सफर ध्येयपंथाची...

विवेक मराठी    21-Jan-2017
Total Views |

'ध्येय' म्हणजे कृतीची प्रेरणा! ध्येय आपल्याला जगण्याची ऊर्जा देतं. आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो तो या ध्येयामुळेच. ध्येयाला वेळेच्या मर्यादा घालून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आंतरिक प्रेरणेने प्रयत्नांत सातत्य राहील. व्यक्तिमत्त्व, आवड, क्षमता या तिन्ही गोष्टींची विचारपूर्वक मांडणी करून त्यांच्या मदतीने साध्य होईल असं ध्येय ठरवावं. आपली ध्येयं सकारात्मक असावीत. आपल्या ध्येयाची सतत मनात उजळणी केली, तर विचार भावना त्यासाठी अनुकूल होतील. तर अशी ही ध्येयनिश्चितीची सफर यशस्वी होईल.
वि
भव आणि त्याचा एक मित्र मला भेटायला माझ्या सेंटरला आले होते. विभव म्हणाला, ''हा अमर. खूप टेन्स आहे. इंजीनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे. केटी लागलीय. आता अभ्यासाला बसला तरी मनच लागत नाही. म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो भेटायला.''

विभव मला कॉलेजमधील एका सेशननंतर भेटायला आला होता. त्याला येणाऱ्या अडचणींबाबत तो माझ्याशी बोलला होता आणि त्याला दिलेल्या सोप्या टिप्सचा फायदा झाल्याचं त्याने मला फोन करून आवर्जून सांगितलं होतं.

मी अमरशी बोलले. अचानक त्याचा या शिक्षणातला रसच संपला होता. मन अभ्यासात रमत नव्हतं. आपण 'ऑटोमोबाइल' का निवडलं? यापेक्षा माझ्यासाठी 'आयटी'च ठीक होतं या विचाराने त्याला ग्रासलं होतं.

असा अनुभव अनेक विद्यार्थ्यांना येतो. आपण हे शिक्षण का घेतो आहोत हेच त्यांना माहीत नसतं. आपण पुढे काय करणार? किती आणि कसे शिकणार? याची काहीच योजना अनेक मुलांकडे तयार नसते. थोडक्यात, नेमकं ध्येय डोळयांसमोर नसतं. त्यामुळे मग निराशा वाटयाला येते.

खरं तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ध्येयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ध्येयाशिवाय जगणारी व्यक्ती म्हणजे समुद्रात भरकटलेली नौकाच, नाही का!

'ध्येय' म्हणजे कृतीची प्रेरणा! 'मला काही तरी हवं आहे' ही जाणीव झाली, तरच त्याकरिता प्रयत्न होणार. बघा ना, आपल्याला भूक लागते, तेव्हा चविष्ट कांदापोहे खावेसे वाटतात. आपल्या डोळयांसमोर कांदेपोहे दिसू लागतात. त्याचा खमंग वास भुकेत अधिक भर घालतो. मग सगळया शरीराचं एकच ध्येय - 'खमंग पोहे मिळवणं'. मग त्या ध्येयाला समोर ठेवून आपण लगेच कामाला लागतो अन् थोडयाच वेळात ते पोहे करून खातोसुध्दा! हे का घडलं, तर आपल्या प्रत्येक पेशीने एक ध्येय निश्चित करून स्वीकारलं आणि मग त्यासाठी प्रयत्न केले. योग्य दिशेने.

ध्येय आपल्याला जगण्याची ऊर्जा देतं. आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो तो या ध्येयामुळेच.

स्वामी विवेकानंद म्हणतात, 'उठा, जागे व्हा, अन् ध्येय गवसेपर्यंत थांबू नका.' यातून एक गोष्ट निश्चित होते की आपण प्रत्येक जण कोणतं ना कोणतं उद्दिष्ट घेऊन जन्माला आलो आहोत. ते आपल्यातच आहे. केवळ आवश्यकता आहे ती अज्ञानाचं आवरण बाजूला सारून त्या ध्येयाचं शुध्दरूप पाहण्याची.

