गांधी समजून घेताना...

विवेक मराठी    17-Oct-2017
Total Views |


गांधीविचार आणि संघविचार यांचा परस्परांशी काही संबंध आहे का? देशातील बहुतेक सर्व गांधीवाद्यांनी संघाला गांधीजींचा शत्रू ठरवून टाकले आहे. माझ्यासारखा संघात वाढलेला स्वयंसेवक दीर्घकाळ गांधीविचारांपासून स्वतःला दूर ठेवतो. परंतु गांधी हा दूर ठेवण्याचा विषय नाही, तो प्रामाणिकपणे समजून घेण्याचा विषय आहे. संघाला झोडण्यासाठी लोक गांधीजींचा उपयोग कसा करतात, हा विषय बाजूला ठेवून महात्मा गांधी वाचण्याचा आणि समजून घेण्याचा विषय आहे. मी अनेक वर्षे तसा प्रयत्न करतो आहे. माझ्या या प्रयत्नाचा थोडक्यात घेतलेला आढावा....

 ''दिवाळी अंकासाठी काय लिहिणार आहेस?'' माझे मित्र नाना नवले यांनी मला प्रश्न केला. मी त्यांना म्हणालो,

''अनेक वर्षे माझ्या मनात एक विषय घोळत असतो, विषय आहे महात्मा गांधींसंबंधीचा. एक स्वयंसेवक या नात्याने मी गांधीजींना कशा प्रकारे समजून घेतले आहे, यावर मी लिहिणार आहे.'' नाना नवले म्हणाले, ''म्हणजे तुला अनेकांच्या शिव्या खायच्या आहेत. मागे एकदा डॉ. हेडगेवार आणि डॉ. आंबेडकर यांना मुखपृष्ठावर एकत्र आणून तू शिव्या खाल्ल्यास, तशा आणखी खाव्या लागतील.'' मी म्हणालो, ''आता शिव्या खाण्याची सवय झाली आहे. पूर्वीच्या शिव्यांत आणखी थोडीशी भर पडेल, आणखी काय होणार?''

नवलेंचे म्हणणे खरेच होते. कारण संघस्वयंसेवकांत गांधी ही प्रिय व्यक्ती नाही. तसेच संघात गांधींविषयी कोणीच काही बोलत नाहीत - वाईटही नाही आणि चांगलेही नाही. ज्या काळात संघात माझी वाढ होत होती, त्या काळात महात्मा गांधी हा विषय संघात अस्पर्श होता. संघात किती बौध्दिक वर्ग मी ऐकले असतील आणि घेतले असतील याची मोजदाद करता येणार नाही. परंतु कोणत्याही बौध्दिक वर्गात महात्मा गांधींचे उदाहरण ऐकल्याचे आणि मी दिल्याचे माझ्या स्मरणात नाही. शालेय धडयातून जेवढा काही गांधीजींचा परिचय झाला असेल, तेवढाच मला परिचय होता. पुढे माझे महाविद्यालयीन शिक्षण झाले आणि मी एम.ए.देखील झालो. या माझ्या शैक्षणिक प्रवासात, जेथे संघाचा काही संबंध नाही, महात्मा गांधींचा वैचारिक परिचय जवळजवळ नगण्यच झाला. माझ्या शिक्षणक्रमात, अभ्यासक्रमात गांधी विचार नव्हता.

संघात अगदी हळुवारपणे महात्मा गांधींचा प्रवेश झाला. संघात रोज सकाळी एकात्मता स्तोत्र म्हटले जाते. त्याच्या नावातही बदल होत गेलेले आहेत. प्रात:स्मरण, भारतभक्ती स्तोत्रम आणि आता एकात्मता स्तोत्र असे त्याचे नामकरण झालेले आहे. 1965च्या सुमारास प्रात:स्मरणात काही बदल झाले आणि त्यात महात्मा गांधींचे नाव आले. 'महात्मा गांधीएवच'. अनेक स्वयंसेवक तेव्हा गांधीजींचे नाव घेत नसत. काही जण गांधीरेचक असे म्हणत. मला या सर्व प्रकाराची तेव्हा गंमत वाटे. गांधींविषयी एवढा तिटकारा काही स्वयंसेवकांच्या मनात का? असा प्रश्न मला पडत असे. हळूहळू त्याची उत्तरे मिळत गेली.

दिल्ली येथे महात्मा गांधी यांची हत्या झाली. या हत्येत संघाचा काहीही संबंध नसताना पंडित नेहरू यांनी संघावर बंदी घातली. हजारो स्वयंसेवकांचे संसार उद्ध्वस्त केले. अनेकांना नाहक तुरुंगात जावे लागले. परिवारच्या परिवार यात भाजून निघाले. असे जे भाजून निघाले, त्यांच्या मनात गांधीभक्ती निर्माण होणे अवघडच आहे. गांधीजींचा या जाळपोळीत दूरान्व यानेही संबंध नाही. नंतर जेव्हा माझा त्यांच्या विचारांशी परिचय झाला, तेव्हा त्यांच्या विचारांचाही या जाळपोळीशी काही संबंध नाही, हे माझ्या लक्षात आले. परंतु गांधीहत्येनंतर जाळपोळीच्या वणव्यात जे सापडले, त्यांच्या दृष्टीने गांधी हा विषय अस्पर्श झाला.

अखंड भारत हा संघाचा श्रध्देचा विषय आहे. अखंड भारताच्या नकाशाकडे जर नजर टाकली, तर ही गोष्ट सहज लक्षात येते की भारताची भौगोलिक सलगता निसर्गानेच निर्माण केली आहे. प्रचंड विविधता आणि नैसर्गिक समृध्दी या बाबतीत भारताशी बरोबरी करील असा देश जगाच्या पाठीवर नाही. स्वातंत्र्याचे आंदोलन अखंड भारताच्या स्वातंत्र्यासाठी चालले. अनेक क्रांतिकारक त्यासाठी फासावर गेले. महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीत हजारो लोकांनी तुरुंगवास भोगला. कित्येक जण देशोधडीला लागले. बंगाली भाषेत तर भारतमातेची अप्रतिम बंगाली काव्ये रचली गेली. 'वंदे मातरम्' त्यातले एक. 1947 साली देशाची फाळणी झाली. आपल्याच भूमीत पाकिस्तान नावाचे शत्रुराष्ट्र तयार झाले. फाळणीचा इतिहास फार क्लेशकारक आहे. फाळणी थांबविण्याची शक्ती महात्मा गांधींमध्ये होती. ''माझ्या देहाचे अगोदर तुकडे करा आणि मग देशाची फाळणी करा'' असे गांधीजी म्हणाले. परंतु ते फाळणी रोखू शकले नाहीत. गांधीजींनी हिंदू समाजाचा विश्वासघात केला अशी भावना लाखो लोकांच्या मनात निर्माण झाली. महात्मा गांधीजींना फाळणीसाठी आपल्या प्राणाचे मोल द्यावे लागले.

