श्रीविठ्ठल एक सनातन कोडे

विवेक मराठी    24-Oct-2017
Total Views |


विठ्ठल हे दैवत व त्याच्या भक्तांचा संप्रदाय या दोहोंचा इतिहास किमान 2000 वर्षांचा असावा, असे दिसते.  'श्रीविठ्ठल' हे आजही जगभरातील संशोधक अभ्यासकांच्या दृष्टीने एक 'महाकूट' आहे. संस्कृतीच्या संशोधक अभ्यासकांसमोर, कंबरेवर हात ठेवून उभे असलेले हे एक सनातन कोडे आहे. 'श्रीविठ्ठल' हे दैवत नेमके कोणत्या पंथातले - शैव, वैष्णव की अन्य कोणत्या - मानायचे? इथपासून या कोडयाची सुरुवात होते. श्रीविठ्ठल व त्याचा भक्तिसंप्रदाय या दोहोंचा जेवढा अभ्यास करत जाऊ , तेवढे हे व असे प्रश्न वाढत जातात. कोडे सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचे होत जाते आणि 'श्रीविठ्ठल हे एक सनातन कोडे आहे' एवढेच वास्तव आपल्या लक्षात येते.

संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात पसरलेल्या मराठी माणसांचे आधिदैवत कोणते? असा प्रश्न कोणी विचारला, तर 'श्रीविठ्ठल' हेच त्याचे एकमुखी उत्तर येईल. पंढरपूर आणि श्रीविठ्ठल ही दोन्ही नावे कोणत्याही मराठी मनाला ताबडतोब भावतात. असा हा श्रीविठ्ठल आणि त्याचे वास्तव्य असलेले पंढरपूर या दोन्हींबद्दल श्रध्दाळू भाविकाच्या मनात जेवढी उत्कंठा आहे, तेवढेच कुतूहल चिकित्सक संशोधकाच्या मनात आहे. अनेक मान्यवर संशोधकांनी श्रीविठ्ठलाचा ऐतिहासिक शोध घेण्याचा सातत्याने प्रयत्न केला. अनेक जण आजही तसा प्रयत्न करीत आहेत. पंढरपूरचे पुरातत्त्वीय संशोधनदेखील अल्प प्रमाणावर का होईना, पण झाले आहे. तरीदेखील 'श्रीविठ्ठल' हे आजही जगभरातील संशोधक अभ्यासकांच्या दृष्टीने एक 'महाकूट' आहे. संस्कृतीच्या संशोधक अभ्यासकांसमोर, कंबरेवर हात ठेवून उभे असलेले हे एक सनातन कोडे आहे. 'श्रीविठ्ठल' हे दैवत नेमके कोणत्या पंथातले - शैव, वैष्णव की अन्य कोणत्या - मानायचे? इथपासून या कोडयाची सुरुवात होते.

महासमन्वय

भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना काही प्रमेये, ठोकताळे आधुनिक अभ्यासकांच्या मनात पक्के बसलेले आहेत. गेल्या तीन शतकांमध्ये भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू झाला तो पाश्चात्त्य संशोधकांच्या पुढाकाराने! त्यांनी भारतात येऊन संस्कृतसह भारतीय भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला व त्यातून आपल्या आकलनानुसार आपल्या संशोधनाची मांडणी केली. इ.स. 1860नंतर भारतात जी नवशिक्षित पिढी तयार झाली, ती इंग्लिश शिक्षणाच्या माध्यमातून तयार झाली. त्याच प्रभावाखाली त्यांची विचारपध्दती विकसित होत गेली. त्यामुळे पाश्चात्त्य अभ्यासकांनी तयार केलेल्या चौकटीमध्येच भारतातले नवशिक्षित अभ्यासकसुध्दा भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायला लागले. पाश्चात्त्य अभ्यासकांनी मांडलेली भारतीय संस्कृतीबद्दलची सर्व प्रमेये भारतीय अभ्यासकांनी तशीच्या तशी स्वीकारली व आपला अभ्यास सुरू केला. पण त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या आकलनामध्ये अनेक नवे संभ्रम पैदा झाले. अद्यापही त्याच चौकटीत विचार करण्याची सवय असल्याने ते संभ्रमही आपल्या सर्वांच्या मनात दृढ झालेले आहेत.

