकारचाच कटाक्षाने प्रयत्न दिसून येतो. त्यात रशियाला त्या त्या देशांशी 'स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप' करायची असते. काही महिन्यांपूर्वी मलेशिया, सीरिया अशा काही इस्लामी देशांतील मुल्लामौलवींची परिषद भरवली. त्या व्यापक परिषदेला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री सर्गाई सावरोव यानी राष्ट्रपती पुतीन यांचा संदेश म्हणून असे सांगितले की, तुमच्या देशातील महत्त्वाच्या संस्थांशी आम्हाला 'जिव्हाळयाचे संबंध' प्रस्थापित करायचे आहेत. त्या परिषदेचे अध्यक्षपदही मध्य रशियातील ततारस्थान येथील मुस्लीम पंथीयांच्या धर्मगुरूंना देण्यात आले होते. तीन महिन्यांपूर्वी मॉस्कोमध्ये एका विशाल मशिदीचे उद्धाटन झाले, तेव्हा ऑॅर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख, तेथील ज्यू व बौध्द धर्मांचे आचार्य यांनाही बोलावण्यात आले होते.

असे असले, तरी पाश्चात्त्य देशातील लोक मात्र 'रशियात विविध धर्मांच्या आणि पंथांच्या प्रसाराला समान वाव दिला जातो' या विधानाशी सहमत नाहीत. नुकतीच अमेरिकेतील अमेरिकेचे 'कमिशन ऑॅन इंटरनॅशनल फ्रीडम' या संघटनेचे प्रतिनिधी मंडळ रशिया भेटीला आले होते, तेव्हा 'येथे पुरेशा प्रमाणात आचार आणि विचार स्वातंत्र्य नाही' अशी टिप्पणी केली होती. त्यांनी असेही सुचविले होते की, अन्य देशांतील निरनिराळया पंथांबाबत 'जहालवादी' म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट असे शिक्के मारले आहेत, तो कायदा सौम्य करावा.  इ.सन 2007मध्ये संमत केलेला हा कायदा पाश्चात्त्य देशांच्या टीकेचा विषय झाला होता. याबाबतची अशी वस्तुस्थिती दिसते आहे की, पाश्चात्त्य देशांकडून वारंवार त्यांच्या त्यांच्या पंथाला रशियात वाव मिळण्याबाबत सूचना येत आहेत. त्याबाबत सरकारची भूमिका नाराजीची आहे.

दुसऱ्या बाजूला तर तेथील समाजालाही धर्माची आवश्यकता वाटेनाशी झाली आहे. याचा अर्थ असा दिसतो आहे की, युरोप व अमेरिका हे धर्मसत्ता म्हणूनदेखील महासत्ता असण्याच्या भूमिकेत होते, ती स्थिती रशियाची नाही. तेथील धर्ममार्तंड हे सत्ताधीशांबरोबर वैभव उपभोगण्याच्या मनःस्थितीत आहेत. त्यामुळे तेथील जनतेने आगामी काळात जर आवडणाऱ्या अन्य एखाद्या धार्मिक जीवनशैलीचा स्वीकार केला, तर आश्चर्य वाटायला नको.

9881717855