विक्रमी धर्मसंस्कृती महाकुंभ

विवेक मराठी    03-Jan-2017
Total Views |

24, 25 डिसेंबर रोजी नागपूर येथे रेशीमबागेच विराट धर्मसंस्कृती महाकुंभ संपन्न झाला. समाजाला आणि धर्माचार्यांनाही नवी दृष्टी देण्याचे काम या महाकुंभामुळे झाले. संत, समाज आणि संस्कृती यांचा त्रिवेणी संगम यावर भाष्य करण्याऐवजी काही माध्यमांनी या महाकुंभातील विषय मोडतोड करून, चुकीच्या पध्दतीने प्रकाशित केले. संपूर्ण समाजाला नवी ऊर्जा आणि दिशा देणाऱ्या या महाकुंभाचा वृत्तान्त विवेकच्या वाचकांसाठी देत आहोत
योध्येत श्रीरामचंद्रांचे मंदिर निर्माण व्हावे असे आवाहन सरकारला व देशाच्या नागरिकांना करणारी धर्मसंसद नागपूरला नुकतीच पार पडली. 24 ते 25 डिसेंबर या कालावधीत संपन्न झालेल्या या धर्मसंसदेत नानाविध उपक्रम राबविले गेले. ही धर्मसंसद आपल्या शैलीत आगळीवेगळी होती. यात साधुसंन्याशांबरोबर सैनिकांचा सत्कार, सन्मान हा भाव होता, शिवाय मातृशक्तीला वंदन होते. रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांची उपस्थिती, त्यांची तीन भाषणे या संसदेत होती. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांचे त्यात भाषण होते, तर राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांचीही उपस्थिती या धर्मसंसदेत होती.

संपूर्ण भारतीय वंशातील 24 हजार 34 महिलांनी सामूहिक शिवमहिम्न स्तोत्राचे पठण करून एक विक्रम घडविला. त्यामुळेच या महाकुंभाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये करण्यात आली. विश्वमांगल्य सभेच्या अध्यक्षा कुंदा गणोरकर आणि पूर्णकालिक अधिकारी पूजा देशमुख यांना सरसंघचालकांच्या हस्ते त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. डॉ. सुनीता धोटे व निखिलेश सावरकर यांनी परीक्षण केल्यानंतर या विक्रमाची नोंद झाली. सरसंघचालकांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आले, त्या वेळी अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ महाराज पीठाचे तसेच या महाकुंभाचे निमंत्रक जितेंद्रनाथ महाराजव ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही या संसदेत शनिवारी भाषण झाले. या धर्मसंस्कृती महाकुंभात 1118पेक्षा अधिक संतमंडळी आली होती. सामान्यत: असे महाआयोजन ज्या वेळी होते, तेव्हा त्या ठिकाणी कार्यक्रमानंतर बहुधा कचऱ्याचे ढीग व दुर्गंधी तेवढी उरलेली असते. पण या महाकुंभाचे आणखी एक वैशिष्टय होते की, त्या रेशीमबाग मैदान परिसरावर धुपाचा दरवळ सर्वत्र पसरला आहे. या देवनाथ नगरीत 200पेक्षा अधिक कार्यकर्ते महाकुंभाची अंतिम आवरासावर करीत आहेत. या मैदानावर लाखो लोकांसाठी स्वयंपाक करण्यासाठी म्हणून 50 चुली घालण्यात आल्या होत्या. या चुलींसाठी चर खोदण्यात आले होते, ते आता बुजविले गेले असून मैदान पूर्ववत क्रीडा सरावासाठी उपलब्ध झाले आहे. या सोबत या मैदानावर शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती. ती शौचालये उभारली होती याचे कुठलेही चिन्ह त्या परिसरात उरलेले नाही. सोमवार 26पासून या मैदानावर क्रिकेटचा सराव सुरू झाला आहे.

शंकराचार्यांसह स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांच्या आणि संतमहंतांच्या तसेच विचारवंतांच्या वैचारिक दृष्टीतून समर्थ राष्ट्रनिर्मितीचा वसा व जगण्याची नवी उमेद घेऊन राज्यभरातून आलेल्या भाविकांनी जड अंत:करणाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे लाइव्ह वेबकास्ट लाखो लोकांनी पाहिले असून महाकुंभाचा प्रत्येक उपक्रम यू टयूबवर उपलब्ध आहे.