अशाच काही संभ्रमांपैकी दृढमूल झालेला एक संभ्रम म्हणजे शैव व वैष्णव या दोन विचारधारांचा टोकाचा संघर्ष. या संघर्षाची ऐतिहासिक दस्तावेजाच्या पुराव्यांसकट फारशी मांडणी झालेली नाही. तरीसुध्दा त्या संघर्षाबद्दल लिहिताना त्याला आर्य विरुध्द द्रवीड, उत्तर विरुध्द दक्षिण, भद्रलोक विरुध्द बहुजन असे वेगवेगळे आयाम देण्याचेही काम गेल्या तीन शतकांमध्ये सातत्याने केले गेले. शैव आणि वैष्णव यांच्यातील कथित संघर्षाचा व्यापक मुद्दा बाजूला ठेवला, तरी श्रीविठ्ठलदेखील त्या संघर्षात ओढला गेला व त्यामुळे श्रीविठ्ठलाच्या उत्पत्ती-उपासनेबद्दल अनेक विवाद उभे राहिले, ही वस्तुस्थिती आहे. श्रीविठ्ठल हे दैवत शैव परंपरेतील की वैष्णव, हा वाद आजही चालू आहे. या वादावर तोडगा म्हणून श्रीविठ्ठल हे सांस्कृतिक महासमन्वयाचे एक प्रतीक आहे, हे सिध्द करण्याचा प्रयत्न डॉ. रा.चिं. ढेरेंसारख्या लोकसंस्कृतीच्या थोर अभ्यासकाने केला. तरीसुध्दा श्रीविठ्ठल या दैवताची उत्पत्ती व विकास याबद्दल निश्चिती होत नाही.

शोधू जाता मूळ

'श्रीविठ्ठल हे मुळातले शैव उपासनेच्या मार्गाने जाणारे लोकदैवत होते. त्याची लोकप्रियता बघून कालांतराने वैष्णवांनी हे दैवत स्वीकारले व ते पूर्णपणे आपलेसे केले' अशी मांडणी करणारा एक मोठा वर्ग आहे. श्रीविठ्ठल उपासनेचा प्रारंभ कधी झाला, याबद्दलसुध्दा अनेक मतमतांतरे असली तरी संत ज्ञानेश्वरांपासून विठ्ठल उपासनेला प्रतिष्ठेचे दिवस आले, अशी मांडणी करणारा एक मोठा वर्ग आहे. पण उपलब्ध होणारे ऐतिहासिक पुरावे, साहित्यातील उल्लेख, समाजमनात रुजलेल्या समजुती या सगळयाचा एकत्रित विचार केला, तर विठ्ठल उपासना सुरू झाल्याचा काळ हा संत ज्ञानेश्वरांच्याही खूप मागे जातो. संत ज्ञानेश्वर इसवी सनाच्या बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात (सन 1275 ते 1296) होऊन गेले. आजची विठ्ठल उपासना, त्यावर उभा राहिलेला वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्म या सर्वांचा प्रारंभ संत ज्ञानेश्वरांपासून झाला हे खरे मानले, तरी विठ्ठल उपासना आणि पंढरपूरची वारी या दोन्ही गोष्टी संत ज्ञानेश्वरांच्याही खूप आधीपासून अस्तित्वात होत्या, हे लक्षात ठेवले पाहिजे. पंढरपूरच्या श्रीविठ्ठल देवस्थानाचा उल्लेख करणारे इसवी सनाच्या अकराव्या, बाराव्या शतकातले शिलालेख उपलब्ध झाले आहेत. अगदी जुने - म्हणजे 'पांडुरंग पल्ली ग्राम' असा उल्लेख असलेले शके 438मधील (इ.स. 516) एक ताम्रपत्र कर्नाटकात उपलब्ध झाले असून हा 'पंढरपूर'चाच उल्लेख आहे, असा संशोधकांचा दावा आहे. त्याही पूर्वी महाभारतात व स्कंदपुराणामध्ये भीमा, चंद्रभागा व पंढरपूर यांचे उल्लेख असल्याचे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. महाभारतात भीमा व चंद्रभागा या नद्यांचा उल्लेख असला, तरी श्रीविठ्ठलाचा उल्लेख नाही. नंतरच्या स्कंदपुराणातसुध्दा विठ्ठलाचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे स्कंदपुराणानंतर केव्हातरी पंढरपूर व श्रीविठ्ठल यांचा उदय झालेला असावा.