म्हणूनच आज आपण प्रवास करणार आहोत आपापल्या गतीनुसार... चला तर, मग निघायचं या स्वानुभावाच्या सफरीला..!!

प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेऊ. ध्येय हे काही एका रात्रीत ठरत नाही. आपली बुध्दिमत्ता, अनुभवविश्व, आजूबाजूचं वातावरण या साऱ्याचा परिपाक असतं आपलं ध्येय. ध्येयाला आकार देताना मन आणि बुध्दी दोघांचं तारतम्य असेल तर यश निश्चित आपल्याकडे धाव घेईल.

उदा., प्रवासाला निघताना, आधी कुठे पोहोचायचं त्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. त्यानुसार योग्य दिशेला जाणाऱ्या, योग्य त्या वाहनाची (गाडी, बस, ट्रेन, रिक्षा इ.ची) निवड करतो. प्रवासाला यशस्वी अन् सुखकर करण्यासाठी ज्या आवश्यक आहेत त्या साऱ्या गोष्टी करतो. तसंच आपल्या जीवनप्रवासात नेमकं कुठे पोहोचायचं आहे हे एकदा जाणलं की तो प्रवास सुकर करण्यासाठी प्रयत्न करणं सोपं जातं.

महाविद्यालयातील एखाद्या तरुणाला सैन्यात जायची फार इच्छा आहे. त्याने तेच ध्येय नक्की केलं असेल, तर ते सफल करण्यासाठी त्याला काय काय करावं लागेल बरं? शारीरिक क्षमता वाढवणं, भावनांवर नियंत्रण ठेवणं, योग्य त्या भरती परीक्षांना हजर राहणं, त्याची तयारी करणं इ. गोष्टी त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या म्हणजेच तात्कालिक ध्येय (Short term goal) जी त्याने यशस्वीरित्या पूर्ण केली, तर तो त्याचं दीर्घकालिक (Long term goal) ध्येय गाठू शकेल.

मनुष्याचं अंतिम ध्येय असतं 'आनंद मिळवणं'. तो आनंद मात्र प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळया गोष्टींतून मिळतो. म्हणूनच प्रत्येकाचं अंतिम ध्येय (Ultimate goal) जरी एकच असलं, तरी दीर्घकालिक ध्येयं भिन्न-भिन्न असतात आणि प्रत्येकाच्या जीवनात अनेक दीर्घकालिक ध्येयं असतात.

आज आपणही आपल्या आयुष्यातील विविध ध्येयं (Long term goal) करू आणि त्या प्रत्येक ध्येयाला गाठण्यासाठीच्या पायऱ्या, (आवश्यकता) ज्या आपल्याला चढायच्या आहेत, त्यांचीही सविस्तर यादी करू.

अर्थात, दीर्घकालिक ध्येय ठरवताना विचारपूर्वक ठरवावं लागतं. केवळ भावनेच्या भरात ध्येय ठरवू नये. म्हणजे एखादी मुलगी 'मेरी कोम' चित्रपट पाहून आली आणि लगेच तिने 'बॉक्सर' बनायचं ध्येय निश्चित केलं, तर ते वास्तविकतेला (Realitybm) धरून असेल का? नक्कीच नाही. कारण भावनांच्या भरात ठरवलेली ध्येयं ही भावना ओसरताच विरून जातात.

यासाठी आपली ध्येयं वास्तवाला धरून असावीत. अर्थात, मन आणि बुध्दी या दोघांच्या मतैक्याने ती निश्चित करावीत. यासाठी एक अगदी सोपी पध्दती आहे. आपण खालील संदर्भात स्वअभ्यास करावा.

व्यक्तिमत्त्व :     एक व्यक्ती म्हणून माझ्यात कोणते गुणावगुण आहेत? माझा स्वभाव कसा आहे?

आवड  : मला नेमकी कसली ओढ आहे? मला काय काय मिळवावसं वाटतं?

क्षमता : निसर्गाने मला कोणकोणत्या क्षमता दिल्या आहेत?