या महाकुंभाच्या फलश्रुतीबाबत सा. विवेकशी बोलताना स्वामी जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, ''या महाकुंभाला मिळालेला उदंड प्रतिसाद हा लोकांच्या मनात देशप्रेम जागृत असल्याचे प्रतीक आहे. प्रामाणिक हेतू, विधायक विचार, पारदर्शक आचार, प्रेम व श्रध्दापूर्वक विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा सर्व खटाटोप होता. जनताजनार्दनाने तो उचलून धरला आहे. शाश्वत मूल्यांच्या जतनाचा हा प्रयत्न असून देशात अशा प्रत्येक प्रयत्नासाठी समाज एकत्र आला आहे, हा इतिहास आहे. देशच ज्यांच्यासाठी सर्वोपरी आहे, अशा सर्वांनी या महाकुंभात योगदान दिले आहे. सर्वसमावेशकत्व हे वैशिष्टय ठेवून आणि राष्ट्राच्या संदर्भात शुध्द विचारधारा बाळगून उभ्या केलेल्या कार्याला जनशक्तीचा हातभार लागतो. पाठिंबा लाभतो. मुळात जनतेच्या मनात असलेला विचार तेवढा या निमित्ताने बोलला गेला. योग जुळून आला की, पुन्हा महाकुंभ होईल व समाजही एकत्र येईल हा विश्वास मनात होताच, त्यावर या आयोजनाने लोकमुद्रा उमटली.''

या महाकुंभात प्रेरणा संगम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात भारतीय सेना व वीर शहीदांच्या कुटुंबीयांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या वेळी शंकराचार्य जगद्गुरू वासुदेवानंद सरस्वती, योगी आदित्यनाथ, जनरल निर्मलचंद्र विज, पुण्याचे एअर मार्शल भूषण गोखले, कर्नल सुनील देशपांडे प्रभृती व्यासपीठावर होते. लेफ्टनंट जनरल सैय्यद अताहस बैन व गुजरातचे माजी पोलिस अधिकारी ए.जी. वंजारा या वेळी प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान 150 वीरपत्नी व मातांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिका विस्थापित काश्मिरी पंडितांच्या सेवेसाठी वापरल्या जाणार आहेत. या वेळी बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, ''प्रपंचात आपण देवाचे नाव घेतो, तेव्हाच सर्व काही सुरळीत चालते ना? मग त्याच धर्तीवर सैनिकांचे स्मरणही सदैव ठेवायला हवे. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केवळ युध्दाची वेळच यायला हवी असे जरुरी नाही, तर ते स्मरण नित्यनेमाने आणि हृदयापासून करा. साध्या शब्दांत सांगायचे झाले तर जीवन जगताना देवभक्ती व देशभक्ती समान ठेवायला हवी.

सैनिक शत्रूशी दोन-दोन हात करून शहीद होतात तर संत प्रकृतीशी याच शत्रुप्रवृत्तीशी लढता लढता वैकुंठाला जातात. संत व सैनिक यांच्यातील हे साधर्म्य खरोखर खूप काही शिकण्यासाठी आपल्याला वापरता येते. जेव्हा युध्दाचा प्रसंग उभा राहतो तेव्हा देशातील प्रत्येक नागरिक सैनिकांच्या पाठीशी उभा राहतो, पण युध्द नसताना मात्र तो त्या सैनिकांना विस्मृतीच्या गर्तेत ढकलून देतो. तसेच व्हायला नको. देवाचे नामस्मरण आपण जसे नेहमी करतो तसेच सैनिकांचे स्मरणही नेहमीच करायला हवे.''
शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती। असे कवन म्हणत सरसंघचालकांनी सैनिक कसा कार्य करतो याचे चित्रच उपस्थितांसमोर उभे केले. संत हे जसे कुठल्या धर्माचे, कुठल्या पंथाचे, कुठले राहणार हे न बघता ते दिसताच आपण त्यांना आदराने नमस्कार करतो. म्हणजेच संतांचे नाव माहीत असो वा नसो, आपले मस्तक त्यांच्यासमोर आदराने लवते. असाच आदरभाव सैनिकांप्रति आपल्या मनात उपस्थित व्हायला हवा.

