सारे जगच कूस बदलत आहे

विवेक मराठी    31-Jan-2017
Total Views |

साऱ्या देशांना तीन पध्दतीने विचार करणे आवश्यक आहे, तो म्हणजे युरोपीयांचे आजही अस्तित्वात असलेले त्यांचे वर्चस्वाचे घटक रोखणे, दुसरे म्हणजे त्या त्या देशातून जेवढी लूट झाली आहे, त्याच्या वसुलीची संयुक्त मोहीम हाती घेणे आणि तिसरे म्हणजे पुन्हा आक्रमण न होण्यासाठी संघटितपणे सावध राहणे. सध्या अशा पध्दतीच्या विचाराला सारे अनुकूल आहे. युरोपमध्ये ख्रिश्चन धर्म सोडण्याची जी त्सुनामी आली आहे, त्याचे स्वरूप आणखी व्यापक होण्याची लक्षणे सध्या दिसत आहेत. युरोपच्या प्रवासातील निरीक्षणाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या विषयावरील अस्ताची चाहूल या लेखमालेचा हा शेवटचा लेख.

गात ख्रिश्चन धर्म सोडण्याच्या प्रक्रियेला आलेला वेग दिवसेंदिवस वाढतोच आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये युरोपच्या प्रवासात असताना मोठया प्रमाणावर ख्रिश्चन लोक त्यांचा धर्म सोडत असल्याची जाणीव झाली. वास्तविक या विषयाचा अभ्यास करण्याच्या उद्दिष्टाने तेथे गेलो नव्हतो. पण ती गोष्ट तेथे ठळकपणे जाणवत होती. मोठया शहरांतील काही चर्चमध्ये तेथील लोकांशी चर्चा केल्यावर ती बाब अधिक प्रकर्षाने जाणवली. प्रामुख्याने मूलत: युरोपीय असलेला जेवढा म्हणून श्वेतवर्णीय समाज आहे, त्यात ही बाब मोठया प्रमाणावर जाणवते. मी फक्त युरोपमधील दहा देशांच्या प्रवासाच्या निरीक्षणातून त्याचा अंदाज घेऊ शकलो. पण अमेरिकेत, ऑॅस्ट्रेलियामध्ये आणि रशियामध्ये ही बाब युरोपपेक्षाही मोठया प्रमाणावर आहे. अन्य कोणताही धर्म न स्वीकारता ख्रिश्चन धर्म सोडण्याचा हा प्रकार अभूतपूर्व वाटतो आहे. युरोपमधील काही देशांत धर्म सोडणाऱ्यांची ही संख्या बहुमताच्या अलीकडे आहे, पण युरोपपेक्षा अमेरिका, ऑॅस्ट्रेलिया आणि रशिया या देशांमध्ये ती बहुमताच्या फार पलीकडे पोहोचली आहे. यातील आश्चर्याची बाब म्हणजे धर्म सोडलेल्या बहुतांश लोकंानी परमेश्वराचे अस्तित्व नाकारलेले नाही. ते आध्यात्मिक आहेत. अर्थात आध्यात्मिक समाज म्हणून भारतात जी कल्पना असते, तशी ती नाही. एवढेच म्हणता येईल की ते योगाभ्यास, हरे कृष्ण चळवळ, श्री श्री रविशंकर, अमृतानंदमयी माँ त्याचप्रमाणे चीनची 'ताईची' आध्यात्मिक चळवळ, 'रेकी' उपासना यांच्याशी जोडले गेलेले आहेत. ख्रिश्चन धर्म सोडलेल्या लोकांचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे निधर्मी किंवा इहवादी आणि दुसरे म्हणजे कोणती ना कोणती आध्यात्मिक उपासना पध्दती मानणारे. त्यात निधर्मीपेक्षा कोणत्या ना कोणत्या अध्यात्मिक उपासना मानणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.
ख्रिश्चन धर्म सोडण्याच्या लाटेची दुसरी बाजू म्हणजे चीनमध्ये नवख्रिश्चनांचा आकडा दहा कोटीच्या पुढे गेला आहे. काहींच्या मते तो बारा कोटी आहे, तर काहींच्या मते तो पंधरा कोटी आहे. दुसऱ्या बाजूला आफ्रिकेत तो आकडा एक अब्जच्या पुढे गेला आहे. भारतातही ती चळवळ मोठी आहे. आग्नेय आशिया हे मिशनऱ्यांचे पुढचे लक्ष्य आहे. ब्रह्मदेश म्हणजे म्यानमार - गेल्या तीस-पस्तीस वर्षांत त्या देशाचे बदललेले नाव म्यानमार असले, तरी त्या देशातील लोक अभिमानाने अजूनही 'ब्रह्मदेश' अशीच संज्ञा वापरतात - त्याचप्रमाणे लाओस, कंबोडिया, थायलंड, व्हिएतनाम, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया या देशांचे ख्रिश्चनीकरण करण्याच्या योजना तयार आहेत. त्यातील काही देश तर मुसलमान आहेत, पण तरीही ते कडवे मुसलमान नसल्याने