या तिन्ही गोष्टींची विचारपूर्वक मांडणी करून त्यांच्या मदतीने साध्य होईल असं ध्येय ठरवावं. आपल्याला ती बेडकीची गोष्ट आठवते ना? पिलांनी पाहिलेल्या प्राण्याइतकं स्वत:च्या शरीराला फुगवताना तिला स्वत:चा जीव गमवावा लागला.

आपल्या आयुष्यातली दीर्घकालिक ध्येय साधारणत: चार प्रकारची असतात -

* स्वास्थ्यविषयक : आपलं जीवन निरामय व्हावं असं वाटत असेल तर आहार, व्यायाम, झोप, दिनचर्या याबाबत स्पष्ट ध्येय ठरवावीत.

* कौटुंबिक-सामाजिक नातेसंबंध : सर्वांशी चांगले, जिव्हाळयाचे संबंध ठेवण्यासाठी, समाजाचा घटक म्हणून यशस्वी होण्यासाठीची ध्येयं निश्चित करावीत.

* कामकाज-व्यवसाय : विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात तर प्रौढांना त्यांच्या कामात यशस्वी करण्यास मदत देणारी ध्येयं ठरवून घ्यावी.

* आंतरिक शक्ती : सर्व धावपळीत मनाला स्थिर ठेवण्यासाठी काही ध्येयं ठरवून घ्यावीत.

एकदा का ही ध्येय आपल्या डोळयांसमोर आणली, की त्या प्रत्येकाला सफल करण्यासाठी योजना करावी लागेल.

आपल्या मार्गात अडथळा येणाऱ्या गोष्टीदेखील समजून घ्याव्या लागतील. उदा., एखाद्या सर्वसामान्य घरातील मुलीने मेडिकलला जाण्याचं ठरवलं, तशा क्षमता, व्यक्तिमत्त्व तिला लाभलंय, पण मेडिकलकरिता लागणारी फी भरणं तिच्या पालकांना शक्य नाही. अशा वेळी ती अन्य पर्यायी मार्गांची मदत घेऊन तिचं ध्येय गाठू शकेल.

ध्येयाला वेळेच्या मर्यादा घालून घेणं आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीने जर वजन कमी करायचं ठरवलं, तर ते किती काळात करावं हेही ठरवावं. त्यामुळे आंतरिक प्रेरणेने प्रयत्नांत सातत्य राहील.

आपण जे काही प्रयत्न करू, त्याचा पाठपुरावा गरजेचा आहे. पाठपुराव्यामुळे आवश्यक बदल लक्षात येतात. असाच एक विनोद वाचनात आलेला आठवला. एका व्यक्तीने बागेत कामासाठी तीन कामगार नेमले. एकाने खड्डा खणायचा, दुसऱ्याने झाड लावायचं, तिसऱ्याने पाणी घालायचं अशी कामं ठरवून दिली. आठ दिवसांनी बागेत पाहायला गेला, तर त्याला नुसत्या खड्डयांना पाणी घातलेलं दिसलं. कारण झाडं लावणारा कामगार आजारी पडला होता.

आपली ध्येयं सकारात्मक आहेत ना, त्यातून कोणाचं निष्कारण नुकसान होत नाही ना, याचाही विचार करावा लागेल.

अनेक प्रेरणादायी माणसं आपल्या आजूबाजूला वावरत असतात. प्रत्येकातलं उत्तम ते आत्मसात करत ध्येयांना प्रत्यक्षात उतरवणं सुलभ करता येतं.

एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल - काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेरच्या असतात. त्यामुळे काही वेळा अपयश आलं, तर ते स्वीकारावं आणि ते पूर्ण करण्यास दुसरा मार्ग शोधावा.

आपल्या ध्येयाची सतत मनात उजळणी केली, तर विचार भावना त्यासाठी अनुकूल होतील.

तर अशी ही ध्येयनिश्चितीची सफर आपण सर्वांनी आज सुरू केली. या ध्येयांना प्रत्यक्षात आणत आपल्या जीवनचित्रात आणखी एक रंग भरण्यासाठी सर्वांना शुभेच्छा!

9273609555, 02351692000

suchitarb82@gmail.com