अनेक शतकांच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्याची हीच योग्य वेळ

विवेक मराठी    21-Jan-2017
Total Views |

युरोपात, अमेरिकेत बहुसंख्य लोकांनी आपणहून ख्रिश्चन धर्म सोडण्याची भूमिका घेतली असल्याने भारतात व भारताबरोबर अन्य शंभर देशांत आक्रमक भूमिका घेणाऱ्या या ख्रिश्चन संस्था संदर्भहीन झाल्या आहेत. वास्तविक त्यांच्या धर्माच्या अनुयायांची त्यांच्या धर्माबाबत काय भूमिका आहे, हा त्यांचा खाजगी विषय आहे. तरीही जोपर्यंत त्यांची भूमिका आक्रमणाची आहे, तोपर्यंत आपणाला त्याचा विचार करणे आवश्यक आहे. या संदर्भात भारताने ठाम भूमिका घेतल्यास अनेक शतकांचे आक्रमणाचे जोखड फेकून देणे शक्य होणार आहे व त्यामुळे जगातील अन्य शंभर देशांनाही त्या दृष्टीने एक नवी शक्ती मिळणार आहे.
गातील अवघ्या श्वेतवर्णीय विश्वात - म्हणजे संपूर्ण युरोप, अमेरिका, ऑॅस्ट्रेलिया या खंडांत आणि आशिया-युरोपमध्ये पसारा असलेल्या रशिया या प्रचंड मोठया भूभागात पसरलेल्या देशांत सर्वत्र ऐंशी ते शंभर टक्के ख्रिश्चन असतानाही ते अल्पसंख्य व्हावेत, असा एकविसाव्या शतकाचा चमत्कार आहे. स्वकीयांची स्वकीयांच्या देशातच अशी अनवस्था स्थिती होईल, याची ख्रिश्चन नेतृत्वाला कल्पना होती की नाही, हे सांगता येणे कठीण आहे. पण एक गोष्ट खरी की, अन्य क्षेत्रांत यांची संख्या कोटीकोटीने आणि अब्जाच्या पटीने वाढली पाहिजे, याची दखल त्यांनी दीड-दोन शतकांपासूनच घेतलेली दिसते. त्याचे दृश्य स्वरूप म्हणजे विसाव्या शतकाच्या प्रारंभी ख्रिश्चनांची संख्या एक कोटीच्या घरात असलेला आफ्रिका खंड एकविसाव्या शतकाच्या आरंभी एक अब्जच्या घरात पोहोचला आहे. यासारख्या बाबींची उठाठेव करण्याची आवश्यकता अशी की, जगाच्या पाठीवर त्यांचे कोठे दोनशे वर्षे, तर कोठे पाचशे वर्षे वर्चस्व होते. सारा युरोप गेल्या अर्धसहस्रकात आक्रमक होता. गेल्या एक हजार वर्षांचा जगाचा इतिहास असा आहे की, या काळात मध्यपूर्वेतील जिहादी आणि मोगलही असेच आक्रमक होते. त्याचाच जगावरील वर्चस्वाचा काळ मोठा आहे. मोंगल, जिहादी आणि युरोपीय यांचे जगावरील ज्या सव्वाशे देशांवर वर्चस्व होते, त्या बहुतेक देशांतील समान बाब म्हणजे त्यातील कोणताही देश आत्मविश्वासाने उभा राहू शकलेला नाही. त्या बहुतेक देशांवर आक्रमक ख्रिश्चन देश आणि आक्रमक जिहादी देश यांच्या फेरवर्चस्वाची धास्ती राहिली आहे. भारत हा त्यापैकीच एक देश होय. येथील वस्तुस्थिती तर अशी की, गेल्या साठ-सत्तर वर्षांत येथे लोकशाही पध्दतीने राज्य केलेल्यांनीच येथे आक्रमण केलेल्यांचा पाठिंब्यासाठी उपयोग करून घेतला. त्याचा परिणाम म्हणजे त्या आधीच्या आक्रमकांनी दहशतवादाच्या मदतीने सारा देश पोखरला. भारताची जी स्थिती आहे, त्यापेक्षा त्या पध्दतीच्या अन्य देशांची स्थिती निराळी नाही. गेल्या एक हजार वर्षांत ज्यांनी आक्रमणे व लूट केली, त्यांचे भारताबाबतचे व अन्य त्या देशांबाबतचे मनसुबे तसेच आहेत.