प्रेरणा संगम कार्यक्रम सुरू होण्याआधी मुख्य मंडपात बारा ज्योतिर्लिंगांना अभिषेक करण्यात आला. बारा ठिकाणी हे शिवलिंग ठेवण्यात आले होते. एकूण 48 दांपत्यांच्या हस्ते हा अभिषेक सोहळा पार पडला. अमरावतीचे अण्णाजी देशपांडे यांच्या प्रमुख पौराहित्याखाली सहभागी झालेल्या पुरोहितांनी कोणतेही मानधन न घेता ही सेवा दिली. यजमानांकडून प्राप्त दक्षिणाही महाकुंभाच्या आयोजनात दिली. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्व संतमहात्मे स्मृतिमंदिर परिसरात एकत्र आले. या वेळी रा.स्व. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

मंडपातील व्यासपीठालगतच प्रहार सैनिकी विद्यालयातर्फे उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाला सर्व मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली.मान्यवरांसह उपस्थित भाविक, वीरमाता, वीरपत्नी यांनी शहीद वीर जवानांना सलामी दिली. सॅल्युट केला. या स्मारकाजवळ काढण्यात आलेली फुलांची रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. भारताचा नकाशा व दिल्लीतील इंडिया गेटजवळील शहीद स्मारक त्यावर अंकित केले होते. महाकुंभाच्या शेवटच्या दिवशी रविवारी दुपारी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रवेशद्वारावर शिधा गोळा करण्यासाठी धान्याची पोती ठेवण्यात आली होती.
या वेळी बोलताना जनरल निर्मलचंद्र विज म्हणाले, ''दहशतवाद हा जागतिक पातळीवर गंभीर प्रश्न बनला आहे. त्या विरोधात लढण्याचे काम सैनिकच करतात. ते दहशतवाद्यांविरुध्द कायम तत्पर असतात. त्या सैनिकांप्रती त्यांचे स्टेटस कायम ठेवून सोयीसुविधा शासनाने पुरवाव्या.'' तर लेफ्टनंट जनरल सय्यद अताहत नैत यांनी नागपूरला सांस्कृतिक राजधानी संबोधून ''सैनिक सीमेवर लढत असतो, त्या वेळी त्याचा जगाशी संबंध येत नाही. परिणामत: तो दुनियादारी समजू शकत नाही, पण जेव्हा तो निवृत्त होतो तेव्हा त्याला दुनियादारीशी सामना करावा लागतो. अशा वेळी त्याला मदत केली पाहिजे'' अशी भावना व्यक्त केली. एअर मार्शल भूषण गोखले यांनी शत्रूचा सामना करण्यासाठी सदैव सज्ज असणाऱ्याला, तत्पर असणाऱ्याला सशस्त्र सेना म्हणा; सैनिक हा नेहमीच जिंकण्यासाठी लढत असतो. आपण बॅकफुटवर राहिलो तर साधा सामना जिंकत नाही, हे सत्य सांगून एअर मार्शल गोखले पुढे म्हणाले, ''आता आपल्याला पुढाकार घेऊन पुढेच जावे लागणार आहे.''
या वेळी वीरबंधू श्रीराम मेहेर, वीरमाता सीता माटे व वीरपत्नी मुक्ता चव्हाण यांचीही भाषणे झाली. दै. तरुण भारत, नागपूरने शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी 5 लाखाचा कृतज्ञता निधी वाचकांकडून जमा केला होता, तो जितेंद्रनाथ महाराजांना सुपुर्द करण्यात आला. मातृसंसदेनिमित्त दै. तरुण भारतने 'मातृशक्ती' हा विशेषांक काढला होता. रेवती जोशी यांनी संपादित केलेल्या या अंकांचे विमोचन सरसंघचालकांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन म्हणाल्या, ''स्त्री व पुरुष एकाच रथाची दोन चाके आहेत असे म्हटले जाते; पण पुरुष हा रथी असतो, तर स्त्री ही त्याची 'सारथी' असते. श्रीकृष्णाने जसा अर्जुनाला योग्य मार्ग दाखविला, तसाच संसाराचा रथ योग्य दिशेला नेण्याचे काम ही स्त्री-महिला करीत असते. महिलांना त्याकरिता असलेल्या कामाचे महत्त्व न कळल्यामुळे त्या स्वत:ला कमी लेखतात. त्याची गरज नाही.''

