मेडिकल न्यूट्रिशन थेरपी

विवेक मराठी    05-Jan-2017
Total Views |

जेव्हा आपण जेवतो, तेव्हा अन्न खातो. अन्नातले घटक वेगळे करून खात नाही. तरीही काही पथ्यं पाळली गेली की मधुमेह काबूत राहायला मदत होते, हे निश्चितपणे सांगता येतं. रोजच्या आहारातल्या गोष्टींमध्ये ज्या उपकारक आणि अपायकारक घटकांकडे दुर्लक्ष करून चालत नाही, त्या खाताना नेमका कसला विचार करणं महत्त्वाचं आहे, ते आपण पाहू या. यापलीकडे तुमचं वजन कमी करायचं आहे की तितकंच ठेवायचं आहे, यावर तुम्ही किती कॅलरीज घ्यायला हव्यात हे अवलंबून असतं. आपण पुढे त्याचा विचार करणारच आहोत.
आपण आहाराकडे वैद्यकशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहतो, तेव्हा ते केवळ खाणं न राहता एक उपचार पध्दती बनते, ती मेडिकल न्यूट्रिशन थेरपी होते. मधुमेहावर काबू ठेवताना आहार खूपच महत्त्वाचा ठरतो. आपली उद्दिष्टं नेमकी असतात.

  1. आपलं ग्लुकोज नॉर्मल ठेवणं, किमान ते नॉर्मलच्या जास्तीत जास्त जवळ ठेवणं.
  2. अर्थात ग्लुकोज प्रमाणाबाहेर कमीदेखील होऊ देता कामा नये. असं ग्लुकोज फार कमी झाल्याने, ग्लुकोज वाढल्यावर होणाऱ्या धोक्यापेक्षा शरीराला जास्तच धोका होतो. तो टाळायला हवा.
  3. रक्तातलं चरबीचं प्रमाण हृदयरोगाला निमंत्रण देणार नाही इतक्या मर्यादेत असायला हवं.
  4. रक्तदाब नेमस्त असावा.
  5. मधुमेहापासून शरीराला होणारे अपाय एकतर होऊच नयेत वा कमीत कमी व्हावेत.
  6. प्रत्येक व्यक्तीच्या खाण्याच्या काही आवडीनिवडी असतात, काही धार्मिक किंवा सामाजिक भावना असतात, त्याकडे कानाडोळा करून चालत नाही.
  7. वैद्यकशास्त्र नजरेसमोर ठेवूनदेखील माणसांच्या खाण्यातला आनंद हिरावला जाणार नाही, याचं भान हवं.

भाज्या - अ) पिठूळ : बटाटा, सुरण, रताळू, हिरवे वाटाणे, गाजर ही काही उदाहरणं. या भाज्या जास्त शिजवल्या, म्हणजे त्यात लपलेलं ग्लुकोज बाहेर येतं. म्हणून त्या कमीतकमी शिजवल्या जाव्यात. शिवाय त्यांचं आहारातलं प्रमाण फार अधिक असू नये. कच्ची बीटरूट, मुळा, गाजर यांचं सलाड व्यवस्थित खायला हरकत नाही.

उपवासाच्या पदार्थांमध्ये भरपूर स्टार्च असतात. म्हणून साबुदाणा, बटाटा खाणं टाळावं. त्याऐवजी शेंगदाणे किंवा फळं खाता येतील. तुमच्या भावनांना धक्का पोहोचणार नाही आणि ग्लुकोजदेखील वाढणार नाही.

ब) पिठूळ नसलेल्या - पालेभाज्या, भेंडी, पडवळ, दुधी, इतर फळभाज्या. जास्त तेल न घालता शिजवाव्या. गूळ, साखर घालू नये. मग त्या भरपूर प्रमाणात खायला हरकत नाही. या भाज्यांमध्ये मोठया प्रमाणात चोथा असतो. वेगवेगळी मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स यातून मिळतात. अर्थात अगदी लगदा होईपर्यंत मात्र शिजवू नये. 