अखंड भारत या विषयाची जेव्हा जेव्हा संघात मांडणी करण्याचा प्रसंग येतो, तेव्हा गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मुसलमान नेतृत्वाचे कसे लांगूलचालन केले, याची असंख्य उदाहरणे येत जातात. खिलाफत आंदोलन, जीनांच्या मागण्या, मुंबईत जीनांची भेट असा सर्व इतिहास त्यात येतो आणि या प्रत्येक वेळी महात्मा गांधींनी हिंदू समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष केले, हिंदू-मुस्लीम ऐक्य साधण्यासाठी त्यांनी मुसलमानांना जवळजवळ कोरा चेकच दिला, फाळणी म्हणजे गांधीजींच्या नेतृत्वाखाली मुस्लीम तुष्टीकरणाचा अंतिम परिणाम आहे, अशा प्रकारे थोडक्यात फाळणीचा इतिहास सांगितला जातो. हा इतिहास एकतर्फी आहे आणि त्यात काही बाबतीत ऐतिहासिक तथ्य असले, तरी केवळयाच कारणाने देशाची फाळणी झाली असा निष्कर्ष काढता येत नाही, हे मला समजायला खूप वर्षे जावी लागली.

आतापर्यंत फाळणी या विषयावर अनके पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. दोन वर्षांपूर्वी शेषराव मोरे यांचे फाळणीवर पुस्तक 'काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?' प्रकाशित झाले आहे. महात्मा गांधींनी हिंदुहितासाठी फाळणी स्वीकारली, असा शेषराव मोरे यांचा निष्कर्ष आहे. तो बुध्दीला पटणे फार अवघड आहे, परंतु तो सिध्द करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. फाळणीवर इतर अनेक पुस्तके आहेत. माझ्या दृष्टीने या पुस्तकातील अतिशय महत्त्वाचे पुस्तक नरेंद्र सिंग सरिला यांचे 'दी शॅडो ऑफ ग्रेट गेम : दी अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज पार्टिशन' हे आहे. इंग्रजांनी फाळणी करण्याचा निर्णय कसा केला होता, का केला होता आणि तो त्यांनी कसा अमलात आणला, याची अस्सल कागदपत्रांच्या आधारे त्यांनी माहिती दिलेली आहे. महम्मद अली जीना, नेहरू, वल्लभभाई पटेल, अशी सर्व माणसे इंग्रजांच्या सत्तेच्या सारिपटावरील प्यादी होती. इंग्रजांनी त्यांचा उपयोग केला. 'दी ग्रेट गेम' म्हणजे काय? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला, म्हणून मी त्याचे वाचन सुरू केले. हा ग्रेट गेम टेनिस, क्रिकेट किंवा बुध्दिबळाचा नसून परराष्ट्र नीतीचा आहे. रशियाला मध्य आशियात फार पसरू न देणे हे इंग्रजांच्या परराष्ट्र नीतीचे गुप्त सूत्र होते. इराण आणि अफगाणिस्तानमध्ये त्याला घुसू न देण्याचे होते. यासाठी इंग्रजांनी ज्या उचापती केलेल्या आहेत, त्याला 'दी ग्रेट गेम' असे म्हणतात. महात्मा गांधींना हा ग्रेट गेम समजल्याचे मला कधीच आढळले नाही. मी गांधीजींचे जे काही थोडेबहुत वाचन केले, त्यात इंग्रजांची ही कुटिल नीती त्यांना समजत होती, असे मला काही दिसले नाही.

फाळणीविषयी लॉर्ड माउंटबॅटन म्हणतात, ''आम्ही लवकरच फाळणी करण्यात यशस्वी झालो. एक माणूस फाळणीला राजी नव्हता, पण त्याला आम्ही दूर ठेवले. फाळणीसाठी दोन लोकांना राजी करणे जरुरीचे होते. त्याशिवाय काँग्रेस वर्किंग कमिटी  फाळणीला मान्यता देणार नव्हती. आम्ही कृष्ण मेनन यांना साथीला घेऊन नेहरूंना पटवले. व्ही.पी. मेनन यांना हाताशी धरून सरदार पटेलांना राजी केले. जो माणूस फाळणीला कदापी तयार होणार नव्हता, त्या महात्मा गांधींना बाजूला ठेवले.'' एवढे मात्र खरे की फाळणी झाल्यामुळे महात्मा गांधींच्या व्यक्तित्वाला आणि त्यांच्या महात्मेपणाला तडे गेलेले आहेत. जन्मभर महात्मा गांधी सत्यनिष्ठ राहिले, सत्याशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. अहिंसेचे ते थोर उपासक होते. फाळणीने सत्य आणि अहिंसा या दोघांचा बळी घेतला. गांधीजी एकदा जे बोलत त्यावर ठाम राहत. त्यापासून कधीही माघारी फिरत नसत. गांधीजींनी तिसऱ्या वर्गातून प्रवास करण्याचे ठरविले आणि जीवनाच्या अंतापर्यंत ते त्यांनी पाळले. कस्तुरबा एकदा आजारी पडल्या असता गांधीजी त्यांना म्हणाले, ''तू डाळ आणि मीठ सोड.'' कस्तुरबा म्हणाल्या, ''ते कसे शक्य आहे? तुम्ही तरी सोडाल का?'' गांधीजी म्हणाले, ''उद्यापासून एक वर्षभर मी डाळ-मीठ खाणार नाही.'' आणि गांधीजींनी खरोखर वर्षभर डाळ-मीठ सोडले. गांधीजींच्या जीवनात अशी असंख्य उदहारणे आहेत. फाळणीच्या वेळी मात्र ते जे काही बोलले, त्यापासून ते दूर गेले. हिंसा त्यांना टाळायची होती, पण फाळणीत जी हिंसा झाली ती एका युध्दापेक्षाही भयानक होती.

संघस्वयंसेवक महात्मा गांधींपासून मनाने दूर असण्याचे दुसरे एक कारण आहे. त्यातील मीदेखील एक स्वयंसेवक आहे. गांधीजींचे वाचन करीत असताना मनाचा खंबीर निश्चय करून गांधीजींचे वाचन मला करावे लागले. गांधीभक्तांचे अनेक प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात गांधीविचार आणि आचार जगणारे लोक येतात. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. दुसऱ्या प्रकारात राजकीय गांधीभक्त येतात. तिसऱ्या प्रकारात ज्यांचा गांधीविचारांच्या आचरणाशी आणि गांधी मूल्यांच्या जीवनाशी काही संबंध नसतो, असे विद्वान लोक येतात आणि चौथ्या प्रकारात धूर्त, लबाड, पाताळयंत्री वर्गातील लोक येतात. या चारही प्रकारात मोडणारे सगळे गांधीभक्त संघाविषयी चांगले बोलत नाहीत. पहिल्या प्रकारात मोडणारे लोक काहीसा संयम तरी बाळगतील किंवा ''संघाची ही बाजू आम्हाला कळलीच नाही'' असे काही वेळेला प्रामाणिकपणे म्हणतील. पण उर्वरित तीन प्रकारातील लोक गांधींचा उपयोग संघाला झोडण्यासाठी करीत असतात. आपला उपयोग असा केला जाणार आहे, याची कल्पनादेखील महात्मा गांधींना नसेल. त्यामुळे होते काय, ज्याच्या नावाने आणि ज्याचे विचार कोट करून अशी टीकाटिपण्णी केली जाते, त्या महात्मा गांधींविषयी स्वयंसेवकाच्या मनात आपोआपच एक अढी निर्माण होते. हा माणूस आपल्या विचारांविरुध्द आहे, आपल्या जीवनमूल्यांविरुध्द आहे, आपल्या राष्ट्रसंकल्पनेविरुध्द आहे, आपल्या धर्मसंकल्पनेविरुध्द आहे अशी त्याची भावना तयार होते. अशी भावना तयार होण्यात गांधीजी जबाबदार नाहीत, गांधीजींचे लबाड भक्त जबाबदार आहेत, हे समजायला मात्र खूप वेळ जावा लागतो.