 

स्कंदपुराणाची उपलब्ध असलेली सर्वात जुनी प्रत ही इ.स.च्या पाचव्या शतकातील आहे; परंतु या पुराणाची रचना इ.स.च्या पहिल्या-दुसऱ्या शतकात झाली असावी, असे सर्वसाधारणरित्या मानले जाते. पुराणांपैकी सर्वात जुने पुराण म्हणून वायुपुराण मानले जाते. वायुपुराणाचा रचना काळ हा इ.स.पूर्व 400 ते 300च्या सुमारातला मानला जातो. वायुपुराणात पंढरपूर अथवा विठ्ठल यांचे संदर्भ आढळत नाहीत. ज्येष्ठ संशोधक डॉ. रा.चिं. ढेरे यांनी स्कंदपुराणाच्या उत्तर खंडातील पांडुरंग माहात्म्य हेच सर्वात जुने संदर्भ साहित्य असल्याचे स्पष्टपणे दाखवून दिले आहे. स्कंदपुराणाची कालनिश्चिती काटेकोरपणे करता येत नसली, तरी ते पुराण गेली दोन हजार वर्षे तरी अस्तित्वात आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्या पुराणाच्या आधारे पंढरपूर हे स्थान व श्रीविठ्ठल हे दैवत किमान तेवढाच काळ अस्तित्वात आहे, असे म्हणायला हरकत नाही.

चौविसा वेगळा

या दोन हजार वर्षांत श्रीविठ्ठल या दैवताची संकल्पना विकसित होत गेली. भारतामध्ये शिव/शंकर, विष्णू व देवी या तीन मौलिक देवतांच्या आधाराने विविध देवता विकसित होत गेल्या. विष्णूच्या संदर्भात तर मुख्य दहा अवतार व चौदा उपअवतार असे एकूण चोवीस अवतार मानले गेले. देवीची अगणित रूपे विकसित झाली; तर शिवलिंग कायम राहिले, तरी हजारो नावांनी शंकराची मंदिरे उभी राहिली. पण इतके सगळे असतानादेखील श्रीविठ्ठल यापैकी कोणत्याही विकसन क्रमात बसत नाही. मराठी संतांनी त्याचा उल्लेख 'चौविसाहुनी वेगळा' असा करून वैष्णव देवता विकसन प्रक्रियेत विठ्ठल नाही, हे स्पष्ट केले आहे. विष्णूच्या मुख्य दहा अवतारांपैकी नववा अवतार बुध्द मानला जातो. पण महाराष्ट्रातील एक मोठी परंपरा विठ्ठलाला नववा अवतार मानते. अन्य एक परंपरा विठ्ठल आणि बुध्द अवतार एकरूप असल्याने मानते, तर दुसरी एक परंपरा बुध्दासह सर्व दहा अवतार हे विठ्ठलरूपी श्रीकृष्णाचे वेगवेगळे अवतार असल्याचे सांगते. तात्पर्य एवढेच की विष्णूच्या दहा किंवा चोवीस अवतारांमध्ये विठ्ठलाचा समावेश होत नाही. कोणत्यातरी मार्गाने त्या दशावतार परंपरेत विठ्ठलाला आणण्याचा प्रयत्न केला जातो. असे असले, तरी श्रीविठ्ठलाबद्दल जे काही ऐतिहासिक व पारंपरिक उपासना पध्दतीचे संदर्भ सापडतात, ते सर्व वैष्णव परंपरा सांगणारे आहेत आणि तरीही मुख्य वैष्णव धारेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व तामिळनाडूचा काही भाग हा मर्यादित प्रदेश वगळता देशाच्या अन्य भागात विठ्ठलाचे महत्त्व आढळत नाही.

सावळा सुंदर...