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ - मलई काढलेलं दूध, स्किम्ड मिल्क सगळयात चांगलं. त्यात उत्तम दर्जाचे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटस आणि कॅल्शियम असतं. प्रत्येक जेवणासोबत 150 ते 200 मि.ली. इतकं दूध किंवा तितक्या दुधापासून बनवलेले पनीर, दही यासारखे पदार्थ प्रत्येक जेवणात घेता येतील.

फॅट अथवा चरबीयुक्त पदार्थ

तेलं - शरीराला आवश्यक अशा व्हिटॅमिन ए, डी आणि के चरबीतूनच मिळतात. खाण्याचं समाधान आणि अन्नाची चव यामुळेच मिळते. शिजवण्याच्या अनेक प्रक्रियांसाठी हे आवश्यक असतं. त्यामुळं जेवणातून चरबी पूर्णत: तडीपार करता येत नाही. दुर्दैवाने यात खूप जास्त कॅलरीज असतात. म्हणून यांच्या वापरावर मर्यादा असलीच पाहिजे. तेलांच्या जाहिरातींना कृपया फसू नका. यातलं कुठलंच तेल हृदयासाठी हमखास चांगलं असं छातीठोकपणे सांगता येत नाही. तसं सिध्द झालेलं नाही. तरीही बरेच तेल उत्पादक जाहिरातीत पुऱ्या, पराठे वगैरे तेलाने लडबडलेले पदार्थ दाखवून तुमची दिशाभूल करतात. तेलाचा थेट संबंध तुमच्या ग्लुकोजशी नसला, तरी त्यांचं सेवन कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. तळणापेक्षा तंदूर किंवा पदार्थाच्या अंगभूत तेलाचा वापर करून शिजवण्याच्या पध्दती नक्कीच उपयुक्त ठरतील. तेलबियांपासून मिळालेली तेलं जवळपास सारखीच असतात. असलाच, तर त्यात फारच क्षुल्लक फरक असतो. म्हणून स्वयंपाकाचं तेल एकच न ठेवण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. आपली पारंपरिक तेलं वाईट नाहीत. साधारण माणशी महिन्याला अर्धा किलो तेल वापरलं जाईल असं पाहा. हल्ली तांदळाच्या तुसाचं तेल बाजारात मिळतं, ते त्यातल्या त्यात चांगलं समजलं जातं. मोहरीचं, तिळाचं तेलसुध्दा उत्तम. अळशीचं तेलदेखील चांगलं. विनाकारण महागडं ऑॅलिव्ह ऑॅइल वापरून स्वत:चं आर्थिक नुकसान करून घेऊ  नका. ते भारतीय स्वयंपाकाच्या पध्दतीला तितकंसं उपकारक नाही. ते केवळ वरून ओतायचं तेल आहे. सॅलडमध्ये वापरता येईल. पण त्यात तळणकाम करता उपयोगी नाही. जाहिराती तुमच्यापासून नेमकं हेच लपवून ठेवतात.

मासे हृदयाला चांगले असं म्हणतात, ते त्यातल्या अंगभूत तेलांमुळे. बांगडे, तारली अशा तेलकट माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात, जी हृदयाला चांगली समजली जातात. मासे खाणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हरकत नाही.

लोणी आणि शुध्द तूप - हे वापरावं की नाही यावर दुमत आहे. काही म्हणतात ते चांगलं, तर काही त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतात. यात सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जास्त असल्याने ते कमीत कमी वापरावं हे योग्य. वरणभातावर किंवा पोळीवर घेतलेलं चमचाभर तूप तुमचं नक्कीच फारसं नुकसान करणार नाही.

आपल्याकडे काही राज्यांमध्ये तळण्यासाठी खोबरेल वापरतात. तेदेखील सॅच्युरेटेड गटात मोडतं. त्याचाही कमीत कमी वापर असावा.

वनस्पती तूप - साजूक तुपाला स्वस्त पर्याय म्हणून हे सररास वापरलं जातं. बेकरी उत्पादनांमध्ये यांचा हमखास उपयोग केला जातो. आपल्याला डोळयांना प्रत्यक्ष तेल दिसत नसल्याने आपली फसगत होते. म्हणून पफ, बिस्किटं, केक फारसे खाऊ नका. कित्येक वेष्टनांवर तर 'कोलेस्टेरॉल फ्री' असंही छापलेलं असतं. असे पदार्थ वाटेल तेवढे खाऊ  नका. ते घातक आहे. केवळ 30 टक्के कोलेस्टेरॉल खाण्यातून येतं. बाकीचं आपल्या शरीरातच बनतं, हे लक्षात असू द्या.

