तुमचा आमचा गेम .....

विवेक मराठी    05-Jan-2017
Total Views |

लहान मुलांचा निर्व्याजपणा हा असा असतो,  कधी आई बाबांना गोत्यात आणेल सांगता येत नाही. आईबाबांचे वागणे, बोलणे, चालणे, लकबी सगळे ही लहान मुले पाहत असतात. आपल्या मनात साठवत असतात आणि अचानक कधीतरी चारचौघात असे शाब्दिक बाँब टाकून मुले आईबापांची दाणादाण उडवत असतात.आमच्या कलांगणमध्ये असे कितीतरी नमुने आणि त्यांची विक्षिप्त धमाल अखंड सुरू असते.
''आ
ज माझा मूड नाही.'' आवाज ऐकू आला, म्हणून मी त्या दिशेने पाहिलं, तर छोटी स्वरा आपल्या आईला नाक फुगवून जोरजोरात सांगत होती हे. मी तिच्याकडे गेले आणि विचारलं, ''काय झालं स्वरा?'' तर म्हणाली, ''आज माझा मूड नाही.'' मी म्हणाले, ''म्हणजे गं काय?'' तर म्हणाली, ''आज घरी जायचंय मला, गाणं नाही म्हणणार... मूड नाही माझा!'' मी तिच्या आईकडे पाहिलं. तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. मी हळूच विचारलं, ''मूड नसतो म्हणजे काय? आणि कुणाचा नसतो?'' ''मम्माचा!'' लगेच उत्तर! पुढचं वाक्य - ''ती बाबाला म्हणते, आज माझा मूड नाही कुकिंगचा. चल ना, बाहेर जेवायला जाऊ!'' आता मात्र मी आईकडे बघितलंच नाही. मला हसू येऊ  लागलं होतं आणि आईला नक्कीच पळून जावंसं वाटत असणार! मी मात्र स्वराशी गप्पा मारत शिताफीने तिला गाण्यात सामील करून घेतलं. ती सर्वांच्यात रमलेली पाहून आई खरोखरच पळून गेली. लहान मुलांचा निर्व्याजपणा हा असा असतो,  कधी आई-बाबांना गोत्यात आणेल सांगता येत नाही.

आई-बाबांचं वागणं, बोलणं, चालणं, लकबी सगळं ही लहान मुलं पाहत असतात. आपल्या मनात साठवत असतात आणि अचानक कधीतरी चारचौघात असे शाब्दिक बाँब टाकून मुलं आई-बापांची दाणादाण उडवत असतात. आमच्या कलांगणमध्ये असे कितीतरी नमुने आणि त्यांची विक्षिप्त धमाल अखंड सुरू असते.

पालकांच्या वागण्यातून कुठलाही नकार जोपर्यंत मुलांच्या मनाला संकेत देत नाही, तोपर्यंत ठीक आहे सगळं. पण माझा मूड नाही, मला ना काही करावंसंच नाही वाटत, मला झोपूनच राहावसं वाटतं, माझं काय विशेष.... , मला कोण महत्त्व देणार? मी कितीही मेहनत केली, तरी अपयश ठरलेलंच! शर्यतीत नेहमी माझं घोडं शेवटी.... ही आणि अशी सतत ऐकू येणारी पालकांची वाक्यं लहानपणापासूनच मुलांच्यात निराशा पेरू शकतात!

आमच्या कलांगणची एक पालक! उंचनिंच, दिसायला खरं म्हणजे छान, भावुक डोळे, सुंदर हास्य (जर हसली, तर) अशी! पण सतत दुर्मुखलेली असते. मला नेहमी वाटतं, असं पडक्या चेहऱ्याने कायम राहणं किती अवघड... महिन्याकाठी एखाद्या वेळेला जेमतेम हसेल. तिला काहीही सांगा, ''नाही, पण...'' या शब्दांनीच सुरुवात करणार! आयुष्य म्हणजे एक अत्यंत कठीण परीक्षा, आणि त्यातही तिला सगळयात अवघड पेपरला बसवलं आहे असा चेहरा, हावभाव! सतत तिलाच काहीतरी कमी आहे आणि बाकीच्यांना देवाने भरभरून दिलं आहे असा पवित्रा! स्वत:ला कायमच अन्याय टीमची कॅप्टन समजणारी ही तरुण आई त्यामुळे ना छान राहते, ना छान दिसते, ना कुणाच्यात मिसळते, ना घराकडे नीट लक्ष देते. घरातली सगळी माणसं तर तिच्या या वागण्याने तिच्यावर नाराज होतातच, काळजीही करतात. पण बाहेर मात्र तिला मित्रमैत्रिणीही टाळतात. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा झाकोळ नकोसा वाटतो.

खरंच का जगात प्रत्येक जण पूर्ण आनंदी आणि सुखी असतो? नाही, आणि हे प्रत्येकालाच माहीत असतं. सुखी माणसाचा सदरा कुठे कुणाला गवसलाय? पण तरीही तो सापडावा असं प्रत्येकालाच वाटतं. शोधण्याचे प्रयत्न मात्र भिन्न असतात प्रत्येकाचे! आनंद शोधण्याची शेकडो कवाडं आणि ती शोधण्याचे तितकेच मार्ग! आनंद शोधण्याच्या या रस्त्यावर ज्याला त्याला आपली दु:खं, आपले प्रश्न असतातच, त्यात आणखी दु:खी माणसांचं सान्निध्य कुणाला हवंसं वाटणार?