श्रीविठ्ठल हे मुळात गोप-गोपाळ, धनगर समूहाचे लोक/शैव परंपरेतील गौण लोकदैवत होते व जसजसा त्या दैवताचा प्रभाव वाढत गेला, तसतसे त्याचे उन्नयन झाले, वीरगळापासून वीरगण आणि वीरगणाचा विठ्ठल असा उत्क्रांती क्रम अनेक संशोधकांनी मांडला. श्रीविठ्ठल हे रूप प्रभावी ठरल्यानंतर नागर समाजाने ते स्वीकारले आणि त्याचे संस्कृतीकरण करून त्याच्यावर वैष्णव साज चढवला, असेही या संशोधक वर्गाचे ढोबळ प्रतिपादन आहे; परंतु हे प्रतिपादन तर्कशास्त्राच्या कसोटीवर टिकत नाही. गोप, गोपाळ, धनगर हे पशुपालक समूह सुरुवातीपासूनच श्रीकृष्णाशी जोडलेले आहेत. त्यामुळे शैव, वैष्णव ही साचेबध्द चौकट वापरायची झाली, तर पशुपालक समूहाचा देव श्रीकृष्ण, पर्यायाने विष्णू हेच अधिक तर्कसंगत आहे आणि नागर समाजाने विकसित केलेला श्रीविठ्ठल गेली दोन हजार वर्षे श्रीकृष्णाचा अवतार म्हणूनच स्वीकारलेला आहे. श्रीविठ्ठलाच्या उपलब्ध व प्रचलित मूर्तीमध्ये कोणतेही शैव लक्षण आढळत नाही. श्रीविठ्ठल मूर्तीचे जे रूपवर्णन केले जाते, ते पूर्णपणे वैष्णव धाटणीचे आहे. श्री ज्ञानेश्वरांपासून सर्व संतांनी विठ्ठलाचे वर्णन करताना तो श्रीकृष्णाचा अवतार आहे असेच वर्णन केले आहे. शिव आणि विष्णू या दोन देवतांची रूपे पूर्णपणे भिन्न आहेत. शिव/शंकर गौर वर्णन आहे. त्याच्या अंगाखांद्यावर सर्पालंकार आहेत, हातात त्रिशूळ आणि डमरू, डोक्यात चंद्र आणि गंगा आहेत, नंदी त्याचे वाहन आहे आणि सहपरिवार दाखवला गेल्यास पार्वती, श्री कार्तिकेय, श्री गजानन हे त्याच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. शंकराचे निवासस्थान भारताच्या उत्तर भागातील हिमायल आहे. याउलट विष्णू हा कृष्णवर्णीय! देशभरातील संतांच्या भाषेत 'सावळा' या एकाच शब्दाने ओळखला जातो. लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे, असे मानले जाते. पण शंकराप्रमाणे विष्णूचा परिवार समोर येत नाही. भारताच्या तीन बाजूंनी पसरलेल्या महासागरात कुठेतरी विष्णूचे निवासस्थान आहे. शंकराची पूजा करण्यासाठी शिवलिंगाचा वापर केला जातो, तर विष्णूची सगुण साकार पूर्णाकृती मूर्ती पूजेमध्ये वापरली जाते. शंकराचे अवतार फारसे मानलेले नाहीत. विष्णूचे दहा किंवा चोवीस अवतार मानलेले आहेत. त्यापैकी राम व कृष्ण यांच्या अर्धांगिनी आहेत. पण कृष्णाबरोबर त्याची मुख्य पत्नी रुक्मिणी हिच्याखेरीज काही ठिकाणी सत्यभामा आणि नंतरच्या काळातील राधा यांचेही पूजन केले जाते. शंकर आणि विष्णू या दोन्ही दैवतांच्या वरील प्राथमिक वैशिष्टयांचा विचार केला, तर त्यापैकी शंकराचे एकही वैशिष्टय विठ्ठलामध्ये आढळत नाही. उलट विष्णूची/कृष्णाची अनेक वैशिष्टये विठ्ठलामध्ये उतरलेली पाहायला मिळतात. अगदी काटेकोरपणे बोलायचे झाले, तर एक 'पांडुरंग' हे नाव एवढेच शंकराशी संबंध सांगणारे वैशिष्टय श्रीविठ्ठलामध्ये आहे. पण तेही पूर्ण विरोधाभासी आहे. कारण पांडुरंग म्हणजे गौरवर्णीय! संत ज्ञानेश्वरांपासून सर्व विठ्ठलभक्तांनी विठ्ठलाचे वर्णन 'सावळे सुंदर रूप मनोहर' असे केलेले आहे. श्रीविठ्ठल गौरवर्णीय असल्याचा उल्लेख अपवादानेदेखील आढळत नाही. श्रीविठ्ठलाच्या पूजाअर्चेचे जेवढे सोपस्कार आहेत, ते सर्वच्या सर्व श्रीकृष्ण कथांशी जोडलेले आहेत. त्यामुळे 'शैव गोतावळयातील लोकदैवताचे वैष्णवीकरण' ही संकल्पना तर्काच्या आधारावर टिकत नाही.