संघविरोधी गांधीभक्तांची अशी असंख्य उदाहरणे देता येतील. महाराष्ट्रात तर त्याची वानवा नाही. साने गुरुजींपासूनही सुरुवात करता येते. परंतु त्यांच्याविषयी मी माझ्या 'मी, मनू आणि संघ' या पुस्तकात लिहिले आहे, म्हणून त्याची पुनरावृत्ती येथे करीत नाही. फक्त एकच उदाहरण देतो, ते आहे प्रा. नरहर कुरुंदकर यांचे. महाराष्ट्रातील फार मोठे नाव. अनेकांना ते गुरुस्थानी आहेत. अत्यंत बुध्दिमान, बुध्दिवादी, व्यासंगी अशी त्यांची ख्याती आहे. त्यांची असंख्य पुस्तके आहेत. 'शिवरात्र' या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकात श्री गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी असा एक दीर्घ लेख आहे. कुरुंदकरांचे मी बऱ्यापैकी वाचन केलेले आहे. युक्तिवाद करण्याचे त्यांचे कौशल्य त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. यात आम्ही संघस्वयंसेवक कमी पडतो किंवा त्या भानगडीत पडत नाही. चर्चा, वादविवाद यात स्वयंसेवकाला फारसी रुची नसते.

कुरुंदकरांचा हा लेख महात्मा गांधी जन्मशताब्दी वर्षात श्रीगुरुजींनी गांधींविषयी केलेल्या भाषणावर आहे. ज्याला मी कुरुंदकर शैली म्हणतो, ती अशी आहे की अगोदर निष्कर्ष काढायचे आणि मग ते सिध्द करण्यासाठी युक्तिवादाची सर्व साधने वापरायची. युक्तिवादाचे जाळे असे फेकत जायचे की त्यामध्ये वाचणारा गुरफटून जातो. आणि तो जर कच्चा असेल तर त्याचा बुध्दिभेद ठरलेला आहे. श्रीगुरुजींविषयी नरहर कुरुंदकरांना आस्था नाही. गुरुजींविषयी ते म्हणतात, 'स्वच्छपणे वर्णव्यवस्थेला पाठिंबा दाखविण्याचे धैर्य ते करू शकतात.' कुरुंदकरांना म्हणायचे आहे, गुरुजी वर्णवादी आहेत. गुरुजींनी गांधींविषयी बोलणे हाच कुरुंदकरांचा आक्षेपाचा विषय आहे. कुरुंदकरांच्या भन्नाट तर्काचा एक परिच्छेद देतो. त्यावरून युक्तिवाद काय असतो, हे वाचकांच्या लक्षात येईल. 'आपल्या राजकारणात हिंदू जनता विरुध्द हिंदुत्ववाद हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जे हिंदू जनतेच्या वतीने उभे आहेत, ते हिंदुत्ववादाच्या विरुध्द उभे आहेत. या प्रवृत्तीचे महान नेते महात्मा गांधी होते. आणि जे हिंदुत्ववादाच्या बाजूने उभे आहेत ते हिंदू जनतेच्या विरोधी उभे आहेत. गोळवलकर या हिंदुत्ववादी, पण हिंदू जनता विरोधी प्रवृत्तीचे प्रमुख नेते व प्रतिनिधी आहेत.... हिंदू धर्माच्या नावे उभे असणाऱ्यांनी हिंदू जनतेच्या जीवनाला विरोध करून हिंदू धर्माचा द्वेष करण्यास शिकविले. उत्कटतेने करण्याची शिकवण दिली. मुसलमानांच्या तलवारी आणि धार्मिक अत्याचार जे 700 वर्षांत करू शकले नाही, ते कार्य हिंदुत्ववादी शक्तींनी 50 वर्षांत सफल केले! हिंदुत्ववाद्यांची इच्छा होती, हिंदूंनी मुसलमानांचा, इंग्रजांचा द्वेष करावा. प्रत्यक्षात घडले इतकेच की, या जनताद्रोही राजकारणाच्या परंपरेने हिंदू लोकांना हिंदू धर्माचा शोध करण्यास शिकविले.' कुरुंदकरांच्या या अजब शोधाला काय म्हणावे? मी त्यांच्यापुढे फार लहान माणूस आहे.

अशा गांधीभक्तांच्या लिखाणातून संघस्वयंसेवकाला गांधी समजत तर नाहीच, उलट महात्मा गांधींविषयी त्याच्या मनात नको असलेले गैरसमज निर्माण होतात. माझ्याही मनात भरपूर निर्माण झाले. अन्य वाचन करता करता गांधी भेटतच जातात. उदा. आंबेडकर वाचताना महात्मा गांधी पानोपानी भेटत जातात. दोघांतील वैचारिक संघर्षाची ओळख होत जाते. मग पुन्हा उत्सुकता निर्माण होते की अस्पृश्यता, वर्णव्यवस्था याविषयी गांधीजींची मते काय आहेत, हे जाणून घेण्याची.

अस्पृश्यतेविषयीचा सर्वात मोठा धिक्कार जर कोणी केला असेल तर तो महात्मा गांधींनी. हा हिंदू धर्मावरील कलंक आहे, असे ते म्हणत. नुसते म्हणून ते थांबले नाहीत, तर आपल्या जीवनातून त्यांनी अस्पृश्यता हद्दपार केली. साबरमती आश्रमात एका अस्पृश्य जोडप्याला ठेवले, म्हणून त्यांची बहीण आश्रम सोडून गेली. पत्नीने तक्रार केली आणि आर्थिक मदत करणाऱ्यांनी आर्थिक मदत बंद केली. परंतु महात्मा गांधींनी कशाशीही तडजोड केली नाही. हे जेव्हा मी वाचले, तेव्हा हृदयातील एक जागा गांधीजींनी व्यापली. गांधीजींच्या जीवनात अशा अस्पृश्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेत. या दोन-तीन प्रसंगी त्यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना जवळ घेतले. अंतिम इच्छा व्यक्त करीत असताना आपल्याला पुढचा जन्म अस्पृशत्वात मिळावा, असे त्यांनी म्हटले. अस्पृश्य, दलित या शब्दांविषयी त्यांना ममत्व नव्हते, म्हणून त्यांनी हरिजन हा शब्द दिला. नंतर हा शब्ददेखील अस्पृश्य वर्गाने नाकारला, हा भाग वेगळा. गांधीजींनी वर्णव्यवस्थेचे आणि जातिव्यवस्थेचे समर्थन केले म्हणून ते विषमतावादी होते, असे निदान मी तरी म्हणू शकत नाही. त्यांची वैचारिक भूमिका होती आणि ही भूमिका समतेला मानणारीच होती. ती न समजून घेता त्यांच्यावर वर्णवादी, जातीवादी असा सरळसोट आरोप करणे अत्यंत चूक आहे.