मध्यंतरी एक गोष्ट वाचनात आली. एके दिवशी देव या पृथ्वीवर प्रकट झाला आणि त्याने अखिल मानवजातीला विचारलं, ''बोला, काय हवंय तुम्हाला? काय देऊ  मी?'' सगळे मानव एकजात उद्गारले, ''देवा, आमचं दु:ख नाहीसं कर. आमचं दु:ख नकोय आम्हाला!'' ''ठीक आहे.'' देव म्हणाला, ''तुमचं प्रत्येकाचं दु:ख नाहीसं करतो. चला, प्रत्येकाने आपल्या आपल्या दु:खाचं गाठोडं करा आणि इथे ठेवा आणून!'' कोण गर्दी आणि कोण धावपळ.... केव्हा एकदाचं गाठोडं करतो आणि सगळं दु:ख देवाला देऊन टाकतो, असं प्रत्येकाला झालेलं! आपली दु:खं देवावर सोपवून मनुष्यजात शांतपणे बसली. देव म्हणाला, ''हं... आता या इकडे आणि इथून कुठलंही गाठोडं उचलून घेऊन जा. तुमचं दु:ख नाहीसं झालं. आता दुसऱ्याचं घ्या.'' खरं तर सगळे मनातल्या मनात धुसफुसू लागले. पण देवाला कोण बोलणार? बरं, त्याने शब्द तर पाळला होता. सगळे पुन्हा त्या दु:खाच्या गाठोडयांकडे वळले. पाहतात तो काय - आजारपण, दैन्य, शत्रुत्व, अपघात, मृत्यू, विश्वासघात, अध:पतन, दुराचार, हिंसा, मारहाण, घातपात या आणि अशा अनेक वेदना आणि तीव्र शारीरिक आणि मानसिक दु:खांनी ती गाठोडी भरली होती. अखेरीस एक क्षण असा आला की ज्याने त्याने आपापलं दु:खच उचललं. त्याला तेच बरं आणि सहन करता येण्यासारखं वाटलं. देव हसला आणि म्हणाला, ''या पृथ्वीचा समतोल साधायचा असेल, तर आनंद आणि दु:ख या दोन्हीची निर्मिती समप्रमाणात करणं भाग होतं मला! जसे दिवस-रात्र, तसे आनंद आणि दु:ख!'' एवढं बोलून देव अंतर्धान पावला.

मला तरी कधीकधी असं वाटतं की मानवजात मुळात त्याने बनवलीच अशासाठी आहे की त्यामुळे देवाची स्वत:ची करमणूक व्हावी. हो..... बघा ना, हा स्वर्गात जाऊन सोन्याच्या झोपाळयावर बसणार. तिथून खाली पाहिलं की प्रत्येक माणसाचा मेंदू त्याला उघडया पुस्तकासारखा दिसणार, वाचता येणार, त्यातले विचार समजणार आणि हा वर झोके घेत खो खो हसणार.. देवाने माणसाला बुध्दी दिली, मानवाने त्या बुध्दीच्या जोरावर सगळं जग बोटाच्या टोकावर आणलं, पण वर या देवबाप्पाकडेही एक वेगळा कॉम्प्युटर आणि त्याचं किमयागार बोट आहेच की ..... आणि आपलं माणसाचं जग हा त्याच्यासाठी त्याचा कॉम्प्युटर आणि त्यानेच बनवलेला आपला प्रत्येकाचा मेंदू आणि मन नावाचं अदृश्य इंद्रिय हा त्याचा गेम! हं... विचार करता करता कुठे येऊन पोहोचले मी! पृथ्वीतलावरून डायरेक्ट स्वर्ग आणि आता पुन्हा एकदा land झाले जमिनीवर!

आणि आता हेही लक्षात येतंय की लवकरच होणार आहे नवीन वर्षाची बहारदार सुरुवात! वर्षाच्या सुरुवातीला आनंदी, प्रेरणादायी विचार व्यक्त करायचे असतात. संकल्प करायचे असतात. शिरस्ताच आहे तो....2016 झंझावाती वेगाने संपून आपण सगळेच 2017च्या नव्या विमानात बसतोय आता. मग काय, नव्या घटना, नवे प्रसंग, नवी आव्हानं आणि ती पूर्ण करण्यासाठी मनात योजल्या जाणाऱ्या नव्या नव्या योजना, त्यातून जन्म घेणारी नवी सुखदु:खं आणि पुन्हा नव्या वर्षाचं एक नवं चक्र. गेलं वर्षभर 'कवडसे'मधून लिहिताना, तुम्हा सर्वांशी लेखनातून संवाद साधताना फार आनंद मिळाला. सतत काहीतरी नव्या कल्पना, निरीक्षणं, घटना साप्ताहिक विवेकच्या पानांवर रेखाटण्याचा योग आला.

देव असतो की नसतो हे ज्याचं त्याने ठरवायचं, पण एक अदृश्य शक्ती सर्व मानवजातीच्या मेंदूचा आणि मनाचा 'गेम' करते, हे देव मानणारे आणि न मानणारेही नक्कीच मान्य करतील. मला वाटतं आपण आपल्या बळावर जेव्हा इथे तो गेम जिंकतो, तेव्हा तिथे तोही त्याचा डाव जिंकताच असणार! फुल्लित होत असणार आणि हवेत एक आनंदाची तान भिरकावून देत असणार..... त्याच्या होतील सुरेल लहरी आणि त्याच देतील आपल्याला नवीन वर्षाच्या आनंदाची ग्वाही.... तर मग हसू या, गाऊ या, नवी आव्हानं पेलू या, जिंकू या आणि त्यालाही जिंकवू या.... निसर्गातून विहरणाऱ्या सुरेल आनंदलहरींसाठी!!!

kkalavarshab@gmail.com

9594962586