 भारतावर आणि जगावर आक्रमण व लूट करणाऱ्यांबाबत विचार करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, या दोन्ही आक्रमणांना पूर्वी सारे जग घाबरत असे. आजही त्यांच्या आक्रमणाची आक्रमकता अधिक जहाल झाली असली, तरीही त्यांना सव्वाशेर ठरणारे अनेक घटक सध्या जगात आक्रमक आहेत. त्यापैकी अमेरिकेतच मोठे तळ आहेत. फार मोठया लोकांची तेथे अशी प्रतिज्ञा आहे की, 'जोपर्यंत अमेरिकेत कोलंबसचा मुक्काम आहे, तोपर्यंत आम्हाला शांत झोप येणार नाही.' ज्या सव्वाशे देशांत या सेमेटिक महासत्तांनी आक्रमणाची व लुटीची भूमिका घेतली, त्या प्रत्येक ठिकाणी आता स्थानिक गट जमिनीत पाय घट्ट रोवून उभे आहेत. आक्रमकांच्या पाठिंब्यावरच राज्य करणारी त्या त्या ठिकाणची नेहरू परंपरेची जागा आता त्या त्या ठिकाणच्या मोदींनी घेतली आहे. त्यामुळे आक्रमकांच्या विरोधात जग आक्रमकही आहे आणि संघटितही होते आहे. तरीही त्याचा प्रतिरोध करण्यासाठी एवढी शक्ती पुरणारी नाही. 

पाश्चात्त्य जगाला त्या दृष्टीने सध्या प्रतिकूलतेचा काळ असला, तरी त्यांचे मनसुबे दडून राहिलेले नाहीत. त्यांची आक्रमणाची एक पध्दती आहे. जिहाद्यांचीही तशीच पध्दती आहे. सध्याचा दहशतवाद हा मोठया आक्रमणाचाच भाग आहे. कोणत्याही देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व त्या त्या देशाला प्राणप्रिय असते. त्या दृष्टीने यासारख्याचा विचार करावा लागतो. यासारख्या बाबीचा युरोप-अमेरिकेतील ख्रिश्चनांच्या अल्पसंख्य होण्याशी संबंध असा की, तेथील त्यांची संख्या कितीही कमी किंवा जास्त होत असली, तरी त्यांचे जगभर पसरणे कमी झालेले नाही. त्यामुळे एका बाजूला तरी ते कितीही अल्पसंख्य झाले, तरी त्यांची भारतावरील आक्रमणाची इच्छा कमी झाली असे मात्र मानता येणार नाही. इ.सन 1999मध्ये त्या वेळचे पोप जॉन पॉल दुसरे यांनी भारतात येऊन जी घोषणा केली होती, ती न विसरता येण्यासारखी आहे. आशियातील सर्व देशातील ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या परिषदेत बोलताना ते म्हणाले होते की, ''गेल्या दोन सहस्रकांत आपण युरोप, आफ्रिका, अमेरिका आणि ऑॅस्ट्रेलिया हे खंडच्या खंड येशूच्या कळपात आणले आहेत आणि आता आशिया आणायचा आहे.'' त्यांच्या बोलण्याची प्रचिती म्हणजे याच काळात त्यांनी चीनमध्ये बारा कोटी लोकांना ख्रिश्चन केले आहे. त्यामुळे भारतातील संघटनाची आणि कामाची त्यांची पध्दती समजावून घेतली पाहिजे.