 

श्रीविठ्ठलाच्या अवताराशी जोडलेली कथा म्हणजे पुंडलिकाची कथा. पुंडलिक हा शिवभक्त होता, पण त्याला भेटण्यासाठी श्रीकृष्ण आला व त्याने विठ्ठलरूप धारण केले अशी कथा सांगितली जाते. पुंडलिकाचाच पाठभेद 'पुंडरीक' म्हणूनही सांगितला जातो आणि 'पुंडरिकापासून पांडुरंग' झाले असेही सांगितले जाते. पण 'पुंडरिक/पुंडलिक' हा शब्द मानला किंवा गृहीत धरला, तर पुन्हा त्या शब्दाचे मूळ विष्णूशीच जोडलेले आहे. 'मंगलम् भगवान विष्णू। मंगलम् गरुड ध्वजम्। मंगलम् पुंडरिकाक्षं मंगलाय तमो हरी।' या मंगलाचरणात 'पुंडरिक' हा शब्द विष्णूचे विशेषण म्हणून आलेला आहे. 'पुंडरिक' म्हणजे कमळ! हेही पुन्हा विष्णूचेच वैशिष्टय आहे आणि 'पुंडरिकाचे रूपांतर पांडुरंग' हे काही शब्द शास्त्रीयदृष्टया प्रस्थापित होत नाही. शिवाय भक्ताचे नाव देवाला मिळाले असे दाखवण्याचा हा प्रयत्न असला, तरी त्यातून 'विठ्ठल' या नावाचा उलगडा होत नाही, हा भाग वेगळाच! त्यामुळे फार फार तर एवढेच म्हणता येईल की, मुळातल्या पशुपालकांच्या दैवतांच्या विकसनाच्या कोणत्या तरी टप्प्यात विठ्ठलावर शैवमताचे आरोपण करण्याचा प्रयत्न झाला असावा. श्रीविठ्ठल हे शैव आणि वैष्णव या दोन्ही संप्रदायांच्या महासमन्वयाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन डॉ. रा.चिं. ढेरे यांनी केले आहे, ते मात्र वेगळया अर्थाने खरे आहे.

वाटचाल समन्वयाची

आपण सुरुवातीला चर्चा केल्याप्रमाणे विठ्ठलभक्तीच्या संप्रदायाला संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांनी आजचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. संत ज्ञानेश्वर हे आध्यात्मिकदृष्टया नाथपंथीय - म्हणजेच पर्यायाने शैव मतावलंबी होते. त्यांची गुरुपरंपरा आदिनाथ म्हणजेच शिवशंकरापासून सुरू होते. ज्ञानेश्वर महाराजांनी या गुरुपरंपरेचा वारंवार अभिमानाने उल्लेख केलेला आहे. मात्र शैव मतावलंबी असूनही आपल्या तत्त्वज्ञानाची मांडणी करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी निवड केली ती श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेची. त्यांनी ज्या भक्तिरचना लिहिल्या, त्याही विठ्ठलरूपी श्रीकृष्णाचे गुणगान करणाऱ्या!

संत नामदेवांचीही परिस्थिती जवळपास तशीच आहे. संत नामदेवांचे गुरू विसोबा खेचर हे त्यांच्या काळातील महान शिवभक्त म्हणून प्रसिध्द, तर नामदेव हे बालपणापासून विठ्ठलभक्त म्हणूनच प्रख्यात होते. संत नामदेव हे आपल्याइतकेच महान विठ्ठलभक्त आहेत हे विसोबा खेचर यांना माहीत होते व ते माहीत असतानादेखील विसोबा खेचर यांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले आणि त्यांच्याकडून गुरुमंत्र घेतल्यानंतरदेखील संत नामदेवांनी गुणगान केले ते विठ्ठलरूपी श्रीकृष्णाचेच! संत तुकोबारायांच्या बाबतीतही हेच घडले आहे. तथाकथित 'शैव-वैष्णव वैरभाव' इथे कुठेच आड आलेला नाही. ज्ञानेश्वर, नामदेवांपासून सुरू झालेली परंपरा आजतागायत त्याच पध्दतीने सुरू आहे आणि समन्वयाचे हे खरे रूप आहे असे नक्कीच म्हणता येईल.

