अनुभवांची दुसरी बाजू

विवेक मराठी    03-Jan-2017
Total Views |

(भाग दोन)

मुलांच्या या मतातला प्रामाणिकपणा जेवढा महत्त्वाचा, तेवढाच त्यातला मुलांना काय जाणवतं हा अर्थ महत्त्वाचा. मला वाटतं मुलांच्या मनातला अर्थ शोधणं-सापडणं ही माझी शिकण्याची गोष्ट. आपल्या बाबतीत ही घडते का? शिक्षक म्हणून एक आपणच आपलं ऑडिट करू या का? या शैक्षणिक वर्षात मी काय काय शिकले? याचं काही उत्तर देता आलं तर ते नोंदवून ठेवू. शिक्षक म्हणून आपल्या शैक्षणिक ऑडिटचे मुद्दे काढणं हेही आपलं एक काम राहील.
''तु
म्हाला कोणतं गाणं आवडतं?''

''मराठी का हिंदी?''

''दोन्ही भाषांतली सांगा.'

''चौदवीका चाँद, आयेगा आनेवाला, तू गंगा की मौज में... मराठीतली लताबाईंची, आशाताईंची सगळी गाणी आवडतात.''

''वा! छान. मलासुध्दा ही गाणी आवडतात. पुस्तकं कोणती आवडती?''

''स्वामी, ययाती, मृत्युंजय, रायगडला जेव्हा जाग येते.''

''मलाही आवडतात ही पुस्तकं. अगदी श्यामची आईसुध्दा.''

''हो ना. आजही रडू येतं मला... आज मुलं हा सिनेमाही एका जागी बसून पाहत नाहीत. बोअर होतं त्यांना. काय म्हणावं....''

''तुमचा त्रागा समजतो मला. तुम्ही अजून 1960च्या काळातच वावरताय. देशभक्ती, उदात्त प्रेम वगैरे... पंचावन्न वर्षांनी काळ पुढे जाणं म्हणजे केवढा पुढे जाणं, याची कल्पना आपण तेव्हाच करू जेव्हा वर्तमानात जगायला शिकू. मुलींच्या आजूबाजूला जे घडतंय, जे वाचतायत मुली, पाहातायत ते फार नीतिमूल्यं जपणारं नाही. तुम्ही विचाराल, पूर्वी हे घडत नव्हतं का?... घडत होतं. पण सर्वांसमोर ते आणलं जात नव्हतं. त्याचा बाजारही होतोय... आपण आपल्या काळातून बाहेर येऊ या. वर्तमानाकडे डोळसपणे पाहू या. परिस्थिती समजून घेऊ आणि मग मुलींना कुठे-कसं न्यायचं हे ठरवू. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांचा समन्वय नाही साधला, तर आपण आजच्या मुली या सदरात बोलत राहणार. मुली आपल्याबद्दल बोलत राहणार. म्हणूनच मुलींसाठी एक गट तयार करू. आपल्याला अपेक्षित विषयांची मांडणी क्रमाक्रमाने या गटापुढे करू. हा गट इतरांपुढे ते ते विषय मांडत जाईल... चालेल....''

होकारार्थी माना डोलल्या, पण म्हणजे नक्की काय करायचं हे कसं कळणार? थोडयाशा शांततेनंतर प्रश्न आला - ''वर्गात फार गोंगाट होतो. एका बाजूला गेलं की उरलेल्या भागात दंगा सुरू. किती वेळा सांगायचं गप्प बसा?''

''थोडंसं हसू आलं. माणसं एकत्र जमली की आपापसात बोलणं होतंच. आपण आता एकत्र आलो तेव्हा बोललोच. बोलत होतोच. आपण बसलोयही एका विशिष्ट गटागटाने. नोकरीच्या काळानुसार सीनियर, मीडियम, ज्युनिअर...''

सगळयांना पटलं होतं, हे त्यांच्या हसण्यावरून समजलं. एक गंमत सांगायला सुरुवात केली, ''तुमच्या गटातल्या मुलींच्या दंग्यांबद्दल काय वाटतं?''