मिशनऱ्यांना चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. पण या साऱ्या ख्रिश्चनीकरणाचा स्वभाव असा आहे की, युरोपमधील ख्रिश्चन पंथोपपंथांच्या मुख्यालयातील प्रयत्नाखेरीज यातील काहीही होत नाही. म्हणजे आफ्रिकेतील सब सहारा प्रदेश आणि त्याला लागून असलेले काही देश यांची लोकसंख्या गेल्या शंभर वर्षांच्या काळात एक कोटीवरून एक अब्जावर गेली. पण ती सगळी मिशनऱ्यांच्या प्रयत्नांमुळे झाली आहे. एका बाजूला त्या देशातील दुष्काळी वातावरण कायम ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूला तेथे कोटयवधी टन धान्य, तेलाचे डबे, दुधाच्या पावडरीचे डबे हे मदत म्हणून देत ख्रिश्चन संख्या वाढू द्यायची, असा हा गेली शंभर वर्षे सुरू असलेला कार्यक्रम आहे. आफ्रिकेतील प्रत्येक देश हा निसर्गाच्या देणगीने अतिशय समृध्द आहे, तरीही युरोपीय वर्चस्वामुळे त्यातील कोणताही भाग 'सुजलाम् सुफलाम्' नाही. भारताचीही दीडशे वर्षापेक्षा अधिक काळ तीच अवस्था केली होती. मिशनऱ्यांनी चीनमध्ये केलेल्या ख्रिश्चनीकरणाच्या आधारे लवकरच 'ख्रिस्तीस्तान' करण्याचे युरोप-अमेरिकेचे स्वप्न आहे. पण याबाबत चीनच्या सरकारचे म्हणणे असे की, चीनमध्ये कोणाच्या भावनेचा आदर केला जातो, पण त्याच्या आधारे जर राजकारणाची किंवा आक्रमणाची भाषा करत असेल तर त्याचा सामना करायचे उपाय आमचे आधीपासूनच तयार आहेत. एक म्हणजे 'त्यांच्या हाताशी आहे', असे वाटणारा दहा-बारा कोटीचा आकडा त्यांना समाधान देत असला, तरी चीनमधील इहवादी आणि ईश्वरवादीही अनेक परंपरांनी युरोपसह अनेक देशात फारच अंतर कापले आहे. जगातील बाजारपेठेत तर सर्वात मोठा शिक्का आमचा झाला आहे, त्याच्या आधारे राजकारण करायचा आमचा हेतू नाही. पण कोणी आमच्याबाबत तशी भूमिका घेत असेल, तर त्याचा सामना आम्ही लीलया करू. चीनच्या ज्या भागात तुम्हाला युरोपीय वर्चस्वाचा भास होतो आहे असे वाटते आहे, तेथे आम्हीही खबरदारीचा उपाय म्हणून रणगाडयांच्या आणि स्थानिक पल्ल्याच्या हवाई हल्ल्याच्या ब्रिगेड तयार ठेवल्या आहेत. आफ्रिकेप्रमाणे दक्षिण अमेरिकेतही ख्रिश्चनांची संख्या कोटी आणि अब्ज यांचे आकडे पार करत आहे, त्यांनी तर रोमचे पोप मुख्यालय आणि लंडनचे प्रोटेस्टंट मुख्यालय यांच्या जबाबदाऱ्या घेण्याची तयारी ठेवली आहे. 'युरोपातील ख्रिश्चन साम्राज्याचे पडते आहे असे वाटले, तरी ते निशाण आम्ही उचलून धरू' अशी भाषा त्यांनी सुरू केली आहे.

याचा अर्थ असा नव्हे की, गेल्या पाच शतकांत जगावर पाशवी वर्चस्व निर्माण करणाऱ्या ख्रिश्चन महासत्तांचे वर्चस्व संपले आहे. आक्रमणाची सवय असणाऱ्यांबाबत कायमच सावध असावे लागते. पण त्यांनी निर्माण केलेल्या भ्रामक समजुतीची मुळे उखडून टाकायला त्यांच्याच लोकांनी प्रारंभ केल्यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्याला खिंडारे पडली आहेत हे निश्चित. जगातील जाणकारांचे म्हणणे असे की, सध्या साऱ्या जगानेच कूस बदलायला घेतली असल्याने गेल्या पाचशे वर्षांच्या आक्रमणाचे बालेकिल्ले हे खिंडारांचे देश झाल्यास आश्चर्य मानायला नको. त्यांचे म्हणणे असे की, साऱ्या जगानेच कूस बदलायला घेतली आहे. अमेरिकेनेही 'अमेरिका फॉर अमेरिका' असा विचार केला आहे. ब्रिटननेही तोच विचार सुरू केला आहे. सोव्हिएत युनियनचे विघटन करून रशियाने त्याला पंचवीस वर्षापूर्वीच प्रारंभ केला आहे. चीनने साम्यवादाचे स्वरूप एकपक्षीय शासनापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अन्यथा जगाच्या बाजारपेठेची भाषा हीच जगण्याची भाषा मानणे सुरू केले आहे.