पण याच निमित्ताने खूप चर्चा झालेल्या अथवा होणाऱ्या कथित/तथाकथित शैव-वैष्णव संघर्षाकडे वेगळया नजरेने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारतामध्ये शैव व वैष्णव या दोन संप्रदायांमध्ये भीषण संघर्ष होता, असे सर्वप्रथम ब्रिटिश व अन्य पाश्चात्त्य मिशनरी लेखकांनी मांडायला सुरुवात केली. कदाचित ही मांडणी करताना त्यांच्या नजरेसमोर युरोपमध्ये झालेला व आजही सुरू असलेला कॅथलिक व प्रोटेस्टंट या दोन ख्रिश्चन पंथांमधील संघर्ष असावा. पण थोडा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येते की, ख्रिश्चन धर्मीयांमधील संघर्षाच्या बरोबरीचा तर सोडाच, पण त्याच्या जवळपास जाणारा संघर्षदेखील भारतातील शैव व वैष्णव यांच्यामध्ये झालेला नाही. ज्यू व इस्लाम धर्मीयांशीदेखील तशीच तुलना करता येईल. ज्यूंमधील कर्मठ सनातनवादी व सुधारणावादी समूहांमध्ये पूर्वीच्या काळी झालेला व आजही सुरू असलेला संघर्ष कमालीचा रक्तरंजित आहे. इस्लाममधील शिया व सुन्नी यांच्यातील संघर्ष किंवा अहमदिया, वहाबी अथवा सुफी पंथीयांना मिळणारी वागणूक या सगळयांची तुलना जर केली, तर त्या पध्दतीचा संघर्ष शैव व वैष्णव किंवा भारतातील अन्य उपासना पंथीयांमध्ये होता, असे आढळून येत नाही; उलट 'एकं सत विप्रा: बहुधा वदंति' असे म्हणणारी भारतीय परंपरा एकाच ब्रह्मतत्त्वाचा आविष्कार 33 कोटी देवांमध्ये होतो, असे मानत आली आणि ही समन्वयाची भूमिका हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. म्हणूनच भगवान महावीर आणि गौतम बुध्द यांच्यापासून ते शंकराचार्यांपर्यंत आणि नंतरच्या काळात मध्वाचार्य, गुरू नानक, बसवेश्वर, चैतन्य महाप्रभू आदी सर्व विभूतींना लोकमान्यता मिळत गेली. श्रीविठ्ठलावर शैव परंपरेचे आरोपण करण्याचा प्रयत्न हा त्यातूनच झाला असावा का? हाही एक प्रश्न आहेच. नाहीतर 'पांडुरंग' नावाचा कृष्णवर्णीय देव का? हे कोडे शिल्लकच राहते.

 

कानडावो विठ्ठलू

खरे तर 'श्रीविठ्ठल' या नावापासूनच हे सनातन कोडे सुरू होते. 'विठ्ठल' या शब्दाची सांगितली जाणारी व्युत्पत्ती फारशी पटत नाही. 'विष्णु' या शब्दाचा प्राकृत अपभ्रंश 'विट्टु-विठ्ठल' झाला अशी मांडणी अनेकांनी केली असली, तरी ती भाषाशास्त्राच्या कसोटीवर उतरणारी नाही. 'रुक्मिणी'चे 'रखुमाई' किंवा 'राधा'चे 'राही' हे प्राकृत बदल भाषाशास्त्राला धरून व पटणारे आहेत. तसे 'विठ्ठल' या शब्दाबद्दल म्हणता येत नाही. 'विटेवर उभा असलेला देव म्हणून विठ्ठल' असेही एक स्पष्टीकरण दिले जाते; परंतु हे स्पष्टीकरणसुध्दा ओढून ताणून आणलेले स्पष्टीकरण वाटते.