ही मेडिकल न्यूट्रिशन थेरपीची मूलभूत तत्त्वं झाली. यापलीकडे तुमचं वजन कमी करायचं आहे की तितकंच ठेवायचं आहे, यावर तुम्ही किती कॅलरीज घ्यायला हव्यात हे अवलंबून असतं. आपण पुढे त्याचा विचार करणारच आहोत.

9892245272

 

कार्बोहायड्रेटस किंवा पिष्टमय पदार्थ

धान्य - गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका ही मुख्य धान्यं. आहारात त्यांचा समावेश असतोच. तांदूळ सोडून इतर धान्यं बहुधा दळून वापरली जातात. ती शक्यतो आख्खी, टरफलासकट दळून वापरावी. यातून आपल्याला अधिक फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात, जे आरोग्याला उत्तम असतात. पांढऱ्या शुभ्र तांदळापेक्षा हातसडीचा तांबूस तांदूळ जास्त चांगला. भात खाणं पूर्णत: थांबवण्याची जराही गरज नाही. पण तो मोजून मापून खाल्ला पाहिजे. अंदाजे घेण्यापेक्षा देवाला आपण मूद दाखवतो, तसा प्रत्यक्ष वाटीने मोजून घेणं चांगलं. चपात्या, भाकऱ्या, पाव आपण बहुधा मोजून खातो. शिवाय त्या बनवणारी व्यक्ती एकच असली, तर त्या व्यक्तीचा हात इतका बसलेला असतो की बहुधा त्या भाकऱ्या एकाच आकाराच्या आणि जवळपास एकाच वजनाच्या असतात.

 

फळं - ठरावीक पाच-सहा फळं सोडून बाकीची सर्व प्रकारची फळं आरोग्याला चांगली. ती आख्खी खायला हवीत. दिवसातून मध्यम आकाराची किमान एक-दोन फळं खावीत. सुकवलेल्या किंवा डबाबंद, पाकातल्या फळांपेक्षा ताजी फळं उत्तम. 

 

प्रोटीन्स

प्राणिजन्य - अंडी, मासे, मटण, कोंबडी, दूध यात उत्तम क्वालिटीचे प्रोटीन्स असतात. शाकाहारी लोकांसाठी अथवा मांसाहारी मंडळींना उपवासाच्या दिवशी हा पर्याय बंद होतो. इथेही शिजवताना तेल हात राखून वापरलं गेलं पाहिजे. तंदूर, ग्रिलवर भाजणं, उकडणं, मायक्रोवेव्ह अथवा एअर फ्रायरचा वापर करून शिजवणं यांना प्राधान्य द्यावं. साधारण दोन ते तीन पोर्शन रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत. दूध सहसा मलई काढलेलं असावं.  

वनस्पतिजन्य - सुका मेवा, अनेक प्रकारच्या डाळी, कडधान्य, धान्य यात भरपूर प्रोटीन्स असतात. डाळी आणि धान्य यांचं एकत्रीकरण उत्तम दर्जाचं प्रोटीन्स देऊ शकतात. कारण या दोन्हीमध्ये शरीराला आवश्यक अशी सगळीच अमिनो ऍसिड्स नसतात. त्यामुळे कुपोषण संभवतं. जी अमिनो ऍसिड्स डाळींमध्ये नसतात, ती धान्यात असल्याने दोन्ही वापरात असली पाहिजेत. आपण डाळ-भात खाऊन ही कमतरता भरून काढत असतो. साधारण 30 ते 40 ग्रॅम अक्रोड, बदाम, पिस्ता, काजू यासारखे सुक्या मेव्यातले पदार्थ वा 100 ग्रॅम डाळी आपल्याला पुरेसे प्रोटीन्स देऊन जातात.