महात्मा गांधी, आंबेडकर यांच्या वैचारिक संघर्षातील 'पुणे करार' हा एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. राउंड टेबल कॉन्फरन्सनंतर जो जातीय निवाडा घोषित झाला, त्या निवाडयाप्रमाणे मुसलमानांबरोबरच अस्पृश्यांनादेखील विभक्त मतदारसंघ मिळाला. महात्मा गांधीजींनी अस्पृश्यांच्या विभक्त मतदारसंघाला प्रारंभापासून कडाडून विरोध केला होता. इंग्रजांनी निवाडा घोषित केल्यानंतर त्याविरुध्द गांधीजींनी येरवडा कारागृहात उपोषण सुरू केले. गांधीजींचे प्राण संकटात सापडले. नंतर डॉ. बाबासाहेबांसोबत वाटाघाटी होऊन सुप्रसिध्द पुणे करार झाला. विभक्त मतदारसंघ गेले आणि राखीव जागा आल्या. मुसलमानांचे विभक्त मतदारसंघ पाकिस्तानची जननी मानण्यात येते. हिंदू समाजापासून अस्पृश्यांना कायमचे तोडण्याचा इंग्रजांचा हा डाव होता. गांधीजींनी तो सफल होऊ दिला नाही, हे गांधीजींचे हिंदू समाजावरील कोटी कोटी उपकार आहेत. यामुळे गांधीजींची माझ्या मनातील उंची आपोआपच वाढली.

वाचनाच्या प्रवासात एकदा लुई फिशर यांचे महात्मा गांधींवरील पुस्तक वाचनात आले. वाचता वाचता सिमल्यातील एका प्रसंगाने माझे चित्त खेचून घेतले. फाळणीच्या नाटयात सिमल्याची बैठक अतिशय महत्त्वाची समजण्यात येते. सिमल्याला व्हाइसरॉयचा वाडा आहे. तिथे ही बैठक झाली. तेव्हा नियम असा होता की, व्हाइसरॉय सोडून अन्य कोणी सिमल्यात मोटर वापरायची नाही. बैठकस्थानापासून गांधीजींचे निवासस्थान सात-आठ किलोमीटर दूर होते. बैठकीकडे येण्यासाठी गांधीजींना वाहन देण्यात येईल, असे इंग्रज सरकारतर्फे सांगण्यात आले. गांधीजींनी विचारले, ''वाहनाची व्यवस्था सर्वांसाठी आहे का?'' उत्तर आले, ''नाही, व्यवस्था फक्त गांधीजींसाठी आहे.'' गांधीजींनी ते नाकारले आणि ते बैठकस्थानी चालत गेले. बैठक अनेक दिवस चालू होती आणि गांधीजी अनेक दिवस पायी जात-येत होते. तत्त्वाशी तडजोड न करणारा आणि सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे याचा आग्रह धरणारा अशी गांधीजींची एक प्रतिमा मनाच्या एका कोपऱ्यात जाऊन बसली.

 

मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर याचे जीवनचरित्र मी लिहिले. अमेरिकेतील ऍफ्रो-अमेरिकन चळवळीचा हा महान नेता होता. महात्मा गांधींप्रमाणे त्याचीही हत्या झाली. त्यांचे वर्णन 'अमेरिकन गांधी' या शब्दांत करायला हरकत नाही. गांधीजींच्या मार्गाने त्यांनी असहकाराची अहिंसक चळवळ अमेरिकेत चालविली आणि सर्व निग्रोंना राजकीय आणि नागरी अधिकार मिळवून दिले. त्यांनी घडवून आणलेला माँटगोमेरीचा संप अहिंसक क्रांती लढयातील एक सुवर्णपर्व आहे. हा संप 381 दिवस चालला. महात्मा गांधींचा विचार आणि त्यांचे सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान हेच त्याची पूर्ण प्रेरणा होते. आपल्या देशातील एखादा महात्मा जगभर कशी प्रेरणा निर्माण करतो, हे वाचून माझा ऊर अभिमानाने भरून आला. मी नेल्सन मंडेला यांचे जीवनचरित्र वाचताना मला हाच अनुभव आला. तसेच लेक वालेसाची पोलंड चळवळ वाचतानाही आला. जुलमी सत्तेविरुध्द न्यायासाठी अहिंसक चळवळीचे हत्यार महात्मा गांधींनी सर्व जगाला दिले.

मणी भौमिक हे लेझर किरणाचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे 'कोड नेम गॉड' हे पुस्तक आहे. पुस्तकाचा विषय आहे विज्ञानाच्या माध्यमातून देवाचा शोध. यामुळे या पुस्तकात पदार्थविज्ञान शाखेत आज जे संशोधन चालू आहे, त्याची जशी अद्ययावत माहिती वाचायला मिळते, तशी देवाच्या शोधाची वाटचालही बघायला मिळते. पुस्तकात महात्मा गांधींचा या संदर्भात (म्हणजे देवाच्या शोधाच्या संदर्भात) वारंवार उल्लेख येत जातो. त्यांच्या आंदोलनात बंगालमध्ये हुतात्मा झालेल्या मातंगी नावाच्या तरुणीचा हृदयस्पर्शी तपशील येतो. गांधीजींचे सामर्थ्य काय होते, आणि एका सामान्य स्त्रीला किती धाडसी आणि देशासाठी वाटेल तो त्याग करण्यास तयार करीत, याची ओळख होते. असे प्रसंग तर गांधीजींच्या आयुष्यात सांगावे तेवढे थोडेच आहेत. महादेवभाई देसाई त्यांना भेटायला गेले आणि उत्तम चालणारी वकिली सोडून 25 वर्षे त्यांच्या सेवेत राहिले. गांधीजींचे उजवा हात झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांची तीच गत झाली. बार्डाेलीच्या सत्याग्रहात एका महिलेने त्यांना सरदार ही उपाधी दिली. जवाहरलाल नेहरू त्यांना भेटले आणि गांधीजी त्यांचे बापू झाले. ब्रिटिश नौदलाचे प्रमुख स्लेड यांची कन्या मॅडेलिन स्लेड सगळे वैभव सोडून साबरमतीच्या आश्रमात आली आणि मीराबहन झाली. हिमालयात निघालेले विनोबा, गांधीजींचे एक भाषण ऐकून कोचरबला आले आणि गांधीमय झाले.

