सामाजिक अराजकाची नांदी

विवेक मराठी    06-Jan-2017
Total Views |

पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांच्या पुतळा रात्रीच्या अंधारात उखडून नदीपात्रात फेकण्याची मर्दुमकी काही तरुणांनी गाजवली. हे कृत्य करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटकही केली. या घटनेमुळे वरवर शांत वाटणाऱ्या, पण आतून धुमसत असणाऱ्या समाजजीवनाची प्रचिती पुन्हा एकदा महाराष्ट्राला मिळाली. मागील काही वर्षांपासून अस्मितेच्या नावाखाली महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्याचा बळी घेण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याचे हे अगदी ताजे उदाहरण आहे. आम्ही सांगू तोच इतिहास अशी आरेरावीची भाषा बोलत विशिष्ट जातीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होतो आहे, यावर स्वतःला पुरोगामी म्हणवणारेही पुण्यातील आणि पुण्याबाहेरचेही मान्यवर मूग गिळून गप्प बसतात. ही स्थिती महाराष्ट्राला परवडणारी नाही. आपले मत प्रस्थापित करण्यासाठी अशा प्रकारचे मूर्तिभंजन करणे हे उत्तम सामाजिक स्वास्थ्याचे लक्षण नाही, हे सर्वांनी ध्यानात घ्यायला हवे.
या प्रकरणात संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते, नितेश राणेचे कार्यकर्ते अशी वेगवेगळी नावे पुढे येत आहेत. मागील तीन वर्षांपूर्वी अशा घटना घडत होत्या, तेव्हा त्याला राजसत्तेचा अघोषित पाठिंबा आहे, मताचे राजकारण करण्यासाठी, आपली स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी या घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आहे असा सर्वसामान्य जनतेचा समज होता. पण आता तर महाराष्ट्रात सत्तांतर झाले आहे. अशा घटना घडवून आणणाऱ्यांचा आणि सामाजिक उद्रेक घडवू पाहणाऱ्यांचा आजच्या सत्ताधाऱ्यांनी काय विचार केला आहे? समाजात विद्वेष पेरणाऱ्या या प्रवृत्तीचा सरकार कशा प्रकारे बंदोबस्त करणार आहे? एका विशिष्ट जातीला लक्ष्य करून आणि त्याच्या माध्यमातून निर्माण होणारे दहशतीचे वातावरण महाराष्ट्राला सामाजिक अराजकाच्या दिशेने घेऊन जाणारे आहे, याची नोंद सर्वांनीच घ्यायला हवी.

राम गणेश गडकरी यांनी 'राजसंन्यास' या आपल्या अर्धवट लिहिलेल्या नाटकातून छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला आहे, विकृत मांडणी केली आहे अशी भूमिका घेत तीन जानेवारीला गडकरींचा पुतळा उखडला गेला. खरे तर अशी मागणी या आधीच झाली होती. पुणे महानगरपालिकेकडे काही मंडळीनी पुतळा हटवण्याची मागणी केली  होती. कदाचित पुणे महानगरपालिकेने स्वतःच बसवलेला दादोजी कोंडदेवांचा पुतळा स्वतःच काढून टाकला, तसेच गडकरींच्या पुतळयाबद्दल होईल अशी काहीशी अटकळ असावी. पण त्याला यश आले नाही आणि  ही घटना घडली. या घटनेनंतर सोशल मीडियावर घटनेचे समर्थन करण्याची चढओढ लागली. ज्या तरुणांनी हे काम केले, त्यांच्या मर्दमुकीचे पोवाडे गायले जात आहेत. अटक झाल्यानंतरची त्याची छायाचित्र प्रकाशित करून त्यांना पाठिंबा दिला जात आहे, तर दुसऱ्या राम गणेश गडकरी आपल्या जातीचे आहेत म्हणून काही बांधवांनी मैदानात धाव घेतली आहे. त्यातील काहींनी गडकरींचे तैलचित्र पुतळयाच्या चबुतऱ्यावर लावले. यातून हेच सिध्द होते की समाज म्हणून आम्ही एकसंघ राहिलो नाही. आधुनिक युगाच्या, प्रागतिकतेच्या गप्पा मारता मारता आपण अधिकाधिक जातिग्रस्त होत आहोत. 'माजीया जातीचा मज भेटो कोणी' संत तुकारामांची ही ओळ आम्ही अगदीच विरुध्द अर्थाने आत्मसात केली आहे. आम्ही असेच जातिग्रस्त होऊन पुरोगामी महाराष्ट्राचा देदीप्यमान वारसा आणि महापुरुषांचे कार्य मातीमोल करायला निघालो आहोत, याचे कुणाला भान आहे का? जातीजातीत समाजाची उभी फाळणी करून आपण कोणती प्रगती साधणार आहोत आणि पुढच्या पिढीसाठी कोणता वारसा उत्पन्न करणार आहोत? या प्रश्नांची उत्तरे आज ज्यांच्या खांद्यावर समाजाची धुरा आहे, त्यांना शोधावी लागतील. नाहीतर पुढची पिढी त्यांना कधीही माफ करणार नाही.