'विठ्ठल' हे नाव आले कुठून? हे शेकडो वर्षे न सुटलेले कोडे आहे आणि त्यालाच जोडलेले कोडे आहे 'विठ्ठलाचे कानडीपण'! संत ज्ञानेश्वर 'कानडा वो विठ्ठलु। करनाटकु।' म्हणून नि:संदिग्धपणे सांगतात. नंतरचेही विविध विठ्ठलभक्त संत 'कानडा राजा पंढरीचा' असेच म्हणतात. कृष्णाचा अवतार असलेला श्रीविठ्ठल 'द्वारकेचे लेणे' असला तरी तो 'कानडा' आहे असेही म्हटलेले आहे. याचा अर्थ काय? कारण कर्नाटकात विठ्ठलाची मंदिरे आढळत असली, तरी विठ्ठल उपासनेचे केंद्र व प्रभावक्षेत्र प्रामुख्याने महाराष्ट्रच राहिलेले आहे. मग ह्या 'कानडी' संदर्भाचा अर्थ काय? 'विठ्ठल' या नावापासूनच हे संदर्भ सुरू होतात का? हे नावच मुळी कन्नड वा अन्य एखाद्या दाक्षिणात्य भाषेतून आले का? असे प्रश्नही निर्माण होतात. कारण तेलगू भाषेत 'बिड्डा' हा शब्द आहे. त्याचा अर्थ होतो सुपुत्र. या 'बिड्डा'चेच रूपांतर उत्तरेत 'बिट्टा - बेटा' असे झालेले आहे. या शब्दाचा 'विठ्ठल' या नावाशी काही संबंध आहे का? तामिळ भाषेतदेखील 'विठ्ठल' या नावाच्या व त्यामागील धारणांच्या जवळपास जाणारे अनेक शब्द आढळतात. उदा. तामिळ भाषेत 'विट्टपं' म्हणजे पृथ्वी, 'विट्टरम' म्हणजे तपस्येचे आसन, 'विट्टवर' म्हणजे संन्यासी, 'विट्टू' म्हणजे विष्णू' असे काही शब्द आहेत. त्यातून विठ्ठल हे नाव आलेले असण्याची काही शक्यता आहे का? तामिळ भाषेतच आणखी एक शब्द आहे - 'विट्टेरीदल' म्हणजे फेकून देणे. 'पुंडलिकाने वीट फेकून दिली व त्यावर देव उभा राहिला' ह्या कथेचा आणि 'विठ्ठल' शब्दाचा काही संबंध असावा का? कारण तामिळ भाषेतच नुसत्या 'विट्टेरी' या शब्दाचा अर्थ होतो 'नि:संग मनुष्य' ! विठ्ठल या देवनामाशी जोडलेल्या विविध संकल्पना तामिळ भाषेतील या विविध शब्दांच्या जवळ जाणाऱ्या आहेत. याच पध्दतीने कन्नड भाषेतील काही शब्ददेखील 'विठ्ठल' या नावाच्या जवळ जाणारे असू शकतात. तसेही 'पांडुरंग' हे नाव 'पंडरीगे' या कानडी शब्दातून आले, त्यापासूनच 'पंढरी-पंढरपूर' ही नामे आली असेही प्रतिपादन केले गेले आहे. तशाच पध्दतीचे विठ्ठलनामाशी जवळीक साधणारे शब्द कानडी भाषेत आहेत का? हे तपासले पाहिजे.

भेटी लागी जीवा

श्रीविठ्ठल हे एक सनातन कोडे मानले जाते ते याच वेगवेगळया कारणांमुळे! सर्वसाधारणत: हिंदू धर्मातील देवदेवता, संकटात सापडलेल्या भक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांच्या मदतीला धावतात. बहुतांश वेळेला त्या सशस्त्र असतात. कोणाला तरी संरक्षण देण्यासाठी, धर्मविरोधकांचे निर्दालन करण्यासाठी ते अवतार घेतात. विठ्ठलाच्या बाबतीत यापैकी काहीही घडत नाही. पुंडलिक व विठ्ठल ही विठ्ठलाच्या अवतरणाची कथा स्वीकारली, तर विठ्ठल हा अनामंत्रित म्हणून पुंडलिकांकडे गेलेला आहे. पुंडलिक हा विठ्ठलाचा, विष्णूचा भक्त नाही. ज्या वेळेला विठ्ठल पुंडलिकाकडे गेला, तेव्हा पुंडलिक ईश्वराचेही ध्यान करत नव्हता. तो कोणत्याही संकटात सापडलेला नव्हता, तर तो केवळ वृध्द आई-वडिलांची सेवा करण्यात मग्न होता. श्री विठ्ठलाला त्याचेच अप्रूप वाटले व तो पुंडलिकाला 'केवळ भेटण्यासाठी' गेला. अशा पध्दतीने 'केवळ भेटण्यासाठी भक्ताकडे जाणे' हे श्रीविठ्ठलाच्या संदर्भात वारंवार घडलेले आपणास पाहायला मिळते. भक्त पुंडलिकाची एकूण कथा व त्यातून श्रीविठ्ठलाच्या अवतरणाचे दिलेले स्पष्टीकरण हे भाविक मनाने शेकडो वर्ष स्वीकारलेले असले, तरी ते स्पष्टीकरण तर्काच्या कसोटीवर उतरत नाही. 'श्रीविठ्ठल' हा देव असला, तरी संपूर्ण नि:शस्त्र आहे. एका अर्थाने तो पूर्ण निष्काम आहे. भक्त त्याच्याकडे काही मागत नाहीत, त्याला नवस करीत नाहीत. नवसाला पावण्याची जबाबदारी श्रीविठ्ठल घेत नाही. केवळ उराउरी भेटणे व सुखदु:खाच्या, शिळोप्याच्या गप्पा-गोष्टी करणे, एवढाच भक्त व देव यांच्यातील संबंध येथे आहे. अपवाद म्हणून श्रीविठ्ठल कधी जनाबाईला दळायला मदत करतो किंवा कैदेत पडलेल्या दामाजींची दंड भरून सुटका करतो. पण हे त्याचे आविष्कार पूर्णपणे मानवी आहेत. एकूणच श्रीविठ्ठलाच्या चरित्रात अमानवी किंवा अतिमानवी चमत्कारांना फारसे स्थान नाही. देवाचे हे स्वरूप, दैवताची ही संकल्पना आणि देव व भक्त यांच्यातील अशा प्रकारचे संबंध पूर्णपणे अनोखे आहेत. केवळ हिंदू धर्मातीलच नव्हे, तर बहुधा जगातल्या कोणत्याही धर्मात अशा प्रकारचे 'देव निधान' सापडणार नाही. म्हणून कोडे हे पडते की, ही संकल्पना जन्माला आली कशी? कोणत्या प्रदेशात? एवढया विस्तीर्ण भूप्रदेशात तिचा विस्तार कसा झाला? आणि जवळपास 2000 वर्षे अनेक प्रकारचे चढ-उतार, आक्रमणे आणि विरोध या सगळयांना तोंड देत ती जिवंत कशी राहिली?