विनोबांनी गांधीजींवर भरपूर लिहिले आहे. विनोबा हे माझे अत्यंत आवडते लेखक, तत्त्वचिंतक आहेत. भाषा साधीसोपी आणि सगळया तत्त्वज्ञानाला भारतीय तत्त्वज्ञानाची मूलभूत बैठक.  त्यांच्या लेखनात वेद-उपनिषदे, रामायण-महाभारत यातील संदर्भ सहज येत जातात. विनोबा गांधीभक्त असले, तरी अंध गांधीभक्त नाहीत. गांधीविचार समजून घेणारे, त्यातला कालसापेक्ष भाग सोडण्याची हिंमत असणारे आणि त्यात नव्याने भर घालून गांधीविचारात भर घालणारे आधुनिक काळातील दार्शनिक संत होते. त्यांचे 'गांधी जसे पाहिले जाणले विनोबांनी' हे पुस्तक गांधीविचारावरील माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकांमध्ये सर्वश्रेष्ठ पुस्तक आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत हे पुस्तक मी अनेक वेळा वाचले आहे. या वाचनाने जसे मला गांधी समजले, त्याहून अधिक संघ समजत गेला. हे वाक्य अनेकांना बुचकळयात टाकेल. गांधीजींच्या पुस्तक वाचनाने संघ कसा काय समजतो? असा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होऊ शकतो. माझ्यासारखा स्वयंसेवक कुठल्याही थोर पुरुषाचे वाचन करीत असताना, अभ्यास करीत असताना त्याच्याशी माझे किती प्रमाणात साधर्म्य आहे, याचा कळत-नकळत शोध घेत असतो. विवेकानंद वाचताना पदोपदी जाणवायला लागते की, संघस्वयंसेवक म्हणून तर मी हे करीतच असतो. हा विचार तर मी जगतो आहे. आंबेडकर वाचत असताना हिंदू समाजाच्या दोषांसंबंधी आणि तो दोषमुक्त व्हावा यासंबंधी बाबासाहेब जे लिहितात, ते मनाला एकदम पटत जाते आणि मग असे वाटते की बाबासाहेबांना जे अपेक्षित होते, तेच तर मी संघस्वयंसेवक या नात्याने करीत आहे.

असे काही लिहिण्यात एक धोका असतो, याची मला कल्पना आहे. तो धोका असा असतो की, कुरुंदकरांसारखे विद्वान आणि त्यांच्या शिष्यसंप्रदायात मोडणारे अनेक जण, तसेच या संप्रदायात न मोडणारेदेखील अनेक जण आक्षेप घेतात की संघाला स्वत:चा विचार नसल्यामुळे संघवाले सर्वांना आपल्या झोळीत बांधत असतात. विवेकानंद, आंबेडकर, सावरकर, गांधीजी असा सबगोलंकार विचार संघवाले करतात. त्यात त्यांचा हेतू असा असतो की, संघकामाला या महापुरुषांची नावे घेऊन मान्यता मिळविण्याचा. या सर्वांना मी या ठिकाणी उत्तर देतो, अनेक वेळा ते जाहीर भाषणांतून मी दिलेले आहे. संघाला जनमान्य होण्यासाठी यापैकी कोणत्याही महापुरुषाची गरज नाही. संघाचे काम स्वयंभू आहे, सार्वभौम आहे, सार्वकालिक आहे आणि संपूर्ण सत्यावर आधारित आहे. त्याला कोणाच्याही कुबडीची आवश्यकता नाही. ते आपल्या अंगभूत सामर्थ्याने जनमान्य होत जाणार. त्याला अडविण्याची ताकद कोणात नाही. आमचा प्रयत्न एवढाच असतो की संघ जे काही करतो आहे, त्याला एक पूर्वपरंपरा आहे. संघात जे अनेक विषय येतात, ते अनेक थोर महापुरुषांनी आपल्या जीवनात उत्कटतेने पुढे आणले आहेत. त्यांना वंदन करणे हे स्वयंसेवक या नात्याने आमचे कर्तव्य आहे.

संघ समजण्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे स्थूल संघ आणि दुसरा आहे सूक्ष्म संघ. स्थूल संघ संघाच्या गणवेशात, संघाच्या शारीरिक कार्यक्रमात, संघाच्या बँडपथकात, संघाच्या कार्यालयात दिसतो. तो संघ प्रमाण मानून अनेक विद्वान भन्नाट लिहीत असतात. माझ्या दृष्टीने हे सर्व विनोदी लेखन असते. याच स्थूल प्रकारात संघाच्या शब्दवाङ्मयाचा समावेश करावा लागतो. श्रीगुरुजींची भाषणे, सरसंघचालकांची भाषणे, डॉ. हेडगेवारांची आणि गुरुजींची चरित्रे इत्यादी. या शब्दवाङ्मयावरदेखील सतत लेखन होत असते. कुरुंदकरांनी जसे शोध लावले आहेत, तसे अनेक जण शोध लावत असतात. या सर्वांना संघाचे सूक्ष्म ज्ञान बालवाडीतील मुलाइतकेदेखील नसते. संघ त्याच्या स्थूल स्वरूपात नसून तो संघाच्या जीवनपध्दतीत आहे. ती जगावी लागते. तिचा अनुभव घ्यावा लागतो, त्याशिवाय तिचे ज्ञान होत नाही.

सिध्दान्तरूपाने संघाने सांगितले की, हे आपले सनातन राष्ट्र आहे, आपली सनातन संस्कृती आहे, धर्म तिचा पाया आहे, हे हिंदू राष्ट्र आहे. जगात अनेक राष्ट्रे आली आणि गेली. हिंदू राष्ट्र अक्षुण्ण आहे. त्याला मरण नाही. हे चिरंजीव राष्ट्र बनण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील एक कारण आपला समाज कधी शासनकेंद्रित झाला नाही. आपले आदर्श राजे-महाराजे, सेनापती नसतात. धर्ममार्गावर चालणारे साधू, संत, महात्मे आपले आदर्श असतात. राष्ट्रातील व्यक्तींचे पतन झाले की राष्ट्राचे पतन होते. राष्ट्राला उभे करायचे असेल तर व्यक्तिनिर्माणावर भर दिला पाहिजे. समाजाशिवाय व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, म्हणून सामाजिक ॠणांचे स्मरण सतत ठेवले पाहिजे. ते ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशातील प्रत्येक व्यक्ती चारित्र्यसंपन्न आणि निःस्वार्थी असली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सत्ताप्राप्त करण्याचे नाही. सत्ता दुय्यम आहे, समाज सत्ता त्याहून मोठी आहे. समाज सत्ता बलवान करणे हे संघकामाचे लक्ष्य आहे.

महात्मा गांधीजी राजकारणी होते की आध्यात्मिक संत होते की संत राजकारणी होते? याबद्दल उलटसुलट चर्चा चालू असते. डॉ. हेडगेवारांनी राजकारणाविषयी तेव्हा म्हटले, ''परतंत्र राष्ट्राला स्वातंत्र्य मिळविणे एवढेच राजकारण असते. या अर्थाने महात्मा गांधींना राजकारणी म्हणायला हरकत नाही. तथापि सत्तेचे राजकारण करणारा राजनेता असा त्यांचा पिंड नव्हता. राजसत्तेची त्यांना कसलीही हाव नव्हती. देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करीत असताना तो सोडून ते बंगालमध्ये नौखालीत येऊन बसले होते. मुसलमानांची दंगल शमविण्यासाठी ते एकटेच निघाले होते. म्हणून माउंटबॅटननी म्हटले की, गांधी म्हणजे वन मॅन आर्मी आहेत. आपल्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर त्यांनी काँग्रेस विसर्जित करून तिचे लोकसेवक संघात रूपांतर करावे, असा एक ठराव केला होता. त्यातील पहिला परिच्छेद असा आहे, 'हिंदुस्थानचे दोन तुकडे झाले असले, तरी हिंदी राष्ट्रीय काँग्रेसने योजलेल्या साधनांनी देशाने राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले आहे. तेव्हा आता काँग्रेसला आजच्या स्वरूपात - म्हणजे प्रचाराचे साधन आणि पार्लमेंटरी काम चालविणारा गाडा या स्वरूपात राहण्याचे कारण उरले नाही. लहान-मोठया शहरांपासून भिन्न असलेल्या सात लाख खेडयांच्या दृष्टीने सामाजिक, नैतिक व आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे अजून राहिले आहे... या आणि अशाच प्रकारच्या इतर कारणांकरिता ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटी असा ठराव करते की, आजची काँग्रेस संघटना मोडून टाकून तिचे खाली दिलेल्या नियमांनुसार लोकसेवक संघात विकसित रूपांतर व्हावे.'