याबाबत चीनची जी स्थिती आहे, तशी भारताची नाही; पण येथील त्यांची आक्रमक भूमिका दुर्लक्षिण्यासारखी नाही. एक म्हणजे ही मंडळी जेव्हा प्रचाराला बाहेर पडतात, तेव्हा त्यांची भाषा लोभस असते. प्रेमाची असते. पण त्याच ठिकाणी थोडीही शक्ती जमा झाली की लगेचच सामर्थ्याचे प्रदर्शन करणारी असते. हळूहळू स्वतंत्र अस्तित्वाची मागणी आणि त्यानंतर त्या त्या देशातून फुटून निघण्याची मागणी या पाठोपाठ येत असतात. त्या त्या ठिकाणची लूट आणि त्याच्या आधारे जगातील अन्य ठिकाणच्या लुटी हे पुढचे मार्ग असतात. अशातूनच त्यांनी जगाला लुटण्याचे सामर्थ्य निर्माण केले. भारतातील मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय या 'जिल्हा' राज्यांचा तसा अनुभव आहे. त्यांना 'जिल्हा राज्ये' म्हणायचे कारण असे की, भारतातील दूर असलेल्या आसाम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी प्रथम शतप्रतिशत ख्रिश्चन ही भूमिका राबवली. त्यांची स्वतंत्र राज्याची मागणी स्वतंत्र देशाच्या मागणीतून सुरू झाली. भारतातही जेथे जेथे त्यांचे धर्मांतर सुरू आहे, त्या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र अस्तित्वाची मागणी व पाठोपाठ स्वतंत्र देशाची मागणी असे टप्पे प्रत्यक्ष दिसत आहेत. चीनमध्येही यापेक्षा निराळी स्थिती नाही. तेथे बारा कोटी लोक ख्रिश्चन असल्याचा त्यांचा दावा आहे. त्या पाठोपाठ त्यांनी चीनमध्ये तेथील राज्यकर्त्या कम्युनिस्ट शासनाच्या साडेसात कोटी या सदस्यसंख्येपेक्षा आम्ही जास्त आहोत, असे दाखवून लवकरच आम्हीच येथे राज्य करणार, असा दावा करण्यास आरंभ केला. भारत आणि चीनप्रमाणेच अमेरिका, ऑॅस्ट्रेलिया आणि आफ्रिका या खंडांची तीच स्थिती आहे. त्यामुळे गेल्या पाचशे वर्षांतील धर्मांतराच्या आधारे केलेली जगाची लूट हे सूत्र लक्षात ठेवले, तर तेवढेच सावध असण्याची गरज आहे.

भारतात त्यांच्या निरनिराळया बेचाळीस संघटना या धर्मांतराच्या कामात गुंतलेल्या आहेत. याबाबत एक साधे निरीक्षण सर्वांनाही जाणवेल की, अलीकडे गेल्या काही वर्षांत भारतात प्रत्येक गावात आणि शहरी भागात प्रत्येक झोपडपट्टीत ख्रिश्चन प्रचारक दिसू लागले आहेत. ही वाढ गेल्या दहा वर्षांतीलच आहे. येथे प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना होत असते. त्या प्रत्येक जनगणेतील यांचा अनुभव असा की, येथील एकूण वाढीच्या तुलनेत यंाची वाढ अधिक असते. त्याहीपेक्षा यांची वाढ करण्याचा त्यांचा आणखी एक मार्ग आहे, तो म्हणजे 'क्रिप्टो ख्रिश्चन' - म्हणजे अनेक ठिकाणी ख्रिश्चनीकरण जरी केले, तरी जनगणनेत त्यांचा समावेश न करण्याचे त्यांच्या संघटनांनी ठरविले आहे. त्या त्या ज्ञातीचे सरकारने दिलेले फायदे घेण्यासाठी ते हिंदूच असतात. देश पोखरण्याच्या त्यांच्या उद्दिष्टातील एक साध्य असेही त्यांचे स्वरूप असते. ख्रिश्चनांचे लोकसंख्येतील प्रमाण 2.3 टक्के आहे. हे प्रमाण इ.सन 2001च्या जनगणनेइतकेच आहे. पण क्रिप्टो ख्रिश्चनांची संख्या वाढविण्यात आली आहे. देशातील ख्रिश्चनांच्या संख्येचे जेथे जेथे प्रमाण अधिक आहे, त्या ठिकाणी या ना त्या प्रकारे फुटीरतावादी व दहशतवादी कृत्यांचे प्रमाण अधिक आहे. पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक ख्रिश्चन केरळमध्ये आहेत, तर तामिळनाडूमध्ये हे प्रमाण पावणेसोळा टक्के आहे. कर्नाटकात हे प्रमाण 4.2 आहे. आंध्रात हेच प्रमाण 4.9 आहे. ईशान्य भारतात त्यांनी त्यांची अधिकाधिक शक्ती वापरून तेथील प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 29.9% आहे. याखेरीज जेथे जेथे त्यांची संख्या आहे, ती संघटित आहे. झारखंड, ओरिसा आणि छोटा नागपूर येथेही त्यांचे वर्चस्व आणि त्यांच्या चळवळीही वाढत आहेत. तेथील लोकसंख्या आणि त्या भागातील फुटीरता चळवळी यांचा काय संबंध आहे, याचा भारतात अभ्यास होण्याची गरज आहे.