पांडुरंग/विठ्ठल हे दैवत व त्याच्या भक्तांचा संप्रदाय या दोहोंचा इतिहास किमान 2000 वर्षांचा असावा, असे दिसते. जैन व बौध्द या तत्त्वज्ञानांचा उगमही त्याच सुमारास किंवा काहीसा अगोदर झाला होता. श्रीविठ्ठलाला 'महावीर' व 'बुध्द' ही दोन्ही विशेषणे लावली जातात, त्यामागील कारणे काय? जैन अथवा बौध्द तत्त्वज्ञानाचे प्रणेते म्हणून भगवान महावीर आणि गौतम बुध्द या व्यक्तींचे नाव जोडलेले आहे; परंतु तसे कोणतेही एका व्यक्तीचे नाव श्रीविठ्ठलभक्तीशी जोडलेले नाही. साधारणत: याच सुमारास, नाथ संप्रदायदेखील अस्तित्वात आला. या नाथ संप्रदायाचे आणि विठ्ठलभक्तीचे नाते मात्र घट्ट आणि स्पष्ट आहे. संत ज्ञानेश्वरांसह अनेक विठ्ठलभक्त संतांची गुरुपरंपरा नाथ परंपरेशी जोडलेली आहे. नाथ संप्रदाय आणि विठ्ठलभक्ती यांचे नाते कसे जोडले गेले, हेही एक कोडे आहेच! संत ज्ञानेश्वरांच्या पूर्वीचे विठ्ठलभक्तीसंबंधीचे साहित्य उपलब्ध नाही. तरीही त्यांच्यापूर्वी किमान हजार-बाराशे वर्षे विठ्ठलभक्तीचा संप्रदाय अस्तित्वात होता, हे तर स्पष्ट दिसते. ते अस्तित्व कशाच्या आधारावर टिकून होते? विठ्ठलभक्तीमधला आणखी एक उत्सुकता जागी करणारा धागा आहे मधुरा भक्तीच्या वेगळया आविष्काराचा! विठ्ठलाला 'आई' मानणे किंवा स्वत:ला त्याची 'लेक' मानणे हे येथे सरसकट पाहायला मिळते. संत नामदेव तर 'येई वो विठ्ठले' या अभंगात विठ्ठलाचे वर्णन 'जगत्जननी जगदंबा' म्हणून करतात. मग हा शाक्त प्रभाव म्हणायचा का? असे एक ना अनेक कूटप्रश्न आपल्याला सतावू लागतात.

श्रीविठ्ठल व त्याचा भक्तिसंप्रदाय या दोहोंचा जेवढा अभ्यास करत जाऊ , तेवढे हे व असे प्रश्न वाढत जातात. कोडे सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचे होत जाते आणि 'श्रीविठ्ठल हे एक सनातन कोडे आहे' एवढेच वास्तव आपल्या लक्षात येते.

madhav.bhandari@yahoo.co.in