जगातील श्वेतवर्णीय ख्रिश्चनांतील निम्म्या-अधिक लोकांनी ख्रिश्चन धर्म सोडायला घेतल्याची व्याप्ती यापेक्षा बरीच मोठी आहे. साहजिकच साऱ्या जगावर आणि भारतावर याचा परिणाम होणार आहे. गेल्या दोन-तीनशे वर्षांत जगातील ज्या दीडशे देशांची ओळखच ज्या युरोपच्या आक्रमणाने पुसली गेली, त्यांनी ती परत मिळवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्याची गरज आहे. युरोपीय देशांनी आणि युरोपीयांनी मिळवलेल्या देशांनी त्यांच्या वर्चस्वाचा 'अजेंडा' एकेकटयाने व संघटितपणेही अनेक शतके सुरू ठेवला, त्याप्रमाणे त्यांच्या वर्चस्वाखाली काही शतके घालवलेल्या देशांनी तो एकेकटयाने व संघटितपणे सुरू ठेवण्याची चर्चा सुरू होणे आवश्यक आहे. पहिली दोन-तीनशे वर्षे जगभराहून दररोज येणारी शंभर शंभर टनांची शंभर शंभर जहाजे रिचवलेल्या त्या देशांनी जगभर न संपणारे खंडित होणारे वर्चस्व निर्माण करण्याचा संघटित प्रयत्न सुरू केला. त्यातील पहिला टप्पा म्हणजे जगाचा इतिहास हा युरोपपासून किंवा बायबलपासून सुरू होतो, अशी भूमिका घेतली. आर्य-अनार्य हे त्याचे छोटेसे 'एक्स्टेन्शन' आहे. पूर्वी त्याच्या नावाने दहशतवाद असे. आता त्या त्या देशातील जेहादी असोत की माओवादी असोत, त्यांना या महासत्तांनीच संघटित करून दहशतवाद पसरवण्यास आरंभ केला आहे. जगातील प्रत्येक देशातील अर्थकारण, शिक्षण, औद्योगिक वाढ, संशोधन क्षेत्रे, लष्करी गतीविधी, समाजकारण, समाजसंस्थाजीवन, शेती पाणीपुरवठा, कामगार संघटना याच्या माध्यमातून तो प्रयत्न सुरू असतो. त्यात त्यांना मोठया प्रमाणावर यश मिळालेही. गेल्या साठ-सत्तर वर्षांत युरोपीय जोखडातून ज्या सव्वाशे देशांना स्वातंत्र्य मिळाले, त्यांच्यावर पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांनी परत कामाची दिशा बदलली. एका बाजूला बायबलच्या नावाखाली वर्चस्व निर्माण करणे व दुसऱ्या बाजूला त्या त्या देशातील दहशतवादाला संघटित रूप देणे हा त्यांचा प्रयत्न राहिला. सारे देश त्याचे बळी आहेत. ते करताना त्यांनी जगाची दोन प्रकारे विभागणी केलेली दिसते. एक म्हणजे वसाहती देश आणि युरोपीयांच्या वसाहतीखाली नसणारे देश. वसाहती देशांत ते सारे प्रयत्न सुरू आहेत व अन्य देशांतही शक्य त्या प्रमाणात सुरू आहेत.

या साऱ्या देशांना तीन पध्दतीने विचार करणे आवश्यक आहे, तो म्हणजे युरोपीयांचे आजही अस्तित्वात असलेले त्यांचे वर्चस्वाचे घटक रोखणे, दुसरे म्हणजे त्या त्या देशातून जेवढी लूट झाली आहे, त्याच्या वसुलीची संयुक्त मोहीम हाती घेणे आणि तिसरे म्हणजे पुन्हा आक्रमण न होण्यासाठी संघटितपणे सावध राहणे. सध्या अशा पध्दतीच्या विचाराला सारे अनुकूल आहे.

युरोपमध्ये ख्रिश्चन धर्म सोडण्याची जी त्सुनामी आली आहे, त्याचे स्वरूप आणखी व्यापक होण्याची लक्षणे सध्या दिसत आहेत. युरोपच्या प्रवासातील निरीक्षणाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या विषयावरील लेखमालेचा हा शेवटचा लेख आहे. वाचकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला, याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानतो.

9881717855