विनोबांचे यावरील भाष्य असे आहे - 'त्यांचा सल्ला मानला असता, तर काँग्रेस ही देशातील सर्वात मोठी सेवा संस्था बनली असती. ज्या राजकीय कामासाठी काँग्रेसची रचना झाली, ते पुरे झाले होते. नंतर काँग्रेसने आपले रूपांतर करून देशाचे रचनाकार्य उचलून घेतले, तर काँग्रेसने जे काही पुण्य कमाविले होते त्याचा लाभ तर तिला मिळेलच, शिवाय त्या पुण्यात वाढ होईल, अशी एक विशाल, अतिभव्य, दिव्य कल्पना ते करीत होते. उपनिषदीय दर्शनासारखेच हे दर्शन होते. अद्भुत प्रतिभेशिवाय हे दर्शन अशक्यच.' गांधीजींना काय म्हणायचे आहे? समाज शासनकेंद्रित, शासनानुवर्ती नसावा. विनोबांच्या या भाष्यावर अधिक भाष्य केले पाहिजे असे नाही.

महात्मा गांधीजींनी या देशात केलेला अद्भुत चमत्कार म्हणजे, त्यांनी सर्वसामान्य माणसाला राजसत्तेविरुध्द लढण्यासाठी उभे केले. देश गुलाम झाला होता. इंग्रजांनी सर्वांच्या हातातील शस्त्रे काढून घेतली होती. निःशस्त्र माणसाला शक्तिमान करण्याचे अचाट काम गांधीजींनी केले. 1930 साली त्यांनी दांडी सत्याग्रहाची घोषणा केली. इंग्रजांनी मिठावर कर बसविला होता. हा कर काढून घेतला पाहिजे, अशी गांधीजींनी मागणी केली. आणि त्यासाठी सत्याग्रह करण्याची घोषणा केली. साबरमती आश्रम ते दांडी अशी पदयात्रा त्यांनी काढली. गावोगाव ते गेले. मिठाचा सत्याग्रह करून स्वराज्य कसे मिळणार? असा प्रश्न पंडित नेहरूंपासून सर्वांच्या मनात निर्माण झाला होता. गांधीजींच्या अफाट प्रतिभेची अनुभूती सर्वांना व्हायची होती. मीठ हे प्रत्येकाच्या ताटात असते. त्यामुळे मिठाचा सत्याग्रह श्रीमंतापासून गरिबापर्यंत आणि शहरापासून खेडयापर्यंत प्रत्येक घरात गेला. या सत्याग्रहात सत्याग्रहींनी ज्या आत्मसंयमाचे प्रकटीकरण केले, ज्या धैर्याने लाठया खाल्ल्या, अमानुष अत्याचार सहन केले, त्याच्या कथा अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत आणि गांधी शक्तीची ओळख करून देणाऱ्या आहेत.

आत्मशक्ती ही प्रत्येक मनुष्याची सगळयात मोठी शक्ती असते. तिची ओळख करून द्यावी लागते. सामान्य स्थितीत अशी ओळख होत नाही. संघशाखेत ही ओळख रोजच्या कार्यक्रमातून, प्रार्थनेतून, सामूहिक चिंतनातून करून दिली जाते. गांधीजींनी ही ओळख स्वत:च्या चारित्र्यबळाच्या आधाराने समाजाला करून दिली. वयाच्या 37व्या वर्षी त्यांनी ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले आणि त्याचे आजीवन पालन केले. गांधीजींनी आश्रमामध्ये आश्रमवासीयांना अनेक व्रते घ्यायला लावली. विनोबाजींनी त्याला नाव दिले 'एकादशव्रत'. सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरिग्रह ही पाच प्रमुख व्रते आहेत. ती भारतातील सर्व धर्मसंप्रदायांत येतात. पातंजली योगसूत्रातही त्यांचा उल्लेख आहे. याला जोडून आस्वाद व्रत, अभय व्रत, अस्पृश्यता निवारण, शरीरश्रम, सर्वधर्मसमभाव व स्वदेशी ही व्रते येतात. गांधीजींनी आपल्या जीवनात या सर्व व्रतांचे आदर्शवत पालन केलेले दिसते. बोले तैसा चाले अशी त्यांची प्रतिमा यामुळे तयार झाली आणि साहजिकच लोकांचा त्यावर विश्वास बसला.

सर्वसामान्य लोकांना देशाशी, समाजाशी जोडून ठेवणारा एक कार्यक्रम गांधीजींना पाहिजे होता. विनोबांच्या शब्दांत 'बापूंचे म्हणणे होते की सर्व देशासमोर अशी एक उपासना असावी, जी देशातील प्रत्येक लहान बालकदेखील करू शकेल. धार्मिक आणि पांथिक उपासना असतात, पण त्यामुळे भेद निर्माण होतात. देशात अभेद उत्पन्न करणारी उपासना पाहिजे. सर्व जणांना वाटले पाहिजे की मी देशासाठी काही ना काही करीत आहे. अशा विचारानेच चरख्याचा विकास झाला. सूत कातणे हे हलक्यात हलके आणि सोपे श्रम आहेत. बापूंनी स्वत: जन्मभर रोज सूत कातले. मृत्यूच्या दिवशीही चरखा कातून नंतरच गेले. ही त्यांची अपूर्व रीत होती. याच रितीने ते भारताच्या आम जनतेबरोबर एकरूप होऊ शकले.' हे जेव्हा मी वाचले, तेव्हा माझ्या मनात सहज प्रश्न निर्माण झाला की रोजची एक तासाची शाखा आणि रोजचे एक तासाचे चरख्याचे सूत कातणे यांच्या आशयात फरक कोणता? यामुळे मी गांधीजींच्या अधिक जवळ गेलो.