''एका जागी बसत नाहीत. सारख्या मागे मागे.''

''सारख्या तक्रारी. ही माझं हे घेते, ती माझं हे मागते.''

''झिंज्या उपटून मारामाऱ्या. किती मोठयाने बोलतात...''

''आपापसात सारख्या खाणाखुणा. मानेने. डोळयाने. इकडे तिकडे लक्ष. कानातल्याशी चाळा. केसांशी चाळा. विचारलं काही, तर गप्प होतील. नाहीतर त्यांचे त्यांचे कंपू पडलेले असतात. गट कितीही मोडा. पुन्हा त्यांच्या त्यांच्या मैत्रिणींतच त्या बसतात. गळयात गळे...''

एकदम दंग्यांचं विश्लेषण थांबलं. म्हणजे वयोगटानुसार दंग्याचं स्वरूप बदलतं. जर दंग्याचं स्वरूप बदलत असेल, तर सगळयांनाच 'गप्प बसा' हा एक उपाय नाही चालणार.... काही गटांना एका जागी बसायचं नाही. मग सगळे एकदम काही हालचाल करतील अशी सुरुवात करू. अशा आवाजाने सुरुवात करू की सगळयांचं लक्ष केंद्रित होईल. अशा वाक्याने सुरुवात करू की प्रत्येकीला नवल वाटेल. वयोगट वेगळा. उपाय वेगळा. आवड वेगळी. निवड वेगळी. असं काय करायचं?

पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकदम मुलांना पुस्तकात कोंबलं जात नाही. पुस्तक केवढंसं, मुलं किती? किती मनं? किती डोकी?... चला तर, हा रस्ता कायमचा शोधायला हवा. 'गप्प बसा' असं सांगणारा चुकीचा रस्ता बंद करायला हवा. पहिले इतकंच.

एक लक्षात ठेवू या. आपल्या व्यवसाय क्षेत्रात जणू आपलं सगळं स्थिरावलंय, सामसूम आहे. पण समोरचे नव्यानेच जगायला शिकताहेत. मग ते चुळबुळ करणार, बोलणार, अस्वस्थ होणार, भांडणार, मारामारी करणार, कान टवकारून ऐकणार. पण लक्षात घेऊ, ते आपल्यावरच फक्त अवलंबून नाहीत. किंचितच आपल्यात आहेत. त्यात त्यांना आपण कितीसे समजणार? जर काही वेगळं केलं, तर मात्र ह्या त्यांच्या समजण्याला सुरुवात होईल. नंतर मूल्यं वगैरे. तोवर त्याचं इथलं अस्तित्व संपतं. जाताना फक्त दिसणंच, आपल वागणंच मुलं बघतात इतकंच.

शाळेत असताना दर निरोप समारंभाला मुलं सांगायची, ''सर दर तासाला आम्हाला एक विनोद सांगून हसवायचे. त्यामुळे त्या तासाला आम्ही रोज हसायचो. विनोद काय सांगायचे ते लक्षात नाही. हसायचो. एवढं मात्र लक्षात आहे.''

''सर वर्गावर येण्याआधीपासूनच आम्हाला भीती वाटायची... त्या विषयाचीसुध्दा... भीतीचा तिढा सुटलाच नाही.''

''मुलांच्या या मतातला प्रामाणिकपणा जेवढा महत्त्वाचा, तेवढाच त्यातला मुलांना काय जाणवतं हा अर्थ महत्त्वाचा. मला वाटतं मुलांच्या मनातला अर्थ शोधणं-सापडणं ही माझी शिकण्याची गोष्ट. आपल्या बाबतीत ही घडते का? शिक्षक म्हणून एक आपणच आपलं ऑडिट करू या का? या शैक्षणिक वर्षात मी काय काय शिकले? याचं काही उत्तर देता आलं तर ते नोंदवून ठेवू. शिक्षक म्हणून आपल्या शैक्षणिक ऑडिटचे मुद्दे काढणं हेही आपलं एक काम राहील.