भारताने कधी कोणा देशावर आक्रमण करून सत्ता हस्तगत केली नाही. ही मातृसंस्काराची फलश्रुती आहे, अशी भावनाही सुमित्राताईंनी व्यक्त केली. तर पुरुषांच्या प्रबोधनाची गरज सरसंघचालकांनी व्यक्त केली. मातृवर्गाकडे बघण्याची समाजाची दृष्टी बदलली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, ''कोणत्याही स्त्रीचे कर्तृत्व व सौंदर्य बघण्यापेक्षा तिच्यातील मातृत्वाचा गौरव झाला पाहिजे. एकाच वेळी नानाविध अवधाने सांभाळून कार्य करणाऱ्या मातृशक्तीचा गौरव झाला पाहिजे. स्त्री श्रेष्ठ की पुरुष श्रेष्ठ हा प्रश्न नसून समाजाचे हे दोन्ही घटक परस्परपूरक आहेत'' हे सरसंघचालकांनी आवर्जून नमूद केले.

या महाकुंभानिमित्त हैदराबादच्या मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाचे कुलगुरू झाफर सारेशवाला नागपूरला आले होते. ते या महाकुंभाने फार भारावून गेले होते. ''केवळ धार्मिक भावनेतून भाषण देणारे देशातील सेक्युलर्स बिनकामाचे आहेत. सैनिकांचा जिथे सत्कार होतो तेथे तरी देशसेवेकडे भगवेकरण म्हणून बघू नका. हिंदू-मुस्लीम संवादांची हीच वेळ अतिशय योग्य आहे'' हे सांगून ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ''आजवर माझे आयुष्य संघ व हिंदुत्वाशी भांडण्यात गेले. बिनकामाच्या सेक्युलरांसारखी नुसती भाषणे देत होतो. नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळू नये यासाठी आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका दाखल करणारा मीच होतो'' हे सांगून ते म्हणाले, ''या कार्यक्रमासाठी सरसंघचालकांनी मला नागपूरला बोलाविले. त्या वेळी येताना मनात प्रचंड भीती होती, पण इथे येताच हा तर सैनिकांच्या सत्काराचा कार्यक्रम असल्याचे मला दिसून आले. सैनिकांचा सत्कार करण्यात कुठे आले हिंदुत्व? उलट या निमित्ताने संवाद सुरू होण्याची ही पहिली पायरी मानता येईल.''

कार्यक्रमात वारंवार सैनिक व संत परंपरा असा उल्लेख असताना सीमेवर हिंदू संतांना विशेषत: काश्मीर खोऱ्यात बसविण्याची योजना असू शकते काय - हा प्रश्न थेटपणाने फेटाळून लावत ते म्हणाले, यातील संत परंपरा याचा अर्थ फक्त हिंदू संत असा घेता येणार नाही. प्रत्येक धर्मात संत असतात व त चांगले काम करीत असतात. मौलवींनादेखील सीमेवर पाठवता येईल.

मात्र या सर्वाच माध्यमांनी गाजविला ते राजकीय विषयच संतांचा पुन्हा 'दस'चा नारा. त्या भाषणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हजर होते. मोहनजींच्या भाषणातही अनेक विचारप्रवर्तक मुद्दे होते, पण त्यांचा 'घरवापसी'चा मुद्दा माध्यमांनी गाजविला. 2019पूर्वी अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला. या धर्मसंस्कृती महाकुंभात 111 कोटी हनुमान चालिसाची पूर्णाहुती देण्यात आली. विहिंप नेते डॉ. प्रवीण तोगडियाही या महाकुंभात उपस्थित होते.

जय श्रीराम, हर हर महादेव व वंदे मारतम्च्या जयघोषाने देवनाथ नगरी दुमदुमली होती, हे मात्र खरे आहे.   

8888397727