विनोबांच्या वर उल्लेखिलेल्या पुस्तकातील एका प्रकरणाचे शीर्षक  आहे 'स्वाध्याय-प्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम्'. विनोबाजी म्हणतात, ''गांधीजींच्या काळापासून कार्यकर्त्यांविषयी माझी एक तक्रार आहे, जी आजही कमी-जास्त प्रमाणात कायम आहे, ती ही की, उत्तम कामात गुंतलेले आमचे लोक विचारांचे अध्ययन कमी करतात. त्याविषयीची अभिरुची आपल्या मंडळींत कमी आहे. आपला समूह कर्मप्रधान असल्यामुळे कर्मातच जास्त वेळ जातो. म्हणून वाचायच्या नावाने, अध्ययनाच्या नावाने रामा शिवा गोविंदा!'' विनोबांचे हे भाष्य ऐकल्यानंतर मला मनोमन हसू आले ते एवढयासाठी की संघात यापेक्षा वेगळे काही दृश्य नसते. कार्यकर्ते आपली हयात संघकामात घालवितात, परंतु अध्ययनाच्या बाबतीत त्यांची प्रगती शून्य असते. मी तर असे अनेक कार्यकर्ते बघितले आहेत की, जे स्थूल संघाचे महातज्ज्ञ होते. परंतु संघाचा विचार काय? आजच्या काळातील त्याचे संदर्भ कोणते? त्याला जागतिक संदर्भ आहेत की नाहीत? त्यात विज्ञान आहे की नाही? याबाबतीत विचर करणारे कार्यकर्ते नगण्य असतात. गांधी अनुयायी आणि संघस्वयंसेवक यांच्यातील हे साम्यदेखील नसे थोडके.

विनोबाजी गांधीविषयी लिहिताना गांधीझम, गांधी विचार आणि गांधी एक व्यक्ती असा फरक करतात. एक व्यक्ती म्हणून गांधीजी सतत विकसनशील होते. गांधीविचारदेखील सतत विकास पावणारा विचार होता. गांधीजींच्या भूमिकेतही बदल होत गेलेले आहेत. आफ्रिकेत असताना ते साम्राज्यनिष्ठ होते. इंग्रजांच्या सदसद्विवेकबुध्दीवर त्यांचा विश्वास होता. भारतात आल्यानंतर त्यांचा हा विश्वास उडाला. नंतर त्यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ चालू केली. 1942 साली त्यांनी इंग्रजांना 'चले जाव' आदेश दिला. आश्रमातील खाण्या-पिण्याच्या नियमातही काळानुरूप बदल होत गेले. इंग्लंडमध्ये आणि आफ्रिकेत असताना गांधीजींचा पोषाख पाश्चात्त्य धर्तीचा होता. भारतात आल्यानंतर ते काठेवाडी पोषाखात एक वर्ष फिरले. भारतातील प्रचंड गरिबी पाहून एवढी वस्त्रे अंगावर घालणे हे पाप आहे, असे त्यांना वाटले आणि ते पंचा नेसू लागले. भारतातील गरिबातील गरिबाशी मानसिकदृष्टया एक होण्याची त्यांची धडपड सतत चालू असे. त्यामध्ये ढोंगबाजी किंवा लबाडी अजिबात नसे. नारायणभाई देसाई यांचे 'अज्ञात गांधी' हे गांधीजींवरील सुंदर पुस्तक आहे. नारायणभाई देसाई महादेवभाई देसाईंचे पुत्र. गांधीजींच्या सहवासात ते मृत्यूपर्यंत राहिले. गांधीजी कौतुकाने त्यांना बाबला म्हणत असत. नौखालीच्या प्रवासातील एक आठवण नारायणभाईंनी दिली आहे, ती त्यांच्याच शब्दात - ''तीच गोष्ट पादत्राणांबाबतची. मंदिर-मशीद या पवित्र स्थळी जाताना कुणी पादत्राणे घालत नाहीत. मी नौखालीतल्या दरिद्रीनारायणाला भेटायला निघालो आहे. ज्यांचं सर्वस्व लुटलं गेलं आहे, ज्यांना आपलं शरीर झाकायला कपडा नाही, त्यांना भेटण्यास जाण्यासाठी पादत्राणांची गरज नाही, असे सांगून बापूंनी चंदीपुरात आपली पादत्राणे सोडली. काटे रुतून त्यांचे पाय रक्ताळले, परंतु नौखालीची पदयात्रा संपेपर्यंत बापूंनी पादत्राणे घातली नाहीत.''

जेव्हा वाचनात येतात, तेव्हा माझ्या नकळत बापू माझ्या मनात जाऊन बसतात. नारायणभाई देसाई यांच्या पुस्तकात अशा अनेक घटना आहेत. त्यातील ही आठवण गांधीजींच्या चारित्र्याची उंची किती होती आणि तिचा प्रभाव समाजातील पतित माणसावर कसा होता हे सांगणारी आहे. नारायणभाईंच्या शब्दात, ''लखनऊ काँग्रेस बैठकीला गांधी गेले होते. तेथे एक वेश्या गांधीकडे अाली. तिने आपल्या हातातील सोन्याच्या बांगडया काढल्या. वेश्या अविवाहित होती. तिच्या बांगडया आकाराने मोठया व वजनदार होत्या. पंचवीस-तीस तोळयांच्या सहज असतील. गांधींनी हाती घेतलेल्या कार्यासाठी ती त्या बांगडया गांधींना द्यायला लागली. ''बेटी,'' असे संबोधून गांधी त्या वेश्येला म्हणाले, ''या बांगडयांचं दान का करतेस?'' त्यावर ती पटकन उद्गारली, ''बाबा, तुम्ही हे काय केलं? मला 'बेटी' म्हणालात! आता गांधीजींची ही बेटी कोठीवर बसणार नाही!''

संपत्तीच्या अधिकाराचे करायचे काय? राज्यशास्त्रातील हा एक जटिल प्रश्न आहे. संपत्तीचा गुणधर्म एकवटण्याचा असतो. ज्याच्या हाती संपत्ती असते, तो शोषण करून अधिक संपत्ती करण्यासाठी तिचा उपयोग करीत असतो. मनुष्याच्या शोषणात संपत्तीचा अधिकार कारणीभूत होतो. माक्र्सने सांगितले, संपत्तीचा अधिकार काढून टाका. संपत्तीधारकांना नाहीसे करून टाका. आपला विषय तसा नाही. ईशवास्य उपनिषदाच्या पहिल्या श्लोकात म्हटले आहे की, जी काही स्थावर-जंगम संपत्ती आहे ती परमेश्वराची आहे. तिचा त्यागपूर्वक उपभोग घेतला पाहिजे. गांधीजी भारतीय दर्शनाचे विसाव्या शतकातील एक मूर्तिमंत रूप होते. आपल्या धर्मशास्त्रातील विचार काळानुरूप कसे मांडले पाहिजेत, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्यानुसार आचरण करण्यास अडचण येऊ नये. गांधीजींनी ईशवास्य उपनिषदाचा विचार ट्रस्टीशिपच्या माध्यमातून मांडला. ''सर्व संपत्ती समाजाची असली पाहिजे. त्यांनी धनवान लोकांकडून अशी आशा राखली होती की त्यांनी सर्व शक्ती व संपत्ती सेवेसाठी खर्चावी. ते ट्रस्टीशिपचा स्वीकार करतील अशी आशाही गांधीजींनी राखली होती. त्यांना मोठी उमेद होती की भारतातील श्रीमंत आपल्या संपत्तीचे एक ट्रस्टी म्हणून वागण्याचे कबूल करतील.''.

