पुरोगामी एकाक्ष

विवेक मराठी    21-Jan-2017
Total Views |

आपण पुरोगामी आहोत, हे सिध्द करण्याचा सोपा मार्ग म्हणजे हिंदुत्वावर सातत्याने आरोप करणे आणि बिनबुडाच्या आरोपांना अशा प्रकारे सादर करणे की जसे काय आम्ही सांगत आहोत तेच वास्तव आहे. हिंदूविरोधात पुरोगामी इतक्या जोरदारपणे आरडाओरडा करतात की सर्वसामान्य जनता त्यावर विश्वास ठेवते. जे वाईट आहे, समाजहिताला बाधा आणणारे आहे, त्याचा निषेध करायलाच हवा. मात्र ही पुरोगामी मंडळी समाजात, देशात घडणाऱ्या सर्व बाबींवर भाष्य करत नाहीत. ते फक्त हिंदुत्ववादी विचारधारा आणि या विचारधारेतील कार्यकर्ते यांच्यावर एकाक्षासारखा डोळा ठेवून असतात. त्यांना हिंदुत्ववादी विचारधारा सोडून जगात दुसरे काही दिसत नाही. या एकाक्षदृष्टीवरच त्यांची पुरोगामित्वाची झूल टिकून असते असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही.
जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना भेटणाऱ्या आणि आपले मत व्यक्त करणाऱ्या झायरा वसिम या सोळा वर्षीय अभिनेत्रीला काश्मीरमधील फुटीरतावाद्यांनी लक्ष्य केले आणि अत्यंत हीन पातळीवर जाऊन तिच्यावर टीका केली. धमक्या दिल्या. हा प्रकार इतका भयंकर होता की शेवटी झायरा वसिमला सोशल मीडियावर माफीनामा लिहावा लागला. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांना तिच्या संरक्षणाची व्यवस्था करावी लागली. एका मुस्लीम मुलीला फुटीरतावादी लोक धमक्या देतात, तिच्या जीविताला धोका उत्पन्न होतो, पण यावर पुरोगामी मंडळी चकार शब्द उच्चारत नाहीत. फुटीरतावाद्यांनी दिलेल्या धमक्या आणि त्यातून झायरा वसिमला लिहावा लागलेला माफीनामा हा असहिष्णुतेचा भाग नाही का? असा आम्हाला प्रश्न पडतो.

प्रश्न केवळ काश्मीरमधील फुटीरतावाद्यांचा नाही, तर देशभर अशाच प्रकारचा नंगानाच करणाऱ्या मंडळींकडे तथाकथित पुरोगामी कायमच काणाडोळा करतात, असा आजवरचा इतिहास आहे. झायरा प्रकरणात सिनेसृष्टीतील मोजकेच संवेदनशील लोक सोडले, तर बाकी साऱ्याच आघाडीवर सामसूम राहिली आहे. धमकी देणारे जर हिंदू असते, तर काय स्थिती राहिली असती? पुरोगामित्वाची झूल पांघरलेल्या मंडळींनी अगदी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाऊन बोभाटा केला असता. मानवाधिकार, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य अशी वेगवेगळी बिरुदे लावून बेंबीच्या देठापासून आरोळी ठोकली असती. पण धमकी देणारे, झायराला माफीनामा लिहिण्यास भाग पाडणारे दुर्दैवाने हिंदू नाहीत, त्यामुळे अशा घटनांकडे पाहण्याची, त्यांचा निषेध करण्याची आवश्यकता या पुरोगामी मंडळींना वाटत नाही.

केरळमध्ये दिवसाढवळया हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे खून होतात, पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर परागंदा होण्याची वेळ येते, पूर्वांचलात हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न उग्र स्वरूप धारण करतो आहे.... पण या सगळया गोष्टींकडे पाहण्याची, त्यावर भाष्य करण्याची, अन्याय-अत्याचाराविरुध्द आवाज बुलंद करण्याची गरज या तथाकथित पुरोगाम्यांना कधीच वाटत नाही. उलट अशा घटनांबाबत एक शब्द जरी उच्चारला तरी आपण प्रतिगामी ठरू आणि आपल्या रोजीरोटीवर गदा येईल, अशी त्यांना भीती वाटत असते. आणि मग सोईस्करपणे ही पुरोगामी मंडळी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराकडे काणाडोळा करत असतात.

हिंदुत्वाचा विरोध हेच पुरोगामित्वाचे एकमात्र लक्षण झाल्यामुळे आपोआपच अन्य गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि त्यावर काही बोलण्याची आवश्यकता उरत नाही. मात्र हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू विचाराच्या संघटना यांचा पाणउतारा करण्यासाठी, पर्यायाने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ही मंडळी अग्रेसर असतात. हा 'सिलेक्टिव्ह' व्यवहार कशासाठी? याचे उत्तर ही मंडळी देतील का? गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या सिलेक्टिव्ह पुरोगाम्यांचे वारूळ फुटले आहे. काहीही करून हिंदू धर्म, हिंदू विचारधारा यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे आणि पुरोगामित्वाचे ढोल वाजवून आपली पोळी भाजून घ्यायची, हा त्यांचा स्वभावधर्म झालेला आहे. आणि त्यामुळे झायराचा माफीनामा हा त्यांच्या कार्यकक्षेतील विषय होत नाही, किंवा विषयातील गांभीर्य लक्षात येऊनही काही विशिष्ट गटाचे लांगूनचालन करण्यासाठी अशा गोष्टीवर भाष्य करण्याचे धाडस त्यांना होत नाही.

पुरोगाम्यांचा हा दुटप्पी व्यवहार पाहता त्यांनी गांधारीसारखी पट्टी बांधली आहे का? असा प्रश्न पडतो. गांधारीने आपल्या डोळयावरची पट्टी सोडून जसे दुर्याेधनाला बळ दिले, तसेच हे पुरोगामी 'सिलेक्टिव्ह' व्यवहारातून फुटीरवाद्यांना, अराजकाचे समर्थन करणाऱ्यांना बळ देत आहेत. पक्षपाती व्यवहार करून केवळ हिंदूंना कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे आणि आपले बेगडी पुरोगामित्व दाखवून द्यायचे, हा पवित्रा आता सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येऊ लागला आहे. जे समाजविघातक आहे, राष्ट्रविरोधी आहे, त्याचा सर्व स्तरांतून निषेध झालाच पाहिजे; पण असे करताना सिलेक्टिव्ह बेगडी पुरोगामीपणा करता कामा नये. नाहीतर पुरोगामित्वाची झूल जनताच काढून घेईल, हे पुरोगाम्यांनी लक्षात ठेवावे.

पुरोगाम्यांची ही ढोंगे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येऊ लागली आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनता आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे, पण या प्रतिक्रिया गंभीरपणे घेण्याऐवजी त्यालाही असहिष्णू म्हणून पुरोगामी कंपू संभावना करत आहे. या साऱ्याचा परिपाक म्हणूनच की काय, पुरोगामी हा शब्द आता शिवी झाला आहे.