सर्वसाधारणपणे कोणत्याही देशातील लोकसंख्येबाबत केलेली ठोकळेबाज विधाने नेहमी चुकीची ठरतात. म्हणजे ख्रिश्चनांच्या जगभरातील भूमिकेची आक्रमकता आणि लुटण्याची वृत्ती यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक ख्रिश्चनांबाबत तसे विधान करणे चुकीचे आहे. त्या त्या वेळी झालेल्या बाबींच्या आधारे सारे काही मोजता येणार नाही. या मंडळींची मातृभूमीवरील देशभक्ती वादातीत असते व सर्व कसोटयांना टिकलेली असते. तरीही अनेक शतकांची आक्रमणे व वसाहतवाद लादण्याचा प्रकार हा त्यांच्यावरील व्यापक स्वरूपानेच घ्यावा लागतो. त्या दृष्टीने विचार केल्यास स्वातंत्र्योत्तर काळात ख्रिश्चन प्रचाराच्या निमित्ताने जगभर अधिकाधिक प्रमाणात पसरण्याची भूमिका युरोपातील प्रत्येक देशाने स्वतंत्र आणि एकत्रितरित्या घेतली आहे. भारताचा स्वातंत्र्योत्तर काळ ज्याप्रमाणे इ.सन 1947 नंतर सुरू होतो, त्याचप्रमाणे जगातील शंभरपेक्षा अधिक देशांची तीच स्थिती आहे. इ.सन 1950 हे जर मध्यवर्ती साल मानले, तर त्याच्या आधी पाच वर्षे आणि नंतर पाच वर्षे युरोपीय देशांच्या जोखडातून मुक्तीचे पर्व मानले जाते. त्या सर्व ठिकाणी युरोपीय व अमेरिकी देशांची आक्रमकता सारखीच राहिली आहे. त्यातील जेवढा प्रयत्न राजनैतिक स्वरूपाचा झाला, तेवढाच प्रयत्न चर्चच्या अंगाने झाला. यासारख्याचा आज विचार करण्याची आवश्यकता अशी की, चर्चच्या अंगाने काम करणाऱ्या बहुतेक संस्था युरोपात, अमेरिकेत बहुसंख्य लोकांनी आपणहून ख्रिश्चन धर्म सोडण्याची भूमिका घेतली असल्याने भारतात व भारताबरोबर अन्य शंभर देशात आक्रमक भूमिका घेणाऱ्या या ख्रिश्चन संस्था संदर्भहीन झाल्या आहेत. वास्तविक त्यांच्या धर्माच्या अनुयायांची त्यांच्या धर्माबाबत काय भूमिका आहे, हा त्यांचा खाजगी विषय आहे. तरीही जोपर्यंत त्यांची भूमिका ही आक्रमणाची आहे, तोपर्यंत आपणाला त्याचा विचार करणे आवश्यक आहे. या संदर्भात भारताने ठाम भूमिका घेतल्यास अनेक शतकांचे आक्रमणाचे जोखड फेकून देणे शक्य होणार आहे व त्यामुळे जगातील अन्य शंभर देशांनाही त्या दृष्टीने एक नवी शक्ती मिळणार आहे. & 9881717855