आम्हाला तुमचा इतिहास, कला, साहित्य मान्य नाही, आम्ही आमचे वेगळी ओळख निर्माण करू असे म्हणणे वेगळे आणि आम्हाला मान्य नाही म्हणून ते संपवून टाकू असे म्हणणे वेगळे आहे. काळ जसा पुढे जातो, तसा तसा इतिहासावर वरचा प्रकाशाझोत अधिक प्रखर होत जातो. कारण इतिहासातून जगण्याचे बळ मिळते. हे जरी खरे असले, तरी अशा इतिहासाचा अभ्यास करताना त्या काळात जाऊन विचार केला नाही, तर गफलत होऊ शकते. इतिहासाचा आधार घेऊन जेव्हा लेखन होते, तेव्हा त्या काळात काय संदर्भ उपलब्ध होते यांचा विचार करूनच ग्राह्य/अग्राह्य असा निवाडा करायला हवा. पण दुर्दैवाने आजच्या काळात   निखळ दृष्टीने इतिहासाकडे बघण्याची इच्छाशक्ती जाणीवपूर्वक दाबली जात आहे आणि जातीय चश्म्यातून इतिहास पाहण्याचा, अभ्यासण्याचा अट्टाहास केला जात आहे. यातून केवळ विखार आणि विद्वेष या दोन गोष्टी निर्माण होत आहेत. आणि यातून कुणाचेच भले होणार नाही.

गडकरी पुतळा उखडणारे पकडले गेले आहेत. त्यांनी सार्वजनिक मालमत्तेची मोडतोड केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. न्यायालयही याच गुन्हासाठी त्यांना शिक्षा देईल. गडकरींचा पुतळा सार्वजनिक मालमत्ता आहे म्हणून उखडला गेला नाही, तर ते गडकरी आहेत म्हणून उखडला गेला आहे ही सुप्त विद्वेषाची मानसिकता न्यायालय विचारात घेईल का? आणि अशी मानसिकता समाजात पुन्हा पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी कठोर बंदोबस्ताचे आदेश शासनास दिले जातील का? आपले राज्य प्रगतिशील, पुरोगामी आहे. किमानपक्षी तशी प्रतिमा तरी आपण निर्माण करू शकलो आहोत. ही प्रतिमा संभाळायची असेल, तर अशा घटनांच्या माध्यामातून सामाजिक दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. कारण दुभंगलेला समाज कधीही प्रगती करू शकत नाही. जातीय विद्वेषाची ही समाज पोखरणारी वाळवी कायमची संपवण्याची आणि द्वेषरहित समाजनिर्मितीची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहेच, पण त्याही आधी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपली सर्वाधिक जबाबदारी आहे. कारण पुण्यातील गडकरी पुतळयाने सामाजिक अराजकाची नांदी गायली आहे.