समजत होतं की दिवस आता हळूहळू संपत आलाय. काय करायचं नक्की ठरलं? कसं पुढे जायचं? निदान क्षेत्रं तरी ठरली. आपण, मुलं, मुलांचे पालक आणि आपण हे सर्व ज्या छत्राखाली आहोत ती संस्था. संस्थेचे काही एक पदाधिकारी सर्वांच्यात होते. काहीसं दडपण होते, काहीसं व्यक्त होण्यात अडथळा आला होता. तरी एवढं ठरलं की आपण काही काम बघून येऊ. त्याची एक यादी करू. आणि वर्षाचा एक कार्यक्रम तयार करू...''

आपल्याला काय हवंय याची आपण यादी तयार करू या. मला जे माहीत आहे ते तुमच्यापेक्षा खूप वेगळं आहे असं समजून मी बोलत राहणं आता थांबवू या असं ठरलं आणि मग सगळे समस्यांचे कागद जुळवणं, ते परस्परात वाटणं, उत्तर लिहिणं, तो वाचून दाखवणं हा खेळ सुरू झाला. समस्या नव्हत्या त्यांना गंभीर समस्या म्हणजे न सुटणारी समस्या असं गृहीत धरून काम झालं. ते किती मूलभूत असणार? समस्यांचं स्वरूप अगदीच उथळ होतं.

शिक्षकांनांच जर प्रश्न पडत नाहीत, तर मुलांच्या प्रश्नांची ते दखल किती घेणार? यावर आम्ही खूप बोललो. प्रश्न का पडतात? केव्हा पडतात? पुढे प्रश्नांचं काय होतं? हेही प्रश्न विचार केल्यावरच प्रश्न पडतात. विचार करताना काही एका टप्प्यावर येऊन आपण थांबतो. तिथे प्रश्न निर्माण होतो. पुढे जाता येत नाही. वेगवेगळे पर्याय शोधायला सुरुवात होते. पर्याय वापरून बघायला सुरुवात होते. एक क्षण असा येतो, जेव्हा लक्षात येतं - प्रश्न सुटू लागलाय, तोवर नवा प्रश्न निर्माण होतो. यातच मजा आहे. आपण सतत जागे राहतो, आपलं अस्तित्व आपल्याला जाणवतं.

आपण रजा काढतो. त्या काळातलं आपलं काम आपण नंतर भरून काढायचं ठरवतो. असं घडलं नाही, तर मुलांचं काहीच बिघडत नाही. काही भाग शिकवलाही जात नाही. ती जबाबदारी आहे असंही मी मानत नाही.

परवा एका शाळेत गेले होते. तिथे तिसरीच्या वर्गात शाळाबाह्य शिक्षक येऊन काही काम करत होते. शाळेतल्या शिक्षिका टेबल-खुर्चीवर बसून आपलं लिखाणाचं काम करत होत्या. वर्ग नाचत होता. उडया मारत होता. उत्तरं देत होता. बाई मोबाइलवर दंग होत्या. काम करणाऱ्या ताईंना विचारलं, ''यांचा सहभाग किती?'' त्या म्हणाल्या, ''असतो ना. मुलांना गप्प बसवणं, मुलांना एकत्र करून देणं.'' घेणाऱ्या ताई खूप वेगळया पध्दतीने काम करत होत्या. मुलं शाळेतल्या शिक्षकांचीच होती. काही मोजमाप केलं गेलं तर श्रेय शिक्षकांनाच मिळणार होतं. मग असं का नाही घडलं? जबाबदारी असली, तरी मी मानायला हवी ना माझी जबाबदारी!

आपण मुलांच्या लक्षात राहतो ते आपण काही शिकवतो म्हणून नाही, तर आपल्यात असं काही वेगळेपण असतं की जे मुलांना भावतं. काय असतं हे वेगळेपण? असतं का? असायला हवं. तेच आपलं अस्तित्व असतं. नाहीतर आपल्याविना काहीच बिघडणार नसतं.

renudandekar@gmail.com