गांधीजींची ट्रस्टीशिपची कल्पना समाजात प्रत्यक्ष व्यवहारात आणणारे किती जण आहेत याची मला फारशी माहिती नाही, परंतु संघात बरीचशी उदाहरणे आहेत. लातूरला विवेकानंद रुग्णालय आहे, करोडो रुपयाची त्याची संपत्ती आहे. हे रुग्णालय उभे करण्यामध्ये माजी क्षेत्रसंघचालक डॉ. अशोकराव कुकडे एक आहेत. ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयाचा एक ट्रस्ट तयार केला आणि सर्व संपत्ती ट्रस्टच्या मालकीची करून टाकली.

विनोबांचे वैशिष्टय असे की ते या ट्रस्टीशिपच्याही पुढे जातात. ते म्हणतात की ''आजच्या समाजाला दास्यभक्तीऐवजी सख्यभक्तीची जरुरी आहे, म्हणजे स्वामित्व व सेवकत्व या भावना चांगल्या अर्थानेही समाजाला रुचत नाहीत. आता जगातून मालकी नष्ट झाली पाहिजे.'' विनोबा जे म्हणतात, त्याची आजची परिभाषा सहभागाची आहे. राष्ट्रीय घडामोडीमध्ये प्रत्येकाला आपला वाटा पाहिजे आहे. समाजातील प्रत्येक गट राष्ट्रघडणीमध्ये स्वतःला पाहू इच्छितो.

गांधीजी युगप्रवर्तक महापुरुष होते. त्यांचे युगप्रवर्तकपण कशात आहे? ''त्यांनी एक नवा विचार दिला. आजच्या युगातदेखील अजून दास्यभक्ती चालू राहावी, समाजात स्वामीपणाची नि सेवकपणाची विभागणी चालू राहावी या गोष्टीचा त्यांच्या विचाराशी मेळच बसत नाही. त्यांनी तर आपल्या समाजात जी गुणांची विभागणी झाली होती तिच्याविरुध्द आवाज उठविला होता. ब्राह्मणात अमुक गुण असावेत, शूद्रात अमुक गुण असावेत, असे आपल्याकडे चालत आले आहे. प्रत्येकाचा धर्म अलग मानला जाई. या प्रकारे गुणांतही पूंजीवाद शिरला होता. सत्य, अहिंसा, प्रेम वगैरे गुण ही संतांची पूंजी होती. बाकी सर्व लोक संतांबद्दल आदरभाव राखतील, त्यांची पूजा करतील, पण त्यांचे अनुकरण करणार नाहीत. पण गांधीजींनी समजावून सांगितले की सत्य, अहिंसा, प्रेम वगैरे गुण जितके संन्याशाला लागू आहेत, तितकेच गृहस्थाला नि इतर सर्वांना लागू आहेत. आपली सगळी शक्ती समाजसेवेत अर्पण करावी आणि त्याऐवजी सामज जे काही देईल ते संतोषपूर्वक ग्रहण करावे. आजच्या भाषेत म्हणायचे तर गांधीजींनी समजावले की सद्गुण सामाजिक उपयोगासाठी असतात.'' गांधीविचारांवरील असे भाष्य वाचले की माझ्यासारखा संघस्वयंसेवक गांधीजींच्या अधिकच जवळ जातो.

'द लास्ट फेज' हा प्यारेलालजींचा गांधी चरित्राचा शेवटचा खंड आहे. गांधींवरील कोणत्याही पुस्तकात या खंडाचा वारंवार उल्लेख होत असतो. त्यातील पृष्ठ 788वर प्यारेलालजी लिहितात, त्याचा सारांश असा -''अणुबाँब ही अंतिम विध्वसंक शक्ती आहे यावर गांधीजी म्हणत, 'मृत्यूचे तांडव निर्माण करणाऱ्या बाँबच्या मागे तो सोडणारा हात असतो, त्या हातामध्ये माणसाचे मन असते. ते मन हाताला कार्यप्रवण करते. मानवी वंश आणि मानवी संस्कृती यांच्या अस्तित्वाची अंतिम लढाई माणसाच्या मनातच लढायची आहे. कारण ते सर्व प्रकारच्या कर्माचे अंतिम उगमस्थान असते. मनुष्याच्या इच्छाशक्तीनेच सर्व काही घडत असते. माणसाच्या मनावर जर ताबा मिळविता आला, तर अणुशक्ती वाईट रितीने वापरण्याच्या मनप्रवृत्तीवर ताबा मिळविता येईल.''

पूजनीय डॉ. हेडगेवारांनी संघ स्थापन करीत असताना त्रिकालाबाधित सत्याचा एक महान मंत्र दिला की, माणूस घडवा, माणसाला चांगले करा, त्याला दैवी गुणसंपन्न करा, देश आपोआप सुधारेल आणि विश्वशांती निर्माण होईल. गांधी तरी वेगळे काय सांगतात?

गांधी काही वेगळे सांगत नसले, तरी गांधीविचार आणि संघविचार एकच आहे, असे विधान मी करणार नाही. मूल्यव्यवस्था, साधी राहणी, सर्वांभूती आत्मीयता, समाजसेवा, समाजशक्तीविषयीचे विचार, धर्मविचार इत्यादी अनेक बाबतीत संघ आणि गांधी एकसारखाच विचार करतात हे जरी मला समजले, तरी संघमार्ग आणि गांधी मार्ग एक नाहीत, हेदेखील मला समजते. गांधीजींची अहिंसा आणि संघाची अहिंसा यात खूप अंतर आहे. फाळणीच्या काळात अन्याय, अत्याचार सहन करा, असे गांधी सांगत. अन्याय-अत्याचार-अपमान आणि तोही राष्ट्रीय असेल तर अजिबात सहन करता कामा नये, ही संघाची शिकवण आहे. या शिकवणीमुळे बाबरी ढाचा पाडल्याचा शून्य खेद माझ्या मनात असतो. काश्मीरमध्ये लष्करावर दगडफेक करणाऱ्यांना एकतर गोळया घातल्या पाहिजेत किंवा त्याहून मोठया दगडांनी उत्तर दिले पाहिजे, असे मला वाटते. गोध्रा येथे कारसेवकांना जिवंत जाळणारे नराधम होते. त्यांना क्षमा नाही. या सर्व गोष्टी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानात बसणार नाहीत. हिंसेचा अहिंसेने प्रतिकार करावा ही त्यांची शिकवण आहे. आपण हिंसा करू नये, परंतु प्रतिस्पर्धी जर हिंसक असेल तर त्याला त्याच्या भाषेतच उत्तर दिले पाहिजे, हे संघाने मला शिकविलेले आहे. महात्मा गांधीजींनी भगवद्गीता प्रमाण मानली आणि त्याप्रमाणे ते जगले. एक संघस्वयंसेवक म्हणून मीही गीता जगत असतो. माझ्याही जीवनाचा ती मार्गदर्शक आधार आहे.  पण माझी जीवन जगण्याची गीता 'गांधी गीता' नसते, ती 'टिळक गीता' असते. ती सांगते, 'जो ज्या रूपात माझे पूजन करील, त्या रूपात मी त्याला भेटतो.'

vivekedit@gmail.com